06 July 2020

News Flash

मनोरंजनाचा जीवघेणा तणाव!

मालिकेचं भरपूर तासांचं शूट, नाटकाच्या दौऱ्यांची धावपळ, सुट्टी नाही, अशा अनेक गोष्टींमुळे मनोरंजन क्षेत्रात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. याला जबाबदार कोण? एका वेळी अनेक कामं

| November 21, 2014 01:29 am

lp21मालिकेचं भरपूर तासांचं शूट, नाटकाच्या दौऱ्यांची धावपळ, सुट्टी नाही, अशा अनेक गोष्टींमुळे मनोरंजन क्षेत्रात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. याला जबाबदार कोण? एका वेळी अनेक कामं करणारे कलाकार, भरपूर तास काम करवून घेणारी चॅनल्स, की इंडस्ट्रीची लाइफस्टाइलच.. या सगळ्याबाबत सांगताहेत कलाकार, निर्माते आणि मानसोपचारतज्ज्ञ-

मराठी मनोरंजन क्षेत्राला सुगीचे दिवस आले, असं सगळे म्हणतायत. नाटक, सिनेमा, मालिका या तिन्ही माध्यमांनी कात टाकली, असंही आपण म्हणतो. अनेक नवे कलाकार येतायत. वेगवेगळ्या विषयांवर लेखन होतंय. विविध प्रयोग होतायत. हिंदी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते मराठीकडे वळताहेत. प्रगती तर होतेच आहे. खूप पुढे जातोय; पण या पुढे जाण्याच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे इथली मंडळी आरोग्याची हेळसांड करू लागली आहेत याचे एकेक उदाहरण समोर येऊ लागले आहे. मध्यंतरी ‘प्यार का दर्द है मीठा मीठा, प्यारा प्यारा’ या हिंदी मालिकेतल्या अबीर गोस्वामी या कलाकाराचं जिममध्ये असताना हृदयविकाराने निधन झालं. वय होतं ३७ र्वष. आणखी उदाहरण म्हणजे झी टीव्हीच्या ‘मिसेस् कौशिक की पाच बहुए’ या लोकप्रिय मालिकेत एका सुनेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रुबिना शेरगील हिचं सेटवरच अस्थमाचा अटॅक (attack) येऊन वयाच्या २९ वर्षी निधन झालं. अशी अनेक उदाहरणं मालिकाविश्वात अलीकडच्या काही वर्षांत होऊन गेली. कारण केवळ हृदयविकार हे नसलं तरी जाण्याचं वय हे नक्कीच नाही. यातलं एक ताजं उदाहरण म्हणजे ‘जय मल्हार’ या मालिकेतली हेगडी प्रधान ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अतुल अभ्यंकर या कलाकाराचं. वयाच्या ४१ वर्षी हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचं निधन झालं. ही उदाहरणं वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की, अशा आजाराने जाण्याचं वय त्यांचं नक्कीच नव्हतं. मग याचं कारण काय.. तणाव, कामाचे तास, शरीराला न मिळणारी विश्रांती, ‘काही होत नाही’ असा अ‍ॅटिटय़ूड, अशी अनेक कारणं. खरं तर हा त्रास इतर अनेक क्षेत्रांमध्येही जाणवतो; पण मनोरंजन क्षेत्रातल्या बदलत्या कामाच्या पद्धतीमुळे या क्षेत्रातल्या अशा घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय.

lp22कशाला महत्त्व देतोय याचं भान ठेवा
एकाच वेळी एकापेक्षा अधिक कामं हाताशी घेऊन ती करणं हे चुकीचं आहे. यामागची आर्थिक कारणं पटत असली तरी पैशांपेक्षा आपला जीव महत्त्वाचा असतो हे विसरून चालणार नाही. कलाकारांनी याची काळजी घ्यावी. निर्माते म्हणून आम्ही नियोजनानुसार काम करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञांचा विचार नक्कीच केला जातो.
श्रीरंग गोडबोले, निर्माते.

