सिंगापूरची सूरमयी सफर

स्टेशनवर फक्त २५-३० लोक, अत्यंत स्वच्छता, शांतता. इथे सिटी अंडर सिटी अशी मेट्रो स्टेशन्स आहेत.

आम्ही दोघी बहिणी टूर कंपनीबरोबर सिंगापूरला गेलो. ठरल्याप्रमाणे सर्व अफलातून, आश्चर्यजनक, अघटित गोष्टी बघून झाल्या. आखीवरेखीव प्रोग्रॅम होता. ब्रेकफास्ट, साइटसीइंग, लंच पुन्हा बाहेर. रात्री जेवण. सगळं सगळं अगदी कसिनोसुद्धा अनुभवून झाला. तरीही मनाला काही तरी हुरहुर लागलीच होती. काळजात काटा रुतत होता. का बरं? इतक्यात बहिणीच्या यजमानांचा मेसेज आला. त्यात बहिणींचे लोककला अकादमीचे सर (मुंबई) डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शंकर महादेवनबरोबर सिंगापूरला एक्सप्लनेडमध्ये कार्यक्रम आहे. त्यांचाही मेसेज आला. मग एक्सप्लनेड थिएटरला कसे जायचे हे टूर लीडरला विचारले, तर त्याने टाळाटाळ केली. स्थानिक गाईडने उडवून लावले. मन अगदी हिरमुसले. संध्याकाळी ५॥ ते ६ वाजताच आम्हाला युनिव्हर्सल स्टुडिओतून ओढून आणून हॉटेलवर आपटलेच होते. मग आमच्या हॉटेलच्या रूमच्या खिडकीतून एक टूरिस्ट ऑफिस दिसायचे, तिथे जाऊन चौकशी केली, तर टॅक्सीपेक्षा तुम्ही एम.आर.टी.ने जा असे सांगण्यात आले. मग हॉटेल काऊंटरवरच्या मुलाने सिंगापूरचा नकाशाच दिला अन् कसे कसे जा ते खाणाखुणा करून सांगितले. छाती दडपली. खूपच निराश झालो.

पाचेक मिनिटांत भाच्याचा फोन आला. ‘‘अगं आई, एम.आर.टी. म्हणजे मेट्रो, घाबरायचं काय त्यात. आपल्यासाखी गर्दी नसते अन् प्रत्येक गोष्ट कधी तरी पहिल्यांदा करावीच लागते.’’ चला हा खरा आपला माणूस. सगळे शॉपिंगला चाललेच होते. आम्हीही निघालो. मेट्रो ‘लिटिल इंडिया’ स्टेशन शोधून काढले अन् इथून सुरू झाले आमचे खरे सिंगापूर पर्यटन. स्थानिक भाषा कळत नव्हती, पण मानवतेची एक भाषा असते, तिच्या आधारावर आम्ही फक्त‘एक्सप्लनेड थिएटर’ अन् शंकर महादेवन म्युझिक कॉन्सर्ट’ या शब्दांवर धाडसाने निघालो. विशेष म्हणजे एम.आर.टी. स्टेशन जवळच होते अन् तिथे कोणालाच भाषा समजत नसली तरी प्रत्येक खांबावर नकाशा रेल्वेरुट व स्टेशन्स लिहिली होती. एका प्रवासी स्त्रीने ते आम्हाला खुणेने दाखविले. सुदैवाने तो इंग्लिशमध्ये होता. मग एक्सप्लनेड दाखवून विचारले, तर लिटिल इंडिया ते ‘धोबीघाट’ जाऊन पुन्हा मेट्रो लाइन बदलून एक स्टेशन एक्सप्लनेड. बघा, किती सोपे, किती अवघड. तिकडे सेंट्रल लाइन, हार्बर लाइनप्रमाणे यलो लाइन, ग्रीन लाइन असते.

स्टेशनवर फक्त २५-३० लोक, अत्यंत स्वच्छता, शांतता. इथे सिटी अंडर सिटी अशी मेट्रो स्टेशन्स आहेत. पाच-सहा चलत-जिने उतरून-चढून गेल्यावर गाडी अन् प्लॅटफॉर्म समोरच. लगेच चढलो. व्यवस्थित खुणा केल्याप्रमाणे धोबीघाटहून एक्सप्लनेडला जायला पुन्हा दुसरी मेट्रो. तिथे स्टेशनवर मुली, स्त्रिया तोकडय़ा कपडय़ांतही बिनधास्त वावरत होत्या. त्यांच्या स्त्रीत्वाचा मान राखला जात होता, किंबहुना ही स्त्री आहे, एकटी आहे म्हणजे ती समस्त पुरुषवर्गाची मालमत्ता आहे असे भाव वाटले नाहीत. स्त्री स्वातंत्र्य व सुरक्षा, तिचे वागणे व कपडय़ांशी संबंधित नसून पुरुषांच्या संस्कार, संयम, विवेकावर अवलंबून आहे हेच खरे. सिग्ांापूरला म्हणूनच फाइन सिटी म्हणतात, कारण जशी सुंदर आहे तशी भरपूर दंड आकारणारीही आहे ही. सगळीकडे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आहेत अन् तुमचे गैरवर्तन लगेच कॅमेराबद्ध होते. त्यामुळे आंतरबाहय़ स्वच्छता, सुरक्षितता, टापटीप, अंडरग्राऊंड शॉपिंग कॉम्प्लेक्स, फूड, फ्रूटस, फॅ शनचे भरमार मार्केट, पण गर्दी, गोंधळ अन् गलिच्छपणाचा मागमूसही नव्हता.

