पर्यटन विशेष

एकीकडे मंदीची चर्चा आणि दुसरीकडे देशविदेशात पर्यटकांचा वाढता ओघ असं चित्र सध्या बघायला मिळत आहे. असं असेल तर पर्यटक नेमके कसे फिरतात, कुठे फिरतात, त्यांना नेमकं काय हवं असतं? वेगवेगळ्या पर्यटन संस्थाचालकांशी बोलून पर्यटनाच्या क्षेत्रात सध्या काय चाललं आहे याचा घेतलेला मागोवा-
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा. त्याची जगण्याची सारी धडपड याभोवती गुंफलेली असते. असे असले तरी या गरजांबरोबरच त्याला ओढ असते ती स्वत:चे जगणे समृद्ध करून घेण्याची. म्हणूनच स्वत:च्या आवडीनुसार, कुवतीनुसार अनेकविध छंद जोपासत तो आपली भूक भागवत असतो. पण केवळ इतक्यावरच तो थांबत नाही. त्याहीपुढे जाऊन जिवाला चार घटका विश्रांती, धकाधकीच्या आयुष्यातून थोडा विरंगुळा शोधत असतो. पूर्वी धार्मिक कारणाने अथवा व्यापार उदिमासाठी माणसाने भरपूर भटकंती केली. कालौघात तंत्रज्ञान प्रगत होत गेले, दळणवळण सुकर झाले आणि आनंदासाठी पर्यटन या संकल्पनेला वाव मिळत गेला. त्यातही शेकडो पर्याय आले. चार पसे हातात खेळू लागल्यावर तर देशांतर्गत होत असलेले पर्यटन थेट परदेशापर्यंत वाढत गेले.
साधारण मागील १५-२० वर्षांत आíथक उदारीकरणाच्या माध्यमातून विकसित झालेल्या समाजातील अनेक घटकांची पर्यटन ही इतर मूलभूत गरजांबरोबर एक गरजच बनून गेली आहे. वर्षभर पसे जमवून वेळात वेळ काढून लोक पर्यटनाचा आनंद घेऊ लागले. आज साऱ्या जगावर मंदीचे सावट आहे. मोटर निर्मितीसारख्या उद्योगाला काही काळ चक्क आपले उत्पादन थांबून ठेवावे लागत असले तरी पर्यटन व्यवसायाला अशी खीळ बसलेली नाही. खरे तर मंदी, रुपयाचे मूल्य घसरणे, महागाई या साऱ्याचा थेट परिणाम पर्यटनावर होत असतो. अर्थात आज तो आपल्याकडेदेखील जाणवत आहेच, पण एकंदरीतच वातावरण पाहता हा उद्योग स्वत:ला सावरत वाटचाल करत आहे. पर्यटन उद्योगातील काही व्यावसायिकांशी चर्चा केली असता लक्षात येते लोक पूर्वीसारखा पसा खर्च करत नसतील, पण पसा खर्च करत आहेत हे निश्चित.

यामागची नेमकी मानसिकता ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक ‘केसरी ट्रॅव्हल्स’चे केसरी भाऊ पाटील उलगडून सांगतात, ‘‘महागाई जरी असली तरी लोकांना फिरायला हवे असते. तुम्ही नवीन ठिकाणी वेगळ्या गोष्टी दाखवल्या तर ते यायला तयार असतात. अगदी आमच्या नुकत्याच झालेल्या महिलांच्या थायलंड टूरला भरभरून प्रतिसाद होता. अनेकांनी एक्सेस बॅगेजचे पसे भरावे लागतील इतके शॉिपग केले होते. लोकांकडे पसे आहेत, त्यांना पर्यटनावर खर्चदेखील करायचा आहे, पण त्यासाठी त्यांना योग्य मार्ग दाखविणे गरजेचे आहे.’’ परदेशी चलन मंदी यामुळे अनेक घटकांवर परिणाम केला असला तरी लोक पर्यटनाला बाहेर पडतात याचे कारण म्हणजे नेहमीच्या कटीकटी तर रोजच आहेत, तेव्हा संधी मिळेल तसे फिरून घेऊ, असा लोकांचा दृष्टिकोन असल्याचे ते स्पष्ट करतात. इतकेच नाही तर अनेक जण भविष्यात क्रुझ सफारी, अंटाक्र्टिका सफरीच्या योजनादेखील आखत असतात.

