पृथ्वीवरचे नंदनवन

टय़ुलिपची फुलं आणि त्यांच्या नयनरम्य गार्डन्सची हिंदी सिनेमातून दिसणारी झलक नेहमीच भुरळ घालते.

टय़ुलिपची फुलं आणि त्यांच्या नयनरम्य गार्डन्सची हिंदी सिनेमातून दिसणारी झलक नेहमीच भुरळ घालते.  हॉलंडमधलं कुकेनहाफ टय़ुलिप गार्डन म्हणजे निसर्गाच्या मुक्त सौंदर्याविष्काराचा आणि त्याला मिळालेल्या  सौंदर्यासक्त मानवी प्रयत्नांचा अनुभवला पाहिजे असा नजराणाच..

आज अकबर बादशहा दिल्लीच्या तख्तावर असता, तर त्याने राजा बिरबलाला सवाल केला असता, इंद्राच्या नंदनवनालासुद्धा मत्सर वाटावा अशी या पृथ्वीतलावरची सुंदर फुलबाग कोणती? कोणत्या देशातल्या बागेत त्या देशाची संस्कृती प्रतिबिंबित करणारा निसर्ग, हस्तकला, संगीत, नृत्यादी कला आणि व्यापार यांचा मनोहर संगम झाला आहे? दरवर्षी नव्या सत्तर लाख फुलझाडांचा नजराणा पेश करूनदेखील फक्त सात आठवडेच प्रेक्षकांसाठी खुली असणारी बाग कोणती? राजा- बिरबला, या सर्वाचा एका वाक्यात जबाब दे!

आणि चतुर बिरबलाने तात्काळ उत्तर दिले असते, ‘‘जहाँपन्हा, हॉलंड देशातली कुकेनहाफ टय़ूलिप गार्डन!’’

खरोखरच कुकेनहाफ टय़ूलिप गार्डन एकमेवाद्वितीय आहे. दरवर्षी मार्चअखेर ते मध्य मे या केवळ सात आठवडय़ांच्या काळातच तिथे प्रेक्षकांना प्रवेश असला तरी जगभराचे लाखो टुरिस्ट या काळात त्याला भेट देऊन डोळय़ांचे पारणे फेडतात. अशी काय खासियत आहे या बागेची?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते मुख्यत्वे टय़ूलिप गार्डन आहे. फक्त ुेवसंतामध्येच बहरणाऱ्या टय़ूलिप्सचा नजारा काही औरच. त्यांच्या वीस हजारांवर जाती आणि तितक्याच रंगछटा! त्यांतील खास हजारभर सवरेत्कृष्ट प्रकार निवडून त्यांचे एक-दोन नव्हे, चक्क सत्तर लाख (सातावर सहा शून्ये- मोडा बोटे!) नवे कंद दरवर्षी लावले जातात. (नव्याचा अट्टहास अशासाठी की, जुन्या कंदांचा आकार व रंगछटा कमी प्रतीच्या असतात.) या टय़ूलिप्सना मॅचिंग म्हणून डॅफोडिल्स, ऑर्किड्स, फर्न्‍स  साथीला असतातच आणि यांचे बहुरंगी, लहान-मोठे, वेगवेगळय़ा आकारांचे अगणित ताटवे ऐंशी एकरांच्या मूळच्या नैसर्गिक जंगलात. शंभराहून जास्त वयाचे मोठे वृक्ष, त्यांवर हक्काने बागडणाऱ्या वेली, बारमाही झरे व छोटे तलाव- अशा दैवी निसर्गनिर्मित सेटिंगला अनेक महान उद्यान रचनाविशारदांनी अशी काही नामी जोड दिली आहे की बस्स! मूळ झऱ्यांचे असंख्य छोटे छोटे फाटे सर्वत्र फिरवताना मध्येच चतुराईने त्यांची रुंदी वाढवून चिमुकल्या तळय़ांचा आभास निर्माण केला आहे, त्यांत बहुविध कारंजी थुईथुई नाचताहेत, हंस अन् बदके विहरताहेत. अगदी खरेखुरे वाटणारे छोटे धबधबे वृक्ष-वेलींच्या मधून डोकावताहेत, प्रशस्त पण वळणदार पायवाटा वेलांटय़ा घेत फुलांच्या ताटव्यांमधून धावताहेत. अवर्णनीय; केवळ अवर्णनीय!

