lp16नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी अमेरिकेत तसंच कॅनडामध्ये साजरा होणारा थँक्सगिव्हिंग हा सण म्हणजे निसर्गाबद्दलचा, निर्मात्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्याचं एक माध्यमच. कालपरत्वे हा सण कसा बदलत गेला याचा आढावा-

पानगळीचा ऋतू म्हणजे ऑटम. अमेरिकेच्या सर्व गोष्टी- विशेषत: नावे- सुटसुटीत करण्याच्या प्रथेनुसार याला फॉल म्हणतात, कारण अगदी उघड. या मोसमात झाडांचे खराटे होतात. पानं गळून जातात. फॉल तसा उदासवाणाच असतो. सर्व प्राणिमात्रांना ऊर्जा देणारा सूर्यप्रकाश दिवसागणिक कमी होत असतो. मनाची मरगळ दूर करणारे वर्षांतले मोठे सण फॉलमध्येच येतात, हा एक सुखद योगायोगच म्हणायचा.

हालोवीन संपला, की थँक्सगिव्हिंगचे वेध आणि थँक्सगिव्हिंग संपता संपता नाताळच्या स्वागताची तयारी!

फॉलमध्ये झाडांची पानं खाली गळून पडण्यापूर्वी लाल, तांबूस होतात. थँक्सगिव्हिंगला या पानांमुळे सगळ्या परिसरावर सुंदर, सोनेरी झळाळी आलेली असते. थँक्सगिव्हिंग या नावाला काय पर्याय द्यावा? ‘ऋणनिर्देश’? थँक्सगिव्हिंग हे जरी अगदी गद्य नाव असले, तरी सणाला चपखल बसणारे आहे. आपल्याला धन, धान्य, समृद्धी देणाऱ्या दात्याचे स्मरण करून त्याच्याप्रति आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस. भटक्या मानवाने शेती करायला सुरुवात केली आणि त्याच्या जीवनात स्थैर्य आले. शेती हा मानवजातीचा सर्वात जुना व्यवसाय. सर्व आयुष्यच शेतीवर अवलंबून असल्याने चांगले पीक आल्यावर देवाचे आभार मानायची भावना अतिशय सहज आणि नैसर्गिकच आहे. या पाश्र्वभूमीवर मग थँक्सगिव्हिंग हा सर्वात जुना आणि जगाच्या पाठीवर सर्वदूर साजरा केला जाणारा सण म्हणायचा.

अमेरिकेत पहिला थँक्सगिव्हिंग १६२१ च्या नोव्हेंबर महिन्यात साजरा केला गेला. १६२० साली इंग्लंडमधल्या प्लिमथ या ठिकाणाहून ‘मे फ्लॉवर’ नावाच्या बोटीने १०२ प्रवासी नवीन भूखंडाच्या शोधात निघाले. (ही कुटुंबे होती. बोटीवर एका बाळाचा जन्मही झाला.) यातली काही मंडळी धर्मस्वातंत्र्याच्या शोधात, तर काही नवीन प्रदेशात नशीब काढायला निघालेली. ‘हडसन’ नदीच्या आसपासच्या भूखंडाबद्दल पुसट माहिती सगळ्यांनाच होती. बोटीवरच्या प्रवाशांना पिल्ग्रिम्स हे नाव पडले. (यात्रेकरू आणि प्रवासी असे दोन अर्थ असलेला ‘पिल्ग्रिम्स’ हा शब्द दोन्ही अर्थानी यांना लागू होता.)

बोटीवर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. थंडी, वारा, अपुरा अन्नाचा साठा, आजारपणे, जेमतेम- ५० प्रवासी प्रवासाचा पूर्ण पल्ला गाठू शकले. दोन महिन्यांनी हडसन नदीकडे निघालेली बोट वादळी वाऱ्यांपुढे तग न धरल्याने केप कॉडला (आताचे न्यू इंग्लंड स्टेट- पुढे पिल्ग्रिम्सनी या ठिकाणाला ‘प्लिमथ रॉक’ असे नाव दिले) प्रवास थांबवून उभी राहिली. मोजकी पुरुष मंडळी ‘जमीन’ बघून आली. काही दिवसांनी जमतील तशी लाकडी घरे उभारून गाव वसवले गेले.

