01khadiwaleआपल्या देशात दक्षिणेतील चार राज्ये सोडली तर बाकी सगळीकडे अगदी अब्जाधीशापासून ते थेट मोलमजुरीवर जगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत सगळ्यांच्याच दिनक्रमाची सुरुवात चहाने होते. 

लोकमान्य टिळकांना चहा व सुपारी, जास्तकरून सुपारीचे व्यसन होते. आपल्या थोर नेत्याचे अकाली निधन महाराष्ट्रातील हजारो टिळक भक्तांना चटका लावून गेले. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरिता महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबप्रमुखांनी चहा सोडला. माझे वडील अशाच कडव्या टिळक भक्तांपैकी एक होते. त्यामुळे साहजिकच वैद्य खडीवाले घराण्यात चहाबंदी आली, ती आजतागायत तरी माझ्यापुरतीच चालू आहे. अजूनपर्यंत माझ्या राहत्या घरात मी एक थेंबही चहाचा प्यायलो नाही. घरची कॉफीसुद्धा बोटांवर मोजण्याइतक्या वेळा प्यायलो असेन. आमच्या घरी सगळय़ांना जरी चहाबंदी असली तरी वडिलांनी आईच्या चहावर बंदी घातली नव्हती. ते म्हणायचे, ‘‘आई दुसऱ्याच्या घरची मुलगी. त्यामुळे तिला चहा प्यायला पूर्ण परवानगी.’’ माझ्या वयाच्या पाच-सहाव्या वर्षांची पहिला चहा करण्याची आठवण अजूनही ताजी आहे. एक दिवस आईने मला चूल पेटवून चहा करावयास सांगून चहा तयार करण्याचा पहिला ‘ओनामा’ दिला. त्या काळात गॅस, रॉकेल, स्टोव्ह, इलेक्ट्रिक शेगडी या गोष्टी नव्हत्याच. बहुधा ओलसर असणाऱ्या लाकडांची चूल खटाटोप करून पेटवावी लागे. कपभर चहाची सामग्री तयार झाली. आईचे शब्द अजूनही आठवतात. ‘‘एक कप पाण्याला उकळी फुटेपर्यंत, बुडबुडे येईपर्यंत चहापत्ती टाकू नको.’’ अशी कडक सूचना होती. त्याकरिता त्या पद्धतीच्या चहाला ‘बुडबुडेवाला चहा’ असे म्हणतो. मला वाटते, जगभर सर्वानाच मान्य होईल व चहाच्या सर्व घटकद्रव्यांना न्याय देईल असा हा चहाचा लोकमान्य फॉम्र्युला आहे.
प्रथम कपभर चहाकरिता पाव कप दूध तापवून तयार ठेवावे. तसेच एक कपभर चहाकरिता लागणारी (चवीप्रमाणे) साखर कपभर पाण्यात विरघळवावी. दुसरीकडे चहाची पत्ती आवडीनुसार सपाट चमचाभर तयार असावी. चहाकरिता घेतलेल्या साखरपाण्याला उकळी फुटली की लगेच चहाची पत्ती त्या भांडय़ात टाकून पाव मिनिट उकळू द्यावे, लगेच झाकण ठेवावे व गॅस बंद करावा. त्या वेळेस चहाचा उत्तम स्वाद आला पाहिजे. पातेले खाली उतरवून अध्र्या मिनिटाने चहा गाळावा, चवीपुरते साय नसलेले दूध मिसळावे. अपेक्षेप्रमाणे चहाला केशरी लाल रंग आलेला असला पाहिजे. असा चहा, चहा अजिबात न पिणारा मी आईला नेहमीच करून देत असे.
काही मंडळी या चहात आले, वेलदोडे, तुळस पाने, मिरी, दालचिनी, बडीशोप असे कमी-अधिक सुगंधी पदार्थ टाकून चहाची लज्जत घालवितात. मला प्रामाणिकपणे असे वाटते, चहा पिणाऱ्याला हवा असतो, ‘‘चहाचा फ्लेवर, चहाचा रंग, ताजेपणा, चहाची गरमाई.’’ थोडक्यात, चहाची लज्जत घालविण्याचा अधिकार कोणालाच नाही. असा लज्जतदार बुडबुडेवाला चहा मी आग्रहाने आठवडय़ातील एक दिवस माझ्या कामातील बत्तीस वर्षांतील सहकारी वैद्य वीणा मानकामे यांना भल्या प्रात:काळी करून पाजतो. त्यांची माझ्याबद्दल अनेकदा नाराजी असते. पण या चहाबद्दल एकही वावगा शब्द आलेला नाही.
आमच्या घरात पैसा-अडका फार नसला तरी सकाळी व्यायाम व दूध पिण्यावर वडिलांचा खास कटाक्ष असे. वडिलांचा धाक व एकूण साध्या राहणीचे वळण. ज्यामुळे चहाचे व्यसनच काय, पण चवही माहीत असावयाचे कारण नव्हते. चहा ही परदेशी वस्तू आहे असे मनावर बिंबवले जायचे. प्रत्यक्षात भूगोलाच्या पुस्तकात आसामच्या मळय़ात चहा होतो हे वाचूनही आम्ही घरच्या विचारसरणीवर डोळे मिटून खुशाल विश्वासून होतो. असो.
जेव्हा विविध रुग्ण आपल्या आरोग्य-अनारोग्य समस्यांकरिता वैद्यांकडे जातात, तेव्हा त्यांना काय खावे, न खावे याकरिता वैद्य मंडळींकडून साहजिकच सल्लामसलतीची अपेक्षा असते. चहात टॅनिन हे द्रव्य मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे चहा प्यायल्याने जशी ऊर्जा, कामाला तरतरी मिळते तसे काही मंडळींना टॅनिनच्या उष्ण गुणामुळे त्रासही होतो. तोंड येणे, मुखपाक, रांजणवाडी, हातापायाची आग, जळवात, नागीण, रक्ती मूळव्याध, फिशर (परिकर्तिका), फिस्तुला (भगंदर), मलावरोध, अंग बाहेर येणे, शीतपित्त, अंगावर गांधी उठणे, आम्लपित्त, अॅसिडिटी, जळजळ, पोटफुगी, ढेकरा, उचकी, अनिद्रा, खंडित निद्रा, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, मूतखडा, मूत्राघात, लघवी कमी होणे इत्यादी विविध विकारांत चहा टाळावा. अलीकडे जगभर चहावर तऱ्हेतऱ्हेचे संशोधन चालू आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते चहा पिण्याने रक्त पातळ होते, त्यामुळे उच्च रक्तदाब, हृद्रोग, हृदयावर प्रेशर येणे अशा विकारांत चहा प्यायल्याने फायदा होतो.
शेवटी मला चहाबद्दल एवढेच म्हणायचे आहे की, आल्या-गेलेल्यांना आपण चहा जरूर ऑफर करावा. त्यामुळे नवीन मैत्री जुळते, जुनी मैत्री वाढते. ‘चहाच्या कपातील वादळ’ हा शब्दप्रयोग सर्वानाच माहिती आहे. मित्रहो, आपले क्षुल्लक मतभेद एकमेकांसंगे चहा पिऊन मिटवू या, मैत्री वाढवू या! चहाचा शोध लावणाऱ्या पहिल्या चिनी बांधवाला सहस्र चहा प्रणाम!