News Flash

मर्यादांवर मात!

पॅरालिम्पिक २०२० मधील भारतीय कामगिरीचा आढावा घेण्याआधी थोडासा या स्पर्धेचा इतिहास समजून घेऊया.

pyaralompic
पॅरालिम्पिकच्या इतिहासात २०१६ पर्यंत भारताने तीन सुवर्णपदकांसह १२ पदके मिळवली होती आणि टोक्योमध्ये भारतीय क्रीडापटू ती संख्या दुप्पट करतील, यात शंकाच नाही.

अभिजीत कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com
जपानची राजधानी टोक्योमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दोन सुवर्णपदकांसह एकूण १० पदके जिंकून इतिहास घडवला आहे आणि उरलेल्या काही दिवसांत अजूनही काही पदकांची आशा असल्याने २०२१ (या स्पर्धा २०२०च्याच मानल्या जातील) हे भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात यशस्वी वर्ष मानले जाणार यात शंकाच नाही.

ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात देशाने एकूण ७ पदके मिळवून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटू कशी कामगिरी करतात, यावर केंद्रित झाले होते. पण या क्रीडापटूंनी ‘हम किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले.

पॅरालिम्पिक २०२० मधील भारतीय कामगिरीचा आढावा घेण्याआधी थोडासा या स्पर्धेचा इतिहास समजून घेऊया. १९४८च्या लंडन ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी स्टोक मांडेविले हॉस्पिटलचे डॉक्टर लुडविग गट्टमन यांनी दुसऱ्या महायुद्धात मणक्याच्या दुखापतीमुळे जायबंदी झालेल्या ब्रिटिश सैनिकांसाठी पहिल्या व्हीलचेअर स्पर्धेचे आयोजन केले. चार वर्षांनी या स्पर्धेत इस्रायली आणि नेदरलँड्सच्या विशेष सक्षम (differently abled) सैनिकांनी भाग घेतला आणि स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. या स्पर्धा ‘स्टोक मांडेविले गेम्स’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

पहिली अधिकृत पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा मात्र १९६० मध्ये इटलीची राजधानी रोममध्ये झाली आणि त्यात पहिल्यांदा सशस्त्र दलाव्यतिरिक्त इतर विशेष सक्षम खेळाडूंनाही भाग घेण्याची परवानगी मिळाली. या स्पर्धा १९७६ पर्यंत फक्त मणक्याच्या दुखापतीमुळे अपंगत्व आलेल्या खेळाडूंसाठीच मर्यादित होत्या. पण १९७६ मध्ये इतर विशेष सक्षम खेळाडूंचाही या स्पर्धेत समावेश करण्यात आला. आता या स्पर्धा १० पात्र विशेष सक्षम प्रकारांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. या १० प्रकारांत सुद्धा खेळाडूंच्या अपंगत्वाप्रमाणे वर्गीकरण करण्यात येते आणि ते प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी वेगवेगळे असते.

१९८८ मध्ये पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धा सोल ऑलिम्पिकच्या नंतर त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आणि तेव्हापासून या स्पर्धा उन्हाळी ऑलिम्पिकनंतर काही दिवसांनी त्याच शहरात आयोजण्याची प्रथा रूढ झाली.

पॅरालिम्पिकच्या इतिहासात २०१६ पर्यंत भारताने तीन सुवर्णपदकांसह १२ पदके मिळवली होती आणि टोक्योमध्ये भारतीय क्रीडापटू ती संख्या दुप्पट करतील, यात शंकाच नाही. मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ साली पश्चिम जर्मनीच्या हायडलबर्गमध्ये ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण प्रकारात सुवर्णपदक मिळवून जी ज्योत पेटवली होती, तिची आता मशाल झाली आहे आणि कित्येक भारतीय खेळाडू आता विविध पॅरा-क्रीडा प्रकारांत आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळणारे यश हेच दाखवून देते आहे. २०१६च्या रिओ पॅरालिम्पिकपर्यंत भारताला मिळालेल्या १२ पदकांपैकी १० अ‍ॅथलेटिक्समध्ये प्राप्त झाली होती. पेटकरांच्या जलतरणातील सुवर्णपदकाव्यतिरिक्त फक्त राजिंदरसिंग राहेलू यांनी २००४च्या अ‍ॅथेन्स पॅरालिम्पिकमध्ये पॉवरलिफ्टिंगचे कांस्यपदक मिळवले होते.

