11 November 2019

News Flash

आगामी : ‘सुराज्य’ येतोय

संतोष मांजरेकर दिग्दर्शित सामाजिक आशयावरचा ‘सुराज्य’ हा चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. त्यानिमित्त-

| April 11, 2014 01:12 am

संतोष मांजरेकर दिग्दर्शित सामाजिक आशयावरचा ‘सुराज्य’ हा चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. त्यानिमित्त-

मराठी चित्रपटांमध्ये सर्वाधिक गल्ला गोळा करून सुपरडुपर हिट ठरलेला ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा २००९ साली झळकलेला पहिला मराठी चित्रपट ठरला. त्यामुळे दिग्दर्शक संतोष मांजरेकर प्रकाशझोतात आले. परंतु त्यानंतर चित्रपटांच्या अनेक ऑफर्स मिळूनही कथा चांगली नाही म्हणून ते थांबले आणि एकदम पाच वर्षांनी सामाजिक आशयाची आणि काही वैशिष्टय़पूर्ण संदेश देणारी कथा पटल्यानंतरच त्यांनी ‘सुराज्य’ हा चित्रपट बनविला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक मुद्दय़ांपैकी ‘गुड गव्हर्नन्स’ म्हणजेच सुप्रशासन हा महत्त्वाचा मुद्दा सध्या निवडणुकीच्या राजकारणात ऐरणीवर आला आहेच. म्हणूनच ‘सुराज्य’ हा चित्रपट १८ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
चित्रपटाच्या विषयाबद्दल सांगताना कथालेखक आणि या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता विनायक प्रभू म्हणाले, ‘धर्म, धार्मिक कर्मकांड, मोठमोठाली देवळे, त्यांचे बडे ट्रस्ट यांमध्ये दानरूपाने खूप मोठय़ा प्रमाणावर पैसा जमा होत असतो. मोठमोठय़ा मठांमध्येही भक्तगणांकडून दान केले जाते. हा पैसा अनेक चांगल्या कामांसाठी वापरला जातो. अनेकदा तसा वापरलाही जात नाही. श्रद्धेपोटी भक्त दान करतात. परंतु काही वेळा या निधीचा उपयोग सत्कर्म करण्यासाठी केला जातोच असे नाही. याच विषयावर मी कथा लिहिली असून मला स्वत:ला आलेल्या अनुभवांचा उपयोग या चित्रपटात केला आहे. त्यामुळे चित्रपट पूर्णपणे काल्पनिक नाही. अर्थात चित्रपटातून विषय मांडताना त्यात रंजकता यावी, सर्व स्तरांतील प्रेक्षकांना रुचेल अशा पद्धतीने मांडणी करूनच कथा-पटकथा तयार केली आहे’.
या चित्रपटाद्वारे ‘तुझं माझं जमेना’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता वैभव तत्त्ववादी रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. तो म्हणाला की, मालिकेनंतर प्रथमच मी नायकाच्या भूमिकेत पडद्यावर येतोय. त्यामुळे हा चित्रपट माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ओमकार ही चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा मी साकारतोय. चित्रपटाच्या टॅगलाइनप्रमाणे ‘राज्य सुधारण्याचे शस्त्र, धर्म नव्हे कर्म’ आहे. ओमकारचे आई-बाबा नियमितपणे मठात एका स्वामींकडे जात असतात. ओमकारला ते काही फार पटत नसले तरी आई-बाबांच्या सांगण्यावरून, त्यांना दुखावू नये म्हणून केवळ तो मठात जातो. तिथल्या काही गोष्टी त्याला खटकतात. म्हणून ओमकार मनाशी काही ठरवतो आणि त्यासाठी झटतो, असे कथानक आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली धूसर रेषा चित्रपट अधोरेखित करतो, असे वैभव तत्त्ववादीने सांगितले.
प्रभात फिल्म कंपनीने सामाजिक आशय-विषयांचे अनेक अजरामर चित्रपट दिले. त्या मांदियाळीतील विचार करायला लावणारा विषय ‘सुराज्य’मध्ये असल्यामुळेच विनायक दामले यांच्या प्रभात एण्टरप्रायझेसने प्रभातची तुतारी असलेले बोधचिन्ह या चित्रपटासाठी वापरले आहे, ही अनोखी बाब आहे, असे संतोष मांजरेकर यांनी नमूद केले. विनायक प्रभू म्हणाले की, ‘नफा कमाविणे हा चित्रपटाचा उद्देशच नव्हता. चांगला विषय, चांगला संदेश देणे या ध्येयाने चित्रपट केला आहे. विशेष म्हणजे आमच्या चित्रपटाला विकास आमटे-भारती आमटे यांच्याकडून आशीर्वाद मिळाला आहे, हीसुद्धा आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ‘सुराज्य’च्या संगीत सीडीचे प्रकाशन केल्यानंतर विकास आमटे यांनी चित्रपटाचा विषय सर्वसामान्य प्रेक्षकांना विचार करायला लावणारा असून त्यातून काही बोध रसिकांनी घ्यायला हवा, असे सांगितले.
या चित्रपटाद्वारे वैभव तत्त्ववादी-मृणाल ठाकूर ही नवीन कलावंत जोडी झळकणार असून पटकथा- संवादलेखन सौरभ भावे यांचे आहे. तर पुरस्कारविजेते छायालेखक विक्रम अमलाडी यांनी छायालेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. शरद पोंक्षे, माधव अभ्यंकर, पौर्णिमा मनोहर, विनायक भावे आदींच्या यात प्रमुख भूमिका आहेत. संतोष मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट असल्यामुळे जे काही सांगायचेय ते रंजकतेने सांगणारा हा चित्रपट असेल यात शंका नाही.

First Published on April 11, 2014 1:12 am

Web Title: surajya marathi movie