चित्रकूट दर्शन

दीनदयाळ संशोधन संस्था (डीआरआय) ही स्वप्नवत वाटणारी नानाजींची कर्मभूमी चित्रकूट गावातच आहे.

श्रीरामांच्या वनवासातील निवासाचे स्थान म्हणून चित्रकूटला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व तर आहेच, पण  नानाजी देशमुख यांनी केलेला कायापालट पाहण्यासाठीदेखील येथे आवर्जून भेट द्यायला हवी.

श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी १४ वर्षांच्या वनवासातील काही काळ ज्या निसर्गरम्य स्थळी व्यतीत केला असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे चित्रकूट. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश सीमेवर वसलेले हे गाव सतना रेल्वे जंक्शनपासून ८० किलोमीटरवर डोंगरकपारीत मंदाकिनी नदीच्या काठावर आहे. हा दुर्लक्षित परिसर जनसंघाचे कर्मवीर नानाजी देशमुख यांनी दत्तक घेतला आणि तेथे नंदनवन फुलवले. अशा या भूमीचा आणि नानाजींच्या कर्मभूमीचा प्रवास अविस्मरणीय व सामाजिक बांधिलकीच्या विचारांना चालना देणारा होता.

दीनदयाळ संशोधन संस्था (डीआरआय) ही स्वप्नवत वाटणारी नानाजींची कर्मभूमी चित्रकूट गावातच आहे. गेटमधून आम्ही प्रवेश केला आणि एका वेगळ्याच विश्वात शिरलो. २५ ते ३० एकमजली इमारती, मधून काढलेले आखीव रुंद रस्ते, डेरेदार वृक्षांच्या रांगा, फूलझाडे, हिरवळ असलेले छोटे जमिनीचे आखीव तुकडे, इमारतींचे लाल चुटूक रंग डोळ्यांत भरणारे, बालगृह, शिक्षकगृह, २० ते २५ प्रवासी आरामात राहतील अशी सोय. संकुलाच्या मध्यात उभारलेला भव्य मंडप व स्टेज, लाल हिरवी जाड जाजमे. नाश्ता व जेवणाची शिस्तबद्ध सोय. एक आखीव-रेखीव शिस्तबद्ध विश्वच येथे नांदत आहे.

दीनदयाळ शोध संस्था पाहणे हा उद्देश होताच, पण त्याचबरोबर तेथील परिसरातील धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी द्यायच्या होत्या. रामघाट एक त्यापैकी महत्त्वाचे स्थान. नदीचा एक काठ उत्तर प्रदेशात तर दुसरा काठ मध्य प्रदेशात आहे. छोटय़ा नावेतून रामघाट दर्शन करता येते. राम जेथे स्नान करण्यास येत ती जागा, भरतभेट जागा, तुलसीदास ज्या घाटावर बसून राम दर्शनाची उत्कंठतेने वाट पाहात बसलेले असत ती जागा अशी आख्यायिका असलेली ठिकाणे नावाडी दाखवतात. बाजूने शेंदूर, गुलाल, राममूर्ती, विकणारी दुकाने आहेत. सर्व परिसर जणू राममय झालेला असतो. दिवाळीत व रामनवमीला हजारो पणत्या व पात्रातून सोडलेले वातीचे दिवे या सर्वाच्या उजेडात परिसर न्हाऊन निघतो. गणपती, ओंकार वाल्मिकी, अत्री मुनी, राम, लक्ष्मण आणि सीता, या सर्वाच्या रंगीत दगडातील कोरलेल्या रेखीव मूर्ती घाटाच्या दोन्ही बाजूच्या पायऱ्यांनी बाजूनी स्थापिलेल्या आहेत. मध्यात म्हैसूरच्या वृंदावन गार्डनप्रमाणे ३०० फुटांवरून पडणाऱ्या पाण्यावर रंगीत दिव्यांचा झोत सोडलेला आहे.

चित्रकूटपासून तीन कि.मी. अंतरावर असलेले कामदनाथ मंदिराचे वर्णन तुलसीदास व कालिदास यांनी आपल्या काव्यात प्रभावशालीपणे केले आहे. कामधेनूचे पती कामदनाथ मंदिराची प्रदक्षिणा सुरेख फरशी लावलेल्या पाच किलोमीटरच्या वाटेने पुरी करता येते. मंदिर एका टेकडीवर असून अनेक मंदिरांचा समूह आहे.

गुप्त गोदावरी हे स्थान असेच आवर्जून भेट द्यावे असेच आहे. चित्रकूटपासून साधारण दहा किमी अंतरावरील डोंगर कपारीतील गुंफा वा गुहा म्हणजे पिवळ्या दगडांच्या प्रचंड मोठय़ा शिळा, जेथे श्रीरामांचे वसतीस्थान होते असे सांगितले जाते. मध्यभागी हॉलचे प्रवेशद्वार लहान व उंचीला कमी असल्यामुळे आत शिरल्यावर भव्यतेची कल्पना येते. हजारो माणसे बसू शकतील अशा अनेक गुंफा आतून जोडलेल्या आहेत. सर्व परिसर पिवळ्या दिव्यात झगमगत असतो. या सर्व भव्यतेची बाहेरून सुतराम कल्पनाही येत नाही. या गुहांमध्ये गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. दोन गुंफांत वाहणारे पाणी चांगले पाऊल बुडेल इतके आहे. ते पाणी खाली वाहत दोन कुंडांत येते. त्यातील एक कुंड गरम पाण्याचे व दुसरे गार पाण्याचे आहे. या पाण्याचा प्रवाह एका पिंपळाच्या झाडाखाली गुप्त होतो म्हणून या स्थानाला गुप्त गोदावरी असे म्हणतात. पाणी इतके नाहीसे होते की तेथील जागा पूर्ण कोरडी आहे. पुढे हीच गोदावरी नाशिकजवळ परत अवतीर्ण होते असेही म्हणतात. रामायणातील अनेक कथा या गुहांमध्ये चित्रित केलेल्या आहेत.

