भारत म्हणजे वाघांचा देश. इथले वाघ वाचले पाहिजेत म्हणून इंदिरा गांधी पंतप्रधान असताना व्याघ्र संरक्षण व संवर्धन प्रकल्प अस्तित्वात आला. पंतप्रधान असलेल्या इंदिराजींना त्याचे महत्त्व पटले होते. वाघांच्या संदर्भात काहीही झाले तरी मला तातडीने कळवा, असा त्यांचा संदेश होता. म्हणून त्या महत्त्वाच्या विदेश दौऱ्यावर असतानाही त्यांना एका वाघाची शिकार झाल्याचा निरोप धाडण्यात आला. विदेशातील राज्यकर्त्यांबरोबरची ती अतिमहत्त्वाची बैठक सुरू असताना भारतातून फोन आला. ती बैठक थांबवून त्यांनी तो फोन घेतला, एवढे महत्त्वाचे देशात काय झाले, असे विचारता त्या म्हणाल्या, माझ्या देशातील एक वाघ बळी पडला. माझ्या नागरिकाइतकेच महत्त्व माझ्या देशातील प्रत्येक वाघालाही आहे. त्यामुळे हा फोन महत्त्वाचा होता.. वाघाचे महत्त्व पुरेपूर जाणणाऱ्या त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातच १९७२ साली वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे संपूर्ण देशभरात शिकारी आणि वन्य प्राण्यांच्या व्यापारावर बंदी आली. मात्र प्राण्यांना हे कायदेशीर संरक्षण मिळाल्यानंतरही शिकारीच्या घटना सातत्याने होतच होत्या.

प्राण्यांची कातडी, त्यांची हाडे आणि इतर अवयवांची तस्करी होते आहे, हे सातत्याने सर्वाच्याच लक्षात येत होते. वनखाते, सरकार, वन्यजीवप्रेमी सर्वानाच त्याची खात्री होती. पण हे सारे जाते कुठे ते मात्र कळत नव्हते. ते कळण्यासाठी १९८९ हे साल उजाडावे लागले. शिकार केलेल्या प्राण्यांचे अवयव आणि कातडी यांच्या तस्करीसंदर्भातील जे प्रश्न सरकार, वन्यजीव कार्यकर्ते आणि वन खात्याला पडले होते तेच प्रश्न बेलिंडा राइटलाही सतावत होते. तिचा तर जन्मच भारतात कोलकात्याला झालेला. आई वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड फॉर नेचर- इंडियाच्या संस्थापकांपैकी एक. त्यामुळे वन्यजीवांशी नाते तर बालपणीच जुळलेले. तिची आई अनी हिने व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आले त्या वेळेस त्यासाठी वन्यजीव सल्लागार म्हणून भारत सरकारसाठी काम पाहिले. त्या व्याघ्र प्रकल्पांची रचना व व्यवस्थापन कसे असावे इथपासून ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांची निवड करणे व काम मार्गी लावून देणे आदी कामे केली. साहजिकच होते की, वाघांची आवड बेलिंडालाही अगदी लहानपणी लागली. तिच्या आईने वन्यजीवरक्षणाच्या कामात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ब्रिटन सरकारने ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा सर्वोच्च सन्मान देऊन तिचा गौरव केला. बेलिंडानेही वन्यजीवरक्षणाचीच वाट पकडली आणि त्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
बेलिंडालाही सुरुवातीला कळत नव्हते की, वाघ-बिबळ्या या प्राण्यांची शिकार झाल्यानंतर गायब होणारे त्यांचे अवयव जातात कुठे? पण त्याचा उलगडा तिला १९८९ साली झाला. कोलकाता पोस्ट ऑफिसमध्ये वाघांच्या कातडीची दोन मोठाली पार्सल्स पडलेली होती. युरोपियन दिसणे आणि युरोपियन वळणाचे इंग्रजी बोलणे याचा फायदा उठवत तिने धाडसी पाऊल उचलले आणि त्या पार्सलचा माग पार तिबेटपर्यंत पोहोचत चीनपर्यंत काढला. त्यानंतरची तीन-चार वर्षे तिने वेडय़ासारखी तिबेट आणि चीनपर्यंत या तस्करीचा माग काढण्यात घालवली. विदेशी खरेदीदार बनून जायचे आणि मग तस्करांपर्यंत पोहोचायचे, त्यांची संपूर्ण माहिती घ्यायची. त्यातून तिने शेकडो वन्यजीव तस्करांची माहिती मिळवली आणि त्याचा शास्त्रीय पद्धतीने डेटाबेस तयार केला. माहितीचे शास्त्रीय संकलन करून त्याचा शास्त्रशुद्ध अहवाल तयार करून तो भारत सरकारला सादर केला. त्यात भारतातील कोणत्या जंगलात शिकार होते, त्यानंतर मारलेले वन्यजीव कसे व कोणत्या मार्गाने, कुठे पाठवले जातात याची सविस्तर माहिती बारीकसारीक नोंदींसह त्या अहवालात होती. तेव्हा कुठे भारत सरकार आणि भारतवासीयांच्या लक्षात आले की, शिकार नागपूर, मध्य प्रदेश किंवा बिहारमध्ये होत असली तरी सारे मार्ग तिबेटमार्फत चीनपर्यंत पोहोचतात.