या उलट टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांचे खाते टेबल टेनिसपटू भाविना पटेलने महिला एकेरी वर्ग ४ या प्रकारात रौप्यपदक मिळवून उघडले. पोलिओमुळे लहानपणापासून पायातले बळ हरवलेल्या ३४ वर्षीय भाविनाने जगातल्या काही मातब्बर खेळाडूंना अनपेक्षितपणे हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि ही कामगिरी करणारी ती पहिली महिला टेबल टेनिसपटू ठरली.

भाविनाच्या यशानंतर २१ वर्षीय अवनी लेखराने आपल्या पॅरालिम्पिक पदार्पणातच अंतिम फेरीत विश्वविक्रम करून सुवर्णपदक मिळवले. २०१२ मध्ये अपघातामुळे तिच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आणि ती त्यानंतर चालूच शकली नाही. पण २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकविजेत्या अभिनव बिंद्राचे आत्मचरित्र वाचून ती नेमबाजीत नशीब आजमावायला प्रेरित झाली आणि तिने टोक्योमध्ये भारताच्या पॅरालिम्पिक इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षराने कोरले आहे.

अवनीने पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदकाला गवसणी घातली तर भालाफेकपटू देवेंद्र झझारियाने टोक्योमध्ये वैयक्तिक तिसरे पदक जिंकले. ४० वर्षीय देवेंद्रने २००४च्या अ‍ॅथेन्स आणि २०१६च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण त्याने असा विक्रम करणारा पहिला भारतीय म्हणून आपले नाव अजरामर केले होतेच. टोक्योमध्येसुद्धा त्याने पुन्हा एकदा विश्वविक्रम मोडून तिसऱ्या सुवर्णपदकाची आपली दावेदारी सादर केली होती. पण श्रीलंकेच्या दिनेश प्रिया हेराथ मुडियासेलेजने ६७.७९ मीटर भाला फेकून नवीन विक्रम घडवला आणि झंझारिया (६३.९७ मी.) व त्याचा संघसहकारी सुंदर सिंह गुर्जर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदके मिळवली.

खरे तर पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्यांचीच नव्हे, तर नुसते सहभागी होण्यासाठीसुद्धा या खेळाडूंना खडतर प्रवास करावा लागतो आणि त्यांच्या अपंगत्वामुळे त्यांच्यापुढे बरेच पेच निर्माण होतात. उदाहरण द्यायचे झाले तर रौप्यपदक विजेत्या भाविनाला सक्षम शरीराच्या टेबल टेनिसपटूंसारखा तासन्तास सराव करता येत नाही. कारण काही वेळातच तिच्या पाठीत गोळे यायला लागतात आणि त्यानंतर तिला काही काळ आडवे पडून विश्रांती घ्यावी लागते.

पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करण्यासाठी एक वेगळी इच्छाशक्ती दाखवावी लागते आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांचीसुद्धा या सर्व प्रवासात पाठ मोडून निघते आणि या सगळ्यांवर मात करून हे खेळाडू इथपर्यंत पोहोचतात यातच त्यांचे यश आहे. पण २०१६ मध्ये दोन सुवर्णपदकांसहित चार पदके आणि टोक्योमध्ये १० पेक्षा जास्त पदके जिंकून या खेळाडूंनी आम्ही फक्त सहभागी होऊन समाधान मानणाऱ्यांपैकी नाही आहोत, हे दाखवून दिले आहे.