पूर्वीसारखं टीव्हीवर एकच चॅनल आता नाही. महिन्याला एकच सिनेमा प्रदर्शित होणं हेही नाही. आता आहे ते एकाच वेळी दिसणारी अनेक चॅनल्स, एकाच दिवशी रीलीज होणारे सिनेमे आणि एकाच वेळी अनेक नाटकांमधून काम करणारी कलाकार मंडळी. ही स्पर्धा आता अटीतटीची होऊ लागली आहे आणि जीवघेणीही. या क्षेत्रातल्या कलाकारांमध्ये कितीही ‘निरोगी’ स्पर्धा असली तरी ते कलाकार मात्र ‘निरोगी’ आयुष्य जगताना दिसत नाहीत. अमुक मालिकेचं शूट झालं की, नाटकाचा प्रयोग, प्रयोग झाला की पुन्हा शूट, मधल्या वेळेत सिनेमाचं डबिंग. हे चक्र सतत सुरूच. मग एक दिवस या चक्रात कलाकार अडकतोच. मुळात एकाच वेळी तिन्ही क्षेत्रांत दिसण्याची कलाकारांची धडपड ही त्यांच्याच आरोग्यासाठी मारक ठरू शकते, याचा सोयीस्कररीत्या विसर पडतोय. हा खटाटोप आर्थिकदृष्टय़ा पटणारा असला तरी त्यामुळे स्वत:चाच बळी जातोय, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
सिनेमा, नाटक आणि मालिका या सगळ्यांत व्यग्र शेडय़ुल असतं ते मालिकांचं. बारा तासांच्या शिफ्ट्स, गरज असल्यास त्यात काही तासांची वाढ होणं, त्याहून अधिक गरज असल्यास डे-नाइट शिफ्ट म्हणजे सलग एक दिवस-रात्र शूट करणं, महिन्याचे २७ ते २८ दिवस काम करणं या सगळ्या गोष्टी मालिकांमध्ये वारंवार सुरू असतात. आश्चर्य म्हणजे, काही अपवाद वगळता अनेक निर्माता कंपन्यांमध्ये अशा प्रकारे काम चालतं. कलाकार, तंत्रज्ञ-निर्माती संस्था-चॅनल अशी एक साखळी आहे. टीआरपी नावाच्या भुताने चॅनलला पछाडलंय. आणि चॅनलने निर्माता कंपन्यांना. पर्यायाने चॅनलला टीआरपी मिळवून देण्याचं शिवधनुष्य पेलणारे निर्माते कलाकार आणि तंत्रज्ञांकडून भरपूर तास काम करून घेतात. यात भरडला जातो तो कलाकार आणि तंत्रज्ञ. इथे कुठेतरी निर्मात्यांनी चॅनलला ‘नाही’ म्हणणं आवश्यक आहे. याबाबत निर्माते श्रीरंग lp29गोडबोले म्हणतात, ‘‘निर्माता कंपनीचे काम सुरळीत, नियोजनाप्रमाणे व्यवस्थित सुरू असेल तर चॅनल यामध्ये आडकाठी करत नाही. शेवटी चॅनलला मालिका चांगली होणं अपेक्षित असतं. आमच्या निर्माता कंपनीत आम्ही आठवडय़ाचे फक्त चार दिवस शूट करतो. बाकीचे दिवस सुट्टी असते. कधी अगदीच गरज भासल्यास जास्तीचं शूट करावं लागतं. बारा तासांच्या शिफ्ट्सही वाढत नाहीत. या सगळ्यात कलाकारांसह तंत्रज्ञही तितकेच भरडले जातात, कारण काही वेळा कलाकार काही सीन्समध्ये नसतात. त्यावेळी ते आराम करू शकतात; पण तंत्रज्ञ हे सतत त्याचं काम करतच असतात.’’ इंडस्ट्रीच्या लाइफस्टाइलबद्दलही ते सांगतात, ‘‘इंडस्ट्रीत धकाधकीची लाइफस्टाइल आहे. व्यसनाधीन लोक हा जणू शाप आहे इंडस्ट्रीला. पुरेशी झोप घ्यायची नाही. सतत काम करायचं. या सगळ्याचं कलाकारांनी भान ठेवायला हवं. काही कलाकारांना सगळंच हवं असतं. एका वेळी दोन-तीन कामं घेतात. कशासाठी? पैशांसाठी.. पैशांपेक्षा जीव महत्त्वाचा असतो हे लक्षात घेतलं पाहिजे.’’ अनेक कलाकार मालिकेच्या शूटच्या आधी किंवा नंतर असा व्यायाम करतात. त्यामुळे त्यांची निश्चित अशी वेळ नसते. म्हणून सेटवर कलाकारांच्या व्यायामासाठी काही सुविधा करणार का, यावर गोडबोले असं म्हणाले, ‘‘मराठी मालिकांचं बजेट खूप नसतं. त्यामुळे सेटवर कलाकारांच्या आरोग्याच्या काळजीसाठी जिम किंवा तत्सम काही उपाययोजना करणं आर्थिकदृष्टय़ा परवडणारं नसतं, पण निर्माता कंपनी म्हणून कलाकारांच्या मागे फारसं न लागता त्यांच्या सोयीनेही नियोजन आम्ही करू शकतो.’’