१६२० साली अमेरिकेत अमेरिकन इंडियन (यांना नेटिव्ह अमेरिकन्स असेही म्हणतात) लोकांचे अनेक समुदाय वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले होते. प्लिमथमध्ये राहणाऱ्या इंडियन लोकांनी नवीन प्रवाशांना खूपच मदत केली. स्क्वांतो हा या लोकांमधलाच एक. गुलाम म्हणून पकडला गेल्यावर हा काही काळ इंग्लंडमध्ये राहत होता आणि इंग्लिश बोलू शकत होता. स्क्वांतोनी आपल्या लोकांना बोलावून आणले. इंडियन लोकांनी नवीन लोकांना मोठय़ा मनाने स्वीकारले. शेतीची- विशेषत: मक्याच्या शेतीची) प्रात्यक्षिके सुरू झाली. मक्याची पेरणी कधी आणि कशी करायची, नदीमधले छोटे मासे खत म्हणून कसे उपयोगात आणायचे, जंगलातली कुठली फळे, भाज्या टाळायच्या, कुठल्या खायच्या, मासे कुठले पकडून खायचे, कुठले शेतात खत म्हणून वापरायचे आणि कुठले प्रवाहात सोडून द्यायचे, एक ना अनेक! वर्ष सरत आले. गोरे प्रवासी (जे आता निवासी झाले होते) आपल्या घरांमध्ये सुखाने राहत होते. आपल्या हातांनी बांधलेल्या चर्चमध्ये मनासारखी प्रार्थना करत होते, सामुदायिक धान्य कोठारे धान्यांनी भरली होती. चांगल्या पीकपाण्यासाठी, नवीनच मिळालेल्या धर्मस्वातंत्र्यासाठी, एकूणच सरलेल्या शांत आणि समृद्ध वर्षांसाठी गोऱ्या रहिवाशांनी देवाचे आभार मानायला एक दिवस उपास करून दुसऱ्या दिवशी पारण्याची मेजवानी करण्याचे ठरविले. मेजवानीला इंडियन लोकांना आमंत्रणे गेली. दिवस होता १६२१च्या नोव्हेंबर महिन्यातला शेवटचा गुरुवार. हा पहिला थँक्सगिव्हिंग.

इंडियन पाहुणे काही मेजवानीला रिकाम्या हातांनी आले नाहीत. मासे, भाज्या, शिकार करून मारलेले पशुपक्षी आणि रानमेवा घेऊन आले. यजमानांनीही काही कसर सोडली नाही. चर्चच्या समोरच्या पटांगणात एका लांबडय़ा मेजावर गोऱ्या महिलांनी खूप मेहनत घेऊन तयार केलेले वेगवेगळे पदार्थ छान मांडून ठेवले होते. यजमानांनी पाहुण्यांचे छान स्वागत केले. एका जेवणाकरिता आलेले पाहुणे तीन दिवस राहिले. एकत्र जेवणे, वेगवेगळे खेळ खेळणे, शिकार करणे (बंदुका आणि तीरकमठे घेऊन) यात सगळ्यांचा वेळ छान गेला. तर असा हा पहिला थँक्सगिव्हिंग. नंतरचा थँक्सगिव्हिंग तीन वर्षांच्या अंतराने साजरा केला गेला, पण पहिल्या थँक्सगिव्हिंगचे सौहाद्र्र निसटून गेले होते.

