23 February 2019

News Flash

सागरी पदभ्रमण

सह्यद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधल्या पायवाटा धुंडाळत केलेली भटकंती जितकी अंगातली रग शमवणारी, तितकीच कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यालगतची भटकंती मनाला रिझवणारी..

| June 26, 2015 01:04 am

सह्यद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधल्या पायवाटा धुंडाळत केलेली भटकंती जितकी अंगातली रग शमवणारी, तितकीच कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यालगतची भटकंती मनाला रिझवणारी..

सह्यद्रीच्या अंगाखांद्यावरील डोंगरदऱ्या, सुळके, अरुंद पायवाटा यांच्यातून भटकंती करत, सायंकाळी एखाद्या गुहेत, मंदिरात केलेला मुक्काम, या सर्वाची नशा काही वेगळीच असते. पण हे सर्व करत असताना अचानक, समुद्र किनाऱ्यावरून चालत चालत किल्ले, मंदिरे बघण्याची कल्पना पुढे आली. युथ होस्टेल अंबरनाथ युनिटतर्फे आम्ही तळ कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील किल्ल्यांना भेट द्यायचे ठरवले. चार दिवसांची मोहीम चालत करावयाची असल्याने, अनावश्यक वस्तूंना फाटा देत, केवळ गरजेच्या वस्तू सॅकमध्ये भरल्या आणि निघालो. कोकण किनाऱ्यावरील दक्षिणेकडील टोक; सिंधुदुर्ग जिल्ह्यजवळील; समुद्र किनारी वसलेल्या तेरेखोल किल्ल्यावर डेरेदाखल झालो. आता पुढील चार दिवस समुद्रकिनाऱ्यावरून मस्त चालत भटकंती. या मोहिमेमध्ये तेरेखोल किल्ला, यशवंत गड, निवतीचा किल्ला, याचबरोबर प्रेक्षणीय, निवांत समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, कोकणातील मंदिरे इत्यादी ठिकाणे पाहण्याचा मानस होता.
तेरेखोल नदी समुद्रास मिळते तेथे नदीच्या उत्तर तीरावर महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या (गोवा राज्यात) सीमेवर तेरेखोल हा किल्ला आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस मराठय़ांनी बांधलेला हा किल्ला पुढे १७४६ मध्ये जिंकून पोर्तुगीजांनी त्यात बदल करत युरोपीयन पद्धतीने बांधून काढला. पुढे १९५४ साली गोवा मुक्ती लढय़ात पनवेलच्या हिरवे गुरुजींनी आपल्या प्राणांची आहुती देत याच किल्ल्यावर तिरंगा फडकविला होता. या स्मरणार्थ किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ एक स्मारकही उभारण्यात आले आहे. तेरेखोल किल्ल्यावरून खाडीचे दोन्ही किनारे व अथांग समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.
किल्ला पाहून किनाऱ्यावरूनच उत्तरेकडे चालताना थोडय़ाच वेळात महाराष्ट्रात दाखल झालो ते कनयाळे गावात. तिथे नवदुग्रेचे एक छानसे मंदिर आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची ही कुलदेवता असल्याचे गावकरी अगदी अभिमानाने सांगतात. पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर येऊन रेडी गावाकडे वाटचाल सुरू केली. उन्हात मऊशार वाळूतून, समुद्राचा खारा वारा अंगावर घेत चालायला मजा येत होती. समुद्राच्या पाण्याचा प्रत्यक्ष स्पर्श अनुभवायचा म्हणून, मी बूट काढून, सॅकच्या मागे बांधले व उथळ पाण्यातून, लाटांचा मारा झेलत चालायला सुरुवात केली. पाहता पाहता सगळेच पाण्यातून चालायला लागले. ‘वन-टु-वन’ करत रेडी या गावी आलो. रेडी गाव; ऐतिहासिक पाश्र्वभूमीबरोबरच, लोह खनिजांच्या खाणीसाठीही प्रसिद्ध आहे. येथे स्वयंभू गणेश मंदिर आहे. मंदिर भव्य असून त्यास प्रचंड मोठा सभामंडप आहे.