lp23तणाव कमी करण्याचे मार्ग अवलंबवावे
प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगवेगळी असते. त्यामुळे कसं जगायचं याचे ठरावीक नियम असू शकत नाहीत. गेली तीन र्वष मी रोज आठ तासांपेक्षा कमीच झोपतोय, पण मला कुठलंही व्यसन नाही किंवा मी कोणत्याही लेट नाइट पार्टीज करत नाही. कामाचा तणाव असतोच; पण तो कमी करण्याचे विविध मार्ग अवलंबवावे. मी तणावापासून सुटका करण्यासाठी स्विमिंग करतो.
चिन्मय मांडलेकर, अभिनेता, (तू माझा सांगाती)

निर्माते श्रीरंग गोडबोलेंच्या नियोजनाच्या मुद्दय़ाला अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी दुजोरा दिला. ते म्हणतात, ‘‘मालिकांमध्ये डे-नाइट अशी शिफ्ट करण्याची गरजच नाही. व्यवस्थित शूटिंगचं नियोजन केलं तर भरपूर तास आणि महिन्याचे जवळपास सगळेच दिवस शूट करण्याची वेळच येणार नाही, पण दुर्दैवाने असं होत नाही. चॅनल्स नियोजन करत नाहीत. अनेक गोष्टींसाठी चॅनलची संमती मिळणं आवश्यक असतं. पण ते उशिराने होत असतं; एपिसोड्सची बँक केली जात नाही. त्यामुळे जोवर या मूलभूत गोष्टी सुधारल्या जात नाहीत तोवर विनाकारण जास्त तासांच्या शिफ्ट्स या सुरूच राहणार.’’ एकाच वेळी कलाकार अनेक गोष्टींच्या मागे लागतो असा त्याच्यावर आरोप होत असतो. याबाबत चिन्मय सांगतात, ‘‘एका दिवसात मीही सिनेमाचं शूट, मालिकेचं शूट, मग नाटकाचा प्रयोग केला आहे. ते नक्कीच हानीकारक आहे; पण असं वेळापत्रक टाळणंच योग्य. कलाकारांनी ‘नाही’ म्हणणं खूप गरजेचं आहे. दोन गोष्टी सहज शक्य असतील तर करायला हरकत नाही; पण शक्य नसल्यास ओढूनताणून त्या जमवून आणणं आणि आरोग्याची हेळसांड करणं हे चुकीचंच आहे. मी आता मालिकेचं शूट झालं की, जवळपास नाटकाचा प्रयोग असेल तरच करतो अन्यथा नाही सांगतो.’’ रोजच्या कामाच्या तणावामधून बाहेर पडण्याचे विविध मार्ग असल्याचंही ते सुचवतात. तसंच नियमित शारीरिक चाचणी करण्याचाही मुद्दा ते मांडतात, ‘‘वयाची पस्तिशी पार केल्यानंतर प्रत्येकानेच शारीरिक चाचणी करायलाच हवी. तसंच तणावातून बाहेर पडण्यासाठी आपल्या आवडीची कामं करावी, छंद जोपासावा. मोबाइलमुळे जीवन सोपं झालंय, असं आपण म्हणतो, पण खरं तर ते आणखी कठीण होऊन बसलंय असं मला वाटतं. त्यात आपला सगळ्यात जास्त वेळ जात असतो.’’

