उत्सव
मुंबईतील काळा घोडा फेस्टिव्हलच्या धर्तीवर ठाण्यात नुकत्याच झालेल्या उपवन फेस्टिव्हलला रसिकांनी अमाप प्रतिसाद दिला. मुंबईतली रसिकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात उपनगरात स्थलांतरित झाली आहे, याचेच प्रत्यंतर या निमित्ताने आले.
मध्यवर्ती मोठा तलाव, एका बाजूस येऊर जंगलाच्या डोंगरावरून येणारा आणि दिवसादेखील जाणवणारा गार वारा, तलावाच्या सभोवती सहा छोटे मंच, कोठे कोठे कथ्थकने ठेका पकडला आहे, तर कोठे कोळीनृत्यावर सारे डोलत आहेत, तर रॉक-पॉपच्या तालावर थिरकणारी तरुणाई कोठे आहे, मध्येच एखादा रेखाचित्रकार कोणाची तरी छबी कागदावर उतरवतोय, तर कोणी रसिकांच्या कोंडाळ्यात ड्रमवर ठेका पकडलाय, एका गॅलरीमध्ये मान्यवर प्रख्यात चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलंय, एका मोठय़ा व्यासपीठावर जागतिक दर्जाचे कलाकार आपली कला सादर करताहेत आणि या सर्वाचा समरसून आस्वाद घेणारे लाखो लोक असा ३६० अंशात विस्तारलेला असा अनोखा उपवन आर्ट फेस्टिव्हल नुकताच ठाण्यात पार पडला. आकडेवारीतच सांगायचं तर तीन दिवसांत तब्बल तीन लाखाहून अधिक लोकांनी फेस्टिव्हलला भेट दिली आहे.
खरं तर ठाण्यातला उपवन तलाव हा तसा वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहे. म्हणजे सायंकाळी ज्येष्ठांना फेरफटका मारायला, तरुण-तरुणींना गुजगोष्टी करायला, बेदरकार बाइक्सवरून शायनिंग मारायला, महापौरांचा बंगला म्हणून राजकीय वलयदेखील असलेला पण या फेस्टिव्हलमुळे आता उपवनची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
१० ते १२ जानेवारी या तीन दिवसांच्या काळात या १.५ किलोमीटरच्या परिघातील  फेस्टिव्हलमध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम झाले आहेत की, केवळ त्यांतील कलाकारांची केवळ नावं जरी द्यायची म्हटली तरी एक वेगळा लेख लिहावा लागेल. तब्बल २५०० कलावंतांनी सुमारे १०० हून अधिक कार्यक्रमांद्वारे आपली कला या मंचावर सादर केली आहे.
 विविध मंचांवरील नृत्य-गायनाचे कार्यक्रम त्यांच्या ठरावीक वेळी सुरू असायचे, फेस्टिव्हलमध्ये पूर्णवेळ सुरु असणार कलादालन दर्जेदार  होतं. ऋचा मेहता आणि सुरेश पटवर्धन यांनी अकबर पदमसी, सुनील गावडे, प्राजक्ता पालव, विजयराज बोधनकर, अनंत जोशी, दिलीप रानडे, जोगन चौधरी अशा कलाकारांच्या विख्यात चित्रकृतींनी हे दालन उभं राहिलं होतं. एका बाजूला तलावाचे दृश्य, तर दुसरीकडे विख्यात कलाकारांची चित्रं यामुळे या कलादालनाला एक वेगळेच वलय प्राप्त झाले होते. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी अनेक कलाकार स्वत: उपस्थित असल्यामुळे रसिकांना त्यांच्याशी संपर्क साधता येत होता. अतिशय अप्रतिम असे हे दालन असले तरी एका उणिवेकडे निर्देश करणे गरजेचे आहे. ते म्हणजे येणारे लोक हे रसिक असले तरी सर्वानाच चित्रातील सारं कळते असे नाही. त्यामुळे चित्राबद्दल थोडक्यात माहिती अथवा जेथे शक्य असेल तेथे समजावून देण्याची व्यवस्था असती तर सर्वसामान्य रसिकांनादेखील चित्रस्वाद घेता आला असता.

