ऑलिम्पिक विशेष
प्रज्ञा जांभेकर – response.lokprabha@expressindia.com
सिडनी ऑलिम्पिक (सन २०००) स्पर्धेत वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात कर्णम् मल्लेश्वरीनं भारताला पहिलं आणि या क्रीडा प्रकारातलं आतापर्यंतचं एकमेव पदक मिळवून दिलं. अर्थातच तसं करणारी ती पहिली भारतीय तर ठरलीच, पण एका भारतीय महिलेनं मिळवलेलंही ते पहिलं ऑलिम्पिक पदक होतं. त्यानंतर २०१६पर्यंत भारतीय महिलांनी आणखी चार पदकं पटकावत नारीशक्तीचं जोरदार प्रदर्शन केलं. आता आगामी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आत्तापर्यंत न मिळवलेल्या सुवर्णपदकाची कमाई करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याच वेळी आपल्या इतर सहभागी महिला खेळाडूंची तुलना त्यांच्याच आधीच्या कामगिरीशी करत ती उंचावली का, हे पाहणंही योग्य ठरेल. कारण त्यांचं तिथपर्यंत पोहोचणं हेसुद्धा अनेक कारणांनी पदक मिळवण्यासारखंच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.

श्री गणेशा

ऑलिम्पिकची सुरुवात झाली ती १८९४ मध्ये. तरीही १९०० सालापर्यंत त्यात महिलांचा सहभाग नव्हता. १९०० सालीही स्त्रीत्व आणि नाजूकपणाशी सुसंगत मानल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांतच महिलांना प्रवेश दिला गेला. त्यांना अ‍ॅथलेटिक्सच्या मुख्य स्पध्रेतून वगळण्यात आलं. १९०० साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वित्र्झलडच्या हलेने डी. पोर्टलस हिनं पहिल्या महिला खेळाडूच्या रूपानं सहभाग नोंदवला. तिला नौकानयन सांघिक प्रकारात सुवर्णपदकही मिळालं. नंतर तब्बल ५२ वर्षांनी म्हणजे १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकसाठी भारतातर्फे चार महिला या स्पर्धेत उतरल्या. पुढे आणखी ४८ वर्षांनी म्हणजे २०००च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात कर्णम् मल्लेश्वरीला कांस्यपदक मिळालं.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
chess
भारतीय बुद्धिबळपटू सज्ज; प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेला आजपासून प्रारंभ

ऑलिम्पिकमधील पहिल्या महिला खेळाडूच्या सहभागानंतर तब्बल १०० वर्षांनी एका भारतीय महिलेला पहिलं पदक मिळतं, हा इतिहास भारतीय महिला ऑलिम्पिकपटूच्या कामगिरीचं विश्लेषण करताना आणि ते समजून घेताना माहीत असलाच पाहिजे. कारण भारतासारख्या विकसनशील देशात जिथं कोणत्याही खेळाडूला मग तो स्त्री असो, वा पुरुष अतिशय खडतर प्रवासानंतर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ऑलिम्पिकपर्यंत आणि नंतर पदकापर्यंत पोहोचता येतं, तिथं हे नजरेआड करता येत नाही. पुन्हा भारतीय महिला खेळाडूंची तुलना त्या त्या क्रीडा प्रकारातल्या जागतिक दिग्गजांशीही किंवा विकसित देशातल्या खेळाडूंच्या दर्जाशी करणंही अवघड आहे. कारण तुलना कुठल्या, ना कुठल्या समान निकषांवर करता येते. त्या दृष्टीनं आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. याला काही अपवाद आहेत. टोक्यो ऑलिम्पिक हे ऑलिम्पिक इतिहासातील पहिलं स्त्री-पुरुष समानतेचा दावा करणारं ऑलिम्पिक असून त्यात तब्बल ४९ टक्के महिला खेळाडू असतील, अशी अपेक्षा आहे.

१९५२ हे वर्ष भारतीय महिला क्रीडापटूंसाठी महत्त्वपूर्ण वर्ष ठरलं. या वर्षी झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिकसाठी पहिल्यांदा चार भारतीय महिलांना पाठवलं गेलं. नीलिमा घोष (अ‍ॅथलेटिक्स), मेरी डिसुझा (अ‍ॅथलेटिक्स), आरती साहा (जलतरण), डॉली रुस्तम नझिर (जलतरण) या त्या खेळाडू होत्या. नीलिमा घोष अधिकृतपणे, तांत्रिकदृष्टय़ा ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला खेळाडू ठरली. तेव्हा ती अवघ्या १७ वर्षांची होती. ती अ‍ॅथलेटिक्सपटू होती. तिनं दोन शर्यतींत भाग घेतला.