lp25मी सहभागी होईन
मालिकांच्या शूटच्या जास्तीच्या तासांचा अनेकांना त्रास होत असतो; पण हे कुठे तरी थांबलं पाहिजे. याबाबत इंडस्ट्रीमधल्या कोणी पुढाकार घेतला तर मी नक्कीच त्यात सहभागी होईन. माझ्या परीने मला शक्य तेवढं योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन.
शशांक केतकर, अभिनेता (होणार सून मी ह्या घरची)

‘सुपारी’ नावाचं फॅड सध्या इंडस्ट्रीत वेगाने पसरतंय. मालिकेत लोकप्रिय झालात की, कार्यक्रमांच्या आमंत्रणाची रांग लागते. सिनेमात झळकलात, आली कार्यक्रमांची ऑफर. सुरुवातीला याची किंमत कळत नव्हती; पण आता या कार्यक्रमांसाठी जाण्याची ‘किंमत’च मोठी होऊ लागली आहे. दहीहंडीपासून ते पुरस्कार सोहळ्यांमध्ये गाण्यांवर थिरकण्यापर्यंत कलाकारांची मागणी वाढली. छोटय़ा कार्यक्रमांमध्येही यांची किंमत वाढू लागली. अशा ऑफर्स आल्याने आर्थिक मोह होणं अगदीच स्वाभाविक आहे. आपलं मीटर चालू राहतंय ना, मग करू जमेल तोवर, असं म्हणत या ‘सुपारी’चा विडा ते उचलू लागले. मालिका, सिनेमा, नाटक यामध्ये आता भर पडली ती या सुपारीची. त्यामुळे एकाच वेळी तिन्ही ठिकाणी काम करणारे कलाकार आता या सुपारीच्या कार्यक्रमातही दिसू लागले. यावर अभिनेत्री लीना भागवत त्यांचं परखड मत व्यक्त करतात. त्या म्हणतात, ‘‘सुपारीचं फॅड वाढलंय हे खरंय. पण कशाला हव्यात या सुपाऱ्या? कोणी सुरुवात केली या सगळ्याची? आधी हे सगळं कुठे होतं. पण या सगळ्याची गरज नाही असं मला वाटतं. जिवाची हेळसांड करत तर नाहीच नाही.’’ कामाच्या तणावाबाबत त्यांनी आणखी काही मुद्दे मांडले. ‘‘एखाद्याला हृदयविकाराचा झटका येईपर्यंत थांबूच नये असं मला वाटतं. प्रकरण अ‍ॅसिडिटीपर्यंत गेलं की लगेच त्यावर उपाय करावेत. तहान लागली की विहीर खोदण्यापेक्षा आधीच ती खोदून ठेवली की तहान लागेल तेव्हा तुम्ही ते पाणी पिऊ शकता. कामाच्या जास्तीच्या तासांमागची कारणंही वेगवेगळी असतात. पटकथा उशिरा येणं, काही कलाकारांचं लवकर घरी जाणं, त्यासाठी इतर कलाकारांना बसवून ठेवणं; अशी अनेक कारणं त्यामागे असतात. काही कलाकारांचे सीन्स हे शिफ्टच्या सुरुवातीला आणि एकदम शेवटी असे असतात. त्यामुळे मधला वेळ ते बसून असतात. शिफ्ट लांबण्यामागे कोणतं एक कारण नाही; तर अशी अनेक कारणं आहेत. ती शोधणं गरजेचं आहे,’’ असं त्या म्हणतात. कलाकारांना गृहीत धरणं चुकीचं आहे, असंही त्या नमूद करतात.
अन्याय होऊनही कलाकार त्याच त्या चक्रात अडकून असतात. आपण याविरुद्ध आवाज उठवला तर मालिकेतून काढून टाकण्याची भीती प्रत्येक कलाकाराच्या मनात असते. त्यामुळे चालतंय तसं चालवू हा अटिटय़ूड कालांतराने महागात पडतो. कलाकार काम करतोय म्हणून काम करवून घेणाऱ्याचंही फावतं. हाच मुद्दा अभिनेता शशांक केतकर मांडतो, ‘‘कलाकारांनीच निर्मात्या कंपनी/ आस्थापनांना जास्तीचं काम करण्याची सवय लावून दिली आहे. कारण जादा तास काम केल्यावर त्याचे पैसे मिळतात; पण कशासाठी हा खटाटोप? लवकर काम आटोपलं तर घरी जाऊन आराम केला पाहिजे.’’ शशांक सध्या ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका आणि ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक करतोय. खरं तर मालिका आणि नाटक एकदम करणं म्हणजे तारेवरची कसरत असते; कारण मालिकांचं बारा तासांचं शूट आणि नाटकांचे वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे, पण याचा एक फायदाही होत असल्याचं शशांक सांगतो, ‘‘नाटकाचा प्रयोग असला की, मालिकेचं शूट वेळेवर संपतं. ती वेळ पुढे खेचता येत नाही; पण नाटय़गृहापर्यंत वेळेत पोहोचू का अशी धाकधूक मनात असते.’’ एखाद्या कामासाठी नकार देण्याविषयी मत मांडताना तो स्पष्टपणे कबुली देतो. तो म्हणतो, ‘‘सुदैवाने मला मालिकेच्या शूटबाबत नकार देण्याची फारशी वेळ आली नाही. तरी ज्या वेळी नकार देण्याची गरज होती त्या वेळी मला फक्त एक-दोनदाच तो नकार द्यायला जमलं आहे. प्रामाणिकपणे सांगतो ते मला फारसं जमलं नाही.’’ मालिका नवी असली की, सगळेच दिवस शूट करणं गरजेचं असतं. मालिका जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत रोज शूट करणं हा नियमच झालाय. ‘का रे दुरावा’मधली अदिती अर्थातच सुरुची अदारकर हे मान्य करते. ती म्हणते, ‘‘मालिकेचं शूट हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. त्यात अनेक बाबींचा समावेश असतो. त्यामुळे नियोजन करून ते काम केलं तर चांगलंच. शिफ्ट्स लांबण्याची काही कारणं असू शकतात. कधी पटकथेची अडचण असू शकेल, तर कधी लोकेशन न मिळण्याची. आमची मालिका नवीन आहे. त्यामुळे सध्या आम्ही रोजच शूट करतोय. सुट्टी हवी असेल तर मालिकेच्या शिफ्टनुसार जेव्हा शक्य असेल तेव्हा मिळते; पण या सगळ्या गोष्टी मी या क्षेत्रात आल्यानंतर स्वीकारल्या आहेत. कामाचा स्ट्रेस नक्कीच जाणवतो; पण गोष्टी स्वीकारल्यामुळे कदाचित त्याचा त्रास कमी होत असेल.’’