हे पृथ्वीवरचे नंदनवन आहे तरी कोठे? अ‍ॅमस्टरडॅम आणि हेग ही हॉलंड (म्हणजेच नेदरलँड) मधील प्रमुख शहरे. त्यांच्यापासून साधारण सारख्या अंतरावर ही बाग आहे. खासगी वाहनाने जेमतेम अध्र्या तासाचा प्रवास. बहुतेक पर्यटक शिपोल विमानतळ किंवा लेडन या उपनगरी स्टेशनवरून बसने जाणे पसंत करतात. इंटरनेटवरून परतीच्या बसभाडय़ासहित बागेचे ‘कॉम्बो’ तिकीट बुक करण्याची सुविधा आहे. चला तर, आपण भल्या सकाळीच बागेच्या प्रवेशद्वाराशी पोचू या, कारण कुकेनहाफ म्हणजे पुष्पसृष्टीतला ‘बडा ख्याल’ आहे. तिचा आकंठ आस्वाद घ्यायचा असेल तर दोन-चार तासांची उडती भेट कामाची नाही- दोन दिवस द्यायला हवेत. बागेत शिरता क्षणीच तुम्हाला ‘येथे पाहू की तेथे’ असा संभ्रम पडतो. या बागेचा पसारा आहे चक्क ऐंशी एकरांचा; तुमचे पाय, डोळे थकतात, पण बाग संपत नाही. आपल्यालाही हा सौंदर्यानुभव संपूच नये असे वाटत राहते.

तसा या बागेचा इतिहास चक्क २०० वर्षांचा आहे! कुकेनहाफ म्हणजे किचन गार्डन. बागेशेजारच्या, आजही सुस्थितीत असल्यास किल्ल्याचा स्वामी होता एक रसिक सरदार. त्याने लाडक्या राणीसाठी जवळच्या हंटिंग ग्राऊंडमध्ये हे किचन गार्डन वसवली. आणि त्याच्या वंशजांनी त्याकाळच्या सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या उद्यानरचनाकार ‘मि. झोकर’कडून टय़ूलिप्स उद्यानाची निर्मिती केली. गंमत म्हणजे आज तो किल्लादेखील ‘कुकेनहाफ कॅसल’ म्हणूनच ओळखला जातो. बागेचे सध्याचे रुपडे सजले १९५० साली आणि तेव्हापासून तिची लोकप्रियता वाढतच चालली आहे.

मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताक्षणीच समोर एका तळय़ाला खेटलेली ग्रीनहाऊसवजा बैठी इमारत दिसते. हा आहे ‘ज्यूलियाना पॅवेलिअन’! (बागेत असे पाच पॅवेलिअन्स आहेत आणि सर्वाना राजघराण्याशी संबंधित नावे आहेत.) येथे टय़ूलिप्सच्या वेगवेगळय़ा जातींची ओळख करून द्यायला आणि ‘फ्री गाईडेड टूर’ देण्यासाठी हसतमुख स्वयंसेवक आपले स्वागत करतील. इथल्या ‘टय़ूलिप म्युझियम’मध्ये एका जागी शेकडो व्हरायटीज् न्याहाळायला मिळणे म्हणजे देवदुर्लभ पर्वणीच! पॅवेलिअनच्या मागील बाजूला तळय़ालगत फर्न्‍सचे अगणित प्रकार आपले लक्ष आकर्षून घेण्याचा प्रयत्न करताहेत.

एखाद्या खेळण्यातल्या किल्ल्याची असावी अशी तटबंदी उजवीकडे दिसतेय, जरा डोकावू या. अरे, ही तर ‘हिस्टॉरिकल गार्डन’! कुकेनहाफची सुरुवात येथूनच दीडशे वर्षांपूर्वी झाली. आतल्या दगडी बाकांवर शांतपणे बसून ही बाग न्याहाळताना आपण नकळत इतिहासात जातो.

