पर्यटन म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी जाणे आणि तिथल्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटणे अशी एक ढोबळ संकल्पना आपल्याकडे रूढ आहे. एरवी धार्मिक कार्यासाठी म्हणून बाहेर पडणाऱ्या कुटुंबांची संख्याही भारतासारख्या देशात भरपूर आहे, पण त्याला अद्याप आपण पर्यटनाच्या दृष्टीने चांगले वळण लावलेले नाही. थोडे वेगळे पर्यटन म्हणजे अिजठा-वेरुळसारख्या लेणींना भेट देऊन तेथील इतिहास आणि कला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. तरुण असाल तर गड- किल्ले गाठायचे. यापलीकडे फारसा विचार आपल्याकडे झालेला नाही. नृत्य- नाटय़ यांच्याचसाठी पर्यटन असा विचारही आपण करत नाही. पर्यटक कंपन्यांच्या कार्यक्रमात नृत्य-नाटय़ादी कला येतात त्या पापड-लोणच्यासारख्या तोंडी लावायला. पण थोडा वेगळा विचार केला तर लक्षात येईल की, या नृत्य-नाटय़ादी कलाही समजून घेण्यामध्ये सामान्य माणसाला रस असतो, मात्र ते समजून सांगणारे कुणी नाही. केवळ महाराष्ट्रापुरता विचार करायचा तरी आपल्याला आपल्याकडील प्रथा-परंपरांशी संबंधित बाबींची संस्कृतीशी चांगली सांगड घालून त्याचेही एक वेगळे विशेष पर्यटन सुरू करण्यास भरपूर वाव आहे. म्हणूनच या खेपेस ‘लोकप्रभा’ने पर्यटन विशेषांकामध्ये आग्नेय आशिया आणि संग्रहालय पर्यटन या वेगळ्या विषयांबरोबर आजवर कुणीही विचार न केलेल्या कला-परंपरांची वारसास्थळे या वेगळ्या विषयाला हात घातला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या तरुण पिढीला सातत्याने काही तरी नवीन करायचे असते. त्यांना कोकणातील आचऱ्याच्या गावपळणीला जायलाही आवडू शकते. गणपतीइतकाच होळीचा सण कोकणात तुफान लोकप्रिय आहे. या होळीच्या रत्नागिरी- चिपळूणकडच्या प्रथा वेगळ्या आणि तळकोकणातील मालवणकडच्या प्रथा वेगळ्या. कोयनेच्या डोंगरावरची मानाची होळी पेटलेली पाहिली, की खाली कोकणात होळीला रात्री सुरुवात होते. रात्रीचा झोंबरा वारा, कोयनेच्या जंगलातील उंच ठिकाण आणि तिथे परंपरेने वर्षांनुवर्षे केली जणारी पारंपरिक होळी हे सारे काही वेगळे असते. कोणत्याही पर्यटकाला आवडेल असे. तळ कोकणातील होळी-रंगपंचमीला रोंबाट नाचवले जाते. विदेशी पर्यटक तर या दोन्ही होळींच्या प्रथा-परंपरांच्या प्रेमात पडतील अशीच स्थिती आहे. पण महाराष्ट्राच्या इतर भागांतील पर्यटकांनीही हे अनुभवलेले नाही मग विदेशी पर्यटकांची तर गोष्टच सोडा.
दसरा-दिवाळीच्या सुमारास भातशेती पूर्ण झाल्यानंतर गावागावांत कोकणात आणि घाटावर दोन्हीकडे वेगवेगळ्या कृषी परंपरांचे उत्सव सुरू होतात. हे सारेच अनोखे उत्सव आहेत. त्या सुमारास कोकणातील पर्यटनस्थळांचे एक सर्किट करून त्याला िपगुळी आणि दशावताराच्या परंपरेला आणून जोडता येईल. मात्र असा विचार करण्यात आपण खूप तोकडे पडतो. सोलापूरला प्रतिवर्षी होणारी संक्रातींच्या सुमारास होणारी सिद्धेश्वरची जत्रा हाही असाच अनोखा अनुभव असतो. होळीच्या सुमारास सातपुम्डय़ाच्या पर्वतरांगांमध्ये आदिवासींमध्ये खेळली जाणारी होळी ही चिपळूणच्या होळीएवढीच अनोखी असते. त्याला नृत्य-संगीताची जोडही असते. याच सातपुडय़ाच्या आदिवासी समाजामध्ये रांगोळी किंवा मांडणासारखी एक वेगळी चित्रपद्धती गुहा-गुंफांमध्ये किंवा गावाबाहेर काढण्याची एक वेगळी कला-परंपराही समाविष्ट आहे, कलाविषयक पर्यटन त्याच्याशी जोडता येईल. पण हे सारे पर्यटनाच्या नकाशावर कधीच येत नाही.
हे सारे पर्यटनाच्या नकाशावर आले तर पर्यटकांना प्रथा-परंपरांमधील खूप काही वेगळे पाहता येईल. त्या कला-परंपरा वर्षांनुवर्षे जपणाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल, त्यांना आर्थिक मदतही होईल. कोणतीही गोष्ट स्थानिकांच्या अर्थशास्त्राला आणून जोडली की, तिची जपणूक करा, असे वेगळे सांगावे लागत नाही. तिची जपणूक आपसूक होते. अर्थशास्त्राचे हे सूत्र सरकारच्या लक्षात येईल, तो सुदिन!

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel special
First published on: 20-02-2015 at 01:25 IST