scorecardresearch

अडथळ्यांचे ऑलिम्पिक

टोक्यो शहर अजूनही आणीबाणीच्या विळख्यात असताना, जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचे शिवधनुष्य उचलले…

अडथळ्यांचे ऑलिम्पिक
रिओपासून धडा घेऊन टोक्यो ऑलिम्पिकसाठी क्रीडा मंत्रालयाने फक्त दोन आकडी पदकसंख्येचे ध्येय ठेवले आहे.

ऑलिम्पिक विशेष
अभिजीत कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com
टोक्यो ऑलिम्पिक होणार की नाही, हा प्रश्न गेले काही महिने जगभरातील खेळाडू तसेच क्रीडा चाहत्यांना सतावत होता. दर चार वर्षांनी ‘लीप’ वर्षांत आयोजित केली जाणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एक वर्ष पुढे ढकलली गेली होती. पण जगभरात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने वर्षभराने तरी या क्रीडा स्पर्धा घेता येतील का, याबाबत साशंकता होती. पण टोक्यो शहर अजूनही आणीबाणीच्या विळख्यात असताना, जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचे शिवधनुष्य उचलले असून, २३ जुलैपासून ३२ व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाना प्रारंभ होत आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अर्थकारणात उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिकमधून येणाऱ्या उत्पन्नाचा सिंहाचा वाटा असतो. टोक्यो ऑलिम्पिक रद्द झाले असते तर त्यांना सुमारे तीन-चार अब्ज डॉलर्सचा तोटा झाला असता. ऑलिम्पिक स्पर्धेच्या उत्पन्नातील मोठी रक्कम ऑलिम्पिकमधील २८ आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांमध्ये वाटली जाते. करोनामुळे गेल्या दीड वर्षांत यापैकी काही संघटनांची आर्थिक घडी अगदीच विस्कळीत झाली आहे. ऑलिम्पिकला पािठबा देण्यात त्यांचाही स्वार्थ आहे. याचबरोबर युरोप आणि दक्षिण अमेरिकेत नुकत्याच फुटबॉल स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याने जपान सरकारलाही आपण कुठे कमी नाही, हे दाखवून द्यायचे आहे. करोनाकाळात जपान सरकारची लोकप्रियता बरीच खालावली असल्याने त्यांनासुद्धा हे ऑलिम्पिक यशस्वी करून पुढील निवडणुकीत त्याचे भांडवल करायला नक्कीच आवडेल. त्यामुळे देशातील नागरिकांचा विरोध आणि जागतिक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला डावलून हे खेळ पार पाडण्याचा चंग आयोजकांनी बांधला आहे.

या सगळ्या स्पर्धा कुठलाही व्यत्यय न येता पार पडाव्यात म्हणून जपान सरकारने ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या खेळाडू, पदाधिकारी, पत्रकार आणि इतर सर्वावर कडक र्निबध घातले आहेत. एवढे सगळे करूनही करोना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचा खेळखंडोबा करणार नाही, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. अशा सगळ्या वातावरणात आता भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात आणि देशाला किती पदके मिळवून देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आजवर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकपर्यंत आपण सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण २३ पदके जिंकली आहेत. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सहा पदके मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंकडून रिओमध्ये बऱ्याच पदकांची अपेक्षा होती. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तर भारताला २० पदके मिळू शकतील, अशी शक्यता वर्तवली होती. पण सुरूवातीचे १२ दिवस निराशा हाती आल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकच्या कांस्य आणि बॅडिमटनपटू पी. व्ही. सिंधूच्या रौप्यपदकांमुळे भारतीय ऑलिम्पिक पथकाला रिओमधून रिकाम्या हाती परत यावे लागले नाही.

रिओपासून धडा घेऊन टोक्यो ऑलिम्पिकसाठी क्रीडा मंत्रालयाने फक्त दोन आकडी पदकसंख्येचे ध्येय ठेवले आहे. भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली तर ते साध्य करणे फारसे अवघड ठरणार नाही. टोक्योमध्ये भारताचे १२० हून अधिक खेळाडू १८ क्रीडा प्रकारांत भाग घेणार असून आपल्याला नेमबाजी, बॅडिमटन, कुस्ती, बॉक्सिंग, तिरंदाजी आणि भालाफेक या क्रीडाप्रकारांत पदकांची अपेक्षा आहे आणि या आशावादाला गेल्या चार वर्षांत ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या खेळाडूंचा चढता आलेख कारणीभूत आहे.

