उन्हाळ्यासाठी शॉपिंग करायचं म्हणताय..? मग तुम्हाला सध्याच्या फॅशन्समध्ये काय इन आहे आणि काय आऊट आहे हे माहीत असायलाच हवं.

उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, त्याच्याबरोबरीने कॉलेजेसना सुट्टय़ा लागायला लागतील. मग घराघरातून पिकनिक्स, पार्टीज आणि आउटिंगचे प्लान्स बनायला सुरुवात होईल. या सगळ्या गडबड गोंधळात अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘शॉपिंग.’ खासकरून मुलींसाठी सुट्टीतला मोकळा वेळ शॉपिंगसारख्या कामांमध्ये सत्कारणी लावण्यातून वेगळंच समाधान मिळतं. त्यातून नुकतेच सर्व फॅशन शोजसुद्धा पार पडले आहेत. त्यामुळे या उन्हाळ्यासाठी कोणते ट्रेंड इन आहेत आणि कोणते आऊट याची उजळणी सध्या जोरात चालू आहे. अशा वेळी आपण का म्हणून मागे राहायचं? यावेळी आपणही यंदाच्या उन्हाळ्यात काय घालायचं आणि काय घालायचं नाही याकडे एक नजर फिरवू या.
आपली उन्हाळ्यातली म्हणजे साधारण एप्रिल-मे महिन्यातली शॉपिंग ही कॉलेजेस् सुरू होताच पहिली हजेरी लावणाऱ्या पावसाला लक्षात ठेवूनच केलेली असते. त्याचबरोबर उन्हाळा म्हटला की ट्रिप्स हे आता क्लासिक कॉम्बिनेशन झालंय. त्यामुळे शक्य तितके सुटसुटीत आणि आरामदायी कपडे खरेदी करण्याकडे आपला कल असतो. त्यात प्रत्येकाकडे ‘आपण शॉपिंग का करतोय?’ याच्या कारणांची एक लिस्ट असते. नुकतेच दहावी आणि बारावीतून बाहेर पडलेल्या जुनियर्सना कॉलेजमध्ये त्यांच्या सीनियर्सना दाखवून द्यायचं असतं की ‘हम भी कुछ कम नही’. सीनियर्सच्या घोळक्यात ‘ऑल्वेज ट्रेंडी’ हे बिरुद मिरवणाऱ्यांना जुनियर्ससमोर आपली शान कायम ठेवायची असते. ज्याचं कॉलेज संपून इंटर्नशिप किंवा जॉब सुरू झालाय अशा लोकांचा वॉडरोब आता पूर्णपणेच बदलून जाईल किंवा ऑफिसमध्ये ज्यांची सीट इंटर्न ते पर्मनंट एम्प्लॉईजकडे वळली आहे त्यांच्याही वॉडरोबकडे एक नजर फिरवायची गरज असते. आणि काहीजणांना ही सगळी चिंता सोडून फक्त हौस म्हणून शॉपिंग करायची असते. तर या तमाम लोकांसाठी एकदा तरी लेटेस्ट ट्रेंड्सवर एक नजर डालना बनता है.
सगळ्यात पहिले येतात ते रंग. गेल्या सीझनपर्यंत ज्यांनी तुम्हाला वेडं करून सोडलं होतं त्या फ्लोरोसेंट रंगांना सगळ्यात आधी टाटा करा. कारण हा सीझन पेस्टल शेड्स गाजवणार आहेत. गुलाबी, ग्रेच्या लाइट शेड्स, फिक्कट पिवळा, आकाशी, बेज, क्रीम, सफेद या शेड्स आता भाव खाणार आहेत. त्यामुळे यांच्यासाठी तुमच्या वॉडरोबमध्ये आता जागा करा. मुलांसाठीसुद्धा पिंक कलर सध्या ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्ही टी-शर्ट, शर्ट घेणार असाल तर लाइट पिंक आणि ट्राऊझर्ससाठी डार्क पिंक शेड नक्कीच निवडू शकता. यांच्यासोबत जर तुम्हाला बोल्ड शेड्स हव्याच असतील तर नारंगी रंगाचा भाव वाढला आहे, तो तुमच्या वॉडरोबमध्ये नक्कीच येऊ शकतो. कलर ब्लोकिंगचा ट्रेंड अजून तरी जाण्याच्या मार्गावर नाही. त्यामुळे जांभळा, लाल, डार्क हिरवा या रंगांसोबत कलर ब्लोकिंगचा खेळ खेळायला काहीच हरकत नाही. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट ही रंगसंगती सध्याच्या सीझनची हिट जोडी असणार आहे. पण नेहमीच ब्लॅक डेनिम आणि व्हाइट शर्ट हे कॉम्बिनेशन घालण्याऐवजी चेक्स, स्ट्राइप्स किंवा इतर प्रिंट्स ट्राय करा.