चला पुढे, आता आपण अगदी बागेच्या गाभ्यात शिरलो आहोत. समोर दिसतेय एक सुंदर अर्धगोलाकार इमारत आणि त्याहून शतपटीने सुंदर सभोवतालची बाग ही आहे. ‘ऑरेंज नासा’ पॅवेलिअन आणि त्याला उगवता सूर्य कल्पून त्याच्या किरणांचे सरळ आरे दूरवर पसरले आहेत. अशी या बागेची रचना. झाडांचे पिरॅमिड्स आणि वेलींच्या हिरव्यागार कमानींमध्ये फुलांचे मनोहारी ताटवे, सरळ सूर्यकिरणांचा आभास करणारे कालवे आणि त्यामध्ये थुईथुई उडणारी कारंजी या सर्वाचा त्रिवेणी संगम ‘हीच ती पृथ्वीवरची इंद्राच्या नंदनवनाच्या तोडीची बाग’ अशीच अनुभूती देतो.

या बागेला छेदून जाणाऱ्या रस्त्यावर ही ‘स्टार्सची माळ कसली? हॉलीवूडच्या सुप्रसिद्ध ‘वॉक ऑफ फेम’च्या धर्तीवर येथेही या रुंद पायवाटेवर संगमरवरी ताराकृतींत बडय़ा बडय़ा मंडळींची नावे खोदली आहेत. मात्र ही मंडळी फिल्मस्टार्स नसून कुकेनहाफशी संबंधित असलेली आहेत.

‘वॉक ऑफ फेम’वर आपली पावले उमटवीत कुकेनहाफच्या  या सर्वात मोठय़ा पॅवेलिअनमध्ये प्रवेश केल्याक्षणीच आपण एका स्वप्ननगरीतच आलो आहोत असा भास होईल. प्रत्यक्षात हा ‘विल्यम अ‍ॅलेक्झांडर पॅवेलिअन’ म्हणजे एक प्रचंड ग्रीनहाऊस आहे आणि आत एकदम स्पेशल प्रकारांच्या टय़ूलिप्स आणि डॅफोडिल्सची हजारो रोपे फुलांनी अशी काही बहरली आहेत की, निसर्गदेवता पऱ्यांबरोबर रंगपंचमी खेळते आहे की काय, अशी भ्रांत पडावी. पॅवेलियनच्या ऐन मध्यभागी नाचणारी छोटी कारंजी त्यांना साथ देताहेत. वाऽऽ जबाब नही!

टळटळीत दुपार झाली आहे. गेले तीन-चार तास आपण या नंदनवनात तहान-भूक हरपून हिंडतो आहोत. आता समोरच्या हिरवळीवर स्पेशल ‘बॉक्स सीट’ असलेले, खास कुकेनहाफसाठी डिझाईन केलेले बाक आणि फास्ट फूडचे किऑस्क दिसताहेत. आपणपण च्याऊ-माऊ करून थोडा आराम करू या.

आता आपण बागेच्या उत्तर सीमेजवळ आलो आहोत आणि भले मोठे हात हलवीत आपल्याला जवळ बोलाविते आहे एक खरीखुरी, पूर्ण सुस्थितीत असलेली विंडमिल.

हॉलंड आणि विंडमिल यांचे अतूट नाते आहे. ही विंडमिल एका शहराने बागेला भेट दिली आहे. तिची दणकट, लाकडी, दातेरी चक्रे असलेली यंत्रणा पूर्ण कार्यरत आहे. अरे, वारा सुटला वाटते पाहा, विंडमिलची पाती जोरात गरगरू लागली आणि आतली यंत्रणा वेगाने फिरताना पाहाण्याची मौज आपण अनुभवू शकलो.

आतल्या गोल जिन्याने वरच्या उंच, वर्तुळाकार बाल्कनीत जाऊ या. एका बाजूला बागेचे विहंगम दृश्य दिसतेय, तर कुंपणापलीकडे आजवर कधी न पाहिलेली चक्क दोनेक कि.मी. लांबी-रुंदीची शेते! वेगवेगळय़ा रंगांच्या फुलांचे रुंद पट्टे लांबवर जणू क्षितिजाला भिडताहेत. असे दृश्य नजरेत मावण्यासाठी सहस्रनेत्रच हवेत. प्रत्येक जण निसर्गाचा हा मानवनिर्मित नजारा मनात आणि कॅमेऱ्यांत पकडून ठेवतो आहे. अद्भुत! अवर्णनीय!!

