ऑलिम्पिक विशेष
श्रीनिवास हवालदार – response.lokprabha@expressindia.com
ऑलिम्पिक ही क्रीडाक्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची स्पर्धा. १८९६मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेला आता शतकाहून अधिक काळ लोटला आहे. या स्पर्धामुळे अनेक खेळाडू, क्रीडा प्रकार, पदाधिकारी, पंचांना प्रसिद्धी मिळाली. १९३६ सालातील बर्लिन (जर्मनी) येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या अस्सल मराठमोळ्या मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर झाली. बर्लिन ऑलिम्पिकमध्ये ४९ देश, तीन हजार ९६३ स्पर्धक, १९ खेळांचा (२५ संलग्न) समावेश होता. असे असताना मल्लखांबासारखा क्रीडा प्रकार स्पर्धात्मक गटात नव्हे, तर प्रात्यक्षिकांत समाविष्ट होता. ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन’च्या निर्देशानुसार अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने मल्लखांबपटूंचा संघ बर्लिनला पाठवला होता. १ ऑगस्ट १९३६ रोजी बर्लिन ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा झाला. त्यात ३० मल्लखांबपटूंनी भाग घेतला. याव्यतिरिक्त कबड्डी आणि अन्य पारंपरिक भारतीय खेळांचीही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. अमरावती हनुमान व्यायाम प्रसारक संघ दुसऱ्या स्थानावर होता. जर्मन चॅन्सेलर अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी मल्लखांबपटूंची प्रशंसा करत प्रशस्तीपत्रक तसेच सुवर्णपदक दिले. ३० जुलै आणि १ ऑगस्ट १९३६ रोजी बर्लिन ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात मल्लखांब, वेत मल्लखांब, बोथाटी, कुस्ती, जोर इ. भारतीय क्रीडा प्रकार सादर झाले. तसेच आटय़ापाटय़ा, विटीदांडू, इ. खेळ खेळण्यात आले. डॉ. सिद्धनाथ काणे यांनी त्यासाठी मेहनत घेतली.

आता बरोबर ८६ वर्षांनंतर भारतीय क्रीडा प्रकारातील मल्लखांब प्रात्यक्षिके ऑलिम्पिक स्पर्धेत सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये निमंत्रित करून मल्लखांबाला जागतिक स्तरावर संधी देण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. या वेळी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सादरीकरण होणाऱ्या मल्लखांब प्रात्यक्षिकांसाठी अंदाजे २४ मल्लखांबपटू, सहा अधिकारी आणि एक पथकप्रमुख टोक्योला रवाना होणार आहेत.

मल्लखांबाकरिता १९३६ ते २०२१ हा ऑलिम्पिक प्रवास प्रचंड मोठा होता. हा खेळ इतर देशांमध्येही रुजणे आवश्यक आहे. त्यातून भविष्यात भारतीय मल्लखांब संघ ऑलिम्पिकमध्ये देशाला पदके आणि सन्मान मिळवून देईल. या क्रीडाप्रकाराला ऑलिम्पिकचे व्यासपीठ मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

(लेखक माजी राष्ट्रीय मल्लखांबपटू आणि प्रशिक्षक आहेत)