प्रिंट्सचा विषय निघालाच आहे तर फ्लोरल प्रिंट यंदा ट्रेंडमध्ये असणार आहेत. मुलांचीसुद्धा फ्लोरल प्रिंट्समधून सुटका होण्याची लक्षणे दिसत नाही आहेत. फ्लोरल प्रिंट्सची जादू यंदा मेन्सवेअरवरसुद्धा चढलेली आहे. यासोबतच जॉमेट्रिक प्रिंट्स यंदा तुम्हाला पाहायला मिळतील. डिजिटल प्रिंट्स अजूनही बाजारातून बाहेर जाण्याचं नाव नाही घेताहेत. त्यामुळे यावेळीही काही भन्नाट डिजिटल प्रिंट्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. यामध्ये प्रामुख्याने निसर्गाची विविध रूपं पाहायला मिळतील. मग कदाचित एकीकडे फ्लेमिंगो पक्षीच तुमच्या ड्रेसवर उडत असतील किंवा एखादी नदीच झुळूझुळू वाहत असेल.
उन्हाळ्यात आपण सुटसुटीत कपडय़ांना प्राधान्य देतो. त्यामुळे कॉटन, सॅटीन, लेस फॅब्रिक, जॉर्जेट, शिफॉन या फॅब्रिक्सनी स्वत:चं बुकिंग तुमच्या वॉडरोबमध्ये करून टाकलंय. शिअर ड्रेसिंग किंवा एक्स-रे ड्रेसिंगचा ट्रेंड आता हळूहळू रुळू लागलाय. खादी फॅब्रिक्सचा भाव वाढलाय. आता ते ओल्ड फॅशन राहिलेले नाही आहेत, त्यांनाही सुगीचे दिवस आलेत.
आता एकूणच लुकबद्दल बोलायचं झालं तर, शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीटचा मंत्र सध्या इन आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ‘कपडा बचाओ’ अभियान यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे तुमच्या ड्रेसेसची लेन्थ थोडी आखडतीच घ्या. क्रॉॅप टॉप्स हट्टाने त्यांच्या जागेवर अजून कायम आहेत. ट्राऊझर्स आणि डेनिम्सची लेन्थसुद्धा यावेळी आखडती झाली आहे. अँकल लेन्थ डेनिमची किमान एक जोडी यंदा तुमच्या वॉडरोबमध्ये असलीच पाहिजे. हा नियम मुलांनासुद्धा लागू होतोय. स्कर्टस्ची लेन्थसुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे ड्रेसेस यात मागे कसे राहतील. मिडीज, मायक्रो मिडीज आता ट्रेंडमध्ये येऊ लागतील. नाही म्हणायला फ्लोअर लेन्थ ड्रेसेसनी या गर्दीत आपल्या सीटचं बुकिंग आधीच करून टाकलंय. आणि त्याचबरोबर फ्लेअरची भर टाकून थोडंसं ज्यादा फॅब्रिक पण आपल्या नावावर केलंय. यांच्यासोबतच स्ट्रेट फिट गारमेंट्समुळे एकूणच कॉर्पोरेट लुक फॉर्ममध्ये आलेला पाहायला मिळेल. उन्हाळा आला असला तरी जॅकेट्स काही जाण्याचे नाव घेत नाही आहेत. खास समर जॅकेट्स या सीझनमध्ये पाहायला मिळतील. जंपसूट्स मात्र या गाडीत शिरलेत. अर्थात त्यांची लेन्थ किती हवी हे तुमच्यावर आहे. पण फूल लेन्थपासून शॉर्ट लेन्थपर्यंत वेगवेगळ्या रूपात ते तुम्हाला पाहायला मिळतील. यंदा धोती पँट्स का भी बुलावा आया है. आणि आता तर ते ब्राईडल वेअपर्यंत जाऊन पोचले आहेत. तुम्हाला साडी घालायला आवडत नसेल तर धोती साडीची संकल्पना यंदा पाहायला मिळेल.

यावेळचा ट्रेंड स्लोगन्सचा असणार आहे. तुमच्या ड्रेसेसवर अगदी डिझायनरच्या नावापासून ते त्याच्या डिझाइन फिलॉसॉफीपर्यंत विविध स्लोगन्स तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी फेसबुक किंवा चॅटिंगमध्ये तुम्ही नियमित वापरत आलेले ‘सेल्फीज’, ‘किप काल्म’, ‘बाबाजी का ठुल्लू’, ‘LOL’ सारखे शब्द आता तुम्हाला तुमच्या कपडय़ांवर पाहायला मिळतील. याचबरोबर सध्याचा ट्रेंड हा शिमर फॅब्रिक्सचा आहे. गोल्ड, सिल्व्हर शेड्स आता ट्रेंडमध्ये पाहायला मिळतील. ग्लिटर आता फक्त मेकअपमध्ये नाही तर फॅब्रिक्समध्येसुद्धा पाहायला मिळेल.
एकूणच यंदाचा ट्रेंड ड्रामाटिक नसून थोडासा सोबरच आहे. रंग, प्रिंट्स, पॅटर्नस्चा भडिमार करण्याऐवजी सिम्पल लूक ठेवण्याकडे यंदा प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे आता हो जाओ शुरू. तुमच्या वॉडरोबमध्ये यापैकी काय आहे किंवा काय नाही याची एकदा उजळणी करा आणि लागा शॉपिंगच्या तयारीला.