कथा एका दुर्लक्षित साम्राज्याची

हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी.

हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज तेथील ४० ते ५० किमी परिसरात भग्नावस्थेत असलेल्या विविध वास्तू पाहताना मन उद्विग्न होते.

कर्नाटक राज्यातील बेलारी तालुक्यातील होस्पेट या मुख्य बाजारपेठ असलेल्या गावापासून १३ किमी अंतरावर असलेले हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज ४० ते ५० किमी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते. यामागचा भव्यदिव्य गौरवशाली इतिहास चलतपटाप्रमाणे आपल्या डोळ्यासमोरून सरकत जातो.

विजयनगर (विजयाची नगरी) हे दक्षिण भारतातील इ.स. १३३६ ते १५६५ काळातील बलाढय़ हिंदू साम्राज्य. राजा कृष्णदेवराय सम्राट असताना इ.स. १५०३ ते १५३० हा या साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. त्याच काळात पोर्तुगीज प्रवासी डॉमीगो प्रेस हे शाही सम्राटाचे पाहुणे म्हणून हम्पीमध्ये राहिलेले. त्यांची रोजनिशी विविध भाषात उपलब्ध असून त्यातील वर्णन सुवर्णाक्षरात कोरून ठेवण्यासारखे आहे. ‘सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेले जगातील सर्वात उत्तम रईस शहर अशी त्याची ख्याती इराक-इराणपर्यंत होती.’ पर्शियन प्रवासी अब्दुल रझाक लिहितो, ‘‘माझ्या नेत्रांनी हम्पी इतके अप्रतिम शहर कुठेही पाहिलेले नाही किंवा त्याच्या तोडीचे दुसऱ्या कोणत्याही शहराचे नाव ऐकलेले नाही. अनेक टेकडय़ांवर वसलेल्या शहराला एकामागोमाग वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी, भर बाजारात दिवसाढवळ्या चांदी, सोने, हिरे, माणके, केशर यांचे ढीगचे ढीग विक्रीसाठी. देशी परदेशी व्यापाऱ्यांच्या झुंडी याने बाजार फुलून जात असे. राज्याचा विस्तार थेट ओरिसापासून केरळपर्यंत होता. राजाजवळ सात ते आठ लाख खडे सैन्य होते. चलनात सोन्याची नाणी होती. विजयनगर म्हणजे सुवर्णनगरीच होती. पण इ.स. १५६० नंतर साम्राज्याची शोकांतिका सुरू झाली. इ. स. १५६५ तालीकोट (राक्षसतागडी) येथील बहामनी राज्ये व विजयनगर साम्राज्य यांच्यामधील घनघोर युद्धात विजयनगर राज्याचा दारुण पराभव झाला. शहरातील अनेक प्रासाद, देवळे, पुतळे, आलिशान घरे यांचा अघोरी नाश केला गेला. तलवारी, कुऱ्हाडी, हातोडे व दुसरे जे काही आयुध हाताला मिळेल त्याने अहोरात्र अघोरी कृत्य चालू होते. तीन महिने शहर लुटले जात होते. आगी लावून राजवाडे भस्मसात केले गेले. जे शिल्लक होते ते क्रूरकर्माच्या तोडण्यापलीकडचे होते. आजही त्या शिल्लक राहिलेल्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.’

१५ ते २० किमी परिसरात पसरलेल्या या उद्ध्वस्त शहरात आपणास जागोजागी दिसतात अजस्र शिळा. हम्पीचे विरुपाक्ष शिवमंदिर आठव्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच. पंपातीर्थ स्वामीस्थल या नावाने ते प्रसिद्ध आहे. मंदिराचे पूर्वेकडील गोपूर १०५ फूट म्हणजे जवळजवळ दहा मजले उंच आहे. मध्यात विस्तीर्ण आयताकृती प्रांगण. त्यात अनेक गोपुरे आहेत. कृष्णदेवरायांच्या काळात ‘राज्याभिषेक मंडप’ व सर्वात लहान गोपूर बांधले गेले. मंडपाला नक्षीकाम व अलंकाराने मढविलेले १०० खांब आहेत. अलंकारांनी मढविलेला नंदी आहे. त्यावर आरूढ गिरिजाशंकराची मूर्ती आहे. राम, कृष्ण, विष्णू व शिव या अवतारांच्या अनेक कथा शिल्प माध्यमातून जिवंत केलेल्या आहेत.