नवी दिल्लीत १९५१ ला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २०० मीटरमध्ये मुंबईच्या मेरी डिसुझानं कांस्यपदक तर ४ बाय १०० रिलेमध्ये रौप्यपदक जिंकलं. त्यानंतर हेलसिंकी ऑलिम्पिकसाठी तिची १०० मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी निवड झाली. तिच्याकडे प्रशिक्षक नव्हता आणि निधीही नव्हता; सरकार फक्त प्रवास भाडं देत होतं. शेवटी तिच्या शेजाऱ्यांनी आणि मित्रांनी एक नृत्य कार्यक्रम आयोजित करून ऑलिम्पिकसाठी पुरेसे पैसे जमा केले. ऑलिम्पिकची आख्यायिका जेसी ओवेन्सबरोबर त्या काळात मेरी प्रशिक्षण घेत होती ही अभिमानाची बाब आहे.

१९८४ चं महत्त्वाचं वर्ष

१९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये  ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये भारतीय सुवर्णकन्या पी.टी. उषाचं कांस्यपदक सेकंदाच्या शंभराव्या भागानं हुकलं. ती चौथी आली. शायनी अब्राहमनं ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरीपर्यत मजल मारली. तिथपर्यंत पोहोचलेली ती पहिली भारतीय महिला ठरली. तिनं तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवली. एम. डी. वलसम्मा आणि उषा या दोन्ही केरळच्या मुली होत्या ज्यांनी कर्नाटकमधील मल्याळी शायनी अब्राहम आणि वंदना राव यांच्या साथीत ४ बाय ४०० मीटर रिले प्रकारात चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत त्या सातव्या म्हणजे शेवटच्या स्थानावर आल्या, पण त्यांनी नवा आशियाई विक्रम केला.

वेध

१९०० ते २०१६ या कालावधीत वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारात भारताला एकूण २८ पदकं मिळाली आहेत. त्यापैकी २००० ते २०१६ या कालावधीत पाच महिलांनी पदकं मिळवलेली आहेत.

बॉक्सिंगपटू मेरी कॉमनं २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं. ती टोक्यो ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरली असून ती पदक मिळवेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. याच स्पध्रेत सायना नेहवालनं कोटय़वधी भारतीय बॅडमिंटनप्रेमींचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण केलं. लंडनमध्ये सायनानं कांस्यपदक मिळवलं आणि मग सुरू झाला तो झंझावात. पुढे सिंधूनं बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकत चाहत्यांच्या अपेक्षा अजून उंचावल्या. या वेळी करोनामुळे सायना कमी स्पर्धा खेळली. त्यामुळे  ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकली नाही. पण सिंधू मात्र भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करायला सज्ज झाली आहे

भारताला २०१६च्या ब्राझील ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळाली होती. त्यातलं एक बॅडमिंटनपटू सिंधूचं रौप्यपदक होतं तर एक साक्षी मलिकचं कुस्तीतलं कांस्यपदक होतं. जागतिक क्रमवारीत सध्या सातव्या स्थानावर असलेली सिंधू आता २०२१च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्येही सहभागी होत आहे आणि तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहेच. कुस्तीत विनेश फोगट ५३ किलो वजनी गटात सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरची महिला असून ती पदकाची एक प्रमुख दावेदार आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपण ११९ खेळाडूंचा चमू पाठवत असून त्यात ६७ पुरुष आणि ५२ महिला आहेत. १८ क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यातल्या पाच क्रीडा प्रकारात फक्त महिलाच पात्र ठरल्या. तलवारबाजीत भवानी देवी, ज्युदोत सुशीला देवी, जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक, वेटलिफ्टिंगमध्ये एस. मिराबाई चानू तर टेनिस दुहेरीसाठी सानिया मिर्झा आणि अंकिता रैना ही जोडी सहभागी होणार आहे. १९९२ नंतर प्रथमच कोणताही भारतीय पुरुष टेनिसपटू ऑलिम्पिकमध्ये खेळणार नाही.