lp24शरीराचं वेळापत्रक पाळणं गरजेचं…
सर्वसाधारणपणे ‘अटेंशन सिकिंग’ ही अनेकांची समस्या असते. म्हणजे सगळ्यांनी आपल्याकडे बघावं, लक्ष द्यावं, अशी अनेकांची अपेक्षा असते. एखाद्या ठिकाणी गेलो तर सगळ्यांमध्ये आपण उठून दिसलो पाहिजे, अशीही त्यामध्ये भावना असते. यासाठी चांगलं ‘दिसणं’ गरजेचं हे लक्षात येतं. चांगली फिजिक (physic) असावी म्हणून अनेक जण जिमला जायला सुरुवात करतात. ‘मित्र करतात म्हणून मलाही करायचं’ हा दृष्टिकोन तर आजकाल सगळ्याच बाबतीत बघायला मिळतो. त्यामुळे इथेही मित्र जिमला जातात म्हणून अनेक जण जिमचा मार्ग स्वीकारतात. अशा मानसिकतेमुळे मग ‘फिटनेस’ हा मूळ हेतू बाजूला राहतो आणि त्याची जागा ‘बॉडी बिल्डर’सारखं दिसावं हा हेतू घेतो. तुमची मागणी जशी तसे तुम्हाला जिममधले मार्गदर्शक सूचना करतात. काही वेळा त्या तुमच्या शरीराला फायदेशीर असतात, तर काही वेळा नसतात; पण त्याचं आकर्षण असल्यामुळे त्या अमलात आणल्या जातात; पण कालांतराने त्याचा हृदयावर त्रास होतो. बारीक मुलं जाड होण्यासाठी जिमला जातात. वजन वाढवण्यासाठी आणि मसल वाढवण्यासाठी (याला नेमका शब्द काय लिहावा?) विशिष्ट इंजेक्शन्सही सुचवली जातात. दोन्ही प्रकारांसाठी दोन वेगवेगळी इंजेक्शन्स असतात. झटपट परिणामांसाठी अशा इंजेक्शन्सचा वापर केला जातो. त्यांच्या दुष्परिणामावर मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं जातं. आपण घेतोय त्या इंजेक्शनचे फायदे-तोटे लक्षात घेतले पाहिजेत. यावर खोलवर विचार होणं गरजेचं आहे. कामाचं जसं घडय़ाळ आहे तसंच आपल्या शरीराचंही वेळापत्रक असतं. अमुक वाजता उठावं, झोपावं, जेवावं, व्यायाम करावा, विश्रांती घ्यावी असं या वेळापत्रकात असतं; पण त्यानुसार कृती घडत नसल्यामुळे शरीराची हेळसांड होते.
ताणतणाव हे मानसिक असतात. त्यांच्यामुळे माणूस डिप्रेशनमध्ये जातो, फ्रस्ट्रेशन येतं हा समज चुकीचा आहे. तणाव हा शारीरिक त्रासातूनही कळून येतो. एखाद्या माणसाच्या मनात तणाव असला की त्याच्या शरीरातल्या कमजोर यंत्रणेवर आघात होतो. मानसिक तणाव आहे असं केवळ न म्हणता तो कमी कसा होईल यासाठी एकेक पाऊल पुढे गेलं पाहिजे. तणाव दूर करण्यासाठी धूम्रपान, मद्यपान करणं, इतरांवर चिडचिड करणं, वेगळ्या पद्धतीने फ्रस्ट्रेशन बाहेर काढणं, मूड खराब ठेवणं हे सगळे मार्ग चुकीचे आहेत. याउलट आनंदी राहून त्या तणावाशी लढता