विजय चौक येथील राज्याभिषेक चौथरा ५३०० स्क्वे. फूट आहे. त्याला ४० फूट उंच कोरीव कामाची गॅलरी आहे. चौथऱ्यावरच्या पायाचे दगड अजूनही उत्तम स्थितीत आहेत. त्या काळात सर्व बाजूंनी गॅलरीला लाकडी खांबाचा आधार आहे. याला लागून दोन मजली भव्य हॉल ज्याला १०० खांब, दगडी जिने, आहेत. हिरव्या रंगाच्या क्लोराईट दगडाच्या चौथऱ्याला मागून शिरण्यास गोलाकार दगडी जिना आहे. बाजूने चोर खोल्या आहेत. या जागेवरून आपल्या राण्या व दासी या लवाजम्याबरोबर राजा विजयादशमी सोहळा पाहत असे. राण्यांना दागिन्यांचे वजन इतके होत असे की त्यांच्या वजनाने त्यांना धड उभेही राहता येत नसे. अब्दुल रझाकने याचे वर्णन लिहून ठेवले आहे.

बाजूच्या भिंतीवर युद्धावर जाणाऱ्या सैनिकांचे जथे, देखणे घोडे, उंट, नर्तिका, पर्शियन टोप्या घातलेले लांब दाढीवाले परदेशी प्रवासी या सर्वाचे कोरीव कामातील देखावे पाहून आपण थक्क होतो. होळीच्या सणात नर्तिकांच्या हातात रंगाने भरलेल्या पिचकाऱ्या व त्यांच्या चेहऱ्यावरील दिसणारा जोश इतका जिवंत उभा केलेला आहे की जणू आपल्यासमोर खेळ चालू आहे असे वाटते. वाघ, बिबटे, नीलगाई, मगरी यांच्या शिकारीची शिल्पे, व शिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भेदक क्रूर भाव अचूक टिपलेले आहेत.

राजाच्या पदरी असलेले लक्षावधी सैनिक, हजारो सजविलेले अरबी घोडे, हत्ती, संपूर्ण शस्त्रागार या विजय चौकात परदेशी पाहुण्यांसमोर समारंभपूर्वक दाखवले जात असे. याला लागूनच दोन ते तीन हजार स्क्वे. फूट जागेत २५० फूट खोल कुंड असून त्याला १०० ते १२५ आखीव पायऱ्या आहेत. राजा पवित्र मूर्तीना या कुंडात स्नान घालत असे. या कुंडाला लागून राजवाडय़ाच्या भग्नावशेषाचा भला मोठा ढीग पसरलेला दिसतो.

सासवकेलु गणपती मूर्ती मोहरीच्या दाण्यासारख्या दगडाची बनलेली असून जवळजवळ २० ते २२ फूट उंच आहे. तिच्या चारी बाजूंनी मखराचे खांब आहेत. समोर बसलेला मूषक वेगळ्या दगडाचा आहे. याच मूर्तीच्या पाठी एका नटलेल्या स्त्रीची प्रतिमा याच दगडात बसवलेली आहे. तर दुसरी गणपती मूर्ती कड्लेकलू नावाने ओळखली जाते. ही मूर्ती १७ फूट अखंड दगडात कोरलेली आहे. तिच्या सर्व बाजूला विविध आकारांचे गुळगुळीत दगड पडलेले आहेत. बहुधा अर्धवट बांधलेल्या मंदिराचे दगड असावेत. या टेकडीवर असलेल्या गणपती मूर्तीच्या खालच्या बाजूस हम्पी बाजाराची जागा असून त्यामध्ये रुंद आखीव रस्ते व दोन्ही बाजूंस दुकानांच्या गाळ्याचे चौथरे आहेत तिथे हिरेमाणके उघडय़ावर विकण्यास असत. तेव्हा परदाओ हे सोन्याचे गोल चलनातले नाणे होते. त्याच्या एका बाजूस दोन प्राण्यांची चित्रे व दुसऱ्या बाजूस राजाची मुद्रा आहे. नाणी पाडणारी टांकसाळ एका भव्य बंदिस्त इमारतीत आहे. आज हा परिसर थडग्यासारखा आहे. एके काळी येथून सोन्याचा धूर शहरावर पसरत होता. ही नाणी कमलापुरा दालनात पाहता येतात.