महाराष्ट्रातली नारीशक्ती

आता टोक्यो ऑलिम्पिकमध्ये १५ जणांचं भारतीय नेमबाजांचं तगडं पथक सहभागी होत असून त्यात सात महिला आहेत. महाराष्ट्रातून एकूण सात खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून त्यात दोन महिला नेमबाज आहेत. महाराष्ट्रातून राही सरनोबत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे तर तेजस्विनी सावंत महिलांच्या ५० मीटर रायफल प्रकारात खेळणार आहे. या दोघी पदकाच्या प्रमुख दावेदार आहेत.

मोक्याच्या क्षणी शांत राहून खेळणं, हे राहीचं बलस्थान आहे. ती लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात पात्र ठरणारी ती त्या वेळची भारताची पहिली खेळाडू ठरली. त्यानंतर २०१३ मध्ये राहीनं २५ मीटर पिस्टल प्रकारात जगज्जेतेपद पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. यशाची शिखरं सर करत असतानाच राहीला दुखापतीनं गाठलं. त्यामुळे २०१६ च्या ब्राझील ऑलिम्पिकला ती मुकली. त्यातून ती  सावरली. २०१८ साली आशियाई स्पर्धेत २५ मीटर पिस्टलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्यानंतर जर्मनीची मुंखबायर तिची प्रशिक्षक झाली. विशेष म्हणजे ही मुंखबायर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये राहीची प्रतिस्पर्धी होती. मुंखबायरकडे सहा ऑलिम्पिकचा अनुभव आहे आणि तिनं दोन ऑलिम्पिक कांस्यपदकंही जिंकली आहेत. क्रोएशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत राहीनं पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवलं. ज्या ब्राझील ऑलिम्पिकला राही पदकाला मुकली, त्या ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेती ग्रीसची अ‍ॅना कोरक्काई या विश्वचषक स्पर्धेत पाचवी आली. राहीनं अ‍ॅनापेक्षा तब्बल १८ गुण अधिक मिळवून पदक जिंकलं, तेही टोक्यो ऑलिम्पिकच्या महिनाभर आधी.

महाराष्ट्राच्या पथकातील तेजस्विनी सावंत ही सगळ्यात ज्येष्ठ खेळाडू आहे. वयाच्या चाळिशीतही तिनं खेळातील हुकमत कायम राखलीय. नेमबाजीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषवलेल्या माजी जगज्जेत्या तेजस्विनीला ऑलिम्पिक पदक खुणावतंय. अनुभव ही तिची जमेची बाजू आहे.

भारतीय नेमबाजांचा उल्लेख करताना महाराष्ट्राच्याच अंजली भागवतचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणं शक्यचं नाही. तिनं सलग तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये तिनं अंतिम फेरी गाठली होती. तिला पदकानं हुलकावणी दिली खरी पण ऑलिम्पिक गाठणारी ती पहिली नेमबाज तर ठरलीच आणि पी.टी. उषानंतर ऑलिम्पिक अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय क्रीडापटू ठरली.

सातारा जिल्ह्यत दुष्काळग्रस्त भागातील दीर्घ पल्ल्याची धावपटू ललिता बाबर २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचली आणि कोणत्याही ट्रॅक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती ३२ वर्षांतली प्रथम भारतीय ठरली. स्टीपलचेसमध्ये ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

चक दे

गेल्या काही वर्षांत भारतीय महिला हॉकी संघ सातत्यानं प्रगती करतोय. हा संघ सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. १९८०नंतर ३६ वर्षांनी हा संघ २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आणि टोक्यो ऑलिम्पिकसाठीही हा संघ पात्र ठरला आहे. त्यांनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी अपार मेहनत घेतली आहे आणि ते समोर येणाऱ्या प्रत्येक संघाचा कडवा मुकाबला हा संघ करेल हे नक्की. या संघात आठ अनुभवी खेळाडू आहेत तर आठ जणी प्रथमच ऑलिम्पिकसाठी जाणार आहेत. राष्ट्रीय संघाचा ताईत असलेली राणी रामपाल या संघाचं नेतृत्व करणार आहे. या संघाची गोलरक्षक आणि संघाची उपकर्णधार सविता पुनिया ऑलिम्पिकविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाली, ‘‘कोणत्याही  खेळाडूसाठी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणं, हाही यशाचाच भाग आहे. ऑलिम्पिक हे प्रत्येक खेळाडूचं अंतिम लक्ष्य असतं. हा सहभागही एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं असतं.’’ हे उद्गारच पुरेसे बोलके आहेत.

(लेखक आणि मुक्त क्रीडा पत्रकार)