रिओमधील अपयशानंतर भारतीय नेमबाजी संघटनेने उदयोन्मुख खेळाडूंवर मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि खास त्यांच्यासाठी वेगळ्या प्रशिक्षकांची नियुक्ती केली. त्याचा फायदा असा झाला की एअर रायफल आणि एअर पिस्तूल या दोन प्रकारांत कित्येक नवे खेळाडू पुढे आले आणि प्रस्थापितांना बाजूला करून त्यांनी आज ऑलिम्पिक संघात स्वत:ची जागा मिळवली आहे. यांच्यापकी मनू भाकर, सौरभ चौधरी, दिव्यांश सिंह पनवार, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांनी ‘आयएसएसएफ’ विश्वचषकांमध्ये पदके मिळवून आपण ऑलिम्पिकमध्येसुद्धा पदकांचे दावेदार आहोत, हे दाखवून दिले आहे. मनू आणि सौरभने तर सहापकी पाच विश्वचषकांमध्ये दहा मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळवले आहे. वरिष्ठ खेळाडूंपकी महाराष्ट्राच्या राही सरनोबतने क्रोएशियात नुकत्याच झालेल्या विश्वचषकात २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकून जोमात असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे कमीतकमी दहा मीटर एअर पिस्तूल व एअर रायफल तसेच मिश्र दुहेरीमध्ये भारताला पदके मिळवायची आशा आहे.

नेमबाजीव्यतिरिक्त टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सात कुस्तीपटू आणि नऊ मुष्टियोद्धे सहभागी आहेत. त्यांच्यापकी पुरुष फ्रीस्टाइल ६५ किलो वजनी गटातील कुस्तीगीर बजरंग पुनिया आणि महिला खेळाडू विनेश फोगट (५३ किलो) यांच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकला मुकल्यानंतर बजरंगने सगळ्याच आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धात आपला ठसा उमटवला असून, २०१८ आणि २०१९च्या विश्वचषक स्पर्धामध्येही त्याने एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे.

बजरंगला आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये स्वतचा ठसा उमटवायचा आहे तर विनेशला रिओमध्ये महत्त्वाच्या कुस्तीदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे हुकलेली संधी अजून सतावते आहे. दुखापतीतून सावरून परत आल्यापासून विनेशने २०१८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्ण तर २०१९च्या विश्वचषकात कांस्यपदक मिळवून आपण पुन्हा एकदा ऑलिम्पिक पदकाचे दावेदार आहोत, हे दाखवून दिले आहे. या दोन्ही खेळाडूंना भारत सरकारनेही परदेशी प्रशिक्षक देऊन त्यांची तयारी कुठेही कमी पडू नये म्हणून काळजी घेतली आहे. याचप्रमाणे बॉक्सिंगपटूंपैकी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती मेरी कोम, अमित पांघल आणि विकास कृष्णनकडून पदकाची अपेक्षा आहे. इतर क्रीडा प्रकारांपैकी २०१८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि महिला एकेरीची विश्वविजेती बॅडिमटनपटू सिंधू यांच्याकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात कोपराला झालेली दुखापत वाढत गेल्याने नीरजचे २०१९ हे वर्ष अक्षरश वाया गेले आणि त्यानंतर करोनाच्या प्रसारामुळे त्याला २०२० मध्येसुद्धा स्पर्धाना मुकावे लागले. पण गेल्या तीन-चार महिन्यांत नीरजने आपण टोक्यो ऑलिम्पिकसाठी सज्ज झालो आहोत, हे दाखवून दिले आहे. त्याने मार्चमध्ये पतियाळाला झालेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत ८८.०७ मीटर भाला फेकून जागतिक क्रमवारीत चौथे स्थान मिळवले. ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाडूंची या हंगामाची सर्वोत्तम कामगिरी बघता फक्त जर्मनीचा जोहान्सव्हेटर, पोलंडचा मार्सनि क्रुकोव्स्की तसेच त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केश्रोनवाल कोट क्रमवारीत त्याच्यापुढे आहेत. नीरजने मोजक्या स्पर्धा खेळून स्वत:च्या तयारीचा अंदाज घेतला असून तो टोक्योमध्ये ऑलिम्पिक पदकाचे प्रमुख आशास्थान आहे.