याच गावातील समुद्रकिनाऱ्याला लागूनच यशवंतगड नावाचा एक अपरिचित किल्ला आहे. पर्यटक मंडळी तर सोडाच, हौशी ट्रेकर्सही येथे फारसे फिरकत नाही. सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशहाने खाडीच्या मुखाशी मोकळ्या ठिकाणी हा किल्ला बांधला. किल्ला चांगला ऐसपस असून तटाचा एकूण घेर अडीच किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. समुद्रसपाटीपासून तटाची उंची ३०मीटर पर्यंत आहे. १६६२ साली शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यास यशवंतगड असे नाव दिले. ढासळलेले बुरुज, दरवाजे वैभवशाली इतिहासाच्या खुणा पटवून देतात.
यशवंतगड करून पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यावर आलो. उथळ पाण्यातून, शिरोडे गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. डाव्या बाजूस, क्षितिजापर्यंत पसरलेली सागराची निळाई, तर उजवीकडे नारळी-पोफळीच्या बागा व हिरवीगार गच्च झाडी. दोन तासांची वाटचाल करत शांत, सुंदर समुद्र किनारा लाभलेल्या शिरोडे या गावात आलो. येथे समुद्र फारच उथळ असल्याने वाळूची छोटी ‘बेटे’ तयार झालेली आहेत. त्यामुळे समुद्रात डुंबण्यासाठी हा एक सुरक्षित आणि उत्तम किनारा आहे. या सुंदर ठिकाणी देशी पर्यटकांची अजिबात वर्दळ नाही, दिसले ते फक्त परदेशी पर्यटक. बरीच परदेशी मंडळी (बहुतेक रशियन) येथील शांत समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेताना दिसत होती. या परदेशी मंडळींना बहुधा इंग्रजी भाषेचा गंधही नव्हता. काही हुशार स्थानिक कोकणी माणसांनी, प्रखर व्यावसायिकतेचे दर्शन घडवत, छोटी कॉटेजेस बांधून परदेशी पाहुण्यांच्या सोयीसाठी, चक्क रशियन भाषेमध्ये हॉटेलचे नाव व दर फलक लिहिल्याचे दिसले. तळ कोकणातील अशा सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्व काही हजार किलोमीटर दूर असलेल्या परदेशी पर्यटकांनी आपल्या अगोदर ओळखले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
पुढे एक तरी पार केली व लांबलचक बीचवरून चालू लागलो. उथळ पाण्यातून लाटांची मजा घेत चालतांना आरवली गावी कधी पोहोचलो हे समजलेच नाही.
आरवली हे मंदिराचे गाव म्हणावयास हरकत नाही. रामेश्वर, सिद्धेश्वर, कोकणेश्वर अशी बरीच मंदिरे आहेत. पण यातील प्रख्यात मंदिर म्हणजे वेताळाचं मंदिर- श्रीदेव वेतोबा. मंदिरात प्रवेश करताच सात फूट उंचीच्या भव्य मानवाकृती श्रीवेतोबाच्या मूर्तीचे दर्शन घडते. विशेष म्हणजे या मूर्तीस केळीचे घड व चपला वाहण्याची प्रथा आहे. सभामंडपातील एका खिडकीत भक्तांनी अर्पण केलेल्या अविश्वसनीय अशा मोठय़ा आकाराच्या चामडय़ाच्या चपलांचा ढीग पाहावयास मिळतो.
दुसऱ्या दिवशी मोचेमाडकडे वाटचाल सुरू केली. खाडीवर बांधलेला एक ऐसपस पूल पार करत उभादांडा येथे पोहोचलो. उभादांडा हे गाव मुख्यत: मच्छिमारांची वसाहत आहे. येथे श्री देव वाटोबाचे एक सुरेख कौलारू; ऐसपस असे मंदिर आहे. मंदिरात अंमळ विश्रांती घेऊन मच्छीमाराची वसाहत पार करत थेट समुद्रकिनाऱ्यावर आलो. बीचवरूनच वेंगुल्र्याकडे वाटचाल सुरू केली. अचानक समुद्रातून डॉल्फिनचा एक कळप उगवला. डॉल्फिनची जलक्रीडा व दंगामस्ती पाहून मजा आली. रमतगमत चालत वेंगुर्ला गाठले.
