05 July 2020

News Flash

घरोघरी तीच ती कहाणी

टी.व्ही. स्वस्त झाला. तो खिशाला सहज परवडू लागला. त्याच्या आशीर्वादाने घरात करमणुकीची एक फार मोठी सोयच झाली, पण शांती मात्र हरवली. घराघरांतून टी.व्ही.चा आवाज ऐकू

| May 9, 2014 01:21 am

टी.व्ही. स्वस्त झाला. तो खिशाला सहज परवडू लागला. त्याच्या आशीर्वादाने घरात करमणुकीची एक फार मोठी सोयच झाली, पण शांती मात्र हरवली. घराघरांतून टी.व्ही.चा आवाज ऐकू येऊ लागला. घरातल्या संवादाऐवजी टी.व्ही.तल्या पात्रांशी गृहिणीचा तसेच इतरांचा संवाद घडू लागला.

असाही एक काळ होता, जेव्हा टी.व्ही नव्हता, पण काळ आपल्या दिशा सतत बदलत असतो. कालांतराने टी.व्ही. आला, पण त्या वेळी त्याने सामान्य माणसाचे जीवन काबीज केले नव्हते. संपूर्ण वाडीत एकच टी.व्ही. पूर्वी असायचा, कारण तो सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा नव्हता. त्या वेळी चॅनेल जरी एक असले तरीसुद्धा आजच्या १०० पेक्षा ते एक प्रभावशाली होते. लोकांच्या मनाचा ठाव घेणारे होते.
आता परिस्थिती झपाटय़ाने बदलली. चॅनेलच्या नावाखाली करमणूक आणि हुल्लडबाजी सुरू झाली. जे नको होते तेच साऱ्या समाजापर्यंत गेले आणि समाजस्वास्थ्य बिघडले. फक्त शारीरिक नाही, तर मानसिक समस्यासुद्धा निर्माण झाल्या. अस्सल आनंद यात कुठे तरी हरवला.
टी.व्ही. स्वस्त झाला. तो खिशाला सहज परवडू लागला. त्याच्या आशीर्वादाने घरात करमणुकीची एक फार मोठी सोयच झाली, पण शांती मात्र हरवली. घराघरांतून टी.व्ही.चा आवाज ऐकू येऊ लागला. घरातल्या संवादाऐवजी टी.व्ही.तल्या पात्रांशी गृहिणीचा तसेच इतरांचा संवाद घडू लागला. आज रस्त्यावरून चालताना प्रत्येक घराच्या खिडकीतून रंगीत टी.व्ही.चे पडदे दिमाखात उभारलेले दिसतात.
ज्ञानाची एक बाजू तर ठीक आहे, पण मनोरंजनाच्या नावावर आपल्या मनावर वाईट कृत्यांचा वाईट परिणामही घडत असतो याची जाणीव ठेवून काय बरे आणि काय वाईट हे आपणच ठरवलेले आणि ठरवून दिलेले बरे.
टी.व्ही. चॅनलचा एक भाग असतो तो म्हणजे सीरियल्सचा. विविध प्रकारच्या प्रसंगांनी तयार केलेला, मनोरंजनाचा उद्देश ठेवून बनवलेला आणि विविध प्रकारच्या सांसारिक प्रश्नांवर भाष्य करणारा असा कार्यक्रम, पण नीट विचार केल्यास या साऱ्यांत म्हणजेच टी.व्ही.वर चालू असलेल्या असंख्य कौटुंबिक कार्यक्रमांत एकसुरीपणाच चालू असतो. तेच प्रसंग, थोडय़ाफार फरकाने तीच माणसे आणि त्यांची संभाषणे. पाहताना मजा वाटते, पण ते सगळं अर्थहीन असल्याची खंत का वाटत नाही? एका कार्यक्रमात वर्णिलेला प्रसंग थोडय़ाफार फरकाने दुसऱ्यातही वर्णिलेला असतोच. कधी कधी तो सगळ्यात सारखा असतो, पण नेहमीच्या जीवनात त्याचा संदर्भ मात्र लागत नाही.
जर का एक साधा प्रसंग घेतला तर तो असा की, एखाद्या कार्यक्रमातील एक व्यक्ती (मग ती कुणीही असो) आजारी पडते किंवा तिचा अपघात तरी होतो. तिला/ त्याला रुग्णालयात भरती करतात. डॉक्टरांचा मानस प्रकट होतो. ‘दवा से नहीं दुवा से’, कारण केस त्यांच्या हाताबाहेर गेलेली असते. मग सुरू होते ती आराधना. देवासमोर किती पाण्याच्या बाटल्या रिकाम्या केल्या जातात कोण जाणे? किती वेळ देवाला धमकावलं जातं, तू त्याचे/तिचे प्राण वाचविलेस नाही, तर आयुष्यभर तुझं तोंड पाहणार नाही. कधी समईवर हात धरला जातो, तर कधी घंटानाद केला जातो. कधी लोटांगणेही घातली जातात आणि काय आश्चर्य! देवबाप्पा प्रसन्न होतात आणि मरणशय्येवर असलेली व्यक्ती हात चालवू शकते.