उपवन तलावाच्या नैसर्गिक रचनेचा लाभ उठवत संपूर्ण तलावाला मध्यवर्ती ठेवून फेस्टिव्हलची रचना करण्यात आली होती. सहा छोटय़ा मंचांवर सहा वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर केल्या गेल्या. एक मंच फक्त क्लासिकल नृत्य आणि तर दुसरा मंच संगीतासाठी राखीव होता. कर्नाटकी, हिंदुस्थानी, कथ्थक, भरतनाटय़म अशा तब्बल ३६ वेगवेगळ्या कलाकारांनी या दोन्ही ठिकाणी आपली कला सादर केली. तर एका मंचावर केवळ आदिवासी कला सादर केल्या जात होत्या. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, ओरिसा, पारसी, गुजराती अशा विविध राज्यांतील आदिवासी कलेचा आनंद यानिमित्ताने रसिकांना घेता आला. महत्त्वाचे म्हणजे कला म्हणजे केवळ क्लासिकलला कवटाळून न बसता सुगम आणि रॉक-पॉपलादेखील संधी असल्यामुळे सर्वच वयोगटाला हे पूरक ठरणारे होते.
फेस्टिव्हलमधील अनेक स्टॉल्स हे ठाण्यातील तसेच बाहेरील कलाकारांचे होते. येथे व्यवस्थित फ्रेम केलेल्या कलाकृती विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ज्यांना चित्रांची आवड आहे, पण ठिकाण माहीत नाही अशांसाठी ही चांगली सोय होती. अर्थात दिवसा कमी गर्दीच्या वेळी ही चित्रं पाहणं आणि विकत घेणे सहज शक्य होते, मात्र रात्री केवळ लांबून पाहून पुढे जाणे असेच याचे स्वरूप होते.
याशिवाय टॅलेंट हंट, कलेशी संबधित चर्चासत्रे, ओरिगामी, वारली, कॅरिकेचर, पॉटरी, फिल्म अ‍ॅप्रिशिएशनसारखी चर्चासत्रे यातून बौद्धिक खाद्यदेखील मिळाले. फेस्टिव्हलच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भल्या मोठय़ा मुख्य व्यासपीठावर तीन दिवसांत पाच मुख्य कार्यक्रमामुळे ठाणेकरांना झाकीर हुसेन, रूपकुमार राठोड, जयतीर्थ मेवुंडी अशा दिग्गजांचे कार्यक्रम सकाळ-संध्याकाळ अनुभवता आले. तीन दिवसांत इतक्या मोठय़ा कलाकारांना ऐकणे ही ठाणेकरांसाठी पर्वणीच होती.

लहानग्यांचं ठाणं दुर्लक्षित
फेस्टिव्हलच्या निमित्ताने विविध शाळांमध्ये मॅपिंग माय सिटी या संकल्पनेवर चित्र काढून घेण्यात आली होती. आपलं घर, शाळा, आवडतं ठिकाण या परिसराचं चित्रांकन करण्यास सांगितलं होतं. विविध शाळांतील कित्येक मुलांनी आपआपल्या कुवतीने सुंदर चित्र रेखाटली होती. अतिशय वेगवेगळ्या संकल्पना वापरून काढलेल्या या चित्रांना मात्र एकदम कोपऱ्यात पूर्णपणे उघडय़ावर जणूकाही वाऱ्यावर सोडून दिले होते. खरं तर हे सारे ठाण्यातील लहानगे कलाकार, कदाचित यांच्यामध्येच एखादा उद्याचा कलाकार दडलेला असू शकतो. त्यातील किमान निवडक चित्रं तरी व्यवस्थित लावता आली असती, पण कोणतेही उत्पन्न नसणारा हा भाग दुर्लक्षित राहिला. 

राजकीय कलाकारी
लवकरच येऊ घातलेल्या निवडणुका आणि इतक्या मोठय़ा प्रमाणावर जनसमुदाय पाहता चमकण्याची संधी ठाण्यातील राजकारण्यांनी दवडली नाही. फेस्टिव्हलच्या रस्त्यावरची आणि आजूबाजूची फलकबाजी हे सारे पाहता आपण आर्ट फेस्टिव्हलला जातोय की राजकीय पक्षच्या सभेला, असा प्रश्न पडत असे. इतकेच नाही तरी सर्वपक्षीय नेत्यांची व्यासपीठावरील लुडबुड खटकणारी होती.

