आयपीएलचे सामने रंगले असताना सिनेमा कोण पाहणार ही जुनी धारणा हिंदी सिनेमावाल्यांनी यंदाच्या आयपीएल मोसमादरम्यानही कायम ठेवली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातील ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ आणि तिसऱ्या आठवडय़ातील ‘मिस्टर एक्स’ या सिनेमांव्यतिरिक्त सबंध महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची नावे ‘धरम संकट में’, ‘पैसा हो पैसा’, ‘इश्क के परींदे’, ‘जय हो डेमोक्रसी’, ‘मार्गारिटा विथ स्ट्रॉ’, ‘डॉटर’, ‘एक पहेली लीला’, ‘कागज के फूल्स’, ‘एक अद्भुत दक्षिणा: गुरूदक्षिणा’, ‘रहस्य’, ‘रंग ए इश्क’ अशी होती. ‘एक पहेली लीला’ हा सिनेमा सोडला तर बाकी सर्व चित्रपट प्रदर्शित झाले हो, असे प्रेक्षकांना सांगावे लागेल. त्यामुळे हिंदी सिनेमावाल्यांच्या दृष्टीने एप्रिल महिना अजिबात लाभदायी ठरला नाही, असे म्हणावे लागेल. अख्खा मे महिनासुद्धा आयपीएलचा जोर राहणार असला तरी बडय़ा स्टार कलावंतांचे चित्रपट मोठय़ा प्रमाणात झळकणार आहेत.
महिन्याची सुरुवात ‘गब्बर इज बॅक‘ हा सुपरस्टार अक्षय कुमारच्या धमाकेदार सिनेमाने होत आहे. अक्षय कुमारचा ठरावीक प्रेक्षकवर्ग याला लाभेल. त्याचे अनेक सिनेमे ‘फूल ऑन बिनडोक एण्टरटेन्मेंट’ या गटातील अस्सल मसालापट असतात. सनी लिओनीने ‘एक पहेली लीला’ या सिनेमात भरपूर अंगप्रदर्शन केल्यानंतर मे महिन्यात तिचे चक्क आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होतायत. त्यापैकी एक आहे ‘मस्तीजादें’. नावाप्रमाणेच हा बॉलीवूड सेक्स कॉमेडी प्रकारातला चित्रपट असेल. लीला ही भूमिका साकारल्यानंतर या चित्रपटातही सनी लिओनी पुन्हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. लिली लेले आणि लैला लेले अशा ‘ल’ अक्षरांच्या नावाने सनी लिओनीच्या भूमिका अंगप्रदर्शना-व्यतिरिक्त तिच्या न अभिनयाने गाजतात का ते पाहायच्या. तिचा आणखी एक चित्रपट येणार आहे त्याचे नाव ‘कुछ कुछ लोचा है’ असे असून हाही सेक्स कॉमेडी प्रकाराच्या जवळ जाणारा चित्रपट असेल.
–    इरफान खान, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण अशा बडय़ा कलावंतांचा ‘पिकू ’, रणबीर कपूर-अनुष्का शर्मा जोडीचा ‘बॉम्बे वेलवेट’, कंगना राणावतच्या दुहेरी भूमिकेतला ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ आणि अनिल कपूर, नाना पाटेकर, जॉन अब्राहम, परेश रावल, डिम्पल कपाडिया, नासिरुद्दीन शाह अशा बडय़ा स्टार कलावंतांचा मल्टिस्टार बिनडोक मसालापट असलेला ‘वेलकम बॅक’ हा सिनेमाही याच महिन्यात येतोय. मे महिन्याच्या पाच आठवडय़ांमध्ये प्रत्येक आठवडय़ाला बडय़ा स्टार कलावंतांचा एक असे एकूण पाच चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे बॉलीवूडवाले वितरक, निर्माते यांचा सुगीचा काळच म्हणावा लागेल.
हिंदी सिनेमा हा प्रामुख्याने आजही बडय़ा स्टार कलावंतांच्या जोरावर गल्लापेटीवर यशस्वी होतोच, त्यामुळे फॉम्र्युलाबाज पठडीबद्ध सिनेमा हिंदीत वरचेवर येत राहणार आहे. ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘वेलकम’ या गल्लापेटीवर तुफान यशस्वी ठरलेल्या चित्रपटांच्या सीक्वलमुळेही बॉलीवूडच्या उलाढालीत भर पडणार आहे. त्याचबरोबर तामिळ सिनेमाच्या तेलुगू रिमेकचा हिंदी रिमेक अशा स्वरूपाचा हमखास यशस्वी ठरणारा अ‍ॅण्टिहिरो ‘गब्बर इज बॅक’ हा अ‍ॅक्शनपट असून संजय लीला भन्साळीसारख्या दिग्दर्शकाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘रावडी राठोड’च्या यशामुळे भन्साळी यांनी पुन्हा एकदा अक्षयकुमारसोबत चित्रपट केला आहे. यामागे आर्थिक गणिते निश्चितच आहेत. एकीकडे ‘ब्लॅक’, ‘गुजारिश’ यांसारख्या चित्रपटांचे निर्मिती-दिग्दर्शन केल्यानंतर भन्साळींसारखा दिग्दर्शक गल्लाभरू चित्रपटाची निर्मिती करण्यात उतरतो. यावरून कलात्मकता आणि व्यवसाय अशा दोन्ही बाजूंचा समतोल राखण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. म्हणूनच त्यांनी ‘गब्बर इज बॅक’सारख्या चित्रपटाची निर्मिती केली असावी.

–    सुनील नांदगावकर