करोनामुळे बॅडिमटनचा हंगाम २०२० आणि २०२१ मध्ये नीट सुरूच होऊ शकला नाही. त्यामुळे सिंधूच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी ती खेळलेल्या स्पर्धाचे निकाल बघून चालणार नाही. खरे तर सिंधूच्या ऑलिम्पिकसारख्या मोठय़ा स्पर्धामधील कामगिरीमध्ये आणि इतर स्पर्धाच्या कामगिरीत नेहमीच तफावत राहिली आहे. विश्वविजेती सिंधू अशा स्पर्धामध्ये एका वेगळ्याच आवेशात खेळते आणि म्हणूनच जास्त यश संपादन करते.

२०१८ ची विश्वविजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूकडूनही या वेळी खूप अपेक्षा आहेत. मीराबाई सध्या जागतिक क्रमवारीत चौथी असली तरी ती ४९ किलो वजनी गटात पदकाची प्रबळ दावेदार मानली जाते. कारण पहिल्या दोन क्रमांकावर दोन्ही खेळाडू चीनचे असून फक्त एकच टोक्योमध्ये भाग घेऊ शकते. तसेच तिसऱ्या क्रमांकाची री सॉन्ग गम ही उत्तर कोरियाची खेळाडू स्पध्रेत भाग घेऊ शकत नाही. कारण तिच्या देशाने या वेळी ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. चानू टोक्योमध्ये पदक जिंकू शकली तर ती २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या कर्णम मल्लेश्वरीनंतर असे यश मिळवणारी पहिली वेटलिफ्टिंगपटू ठरेल.

गेल्या काही महिन्यांच्या निकालांकडे बघितले तर तिरंदाजीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या दीपिका कुमारीकडून तसेच भारताच्या पुरुष हॉकी संघाकडून पदकाची अपेक्षा करणे संयुक्तिक ठरेल. पण भारताची ऑलिम्पिक कामगिरी जवळून पाहताना हे नेहमी लक्षात येते की संभाव्य पदक तालिकेचा आणि वास्तविक कामगिरीचा ताळमेळ कधीच बसत नाही आणि चाहत्यांच्या नशिबी फक्त निराशाच येते.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपण आठ-दहा पदकांची अशा लावून बसलो असलो तरी, ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा अनुभव हा काहीसा वेगळाच असतो आणि आपण कितीही तयारी केली तरी त्या स्पध्रेत यशस्वी होण्यासाठी मानसिक दडपण आणि अपेक्षांचे ओझे वाहण्याची विशेष क्षमता लागते. म्हणूनच अभिनव िबद्रासारख्या निष्णात नेमबाजालासुद्धा ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले.

टोक्यो ऑलिम्पिक अधिकच अवघड असणार आहे. करोनामुळे असलेले र्निबध आणि स्पध्रेदरम्यान प्रेक्षकांचा अभाव या दोन्ही गोष्टींना क्रीडापटू कशा पद्धतीने सामोरे जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सगळ्याच खेळाडूंनी दोन्ही परिस्थितींची आपल्या परीने तयारी केली असेलच पण प्रत्यक्षात त्यांना ते कितपत झेपेल, हे कोणालाच सांगता येणार नाही.

भारतात २०२० मध्ये लागू झालेल्या कडक टाळेबंदीचे परिणाम आताच काही खेळाडूंच्या कामगिरीवर दिसू लागले आहेत. ऑलिम्पिकच्या आधी तयारीचे दोन-तीन महिने वाया जाणे, हे कधीच चांगले नसते. स्पर्धा तोंडावर आली असताना अजूनही काही खेळाडूंचे लसीकरण झालेले नाही आणि या अनिश्चिततेचासुद्धा त्यांच्यावर परिणाम नक्कीच होणार आहे.

चीन, कोरिया, जपानच्या खेळाडूंच्या प्रगतीबद्दल कोणतेच अंदाज वर्तवता येणार नाहीत. कारण त्यांचे खेळाडू गेल्या दीड वर्षांत जवळजवळ सर्वच आंतरराष्ट्रीय स्पर्धापासून करोनाचे कारण देऊन लांब राहिले आहेत. त्यामुळे महिला कुस्ती, बॅडिमटन आणि नेमबाजीमध्ये त्यांचे खेळाडू कशी कामगिरी करतात यावरसुद्धा भारतीयांच्या पदकांच्या शक्यता अवलंबून राहतील. एकूण काय तर करोनाच्या पाश्र्वभूमीवर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत होत असलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या चमूने २०१२ च्या लंडन क्रीडा स्पर्धामध्ये मिळवले तितके यश मिळवले, तर ही जपानवारी यशस्वी झाली असे म्हणायला हरकत नाही.

(लेखक आणि मुक्त क्रीडा पत्रकार आहेत)

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी ( Coverstory ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-07-2021 at 18:01 IST

संबंधित बातम्या