दिवसा फेस्टिव्हल रात्री जत्रा
फेस्टिव्हलसाठी आकारली जाणारी प्रवेश फी आयत्या वेळी महापालिकेच्या हस्तक्षेपामुळे रद्द करण्यात आली. परिणामी खूप मोठय़ा प्रमाणात लोकांचा लोंढा फेस्टिव्हलकडे आकर्षित झाला. पहिलीच वेळ आहे, काय आहे ते पाहू म्हणूनदेखील अनेकजण आले होते. परिणामी, दिवसा थोडय़ाशा निवांतपणे पाहता येणारी चित्रे, कलाकृती, कार्यक्रम संध्याकाळनंतर पाहणे मुश्किलीचे झाले होते. नुसतेच स्टॉल्ससमोरून छान आहे असे म्हणत पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मध्येच असणाऱ्या खाद्यपदार्थाचे स्टॉल्समुळे गर्दीत आणखीनच भर पडत होती. मुख्य व्यासपीठावरील कार्यक्रमांना व बंदिस्त कार्यशाळांना दर्दी प्रेक्षक वर्ग बऱ्यापैकी लाभला. त्यामुळे दिवसा आर्ट फेस्टिव्हल आणि रात्री जत्रा असे काहीसे स्वरूप आले.

उपयोगिता मूल्य असणाऱ्या वस्तूंना मागणी
फेस्टिव्हलमधील चित्रांच्या विक्रीला बऱ्यापैकी मागणी असली तरी सर्वात जास्त प्रतिसाद होता तो उपयोगिता मूल्य असणाऱ्या वस्तूंना, शो पीसेसना. केवळ एखादे चित्र घेण्यापेक्षा फ्लॉवर पॉट, वॉलपीस अशा कलाकृतींना मागणी होती. स्टॉल्सना भेट देणाऱ्या रसिकांमध्ये उत्स्कुता असायची, पण चार-पाच हजार खर्च करून चित्र घेण्याची मानसिकता मर्यादितच होती. वास्तुशास्त्रावर आधारित चित्रकृती तब्बल एक लाखाला विकली गेली.

सुमन विजयकर, अरुणकुमार, संदीप कर्नावट यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हून आधिक ठाणेकरांचा आयोजनात सहभाग होता. ठाणे महापालिका, पोलीस आयुक्तालय, बिल्डर प्रायोजक, राजकारणी आणि महत्त्वाचे म्हणजे अनेक कलाकार यांच्या सहकार्याने हा फेस्टिव्हल यशस्वी झाला. एकाच वेळी अनेक कलांना वाव देणाऱ्या या फेस्टिव्हलमुळे आता पुढील वर्षीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
खरं तर आयोजकांना आणि प्रशासनालादेखील इतक्या मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती. हा प्रतिसाद का मिळाला याची कारणमीमांसा यानिमित्ताने करणे प्रस्तुत ठरू शकेल. गेल्या काही वर्षांत मुंबई आणि उपनगरातून मध्यमवर्ग मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित झाला. अगदीच लांब नाही, सांस्कृतिक चेहरा आहे, थोडंसं कॉस्मोपॉलिटीन वातावरण हवं आहे अशा अनेकांनी आजच विस्तारित ठाणे वसवलं आहे. त्याचबरोबर ठाण्याच्या पलीकडच्यांनी मुंबईजवळ जाण्याचा प्रयत्न म्हणून ठाणं जवळ केलं. यामध्ये कलाकारांपासून विविध क्षेत्रांतील लोकांचा समावेश आहे. त्यात मराठी आहेत तसेच अमराठीदेखील. त्या त्या समूहानुसार त्यांना सांस्कृतिक कलेशी संबधित उत्सवाची आवश्यकता निर्माण झाली. ठाण्यात सांस्कृतिक उपक्रम बरेच होतात, नवे सुसज्ज असे कलादालनदेखील झाले आहे, पण त्याही पलीकडे जाऊन जी एक उत्सवाची भूक होती, नेमकी ती या फेस्टिव्हलमध्ये पुरी होताना दिसून आली. मुंबईत साजरा होणाऱ्या काळा घोडा फेस्टिव्हलसारख्या ठिकाणी जाणं सर्वानाच शक्य नाही असा एक मोठा वर्ग ठाणे आणि परिसरात आहे. त्यांना हव्या असणाऱ्या फेस्टिव्हलची जागा आता उपवन फेस्टिव्हलने घेतली आहे असे म्हणावे लागेल.