रामाच्या वास्तव्याचे असे दुसरे ठिकाण म्हणून सांगितले जाणारे दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे मंदाकिनी नदीच्या काठावरील दाट जंगलातील पांढरट पिवळसर रंगाची अक्राळविक्राळ आकाराची स्फटिक शिला. ज्या जागी सीता रामाचे चरण पूजीत असे, असे सांगितले जाते. हा परिसर अतिशय शांत व रम्य असून वानरांचे मोठे आश्रयस्थान आहे.

रामघाटापासून चार किमी अंतरावर एका उंच डोंगरावर स्थान आहे ते हनुमान धारा. एक हजार फूट उंचीवरील या जागी पोहचण्यास १५० ते २०० पायऱ्या असून तेथे हनुमानाची भव्य मूर्ती व त्याच्या डाव्या खांद्यावर अखंड निर्मल जलधारा पडत असते. रामायण ग्रंथकार महर्षी वाल्मिकी यांच्या आश्रमाची जागा येथून २० कि.मी. अंतरावर आहे.

श्रीरामाची आदर्श जीवन तत्त्वे सामान्य जनतेला थेट कळावीत या उद्देशाने उभारलेला रामदर्शन हा भव्य प्रकल्प, नानाजींच्या संपूर्ण कार्याचा मुकुटमणी आहे. नानाजी द्रष्टे होते. त्यांनी या प्रकल्पाकरिता शिल्पकार, चित्रकार व रामायणाचा सखोल अभ्यासक या सर्वाना एका छत्राखाली आणून संपूर्ण प्रकल्पाची अभूतपूर्व आखणी केली. तीन वर्षे अखंड परिश्रम केले. मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ फाइन आर्टचे प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर व त्यांचे सहकारी यांनी रामायणातील ३१ महत्त्वाचे प्रसंग पेंटिंग्ज्, रिलीफ व डायोरामा पद्धतीत चितारलेले आहेत. चार फिकट पिवळसर घुमटाकृती दालनात उत्कृष्ट प्रकाशयोजना केल्याने प्रत्येक शिल्पातील जिवंतपणा डोळ्यांचे पारणे फेडतो. प्रत्येक कलाकृतीच्या बाजूस थोडक्यात अतिशय मार्मिक शब्दांत सुवाच्य अक्षरांत लावलेले तक्ते हे सर्व पाहून थक्कच होतो. मुख्य प्रवेशद्वाराशी २०ते २२ फूट उंच हनुमानाची मूर्ती, त्याची बलदंड शरीरयष्टी. या संपूर्ण प्रकल्पाची माहिती असणारी आवर्जून विकत घ्यावी अशी उत्तम सीडी या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहे.

दीनदयाळ शोध संस्थेचे आरोग्यधाम हे ४२ एकरांत पसरलेले आधुनिक आयुर्वेदिक केंद्र देखील चित्रकूट येथे आहे. येथे मुख्यत: आयुर्वेद, निसर्ग उपचार व योग या तीन माध्यमांतून उपचार केले जातात. सर्व परिसर हिरव्यागार वनश्री आणि रंगीत फुलझाडांनी भरलेला आहे. ४०० विविध जातींच्या औषधी वनस्पती भारताच्या विविध प्रदेशांतून आणून त्यांची लागवड केली आहे. प्रत्येक झाडासमोर त्याचे शास्त्रीय नाव व त्याचा आजारावरील उपयोग याचे फलक आहेत. यांच्यापासून औषधे बनविणारी आधुनिक रसशाळा आहे. या प्रकल्पाला जेआरडी टाटा फाऊंडेशनतर्फे पाच कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

आधुनिक व्यायामशाळा, गोशाळा, शिशुविहार असे विविध प्रकल्प तर आहेतच. पण नन्हा-नन्ही पार्क पाहून आपण चकितच होतो. सर्व प्राण्यांच्या अगदी जिवंत वाटणाऱ्या कलाकृती, धबधबे, गुहा, वीज कशी बनते त्याचे प्रात्यक्षिक, आकाशदर्शन जागा व अशा उजाड माळरानावर विविध फुलझाडांनी भरलेला पार्क पाहताना मन सुखावते. आसपासच्या १०० कि.मी. परिसरात अनेक शेती प्रकल्प, शाळा, वसतीगृहे, सौरऊर्जा केंद्र, आवळ्यापासून बनणारे अनेक चविष्ट खाद्यपदार्थ, आधुनिक बेकरी, कलाकुसरीच्या अनेक गोष्टी पाहिल्यावर आपल्याच देशात एका गावाचा कसा कायापालट होतो याची जाणीव होते. मनाला उभारी देणारे हे स्थलदर्शन चिरंतन स्मरणात राहिले आहे.

(छायाचित्र सौजन्य – दीनदयाळ शोध संस्था, चित्रकूट डॉट ऑर्ग)
डॉ. अविनाश वैद्य – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Karmaveer nanaji deshmukh chitrakoot