काळ पुढे सरकत होता. जमेल तेव्हा, जमेल तसा थॅँक्सगिव्हिंग साजरा होत होता, पण इंडियन्सना वगळून. कोणाला थँक्स द्यावेत, त्याच्या कल्पनाही बदलत गेल्या. १७८९ मध्ये अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टननी अमेरिकेची स्वायत्तता साजरी करायला ‘थँक्स डे’ साजरा करावा असे सुचविले. अब्राहम लिंकनच्या कारकिर्दीत अमेरिकेत यादवी युद्ध झाले. दक्षिणेतल्या राज्यांविरुद्ध उत्तरेतील राज्ये. उत्तरेतली राज्ये जिंकली. गुलामगिरीला पूर्णविराम मिळाला. जे सैनिक धारातीर्थी पडले, त्यांच्या विधवांना थँक्स द्यायला थॅँक्सगिव्हिंग साजरा करावा, असे लिंकननी सुचविले. अमेरिकेत आलेल्या महामंदीच्या काळात राष्ट्राध्यक्ष होते फ्रँक्लीन रुझवेल्ट. वर्षांनुवर्षे नोव्हेंबरच्या शेवटच्या गुरुवारी साजरा केला जाणारा थॅँक्सगिव्हिंग रुझवेल्टसाहेबांनी तिसऱ्या गुरुवारीच आणला. (थॅँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी लोक लवकरच येणाऱ्या नाताळ आणि नवीन वर्षांची खरेदी करायला बाजारात गर्दी करतात. एक आठवडा खरेदी करायला जास्ती देणे हा मंदीवर मात करायचा एक उपाय वाटला सरकारला.) जनतेला हे फारसे पसंत न पडल्याने थॅँक्सगिव्हिंग परत नोव्हेंबरच्या शेवटच्या गुरुवारवर आला. बदलत्या काळाबरोबर बरेच संदर्भ बदलत गेले तरी हा सण साजरा करण्यामागची कोणाचे तरी आभार मानायची, कोणाचे तरी ऋणी असण्याची भावना कायम आहे.

आजही थँक्सगिव्हिंगच्या जेवणाच्या टेबलाजवळ बसल्यावर यजमान जेवण सुरू करण्यापूर्वी छोटीशी प्रार्थना करतात (तिला ग्रेस असे म्हणतात). कधी कधी बाकीची मंडळी एकमेकांचे हात हातात घेतात. मात्र इथेही सक्ती नाही. ज्यांना प्रार्थना म्हणायची नसेल, त्यांनी नुसतेच डोळे मिटून बसले किंवा आपल्याला हवी ती प्रार्थना मनातल्या मनात म्हटली, तरी कोणाचीच हरकत नसते.

महाराष्ट्रात गणपतीला, चीनमध्ये नवीन वर्षांला आणि अमेरिकेत थँक्सगिव्हिंगला आपल्या घरच्यांच्या सोबत राहण्याची धडपड सारखीच आहे. अमेरिकेत या सणाला जास्तीत जास्त लोक प्रवास करतात. (आपल्या नातेवाईकांसोबत राहण्याच्या धडपडीत.) मुख्य सण गुरुवारीच साजरा करतात. मेजवानी सकाळच्या जेवणाला किंवा रात्रीच्या. घरातल्या जबाबदार गृहिणीची लगबग बरीच आधी सुरू होते. मोठय़ा लांबडय़ा टेबलावर घालायचा (फॉल सीझनला शोभणारा) टेबलक्लॉथ, मध्यभागी सुंदर पुष्प रचना, कधी क्वचित दिसणारा कॉरनुकोपिआ (बोलताना याचा उच्चार कॉन्कोपिआ असा होतो. ग्रीक पुराणांमध्ये याच्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट आहे.) याला हॉर्न ऑफ प्लेंटी असेही म्हणतात. फळे, भाज्या, सुका मेवा वगैरेनी ओसंडून वाहणारे हे मेंढय़ाचे शिंग (काच, प्लॅस्टिक किंवा वेताचे) पिलग्रिम्स आपल्याबरोबर घेऊन आले. नाजूक डिनर सेट, रुचकर खाद्यपदार्थानी भरलेली भांडी, खुच्र्याची कव्हरे, प्लेटींच्या खालचे रुमाल, नॅपकिन िरग्ज- सर्व काही रंगसंगती साधून! ग्रोसरीमधून स्टफ करण्यासाठी टर्की, तिच्यात भरायचा मसाला, भोपळ्याचा किंवा सफरचंदाचा पाय (पातळ केक), निरनिराळ्या भाज्या, फळे सर्व काही नीट आखणी करून आधीच आणून ठेवायचे. जेवणात स्टफ केलेली टर्की, पंपकिन पाय, अंडी, इतर मांसाहारी पदार्थ, उकडलेली कणसे, रताळी, बटाटय़ाचे भरीत, वेगवेगळी सॅलड्स, शेंगा, क्रॅनबेरी सॉस, फळांचे रस, असा बेत असतो. अलीकडे आरोग्याच्या बदलत्या कल्पनांमुळे सबंध स्टफ केलेल्या टर्कीपेक्षा टर्कीचे सँड्विचेस तरुणांना जास्त पसंत पडतात.