वाघांची संख्या वाढली, कारण त्यांचे अधिवास सुरक्षित झाले एवढेच सांगितले जाते. पण शिकारच होणार नाही म्हणून काम करणाऱ्या बेलिंडाचे काय?

तिबेट आणि चीनमध्ये वाघ व बिबळ्याच्या कातडय़ांना, हाडांना व अवयवांना जोरदार मागणी होती. कातडे हे श्रीमंती शोभेचे लक्षण मानले जाते किंवा मग पारंपरिक व धार्मिक सोहळ्यात त्याचा वापर केला जातो. अवयवांच्या बाबतीत ते कामोत्तेजक असतात, असा समज असल्याने तेथील स्थानिक औषधांमध्ये त्यांचा वापर केला जातो. या कामोत्तेजक औषधांना केवळ चीनमध्येच नाही तर जगभरात मागणी होती, असे बेलिंडाला लक्षात आले.
बेलिंडाने सादर केलेल्या अहवालाचा वापर पुरावा म्हणून करीत भारत सरकारने गुन्हे दाखल करून वन्यजीव कायद्यान्वये तब्बल २३ खटले चालविले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये एवढे खटले प्रथमच चालविले जात होते. त्याचे श्रेय बेलिंडाचे होते. दरम्यान, या कामासाठी आता आयुष्य वाहून घ्यायचे, असे ठरवून बेलिंडाने १९९४ साली वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. आणि सरकारी मदतीची वाट न पाहता मन लावून या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. तिला लक्षात आले की, तस्करांचा माग काढणे हे तसे कठीण आणि जीवघेणे काम असल्याने या क्षेत्रात काम करणारी एकही संस्था नाही. मग तिने आपला जीव यासाठी पणाला लावायचे ठरवले. आजही बेलिंडा हे काम नेमाने आणि नेकीने करते आहे.
२००५ साली तिने पाच आठवडय़ांच्या कालावधीत तिबेट व चीनच्या दिशेने निघालेल्या ८३ वाघ व बिबळ्यांच्या कातडय़ांची व अवयवांची तस्करी पकडून दिली. त्यानंतर अस्वस्थ झालेल्या बेलिंडाने या तस्करीचा एक शास्त्रशुद्ध अहवाल तयार करून तो चीन सरकारला सादर केला. हे सारे रोखण्याची विनंती तिने चीनला केली. मात्र त्याचा फारसा फरक पडला नाही. मुळात ज्या गोष्टींना बाजारपेठ असल्यामुळे ही तस्करी होते ते कारणच नष्ट व्हायला हवे, असे तिला वाटत होते. म्हणून मग तिने त्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. तिबेटमध्ये धर्मगुरू दलाई लामा यांना सर्वोच्च मानले जाते. म्हणून अखेरीस बेलिंडाने दलाई लामा यांना गाठले आणि अहिंसा शिकवणाऱ्या बौद्ध धर्माचे पाईक वन्यजीवांची हत्या केलेली कातडी कशी काय वापरू शकतात, असा रोखठोक सवाल केला. परिणामी दलाई लामांनी तिचे म्हणणे मान्य करून वन्यजीवांची कातडी किंवा कोणतेही अवयव धार्मिक विधींमध्ये वापरू नयेत, असे आवाहन केले आणि नंतर तिबेटच्या रस्त्यांवर दलाई लामा यांना मानणाऱ्या तिबेटींनी घरातील वाघाच्या कातडय़ांची जाहीर होळी केली.
बेलिंडाने स्थापन केलेल्या संस्थेशी वन्यजीव कार्यकर्त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. आता गेल्या २० वर्षांमध्ये या संस्थेने वन्यजीव तस्करीशी संबंधित (फक्त वाघ- बिबळ्याच्या संबंधित नव्हे तर तिने शाहतूस शाल ज्याच्यापासून तयार केली जाते तो मृग व इतर प्राण्यांची तस्करीही शोधून काढली.) तब्बल २० हजार घटनांची माहिती शास्त्रीय पद्धतीने एकत्र करून एक डेटाबेस तयार केला आहे. शिवाय या घटनांशी संबंधित तब्बल १६ हजार गुन्हेगारांची माहितीही एकत्रित केली आहे. हे एवढे सारे काम तर वाघांची संख्या वाढल्यानंतर स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या भारत सरकारने केलेले नाही.
वाघांची संख्या वाढली, कारण त्यांचे अधिवास सुरक्षित झाले एवढेच सांगितले जाते. पण शिकारच होणार नाही म्हणून काम करणाऱ्या बेलिंडाचे काय? की, भारतातच जन्मलेली आणि भारतालाच आपले मानून इथल्याच लोकांसाठी हयात घालविणारी बेलिंडा युरोपियन दिसते आणि तिचे नावही विदेशी वाटते म्हणून आपण तिचे कामही नाकारण्याचा नतद्रष्टपणा करणार? आता ठरवा, पाठ कुणाची थोपटायची ते!
01vinayak-signature
विनायक परब