लक्ष्मी नरसिंह (उग्र नरसिंह ) हे २२ फूट उंचीचे भव्य शिल्प मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. विष्णूचा अर्धमानवी व अर्धसिंहाचे तोंड असलेला अवतार, सात तोंडी आदिशेषावर स्थानापन्न झालेला तर एका मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मूर्तीची तोडफोड अशी विचित्र झालेली आहे की लक्ष्मीचे फक्त हातच कमरेभोवती दिसतात. मूर्तीच्या आसपास पडलेले महाकाय आकाराचे दगड पाहिल्यावर लक्षात येते की हे संपूर्ण तोडणे किती कठीण होते. आणि म्हणूनच आजही हे शिल्प चांगल्या स्थितीत आहे. मूर्तीसमोर अखंड दगडातील शिवलिंग असून त्याचा तळ सतत पाण्याखाली असतो.

राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित राहण्याचा महाल म्हणजे झेनाना तटबंदी. याची जाडी वरवर कमी होत गेलेली. कमानीवरील सर्व कोरीव कामाची बांधणी हिंदू मुस्लीम संस्कृतीचा उत्कृष्ट मिलाफ आहे. १४ कमानी इतक्या सरळ रेषेत आहेत की शेवटच्या कमानीतून दिसणारा उजेड अनुभवणे वर्णनातीत आहे. महालाच्या बाजूस दोन उंच टेहळणी बुरूज आहे. त्यातल्या विविध कोनाडय़ांतून चोहोबाजूंच्या प्रदेशावर कडक नजर ठेवता येत असे. महालाची बांधणी अशी केलेली आहे की बाहेरून आतील स्त्रियांच्या हालचाली अजिबात कळत नसत. या जागी पुरुषांना प्रवेश नसे व सुरक्षिततेची जबाबदारी तृतीयपंथी सेवकांची असे. दोन पोर्तुगीज प्रवाशांनी लिहिलेल्या रोजनिशीतील याबाबतचे वर्णन वाचताना आपल्या डोळ्यासमोर सुवर्ण महाल उभा राहतो. त्यामध्ये नृत्यशाळा होती ज्याला १०० खांब व प्रत्येकावर विविध नृत्यमुद्रा कोरलेल्या होत्या. महालात चांदीचे झोपाळे, व छताला सोन्याचा मुलामा, पलंगांना सोन्याच्या दांडय़ा व मोत्याचे जाळीदार नक्षीकाम, हा लिहून ठेवलेला दस्तऐवज विजयनगर इतिहासाचा मानबिंदू आहे.

कमळाच्या आकाराचा लोटस महाल हे अतिशय उत्तम स्थितीत राहिलेले शिल्प आहे. बदामी पिंगट रंगाच्या मुलायम दगडाचे खांब व कमानी मुस्लीम शिल्पकलेसारख्या तर लाकडी खिडक्या जैन पद्धतीने कोरलेल्या आहेत. छताला गोपुराच्या आकाराचे कळस आहेत. या जागी राण्या सांस्कृतिक कार्यक्रम पाहत.

हत्तींना ठेवण्याकरता हजार ते १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल होता. ज्याला ११ मोठाली दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा असे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी असे. घुमटाच्या आतील बाजूने लटकवलेले अजस्र लोखंडी हूक, ज्याच्या आधाराने जाड दोरखंडाने हत्तींना बांधून ठेवत. या वस्तू समोरील भव्य दालनात माहूत व पहारेकरी राहात. राणी महालाइतकेच हत्ती महालाचे महत्त्व होते.

हिंदू वास्तू पद्धतीने बांधलेले उत्तम देवळाचे प्रतीक आहे हजारा राम मंदिर. प्रत्येक राजाचे हे पूजा करण्याचे पुरातन मंदिर होते. कृष्णदेवरायाच्या काळात त्याचे भव्य शिल्पात रूपांतर झाले. १०० फूट लांब २०० फूट रुंद चौथऱ्यावर बांधलेले हे मंदिर विष्णूच्या दहा अवतारांतील एक म्हणून प्रसिद्ध आहे. रामायण व महाभारतातील अनेक प्रसंग चित्रस्वरूपात सर्व भिंतीवर चितारलेले आहेत. काळ्या गुळगुळीत दगडाच्या खांबावरील कोरलेल्या मूर्ती व बारीक नक्षी लक्षणीय आहेत. काळ्या घोडय़ावरील विष्णूचे रूप म्हणजे कलियुगाचा संकेत आहे. कल्याण मंदिरला अनेक खांब असून प्रत्येकावर रामायणातील विविध प्रसंग मूर्ती स्वरूपात असून त्यात नर्तिकांचे जथे, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, सैनिकांच्या शिस्तीत चालणाऱ्या पलटणी, सजवलेले हत्ती असं प्रत्येक शिल्प आहे. बाजूला मोतिया रंगाचे अजस्र दगड अस्ताव्यस्त पडले आहेत.