आलं पाहिजे. दोन टोकाची माणसं असतात. छातीत दुखलं की आयसीयूमध्ये जाणारे काही लोक असतात तर काही केवळ अ‍ॅसिडिटी म्हणून दुर्लक्ष करणारे असतात. पण त्यावेळच्या दुखण्याची तीव्रता लक्षात घेऊन उपाययोजना करायला हवी. हा तणाव केवळ नोकरी करणाऱ्या किंवा मोठय़ा माणसांच्या आयुष्यातच असतो असं नाही. शाळेचा मुलगाही तणावात असतो. काहींना पैसे कमावण्याची चिंता असते तर काहींना नोकरी मिळत नाही याची काळजी असते. रिलेशनशिपशी निगडित तणाव असणाऱ्या मुलांची संख्या सध्या खूप आहे. हा वयोगट १५ ते २२ वर्षांचा आहे. रिलेशनशिपमध्ये असणं चुकीचं नाही, पण ते योग्यप्रकारे हाताळता आलं पाहिजे. आयुष्यात त्या त्या टप्प्यावरच्या प्राधान्यक्रमांना महत्त्व देता आलं पाहिजे.
सिने इंडस्ट्रीत जिमला जाण्याचं प्रमाण खूप आहे. सतत सगळ्यांसमोर पडद्यावर राहायचं असल्यामुळे वजन वाढू नये यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. त्यासाठी फॅट्सची लेव्हल शून्य करतात. डाएटचे कठोर नियम पाळतात. त्यात त्यांची झोप कमी असते आणि काम जास्त तासांचं असतं. या सगळ्या गोष्टी शरीराला हानीकारक असतात. स्क्रीनवर उत्तम दिसण्यासाठी केला जाणारा हा खटाटोप अप्रत्यक्षपणे त्यांच्याच शरीरासाठी धोक्याची घंटा असते. प्रत्येक क्षेत्राची एक मानसिकता असते. तशीच सिने इंडस्ट्रीचीही आहे. धूम्रपान, मद्यपान, पार्टी हे यात सगळं येतंच. काही वेळा विनाकारण कामाचे जास्तीचे तास, उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्टी, एकाच वेळी अनेक काम करणं हे उत्तम स्वास्थाच्या विरुद्ध दिशेच्या गोष्टी आहेत. अनेकदा कलाकार चौदा तास काम झाल्यावर तास-दीड तास व्यायाम करण्यासाठी जिमकडे वळतात. पण हे चुकीचं आहे. कारण दिवसाचे चौदा तास काम केल्यानंतर तुमच्या शरीराला आरामाची गरज असते. तुम्ही आठ तास काम करून मग तासभर व्यायामाला दिला तर हरकत नाही. विशिष्ट व्यक्तिरेखा साकारण्यासाठी उत्तम शरीर असणं गरजेचं असतं. कलाकार अशा वेळी वेगवेगळी इंजेक्शन्स घेतात. पण त्यामुळे नुकसानच होतं हे लक्षात घ्यायला हवं. या क्षेत्रात आता फक्त मद्य, धूम्रपान अशी व्यसनं नसून इतरही काही ड्रग्सच्या (?) च्या व्यसनांचा समावेश आहे. याला आळा घालण्याचं काम ते स्वत:च करू शकतात. त्यानेही नुकसानच होतं ही महत्त्वाची गोष्ट विसरता कामा नये.
डॉ. देवेंद्र सावे, एमडी, मानसोपचारतज्ज्ञ.