एक्सप्लनेड स्टेशनवरून परत निरनिराळय़ा आडव्यातिडव्या चलत-जिन्यांनी एक्सप्लनेड थिएटरवर एकदाच्या पोहोचलो. हुश्श! या थिएटरचा आकारही माइकसारखा आहे. सहा हेक्टर जागेत वसलेली बहुमजली इमारत, अनेक प्रवेशद्वारं आहेत. सिंगापूरचे सर्वात मोठे स्टेज आहे. २००० माणसं श्रोते अन् १५३ स्वयंसेवक होते. आम्ही आत पाऊल ठेवले अन् थंडाव्याने अन् नि:स्तब्ध शांततेने आमचा कब्जा घेतला. कार्यक्रमाची सुरुवातच डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या गणेशवंदनाने (पहिलं नमन) झाली. (गौरी तनयाय) अन् ‘तुळजाभवानी आई – ’ हे लोकगीत म्हटले. ‘महाराष्ट्राची शान’ असा डॉ. गणेश चंदनशिवे यांचा उल्लेख शंकर महादेवन यांच्या तोंडून ऐकताच टाळय़ांचा कडकडाट झाला. ऊर अभिमानाने भरून आला. इतका खटाटोप करून कार्यक्रमाला आल्याचे सार्थक झाले. मराठीची पताका इथेही फडकली. पुढचा पूर्ण वेळ तो एवढा परिसर भारतीय लोकगीतांनी भारून गेला होता. डॉ. चंदनशिवेंच्या शिष्यत्वाच्या छोटय़ाशा धाग्यावर आम्ही सुरांचा स्वर्ग गाठला होता. सिंगापूरमध्ये अनेक भारतीय आहेत. प्रत्येक प्रांताच्या लोकगीताने हॉल लयबद्ध टाळय़ांनी दुमदुमत होता. मराठीपण भरपूर होते. शंकर महादेवन यांच्या कार्यक्रमाचे नावच मुळी ‘माय कंट्री, माय म्युझिक’ आहे. शंकर महादेवन यांनी तामिळ सिनेमा केला. जन्म व वास्तव्य मुंबई (चेंबूर)चे. कम्पोझर, सिंगर, फोक आर्टिस्ट म्हणून प्रसिद्धी मिळाली. श्रीनिवास खळेंकडे शिक्षण, त्यामुळे मराठी संगीताची उत्तम जाण. त्यांना ब्रेथलेसने प्रसिद्धी मिळाली. (कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता है). मामेखानने राजस्थान, गुजरात लोकगीतं सादरं करून वाहव्वा मिळवली. मदर ऑफ फोक म्युझिक, खाना, पीना, उठना, बैठना संगीतातच यूपीचे ठुमरी, कजरी, कव्वाली, काश्मीरचे भुमरो, वेगळी गाणी. (रातमे खंजर मारे, मोरा सैया तो है परदेस). शंकर महादेवन यांचे ‘खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा, चढता सूरज धीरे धीरे ढलता ही जायेगा’ या शब्दांनी मन विव्हळ झाले. रवींद्रनाथ टागोरांची संगीतभूमी, पश्चिम बंगालचे ‘तो भी एकला चलोरे’ – घाबरू नकोस  एकटा जात राहा आणि शंकर जयकिशन यांचे ‘उड उड बैठी, हलवैय्या दुकनिया, बर्फीके सब रस..’ या गीतांनी टाळय़ांबरोबर पायांनीसुद्धा ठेका धरला.

शंकर महादेवन यांचे अनाऊंसिंग ‘सो फार सो गुड’. वुई विल गो फ्रॉम समथिंग टू समव्हेअर, भारत ब्लेस्ड कंट्री है! खरंच भारताला दैवी देणगी आहे.

पंजाब प्रांताचे (पाकिस्तान) गुलाम अली खाँचे ‘जान भी जाये, ये जहाँ लूट जाये, संग प्यार रहे, मै रहू ना रहू सजनाऽऽ’, रवींद्रनाथांचे ‘माय फादर, लेट माय कंट्री अवेक’ या कवितेच्या शब्दांनी काव्य हृदयातून येते हेच खरे हे जाणवले. अनेक गायक-गायिका होत्या. त्या सर्वानी मिळून कार्यक्रमाचा सुरीला शेवट अर्थातच वंदेऽऽ मातरम् या शंकर महादेवनच्या सुरावटीने केला. कार्यक्रम अर्थातच अतिशय सुंदर झाला. भारावून परत आलो.

प्रवासात अनेक अद्भुत गोष्टी घडतात याचा पुन्हा प्रत्यय आला अन् ‘डोंट लिमिट युवर चॅलेंजेस, चॅलेंज युवर लिमिटस्’प्रमाणे आज तरी एक्सप्लनेडला जाण्याचे चॅलेंज स्वीकारून यशस्वी झालो. एक्सप्लनेड थिएटरचा अनुभव अन् एमआरटीचा थरारक प्रवास हाच आमच्या सिंगापूर टूरचा हायलाइट होता. शब्दश: दोन म्हाताऱ्या एकमेकींना धरून त्या चलत-जिन्याने अन् सुपरफास्ट मेट्रोने न धडपडता कशा गेलो अन् आलो हे एक आश्चर्यच. सिंगापूरचा हा संगीत अनुभव त्यामुळे कायम मनात रुंजी घालेल.
वासंती घाडगे –

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रॅव्हलॉग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Singapore