विठ्ठल मंदिर हे हम्पीमधील सर्वात भव्य दिव्य शिल्प आहे. जगातील एक महान शिल्प म्हणून याची गणना होते. विठोबा हे मराठी लोकांचे कुलदैवत. हे महाराष्ट्र भूमी बाहेर साधारणपणे दिसत नाही. विठोबा हा कृष्णाचा अवतार त्यामुळे पुरातन कालापासून पुजले जाणारे दैवत. इ. स. १५१३ ते १५६४ पर्यंत या मंदिराचा जीर्णोद्धार २३ वेळा झाल्याची नोंद आहे. मुख्य चौथरा अजस्र दगडाचा असून त्यावर मंदिर उभे असून त्याला तीन मुख्य दरवाजे आहेत. देवघरात विठ्ठलमूर्ती आहे. सर्व बाजूंनी लांब व्हरांडे आहेत. त्याच्या प्रत्येक खांबावर कोरीव काम आहे. भिंतीवर रामायण महाभारतातील रंगविलेले प्रसंग आहेत. प्रवेशद्वाराजवळ दगडी हत्ती काही भागात तुटलेला आहे. लागून अतिभव्य कल्याण मंडप आहे, ज्याच्या खांबांची गणती करणे कठीण आहे. प्रत्येक खांबावर विविध देवता व प्राण्यांची कोरीव शिल्पे आहेत. इथे राजघराण्यातील लग्ने होत असत.

मंदिर आवारात ३० ते ३५ फूट उंचीचा अतिभव्य कोरीव काम केलेला दगडी रथ असून तो प्रथमदर्शनी एकसंध दगडातून कोरलेला आहे असे वाटते, पण तो अनेक दगडांनी इतका व्यवस्थित सांधलेला आहे की ते सांधे बारकाईने पाहिल्याशिवाय दिसत नाहीत. रथाची अजस्र दगडी चाके व त्यावरील वर्णनातीत कोरीव नक्षीकाम, मधील आरीचा दांडा, रथाच्या दोन बाजूंस दगडी हत्ती. मध्यात दगडाची पण लाकडाचा भास होणारी शिडी आहे. एकेकाळी हा रथ फिरवीत असत. हम्पीचे हे एक महान शिल्प आहे. मंदिराच्या मागील बाजूस अनेक मोडलेल्या खांबांचा व तुटलेल्या मूर्तीचा भला मोठा ढिगारा असून त्यामधून कमलापुरा गावाकडे जाणारा जुना दगडी बझार रस्ता आहे.

हम्पीत शिरण्याच्या मुख्य रस्त्यावर अंदाजे ७० ते ९० फूट उंचीच्या दोन अजस्र शिळांची नैसर्गिक कमान झालेली आहे. तिचे दगड म्हणजे दोन बहिणी राज्याचे सरंक्षण करीत आहेत अशी दंतकथा आहे. अशा विविध आकारांच्या शेकडो शिळा परिसरात आहेत.

राजमहाल व बाजूच्या परिसरात दगडी पन्हाळी पसरलेल्या पण कोठेही पाण्याचा मोठा हौद दिसत नाही किंवा या पन्हाळी तुंगभद्रा नदीच्या पात्रापर्यंत गेलेल्या दिसत नाहीत. बहुधा जवळपास विहिरी असाव्यात व त्यातले पाणी पखालीने पन्हाळीत ओतले जात असावे. पन्हाळींचे पाणी महालांत खेळवले जात असावे.

हेमकुटा टेकडीवर जैन पद्धतीच्या मंदिरांचा समूह असून कळसाचा आकार पिरॅमिडसारखा आहे. त्यात हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत. जैन साधूंचे नग्न अवस्थेतील पुतळे, हत्ती, सिंह व विविध प्राण्यांचे केलेले कोरीव काम संमिश्र संस्कृतीचे दर्शन दिसते.

राज्यरोहणाच्या राजतुलेचे वेळी महत्त्व असे. दोन कोरीव उंच कमानीच्या आकाराच्या तुला आजही उभ्या आहेत. इथे राजाची सोनेमाणकांनी तुला करून ते समारंभपूर्वक दान केले जात असे.