४०-५० वर्षांपासून इथे राहात असलेले भारतीयही हा सण आपल्या घरी साजरा करतात. तरुण कुटुंबे मोठय़ा घरी जमतात किंवा आजी-आजोबा मुला-नातवंडांकडे जातात. टर्की खातात किंवा नाहीही खात. सर्वानी एकत्र येऊन चार दिवस मजेत घालवायचे आणि हीच दिवाळी असे मानायचे. दिवाळीला सर्वाना सुट्टय़ा कुठे असतात?

थँक्सगिव्हिंगच्या मेजवानीनंतर तरुण मंडळी (विशेष करून पुरुष) फुटबॉलची मॅच बिअरचे घुटके घेत बघत मजेत वेळ घालवतात. स्त्रीवर्ग वाइन पीत गप्पाटप्पा करतात.

थँक्सगिव्हिंगला फुटबॉलचा गेम खेळण्याची आणि पाहण्याची सुरुवात १९२० साली सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. अशाच आणखीन काही परंपराही या दिवसाला अनेक वर्षे जोडल्या गेलेल्या आहेत. ‘मेसी’ या प्रसिद्ध साखळी दुकानाची परेड, ब्लॅक फ्रायडेचे शॉपिंग, गरजू लोकांना मदत करण्यासाठी शाळांमधून, कचेऱ्यांमधून आखलेले विविध कार्यक्रम, इत्यादी.

मेसीच्या परेडची सुरुवात १९२४ साली झाली. परेड फारच सुंदर असते. उंच हवेत तरंगणारे मोठे, मोठे फुगे, सजवलेले रथ, रथांमध्ये सर्वाच्या परिचयाची कार्टूनमधली प्रसिद्ध मंडळी, नावाजलेले अभिनेते अशी खूप मोठी मिरवणूक ठरावीक वेळेला सुरू होऊन तीन तास चालते. परेड न्यूयॉर्कमध्ये असते. खूप लोक ती बघायला प्रत्यक्ष जातात; ती टीव्हीवर बघणारे लोकही कमी नाहीत.

मेसीची परेड आणि ब्लॅक फ्रायडेचे शॉपिंग या दोन्ही गोष्टी आधुनिक अमेरिकेच्या भौतिकवादाला शोभणाऱ्याच आहेत. (थोडीशी दिवाळीची आठवण होते का?) थँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या शुक्रवारला ब्लॅक फ्रायडे म्हणतात. नावावरून वाटावे की या दिवसाला काही वाईट घटना चिकटल्या आहेत की काय! तसं काही नाही. जुन्या पद्धतीप्रमाणे विक्री चांगली झाली नाही तर दुकानदार आपल्या हिशेबाच्या वहीत त्या दिवशीच्या व्यवहारांखाली लाल रेघ मारतो आणि याउलट चांगल्या आर्थिक व्यवहाराखाली काळी रेघ. थँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी लोक नाताळच्या आणि नवीन वर्षांच्या खरेदीची मोठय़ा उत्साहात सुरुवात करतात. (टीव्ही, पेपरमधून जाहिराती, सेल यांचा भडिमार ग्राहकांवर चांगला महिनाभर आधीपासून दुकानदार करीत असतातच.) या एक-दोन दिवसांच्या आर्थिक व्यवहारांचे आकडे बघून अर्थतज्ज्ञ आगामी वर्षांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल अंदाज बांधू शकतात.