कलाकारांकडून काम करवून घेतलं जातं; पण या स्पर्धेत उतरायचं की नाही हे ज्याने-त्याने ठरवलं पाहिजे आणि उतरलंच तर सारासार विचार करूनच उतरावं. निर्माते राकेश सारंग सांगतात, ‘‘कामाच्या तणावाची कारणं शोधणं अत्यावश्यक झालं आहे. या क्षेत्रात उतरता तेव्हा बारा-चौदा तास काम करण्याची तयारी असावी. किती तास काम करावं हाही मुद्दा नाही. ते करण्यासाठी तुमच्यात तेवढी ताकद असली पाहिजे हा मुद्दा आहे. ती असण्यासाठी तुम्ही स्वत:च्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे.’’ पटकथेवर चॅनलची संमती मिळणं आवश्यक असतं; पण काही चॅनल्सकडून ते शेवटच्या क्षणाला होत असल्याचा आरोप सारंग करतात. ‘‘काही चॅनल्स खूप उशिरा पटकथेवर संमती दर्शवतात. शेवटच्या क्षणाला काही बदल सुचवतात. हे जीवघेणं आहे. मला हे पटत नाही, कारण मी निर्माता असलो. प्रत्यक्षपणे मी त्यात भरडला जाणार नसलो तरी माझे कलाकार तिथे काम करणार असतात,’’ असं ते स्पष्टपणे सांगतात. अशा पद्धतीने काम करणं अनेकांना पटत नसलं तरी ते लाळघोटेपणा करून निमूटपणे सहन करतात. तसं होता कामा नये, असंही ते आवर्जून सांगतात. राकेश सारंग यांचा निर्माते म्हणून अनुभव खूप वर्षांचा आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवात त्यांनी कधीच चॅनलचा दबाव, दडपण आलेलं नसल्याचं स्पष्ट केलं. ‘‘तुम्ही तुमच्या कामात चोख असला की, समोरचाही तुमच्या पद्धतीने काम करतो. मग अडचणी येण्याचं प्रमाण कमी होतं,’’ असं ते म्हणतात.