ही टय़ूलिप्स शेते अगदी जवळून पाहावीशी वाटतेय म्हणता? नो प्रॉब्लेम! विंडमिललगतच्या कालव्यात तरंगणाऱ्या या छोटय़ा बोटींच्या पाऊण-एक तासाच्या सफारीत या कोटय़वधी फुलांच्या सौंदर्याचा अगदी जवळून आस्वाद घेता येतो- कारण हा कालवा शेतांमधल्या कालव्यांचा ग्रीडला जोडलेला आहे. चला, आपणपण समोरच्याच छोटय़ा जेट्टीवर तिकिटे काढून या आनंदयात्रेत सामील होऊ या.

जन्मभरात पाहिली नसतील एवढी फुले या तासाभरात पाहून आपण पुन्हा विंडमिलपाशी आलो आहोत आणि जवळूनच कुठून तरी अनोखे सुरेल सूर व स्वर आपले स्वागत करताहेत. अरे वा! येथे तर हॉलंडच्या ग्रामीण सौंदर्याचा मूर्तिमंत, रसरशीत आविष्कार वाटणारी आठ-दहा तरुण जोडपी वाद्यसंगीत व गायकांच्या तालावर बेभान होऊन नाचत आहेत. टय़ूलिप्सच्या बागेत हा फोक डान्स ग्रुप काय करतोय?

हीच कुकेनहाफची खासियत आहे. ही केवळ फुलबाग नाही, तर या देशाची संस्कृती प्रतिबिंबित करणारा आरसा आहे. रोज सर्व पॅवेलियन्स व खास मोकळय़ा जागांवर क्लासिकल व लोकसंगीत, नृत्ये, पारंपरिक लाकडी बूट, हॅट्ससारख्या हस्तकलांची प्रात्यक्षिके, फ्लॉवर शोज, फ्लॉवर अ‍ॅरेंजमेंट प्रशिक्षण (अर्थात मोफत) असे अनेक कार्यक्रम रोज आयोजित केलेले असतातच; शिवाय तरुण व होतकरू शिल्पकारांनी दगड, लाकूड, धातू अशा वेगवेगळय़ा माध्यमांतून साकार केलेल्या कलाकृतींना जागोजागी खास मानाचे स्थान दिलेले दिसते आणि या सर्वाची सांगड घातली आहे फुलांच्या व्यापाराशी. हॉलंडच्या टय़ूलिप्सना जगभरातून मागणी. येथील प्रमुख निर्यातदार कुकेनहाफला लाखो नवे कंद दरवर्षी फुकट पुरवतात आणि त्याबदली बागेचे प्रशासन त्यांची आपल्या वेबसाइटवर जाहिरात करते; प्रत्येक ताटव्यासमोर त्या त्या निर्यातदाराचे नाव असते व बायर-सेलर्स मीट आयोजित करून त्यांना जगभरातून धंदा मिळवून देते. निसर्ग, टुरिझम, कला आणि व्यापार यांचा असा अनोखा मिलाफ घडवून आणण्यात ही डच मंडळी कमालीची यशस्वी झाली आहेत.

संध्याकाळचे सात वाजले आहेत. अजून खूप खूप पाहायचंय, पण आता बाग बंद होणार. तेव्हा बागेला ‘पुनरागमनाय च’ असे आश्वासन देऊन उद्याची तिकिटे बुक करू या.

आपल्या सुदैवाने आजची सकाळपण सोनेरी सूर्यप्रकाशाने नटली आहे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ज्यासाठी जगभराचे पर्यटक आजचा मुहूर्त पाहून येथे येतात ती ‘फ्लॉवर परेड’ संध्याकाळी पाहण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.

आज मागील प्रवेशद्वारातून आत शिरताना समोरच दिसते ‘बीच लेन’ – बागेतील सर्वात रुंद व अतिसुंदर पायरस्ता! वयाचे शतक पार केलेल्या उंच सरळसोट बीच वृक्षांची राई कापीत जाणारी ही पायवाट चिनार वृक्षांच्या गर्द राईंतून धावणाऱ्या श्रीनगर-गुलमर्ग रस्त्याची आठवण करून देतेय, होय ना?