थँक्सगिव्हिंगला दरवर्षी व्हाइट हाऊसमधून प्रेसिडेंट काही टर्कीना अभय देऊन परत त्यांच्या फार्मवर पाठवतात. (आजचं मरण उद्यावर?) थँक्सगिव्हिंगला टर्की खाण्याची प्रथा नेमकी कधी सुरू झाली ते माहीत नाही. (पहिल्या मेजवानीला काही टर्की नव्हती जेवणात.) आता मात्र टर्कीशिवाय थँक्सगिव्हिंगच्या जेवणाची कल्पनाही नाही करता येत. लहान मुले थँक्सगिव्हिंगला ‘टर्की डे’ असेही म्हणतात.

आपल्यापेक्षा जास्त गरजू लोकांची मदत करायला अमेरिकेतले लोक सदैव तत्पर असतात. याचे बाळकडू शिशुवर्गातच मिळू लागते. सगळ्या शाळांमध्ये, ऑफिसेसमध्ये, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये खाण्याचे डबाबंद पदार्थ, कोरडे खाण्याचे पदार्थ (बिस्किटांचे पुडे, वगैरे) ब्लँकेट्स, औषधे अशा किती तरी वस्तू घरून आणून एकत्र साठवून गरजू लोकांना किंवा शेजारच्या संकटग्रस्त देशांना रवाना केल्या जातात.

शाळेमध्ये पाचवीपर्यंत शिक्षक मुलांना पहिल्या थँक्सगिव्हिंगची गोष्ट सांगतात, मुले पिलग्रिम्सचे आणि इंडियन लोकांसारखे कपडे घालून छोटी छोटी नाटुकली सादर करतात. कधी कधी शाळांमध्ये पालकांना आमंत्रण देऊन अल्पोपाहाराला बोलावतात (भावना असते ती त्यांना ‘थँक्यू’ म्हणायची). ‘थँक्स’ आणि ‘यू आर वेलकम’ हे दोन वापरून गुळगुळीत झालेले आणि तरीही न चुकता वापरले जाणारे वाक्प्रचार, देवाचे किंवा इतरांचे आभार मानण्याची शिकवण, बंधुभावाने राहण्याची वृत्ती या आणि अशा चांगल्या शिकवणींची नव्याने उजळणी होते.

मुले बरीच मोठी झाल्यावर त्यांच्या कानावर आणखीनही काही गोष्टी पडतात. पहिल्या थँक्सगिव्हिंगच्या वेळेला असलेली आभाराची भावना (त्याबद्दलही काहींच्या मनात शंका आहे) नंतर कधीच नव्हती. गोऱ्यांनी इथल्या भूमिपुत्रांना एका कोपऱ्यात ढकलून त्यांचा प्रदेश बळकावला. भूमिपुत्रांनी लढाया केल्या, पण त्यांना चिरडायला गोऱ्यांना वेळ नाही लागला. बघता बघता धर्माचा प्रचार करीत यात्रेकरू इंडियन्सची अमेरिका गिळून बसले.

हे सगळे जरी सुशिक्षित मनाला त्रास देणारे असले, तरी अजूनही थँक्सगिव्हिंगच्या मुळाशी ‘कोणाच्या तरी प्रती आदर वाटून त्याला आभारी आहे असे म्हणावे’ ही भावना शिल्लक आहे. आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे, शिक्षकांचे, भावंडांचे, दोस्तांचे, लाडक्या पशु-पक्ष्यांचे, आवडत्या पुस्तकांचे धर्मनिरपेक्ष भावनेने आवर्जून आभार मानायची शिकवण सर्वाना सारखी देणारा थँक्सगिव्हिंग अमेरिकेत राहणाऱ्या सर्वाचाच लाडका सण आहे.