स्वावलंबी पर्यटन
साधारण दहा वर्षांपासून पर्यटनाच्या या प्रकारात चांगल्याच प्रकारे वाढ झाली आहे. माहितीच्या स्फोटामुळे आज सर्वानाच सर्व प्रकारची माहिती विनासायास मिळू लागली आहे. आपल्याला जेथे जायचे आहे ती सर्व माहिती आधीच मिळवून टुर ऑपरेटरच्या सहायाने आपली टुर आखून घेण्याची पद्धत सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी तरी वाढली असल्याचे सर्वच टुर ऑपरेटर नमूद करतात. काही मोठय़ा पर्यटकांनी तर यासाठी स्वतंत्र विभागच सुरू केले आहेत. आपले बजेट ठरवायचे, आपल्याला काय पाहायचे आहे, कोठे राहायचे आहे हे नक्की करायचे आणि मग ऑपरेटरच्या माध्यमातून बुकिंग करायचे, असा हा प्रकार सध्या वाढीस लागला आहे. अशा पर्यटकांची फिरण्याची ठिकाणे नक्की असतात. त्यामुळे पर्यटक व्यावसायिकांनी ठरवलेले सर्व स्पॉट पाहायची त्यांना गरज नसते. स्वत:च्या आवडीनुसार ते स्पॉट ठरवितात. अशा वेळेस नेहमीच्या सुविधा नसल्या तरी त्यांना चालू शकते. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर असे पर्यटक स्थानिक जेवण घेण्यास तयार असतात. एकदा सकाळी बाहेर पडले की जेवणासाठी म्हणून परत दूरचे अंतर पार करून शहरात आपल्या हॉटेलात यायचे यात वेळदेखील जातो आणि भारतीय जेवण परदेशात करणे महागदेखील ठरते. अशामुळे त्यांचा वेळ आणि पसा दोन्ही वाचते आणि स्वत:ला हवे तसे फिरता येते. दुसरा प्रकार आहे तो उच्चभ्रू वर्गाचा, त्यांना आपला खासगीपणा जपायचा असतो, त्यामुळे ते ग्रुप टुर्समध्ये सामील होत नाहीत. तर ज्येष्ठ नागरिकांचा कल मात्र ग्रुप टुरवर जास्त असल्याचे दिसून येते.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

 लोकांच्या या उत्साहामागचा कार्यकारण भाव समजावून सांगताना ‘वीणाज वर्ल्ड’च्या वीणा पाटील म्हणाल्या, ‘‘आपल्याकडे मुख्यत: मराठी मध्यमवर्गीय मोठय़ा प्रमाणात पर्यटनाचा आनंद घेत असतात. या वर्गावर मंदीचा थेट परिणाम फारसा होत नसतो. महत्त्वाचे या घटकाचे पर्यटनाचे बजेट हे ठरलेले असते. मंदीचा मानसिक परिणाम या घटकांवर नक्कीच होतो. तसा परिणाम झालादेखील आहे. त्यामुळे पसे थोडे जपून खर्च करण्याकडे यांची मानसिकता बनते, पण पर्यटन होतच आहे, त्यामुळेच आमच्या पुढील सर्व टुर्सना चांगलाच प्रतिसाद आहे.’’ डॉलर आणि रुपयाच्या संबंधाने त्या पुढे म्हणाल्या, ‘‘सध्याचा हंगाम हा मध्य पूर्वेचा आहे. तेथे डॉलर हा घटक फारसा तापदायक नाही. तेच जर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया हंगाम असता तर चलन विनिमयाचा फटका जास्त बसला असता. तसेच मंदीचा फटका हा मुख्यत: शेअर बाजारासारख्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना जास्ती बसतो. तसा ग्राहक असणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांना हा धक्का हमखास जाणवणारा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुलनेने कमी खर्चाच्या परदेशी टुरला पर्याय म्हणून अनेक पर्यटक हे देशांतर्गत पर्यटनाकडेदेखील वळलेले दिसतात. मात्र त्यातही उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारताला सध्या जास्त प्रतिसाद मिळत आहे.’’