टी.व्ही.चा दुसरा भाग म्हणजे बातम्यांचा. ताज्या, चटपटीत बातम्या प्रत्येकालाच हव्या असतात, त्याशिवाय सकाळच्या चहाला चव येत नसते. बातम्यांची आवश्यकता प्रत्येकालाच भासत असते, पण आज त्या चॅनेल्सची संख्यादेखील भरमसाट वाढली आहे. प्रत्येक चॅनेलवर साधारण एकच बातमी सादर होते. ३० मिनिटे ३० खबरे आणि एका तासात बातम्यांचं शतकही साजरं होतं; पण त्या बातम्या चांगल्या असतात का? १०० पैकी कदाचित १० बातम्या चांगल्या असतील. बाकी कशाच्या? तर चोरी, घुसखोरी, नक्षली हमला, राजनीती (भ्रष्ट), अत्याचार इ..
बातम्यांवरून प्रत्येकाला राजनीती कळत असते. संदर्भ म्हणूनच त्या बघितल्या जातात. राजनेत्यांच्या दुर्गुणांवरच्या टीकाही दाखवल्या जातात. कोण चांगलं कोण वाईट याची तुलनाही केली जाते. कुणी मोठमोठी स्वप्नं दाखवली आणि ती पूर्ण करताना किती हात आवरला, त्याचबरोबर तो कसा आवरला याचेही मोजमाप तिथे उपलब्ध असते. लोकांना सत्याची ओळख करून देण्यात प्रसार माध्यमांचा फार मोठा वाटा असतो. कित्येक आपत्कालीन परिस्थितींत प्रसार माध्यमे आपली जबाबदारी चोखपणे बजावतात, मग ती घटना उत्तराखंडची असो की अजून कुठली. वर ती ठासूनही सांगतात, की आम्हीच तुम्हाला ही पहिली बातमी दिली.
कुठे अपघात झाला, कुठे माणसे बेपत्ता झाली, कुठे अतिरेक्यांनी घोळ घातला, कुणी भ्रष्टाचार केला, तर कोणी आपल्या विवादास्पद बोलण्याने खळबळ माजविली, हे सारेच विषय प्रसार माध्यमांद्वारे आपल्याला कळतात आणि हे दैनंदिन जीवनात महत्त्वाचेही ठरतात.
टी.व्ही.चा तिसरा महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे जाहिराती. जाहिराती ही चीज नाही अशी चॅनेल्स मिळणं अशक्यच झालं आहे. पेपरदेखील आज अर्धा त्यानेच भरलेला असतो. मग टी.व्ही. तर त्यापुढील गोष्ट ना. कार्यक्रमाची उत्सुकता ताणून धरण्यासाठी आणि त्याबरोबरच आपल्या वस्तूंचा नको तितका प्रभाव लोकांवर पाडण्यासाठी अखंड जाहिराती चालूच असतात.
साध्या साबणापासून ते मोबाइल, गाडय़ांपर्यंतच्या जाहिराती टी.व्ही.वर दाखवल्या जातात. प्रत्येक जण कसा अगदी ठासून सांगत असतो- आमचीच क्वॉलिटी उत्तम, पण प्रत्यक्षात कधी कधी ते भंगारही असू शकतं. लहान मुलांच्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या कित्येक मनमोहक वस्तू असतात. उंची वाढविणारी आणि बुद्धी वाढविणारी किती प्रॉडक्ट्स विकण्यासाठी त्यांच्या जाहिरातीचा भस्मासुर दाखवला जातो. तोदेखील एकदा नव्हे, दिवसातून किती तरी वेळा. बुद्धी आणि उंची वाढवणाऱ्या पदार्थावर विश्वास कसा बसतो लोकांचा कुणास ठाऊक? त्या जाहिरातींच्या खाली लहान अक्षरात संदेश लिहिला जातो. बुद्धी / उंची वाढवण्यासाठी आनुवंशिक घटक, योग्य पोषण, व्यायाम हेही घटक कारणीभूत ठरतात. उंची वाढवा, केस वाढवा, बुद्धी वाढवा, वजन वाढवा, नाही तर कमी करा, शक्ती वाढवा आणि बरंच काही, पण प्रत्यक्षात याचा प्रभाव काय पडतो हे प्रत्येकालाच ठाऊक आहे.
पूर्वीच्या रामायण-महाभारताची सर आताच्या कार्यक्रमांना चढतच नाही. मनोरंजन आणि कल्पना यांच्या पायावर उभे राहिलेले प्रसंग काही अर्थबोध होण्यापलीकडे असतात. कुटुंबातल्या चढ-उताराची, सुख आणि दु:खाची कहाणी खरी वाटतच नाही. तो निव्वळ चार बाहुल्यांचा खेळ असतो. याला थोडेफार अपवाददेखील असतील, पण जास्तीत जास्त हीच प्रवृत्ती असते.
आज समाज बदलत असताना त्यात टी.व्ही.चाही फार मोठा वाटा आहे. तोही या बदलाचा प्रत्यक्ष साक्षी आहे. त्याच्यावरही बदलाचा बरा-वाईट प्रभाव पडलेलाच आहे. आज तो प्रत्येकाच्या घरात आपले मानाचे स्थान टिकवून आहे, पण योग्य आणि बरोबरच अयोग्य निर्णय घेण्याची क्षमता मानवाच्या मेंदूवर आहे. तर घ्या आपला निर्णय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2014 1:21 am

Web Title: television
Next Stories
1 खारीचा वाटा..
2 ब्लॉगर्स कट्टा : नको असलेल्या भेटवस्तू
3 माझा पहिला स्मार्ट फोन
Just Now!
X