वेंगुर्ला हे एक टिपिकल कोकणी गाव आहे. आजुबाजूच्या परिसराच्या दृष्टीने ही एक मोठी बाजारपेठ आहे. येथे १६५५ मध्ये डचांनी बांधलेली वखार आहे. अतिशय ऐसपस व भक्कमरी अशा या वखारीची अवस्था आता मात्र फारशी चांगली नाही.
वेंगुर्ला बंदर हे एक खास आकर्षणाचे ठिकाण आहे. एका खडकाळ टेकाडावर हे बंदर बांधण्यात आलेले आहे व आजही येथे मोठय़ा प्रमाणावर माशांचा व्यापार चालतो. भरसमुद्रातून ताजी मच्छी पकडून बोटीतून बंदराजवळ आणली जाते. तेथून अगदी छोटय़ा होडय़ातून मासे जेटीवर उतरवण्यात येतात. झटपट वजन करून लगेच वातानूकूलित ट्रेलरमध्ये बर्फाच्या भुशांसह ठेवून शहराकडे रवाना करतात. शंभरेक कामगार हे काम अगदी झटपट करत होती. हे सर्व बघण्यात एक तास कसा गेला हे कळलेच नाही. बंदराच्या बाजूलाच बांधलेल्या दीपगृहावरून अथांग पसरलेल्या अरबी सागरात सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन झाले.
वेंगुर्ला बंदरापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर भर समुद्रात तीन अवाढव्य खडक आहेत. दगड जळून गेल्यावर जसा काळा दिसतो तसे हे दिसत असल्याने त्याला बन्र्ट आयलंड असे म्हणतात. १८३० साली येथे ब्रिटिशांनी दीपगृह बांधलेले आहे. या ठिकाणी स्विफ्ट पक्ष्यांची घरटी मोठय़ा प्रमाणावर आढळतात. विशेष म्हणजे हे पक्षी तोंडातल्या लाळेने त्यांची घरटी बांधतात.
दुसऱ्या दिवशी निवतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सागरी पदभ्रमण मोहीम असल्याने डांबरी सडक सोडून, नेहमीप्रमाणे किनाऱ्यालगतच्या छोटय़ा वाडय़ांमधून चालण्यास सुरुवात केली. गर्द झाडय़ांमध्ये, समुद्रकिनारी एका टेकडीवर लपलेल्या वायंगणी गावी पोहोचलो. स्थानिक गावकऱ्यांशी गप्पा मारून गाव मागे टाकले. पुढे थेट समुद्रात घुसलेल्या एका छोटय़ा डोंगराचा भाग आमची वाट अडवून उभा होता. कोयत्याने थोडी काटेरी झुडपे कापत, कधी रांगत रांगत मार्गक्रमण सुरू केले. पण हा सर्व भाग म्हणजे मोठे लाल मुंगळ्यांची (उंबिल) वसाहत होती. सर्व मंडळींच्या कपडय़ावर, सॅकमध्ये हे उंबिल घुसले व त्यांनी सगळ्यांनाच चांगला प्रसाद दिला. किनाऱ्यावरून चालतच दुपापर्यंत केळुस या गावी पोहोचलो. येथे गावकऱ्यांनी दिलेला वरणभात व कोिशबीर असा साधा पण चविष्ट जेवणाचा बेत झाला. त्यांचे आभार मानून, थोडय़ाच वेळात निवती गाठले.
निवती हे एक समुद्रकिनारी वसलेले छोटेसे गाव आहे. येथे एक शिवकालीन किल्ला आहे. भर समुद्रात घुसलेल्या सुमारे ५० मीटर उंचीच्या टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे. शिवशाहीच्या काळात बांधलेल्या या किल्ल्यात भव्य बुरुज व मजबूत तटबंदी यांचे अवशेष याखेरीज फारसे काही शिल्लक नाही. निवतीचा समुद्रकिनारा हा पर्यटकांची फारशी गजबज नसलेला एक शांत समुद्रकिनारा आहे. येथे दोन-तीन छोटी हॉटेल्सही असल्याने मित्रमंडळी अथवा सहकुटुंबही येथे भेट देण्यास हरकत नाही.
अशा प्रकारे चार दिवसांपासून तेरेखोल किल्ल्यापासून सुरू झालेली आमची सागरी पदभ्रमण मोहिमेची सांगता निवती किल्ला पाहून झाली. चार दिवस खळखळत्या सागराच्या सोबतीने, निसर्गरम्य वातावरणात व साधा, प्रेमळ व कायम आपुलकीचा सल्ला देणाऱ्या कोकणी माणसांसोबत कसे गेले ते कळलेच नाही.
समीर हर्डीकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on June 26, 2015 1:04 am

Web Title: travel around seashore
टॅग Seashore,Travel