परदेशी पर्यटनाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा परिणाम करणारा घटक म्हणजे परदेशी चलन. या अनुषंगाने एप्रिल-मे-जून-जुल या गेल्या हंगामाबाबत बोलताना ‘विनायक ट्रॅव्हल्स’चे विनायक लाड म्हणाले, ‘‘परदेशी पर्यटनासाठी तिकीट, व्हिसा अशा बाबी आधीच बुक झालेल्या असतात. त्यामुळे जरी परदेशी चलनाचा दर वाढला असला तरी ज्यांनी बुकिंग केले होते ते त्या टुरवर गेलेच. कारण इतर व्हिसा, तिकीट, हॉटेल या गोष्टी वारंवार करणे शक्य नसते. वाढीव विनिमय दरामुळे खर्च वाढला, पण मग लोकांनी इतर पर्यायी गोष्टींवरचा खर्च कमी केला. मंदी आणि या सर्व घटकांचा खरा परिणाम जाणवेल तो पुढील वर्षांच्या हंगामाचे बुकिंग सुरू होतील तेव्हा.’’ सध्याच्या वातावरणाबाबत ते पुढे सांगतात की, ‘‘लोकांना पर्यटन करायचे असते, मग अशा वेळेस ते महागडय़ा टुर बाजूला ठेवून तुलनेने स्वस्त टुरचा पर्याय अजमावतात किंवा चार ठिकाणे पाहणार असू तर तीनच पाहतात.’’ त्यामुळेच सध्या काही प्रमाणात श्रीलंकेला मागणी येत असल्याचे ते नमूद करतात. हाच मुद्दा स्पष्ट करताना टय़ुलिप हॉलीडेज्चे दिलीप यादव म्हणाले, ‘‘इतर गरजांप्रमाणे पर्यटन हीदेखील आज आपली गरज बनली आहे. सुविधांच्या किमती वाढल्या तर लोक थोडय़ा कमी खर्चाच्या सुविधा घेतील. म्हणजेच पंच तारांकितऐवजी तीन तारांकित हॉटेलमध्ये राहतील, पण पर्यटनाला जातील. कारण रोजच्या ताणतणावापासून त्यांना थोडी मोकळीक हवी असते. पर्यटनाला जाण्याआधी खूप विचार करून त्यांनी तयारी केलेली असते. अशा वेळेस शॉिपग कमी करणे, अशा काही तडजोड करतात, मात्र पर्यटनाला जातातच.’’ त्याचबरोबर ते आणखीन एका मुद्दय़ाकडे लक्ष वेधतात ते म्हणजे आपल्या बजेटनुसार पर्यटनाचे पॅकेज करून घेणे. सध्या या प्रकारत किमान दहा टक्क्य़ांनी तरी वाढ झाली असल्याचे ते सांगतात.
जागतिक मंदी, परदेशी चलनाचे वाढते दर या साऱ्या घटकांबरोबरच वाढते कर हादेखील पर्यटनावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असल्याचे ‘मधुचंद्र ट्रॅव्हल्स’चे चंद्रकांत दुणाखे नमूद करतात. ते सांगतात की, ‘‘गेल्या काही वर्षांतील वाढत्या सेवा करांमुळे पर्यटनाच्या खर्चात बरीच वाढ झाली आहे. त्याचादेखील बराच परिणाम या पर्यटकांवर झाला आहे.’’ पुढे ते म्हणतात, ‘‘ज्यांनी तिकिटे ब्लॉक केली होती, त्यांचे हात चांगलेच पोळले आहेत, पण वाढत्या खर्चावर पर्याय म्हणून कमी खर्चाची टुर घेतली तर त्याच प्रकारे कमी दर्जाची सुविधा मिळते. मग आमची आबाळ झाली म्हणून तक्रारी येतात. सामान्य माणसांना १०० रुपये कमी झाले तरी ते हवे असतात, तर परदेशी पर्यटनामध्ये उच्च वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे, त्यांच्याबाबत फारसा फरक पडलेला नाही.’’ त्याचबरोबर आणखीन एका महत्त्वाच्या घटकाकडे लक्ष वेधताना ते सांगतात की, ‘‘परदेशी प्रवासात तुम्ही एखादे ठिकाण कमी केले तरी फार मोठा फरक पडत नाही, कारण विमान प्रवासासारखा मूलभूत खर्च तसाच राहतो. त्यामुळे उर्वरित पर्यटन करण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागतो.’’ हा प्रकार सध्या आपण किमती आधारित विचार करतो त्यामुळे आहे. तेव्हा आपण गुणवत्ता आधारित विचार करायला हवा, असे त्यांचे मत आहे.
सध्याच्या अस्थिर अर्थव्यवस्थेचा परिणाम अनेक घटकांवर होत असला तरी पर्यटनावर काहीही परिणाम झाला नसल्याचे ‘प्रथमेश ट्रॅव्हल्स’चे राजेश ठक्कर सांगतात. ते म्हणतात की, ‘‘मंदी, महागाईबाबत आपण खूप आरडाओरड करत असलो तरी आजही अनेक हॉटेल्स फुल असतात, लोक करमणुकीवर भरपूर पसे खर्च करत असतात. तेच गणित पर्यटनाबाबत लागू होते.’’ राजेश ठक्कर मुख्यत: सिमला कुलू मनालीच्या टुर्स आयोजित करतात. दोन पसे जास्ती घेऊनदेखील त्यांना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच मंदीमुळे पर्यटनाच्या प्रकारात फारसा काहीच बदल झाला नसल्याचे त्याचे ठाम प्रतिपादन आहे. ‘विहार ट्रॅव्हल्स’चे हृषिकेश पुजारी याच अनुषंगाने सांगतात, ‘‘आम्ही कमी दिवसांत जास्त स्थळे दाखविण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मूलभूत खर्च कसा कमी करता येईल यावर आमचाच भर असतो.’’ पर्यटकांचे बजेट विचारात घेऊन उलटय़ा पद्धतीने हिशोब करून टुर आखून देण्याचे प्रमाण सध्या वाढत असल्याचे ते विशेषत्वाने नमूद करतात. अर्थात मोठय़ा ग्रुपमधील पर्यटन हे कधीही तुलनेने स्वस्त असते असे त्यांचे मत आहे.