lp26‘नाही’ म्हणायला सुरुवात
‘नाही’ म्हणणं ही आज गरज झाली आहे. मी दुसरं कोणी असं ‘नाही’ म्हणायला सुरुवात करेल याची वाट बघत बसले नाही. मी आता मला शक्य नसल्यास नकार द्यायला सुरुवात केली आहे. नकार देण्याची पद्धत मात्र योग्य असायला हवी. त्यामागची कारणं समोरच्याला पटवून देण्याचं कौशल्य तुमच्यात हवं.
लीना भागवत, अभिनेत्री (होणार सून मी ह्या घरची)

lp27विरोध करा
एखादी गोष्ट जर पटत नाही तर त्याविरुद्ध बोला. प्रत्येक वेळी लाचार होणं, लाळघोटेपणा करणं गरजेचं नसतं. कलाकारांकडे युनियनही आहे. तिथे जाऊन विरोध दर्शवू शकतात; पण हे चित्र कुठेही बघायला मिळत नाही.
राकेश सारंग, निर्माते.

lp28योगा हा उत्तम मार्ग
सध्या आमची मालिका नवीन असल्यामुळे मला रोज शूट करावं लागतं. कामाचा तणाव जाणवतो; पण तो दूर करण्यासाठी मी नियमितपणे योगा करते. सेटवरही कधी मोकळा वेळ मिळाला की योगा करते. हेल्दी राहण्यासाठी योगा हा मार्ग मला अगदी योग्य वाटतो.
सुरुची अडारकर, अभिनेत्री (का रे दुरावा)

सिनेमाचं वेळापत्रक तुलनेने कमी त्रासदायक असतं. ठरावीक दिवस विशिष्ट ठिकाणी जाऊन शूट करणं, तिथेच राहणं असं असतं. त्यामुळे तिथे येण्या-जाण्याचा वेळ वाचतो. बारा-तेरा तास काम असलं तरी ते काही दिवसच असल्यामुळे त्याचा त्रास फारसा होत नाही. तसंच नियोजनाप्रमाणे तिथली कामं होत असतात. नाटकाचे दौरे आता पूर्वीच्या तुलनेत कमी होतात. त्यामुळे त्यासाठी करावा लागणारा प्रवासही पूर्वीपेक्षा थोडा कमी झालाय. दौरे कमी झाल्यामुळे अनेक कलाकार मालिका, नाटक असं दोन्हीकडे काम करण्याचा प्रयत्न करतात, पण मालिकेचं शूटिंग खूपच व्यग्र असल्यामुळे धावपळ होत असते. रिकाम्या वेळात आराम करण्यापेक्षा कुठली सुपारी मिळतेय का आणि दोन पैसे कमवता येतायत का, अशी धडपड कलाकार करत असतो; पण अशा वेळी शरीराला आरामाची, शांततेची गरज असते हे लक्षात घेतलं पाहिजे. कलाकार असो वा तंत्रज्ञ शेवटी तो माणूसच. ते कोणतंही यंत्र नसून शरीर आहे याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. यंत्रसुद्धा गरम झाल्यावर आपण ते बंद करतो, पण शरीर थकलं तरी ते सुरूच ठेवण्याचा अट्टहास असतो. आपल्याला किती हवं, काय हवं, का हवं, खरंच गरज आहे का, विश्रांती किती महत्त्वाची, नकार देण्याची क्षमता, ‘नाइलाज’ म्हणून काम न करणं अशा अनेक बाबींचा प्रत्येक कलाकाराने विचार करायला हवा. शेवटी, पैशांसाठी काम करत असलो तरी शरीराचा प्राधान्याने विचार करणं गरजेचं आहे.
(या लेखामधील मालिकांचे सर्व फोटो प्रातिनिधिक स्वरूपात वापरले आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2014 1:29 am

Web Title: stressful life of entertainer
Next Stories
1 क्रीडा : मोटारस्पोर्ट्समध्ये मराठी झेंडा!
2 गांगरलेली मुलं आणि गोंधळलेले पालक
3 परखड शास्त्रीय माहितीची गरज
Just Now!
X