18 June 2019

News Flash

कलाकुसर: थर्माकोलपासून टेबलटॉप लँडस्केप

गणपती बाप्पाच्या मखरासाठी वापरला जाणारा थर्माकोल नंतर टाकून न देता त्याच्यातून काही वेगळं बनवता आलं तर..

| September 12, 2014 01:27 am

गणपती बाप्पाच्या मखरासाठी वापरला जाणारा थर्माकोल नंतर टाकून न देता त्याच्यातून काही वेगळं बनवता आलं तर..

गणपतीच्या सजावटीसाठी व पॅकिंगसाठी वापरलेला थर्माकोल (पॉलियुरेथीन) शेवटी इतस्तत: टाकून दिला जातो. यामुळे पर्यावरण दूषित होतेच आणि नाल्यांमध्ये, गटारांमध्ये थर्माकोल अडकून रस्त्यांवर व इतर ठिकाणीही सांडपाणी साचून अनारोग्यास आमंत्रण दिले जाते. या थर्माकोलचे विघटन होण्यास अनेक वष्रे लागतात; दर वर्षी या प्रदूषणात भर पडतच असते. जोपर्यंत थर्माकोलचे उत्पादन व वापर होत राहणार, तोपर्यंत हे प्रदूषण होतच राहणार; त्यावर कसलाही उपाय सध्या तरी दिसत नाही. तर मग होणारे प्रदूषण रोखणे शक्य नसेल तर निदान टाकाऊ थर्माकोलपासून काही शोभेच्या वस्तू बनवल्या तर निदान काही प्रमाणात तरी तो कचऱ्यामध्ये टाकला जाणार नाही आणि काही वष्रे तरी तो आपल्या घरीच शोभेची वस्तू बनून राहील.
थर्माकोल गरम झाल्यास वितळतो हे माहीत होते. थर्माकोल कापण्यास सोल्डरिंग आयर्न्‍ससारखे एक अवजार उपलब्ध असते. त्याचा उपयोग करून थर्माकोलला हवा तसा आकार आणि खडबडीतपणा देता येईल असे वाटले; आणि प्रयोगाअंती ते जमलेही. मग त्याच प्रकारे टाकाऊ थर्माकोलपासून छोटे छोटे लँडस्केप का करू नयेत असा विचार आला. पॅकिंगच्या थर्माकोलचे लहान, ओबडधोबड तुकडे करून त्यांना फेविकॉलने एकमेकांना चिकटवून एक आकृती करून घेतली. तिला सोल्डरिंग आयर्नने दगडांसारखा आकार व खडबडीतपणा साधला. एवढे केल्यानंतर ते फारच विचित्र वाटत होते. ते नसíगक दिसण्यासाठी त्यावर रंगकाम करणे जरूर होते. त्यासाठी फेविकॉलमध्ये थोडे पाणी मिसळून, रंग मिसळून ते वापरून पहिले. पण त्यामुळे एक प्रकारची लकाकी आल्याने ते नसíगक वाटत नव्हते. म्हणून त्या मिश्रणात भिंतीला रंग लावण्यापूर्वी समतल करण्यास वापरली जाणारी पुटी (एक प्रकारची लांबी पावडर किंवा त्याऐवजी चिनीमाती पावडर) मिसळल्याने लकाकी नाहीशी करू शकलो.
लँडस्केप तयार झाल्यावर ती सजवण्यासाठी जिवंत वनस्पतींचे तुकडे किंवा प्लास्टिकच्या झाडाझुडपांच्या प्रतिकृती, रंगीत वाळू, बांबूंचे छोटेसे घर वापरून अत्यंत आकर्षक टेबल-टॉप लँडस्केप्स करता येतात. लँडस्केपमध्ये तळे करायचे असेल तर तळ्यासाठी केलेल्या खोलगट भागास एरल्डाइटचा लेप द्यावा लागतो.
हे कोणालाही घरी करणे शक्य आहे. त्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा सहजच व माफक किमतीत उपलब्ध असते. एक पेपर कटर चाकू, रंग लावण्यासाठी कॅमल हेअर ब्रश, रंग, पुटी किंवा चिनीमाती, फेविकॉल किंवा तत्सम िडक, थर्माकोलचे तुकडे, थर्माकोल कापण्याचा सोल्डरिंग आयर्न आणि मुख्य म्हणजे आपली कलात्मक नजर एवढे असले की बस. हे असे आकर्षक लँडस्केप करून ते भेट देण्यास छानच आहेत. असे आकर्षक लँडस्केप्स विकून घरबसल्या एक उद्योगही होऊ शकेल. हे सर्व केल्याने थर्माकोलमुळे होणारे प्रदूषण रोखले जाणार नसले तरीही तो सरळ सरळ कचऱ्यामध्ये जात नसल्याने काही प्रमाणात तरी त्यावर आवर घातला जाईल.
सर्व छायाचित्रे : नंदन कलबाग

First Published on September 12, 2014 1:27 am

Web Title: thermocol tabletop landscape
टॅग Art,Handicraft