भारतीय पॅरालिम्पिक खेळाडूंचे हे यश म्हणजे आता सगळे आलबेल आहे आणि या देशात विशेष सक्षम खेळाडूंचे भविष्य आता सुरक्षित आहे, असे अजिबात नाही. भारतातील विशेष सक्षम खेळाडूंसाठीचे पहिले आव्हान सराव करण्यासाठी योग्य जागा शोधणे हे असते. कारण आपली बरेचशी स्टेडियम्स बांधताना या खेळाडूंच्या गरजांचा विचारच करण्यात आलेला नाही. या अडथळ्यावर मात केली तर मग पॅरा-संघटना आणि त्यांच्या अनागोंदी कारभाराला सामोरे जावे लागते. या संघटनासुद्धा खेळाडूंच्या मूलभूत गरजांचा विचार न करता स्पर्धा भरवतात आणि खेळाडूंची परवड होते. मार्च २०२१ मध्ये बेंगळूरुला पार पडलेल्या राष्ट्रीय पॅरा-अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांची गोळाफेक स्पर्धा गाडय़ांच्या आणि मोबाइलच्या प्रकाशात खेळवली गेली. अशा स्पर्धाच्या वेळी खेळाडूंना मिळणाऱ्या सोयी-सुविधांबद्दल प्रसिद्धीमाध्यमातून आवाज उठवण्यात आला की कुठल्या तरी चौकशीची घोषणा होते. पण पुढे काहीच बदलत नाही. केंद्र सरकारने तर काही काळासाठी पॅरा-क्रीडा प्रकारांसाठी देशातील सर्वोच्च संघटना भारतीय पॅरालिम्पिक समितीला (पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया) निलंबित केले होते आणि आता त्याची धुरा २०१६च्या रिओ पॅरालिम्पिकची रौप्यपदक विजेती दीपा मलिकने सांभाळली आहे. पण सगळेच खेळाडू अजूनही संघटनेच्या काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होण्याची वाट पाहात आहेत.

एखाद्या नवीन खेळाडूला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घ्यायचा असेल तर तो कुठल्या गटात पात्र ठरतो, हे त्याला आधी जाणून घ्यावे लागते. हे वर्गीकरण करणारे तज्ज्ञ देशात नसल्याने खेळाडूंना स्वखर्चाने एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन हे वर्गीकरण करून घ्यावे लागते. जर त्यांना ते आर्थिकदृष्टय़ा शक्य नसेल तर ते राष्ट्रीय स्पर्धेत जवळच्या कुठल्या तरी गटात भाग घेतात. पण जेव्हा ते परदेशात खेळायला जातात, तेव्हा त्यांना कुठल्या गटात भाग घ्यायचा आहे, हे नक्की नसते. टोक्यो पॅरालिम्पिकमध्येसुद्धा भारताच्या विनोद कुमारला थाळीफेकीत कांस्यपदकाला मुकावे लागले. कारण त्याच्या वर्गीकरणाला काही देशांनी आक्षेप घेतला व तो आयोजकांनी पुनरावलोकनानंतर मान्य केला.

इतके सगळे असूनही भारतीयांचा पॅरालिम्पिकमधील चढता आलेख हा केंद्र सरकारने २००४च्या अ‍ॅथेन्स स्पर्धेनंतर या खेळाडूंना दिलेले आर्थिक साहाय्य, गो स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट या सेवाभावी संघटनांनी देऊ केलेली मदत आणि आता ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ (टॉप्स) योजनेतून केंद्रीय क्रीडा खात्याने खेळाडूंच्या तयारीसाठी घेतलेले निर्णय कारणीभूत आहेत.

आजही कित्येक राज्यांतील पॅरा-संघटना फक्त कागदावरच आहेत. काही क्रीडा प्रकारांच्या राष्ट्रीय संघटनाही असून नसल्यासारख्या असल्याने खेळाडूंची फरफट होत असते. मूलभूत सुविधा, संघटनात्मक बदल आणि या खेळाडूंविषयीचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत त्यांना न्याय मिळू  शकत नाही. आता सर्व प्रकारच्या मर्यादांवर मात करून या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवल्यानंतर तरी त्यांच्याविषयीच्या दृष्टिकोनात बदल होईल, ही अपेक्षा!

पाच वर्षांचा संयम सार्थकी!

सुंदरसाठी हे पदक अधिक महत्त्वाचे होते, कारण २०१६च्या रिओ पॅरालिम्पिकमध्येही तो पदकाचा प्रबळ दावेदार होता. पण स्पर्धेपूर्वी कॉल रूममध्ये यायला उशीर झाल्याने त्याला पंचांनी बाद ठरवले. त्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये आपले कौशल्य दाखवण्यासाठी त्याला पाच वर्षे संयम राखून वाट पाहावी लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2021 6:39 pm

Web Title: tokyo 2020 summer olympic and paralympic games indian players dd 70
Next Stories
1 सणासुदीत कोविडचे आव्हान
2 पालकच म्हणतायत.. पडद्यावरची शाळा आता पुरे
3 गुणांचा पूर, तरीही (मनाजोगत्या) प्रवेशापासून दूर