याच मुद्दय़ावर भर देताना ‘श्रीवसंघ प्रतिष्ठान’चे कॅप्टन नीलेश गायकवाड सांगतात की, ‘‘ग्रुप टुर या कायमच इकॉनॉमी टुरसाठी फायदेशीर असतात. वाढत्या खर्चातून मार्ग काढण्यासाठी अनेक पर्यटक हे प्रामुख्याने पर्यटन स्थळामध्ये बदल करताना दिसतात. अमुक इतक्या बजेटमध्ये मला फिरायचे आहे तेव्हा त्यासाठी कोणते ठिकाण उपयोगी आहे याचा विचार करून ते आपली टुर निवडतात, असे सध्याचे चित्र आहे.’’ गेल्या दहा-बारा वर्षांत जरी महागाई वाढत असली तरी मंदीसारख्या घटकांचा परिणाम मध्यमवर्गीय समाजावर थेट फारसा जाणवत नाही आणि हा घटकच पर्यटनात मोठय़ा प्रमाणात आहे. त्याने वार्षकि नियोजन करून बजेट काढून ठेवलेले असते, त्यामुळे शक्य असेल तेथे विमान प्रवासाऐवजी रेल्वे प्रवास करणे अशा प्रकारे तो खर्च वाचवतो, पण पर्यटनाला जातोच, असे त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय पर्यटन महाग झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत देशांतर्गत पर्यटन बऱ्यापकी वाढल्याचे बहुंताश पर्यटन व्यावसायिक मान्य करतात, पण त्यातदेखील काही प्रमाणात घट होत असल्याचे ‘मध्य प्रदेश पर्यटन महामंडळा’च्या वीणा रमण नमूद करतात. नेमका हा फरक कसा आहे हे सांगतात, ‘‘दहा दिवसांच्या टुरऐवजी लोक टुरचा कालावधी कमी करत आहेत. दुसरा मुद्दा असा की पर्यटनाला जायचे अशी एक मानसिकता तयार झालेली असल्यामुळे थोडीफार तडजोड करायची तयारी ठेवून लोक भटकतात, असेच सध्याचे चित्र आहे.’’ महागडय़ा आंतरराष्ट्रीय टुरचा परिणाम देशांतर्गत पर्यटनात वाढ होण्यास नक्कीच मदत झाली असल्याचे त्यांचे मत आहे.  
आंतरराष्ट्रीय घटकांचा थेट परिणाम पर्यटन क्षेत्रावर हमखास होत असल्याचे ‘मँगो हॉलीडेज’चे मिलिंद बाबर नमूद करतात. इतकेच नाही तर देशांतर्गत व्यवस्थेतील बदल सरकारी धोरणे हेदेखील यामध्ये महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांचे मत आहे. ते सांगतात, ‘‘गेल्या हंगामात फार फरक पडला नाही, पण सध्या बऱ्यापकी मंदी आहे. देशांतर्गत धोरणे आणि मंदी, परदेशी चलन विनिमय हे घटक जर असेच राहिले तर मात्र पुढील हंगामावर हमखास परिणाम होऊ शकेल.’’ दुसरे असे की पर्यटन ही प्राथमिक गरज नाही, त्यामुळे सर्व गरजा भागविल्यावर याचा विचार केला जातो हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.
परदेशी चलन आणि मंदी यासंदर्भात ‘ट्रॅव्हल पॅक्स’चे सुनील देशपांडे वेगळा पलू मांडतात. ते सांगतात, ‘‘२०१०-११ पासूनच परदेशी चलन आणि मंदीचे परिणाम पर्यटनावर जाणवत होते, मात्र पूर्वीपेक्षा आता हा परिणाम मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर अंतर्गत वातावरण फारसे पूरक नसल्यामुळे परदेशी पर्यटकदेखील आपल्याकडे येण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे २०१०-११ मध्ये तुलनेने परिस्थिती चांगली होती, असे त्यांचे मत आहे. सध्याच्या परिस्थितीत मध्यमवर्गीय पर्यटकांवर बऱ्यापकी परिणाम झाला असला तरी उच्च वर्गातील पर्यटनाचे प्रमाण वाढले आहे.’’ देशांतर्गत पर्यटनाचे प्रमाणदेखील वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.  
थोडक्यात मांडायचे तर पर्यटन ही आता सर्वाचीच मूलभूत नसली तरी एक महत्त्वाची गरज बनली आहे. ज्याला जसे जमेल तसे तो फिरत असतो.