बीच लेनच्या डावीकडचा ‘बिअ‍ॅट्रिक्स पॅवेलियन’ म्हणजे ऑर्किड्सचा अलिबाबाच्या गुहेतील खजिनाच! रंगीबेरंगी, फुलपाखरांसारखी दिसणाऱ्या ऑर्किड्सच्या शेकडो वरायटीज् आपल्याला स्तिमित करतील.

आता आपण दक्षिणोत्तर नटत मुरडत जाणाऱ्या या छोटय़ा नागमोडी पायवाटांनी बागेचे दुसरे टोक गाठू या. प्रवास भलताच कठीण आहे- दोन्ही बाजूंचे वेगवेगळय़ा आकारांचे विविधरंगी टय़ूलिप्सचे ताटवे आपल्याला असे संमोहित करतात की, पाऊल थबकूनच राहते. हा आगळावेगळा ताटवा पाहिलात? जणू काही टय़ूलिप्सची वाहती नदीच!

एरवीचे पंधरा-वीस मिनिटांचे अंतर कापायला आपण चक्क दोन-तीन तास घेऊन प्रवेश करतो आहोत ‘झोकर गार्डन’मध्ये. दीडशे वर्षांपूर्वी झोकर महाशयांनी डिझाईन केलेली ही बाग म्हणजे कुकेनहाफचा मुकुटमणीच! विशाल बीच वृक्षांच्या राईत विविध आकारांचे व रंगांचे ताटवे, त्यामधून लचकत मुरडणाऱ्या नागमोडी पायवाटा, हिरवीगार लॉन्स आणि या त्रिकोणाकृती बागेला दोन्ही हातांनी मिठी मारल्यागत भासणारे तळे- त्यांत सुंदर कारंजी व मुक्त विहरणारे डौलदार हंस! या तळय़ातल्या ‘स्टेपिंग स्टोन्स’ची मजा तर काही औरच! अगदी रामसेतूसारखे पाण्यावर तरंगल्यासारखे हे दगड पाय ठेवल्याक्षणी खाली दबतात आणि आता पाय पाण्यात बुडेल की काय असे वाटते, पण पायांना पाणी लागतच नाही. सगळे आबालवृद्ध टुरिस्ट ही पाण्यावरून चालण्याची मजा लुटताहेत. आपणही अनुभव घेऊ या!

छोटय़ाशा पुलावरून तळे ओलांडून समोरच्या ‘विल्हेमिना पॅवेलिअन’बाहेरील ओपन-एअर रेस्टॉरंटमध्ये कॉफीचे घुटके घेत तळय़ांपलीकडील झोकर गार्डनचे सौंदर्य निरखणे हा अमृतानुभवच! बाजूची ‘व्हाइट हॉर्स’ शिल्पाकृतीपण आपले लक्ष वेधून घेतेय!

दुपारचे साडेतीन वाजले आहेत. ‘फ्लॉवर परेडची’ वेळ झाली आहे.

दरवर्षी एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात ही परेड आयोजित केली जाते. आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये जसे चित्ररथ असतात तसे फक्त फुलांनी सजवलेले, वेगवेगळय़ा ‘थीम्स’चे चित्ररथ शहरात पाच-सहा किलोमीटर्सची सफर करून शेवटी कुकेनहाफला येतात. प्रत्येक चित्ररथाच्या पुढे-मागे ‘डिस्नेलँड परेड’च्या धर्तीवर नाचणारे कलावंत व बँड! ग्रेट शो – दोनेक तास चाळीस-पन्नास फुलांनी सजलेले हे रथ मुद्दाम मुहूर्त साधून आलेले जगभरातले पर्यटक अनिमिष नजरेने निरखताहेत; कॅमेरे आणि व्हिडीयोकॅमना तर उसंतच नाही.

संध्याकाळ झाली आहे. गेले दोन दिवस आपण या अनोख्या सौंदर्याविष्काराचा कधीही न विसरता येण्याजोगा अनुभव घेतला आहे. आता तृप्त पण जड मनाने बागेला अलविदा करून परतीच्या प्रवासाला लागू या.

नरेंद्र चित्रे – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Keukenhof tulip gardens holland

ताज्या बातम्या