राणी महालाच्या आत शिरल्यावर मध्यात प्रशस्त पायऱ्या असलेला स्नानाचा भव्य हौद आहे. मध्यात कमळाच्या आकाराची कारंजी आहेत. चोहोबाजूंनी तीन मजले असलेल्या गॅलऱ्या आहेत. त्याला लागून राण्यांची दालने आहेत. या जागेत राण्या व दासी स्नानाचा आनंद लुटत.

राजघराण्यातील स्त्रियांना सतीची प्रथा काटेकोरपणे पाळावी लागे. हा  फार मोठा समारंभ असे. सती जाणाऱ्या स्त्रियांच्या कोरीव मूर्तीवरील चेहऱ्यावरचे भीतिदायक भाव, त्यांच्या मागून वाजत गाजत जाणारी मिरवणूक हे दर्शविणारे सती स्मारक मन हेलावून टाकणारे आहे.

असे विजयनगर साम्राज्य व त्याचे भग्नावशेष याचे उत्खनन १८५६ मध्ये ब्रिटिश अभ्यासक ग्रॅहम ग्रीनलॉ यांनी प्रथम केले. त्या वेळच्या कामाचे त्यांनी काढलेले फोटो आजही पाहण्यास मिळतात. पण पुढील १०० वर्षे या सर्व कामाकडे दुर्लक्ष झाले. यानंतर पुढे १९७६ सालात भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे हम्पी राष्ट्रीय प्रकल्प आखला गेला. अनेक तज्ज्ञ व विजयनगर साम्राज्याचे अभ्यासक यांच्या मदतीने युद्ध पातळीवर काम सुरू झाले. ४० ते ५० किमी परिसरात एकाच वेळी उत्खनन चालू होते. काही वास्तू उत्तम स्थितीत होत्या, तर काहींची आधुनिक पद्धतीने डागडुजी केली गेली. या भव्य कामाचे रंगीत फोटो कमलापुरा म्युझियममध्ये पाहता येतात. १९८८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा असलेले ऐतिहासिक साम्राज्य म्हणून मान्यता दिली व तेंव्हापासून हम्पी हे जगात एक महत्त्वाचे वारसा स्थान म्हणून नोंदले गेलेले आहे. इथे अनेक परदेशी व देशातील अभ्यासक भेट देतात, यावर अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कमलापुरा म्युझियममध्ये हा सर्व इतिहास उलगडत जातो. पहिल्या दालनात हम्पी शहराची अप्रतीम प्रतिकृती केलेली असून पुढील दालनात उत्खननात मिळालेली अनेक दगडी शिल्पे, भांडी, हत्यारे, दागिने, चलनातील सोन्याची नाणी संपूर्ण माहितीसहित मांडलेली आहेत. एका दालनात शैव पंथीय मूर्ती वीरभद्रा, भैरव, भिक्षआत्मन, महिषासुरमर्दिनी, शक्तीगणेशा, कार्तिक, दुर्गा अशा अनेक देवदेवता विराजमान झालेल्या असून मध्यात देवळाची प्रतिकृती, गाभाऱ्यात शिवलिंग नंदी, आणि संपूर्ण देवळाला केलेली नेत्रदीपक रोषणाई पाहून मन आनंदून जाते.

मुख्य प्रवेशद्वारासमोर कृष्णदेवराय व त्याच्या दोन राण्यांचे अतिशय रेखीव पुतळे डोळ्याचे पारणे फिटवितात. या राजांनी दक्षिणेतील अनेक हिंदू देवस्थानांना भेट देऊन सोने, हिरे, माणके यांच्या राशीच्या राशी भेट दिल्या. संपूर्ण दक्षिणेत हिंदू धर्माला राजाश्रय मिळाला. हम्पी शहराची स्थापना झाल्याचे ७७ शिलालेख या परिसरातील खेडय़ात मिळाले. त्यावरून बराच इतिहास कळण्यास मोलाची मदत झाली. राजा उत्तम कवी आणि साहित्याचा जाणकार होता. त्याचे संस्कृत ग्रंथ उपलब्ध नाहीत पण तेलगु भाषेतील त्याने लिहिलेले प्रसिद्ध काव्य अमुक्थम्ल्लदा विष्णूचीत्थामू हे आजही प्रचलित आहे.
डॉ. अविनाश वैद्य – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hampi