देखण्या महाराष्ट्राची सफर करत असताना अनेकदा काही आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा काही ठरावीक प्रदेशातच आढळतात. इतरत्र त्यांचा ना आढळ असतो ना त्यांच्याबद्दलची काही माहिती इतर भागात असते. संत्र्यांचे शहर असलेल्या नागपूरला असाच एक अगदी निराळा उत्सव साजरा करतात. खूप मोठ्ठय़ा प्रमाणात साजरा करतात, अगदी पुण्या-मुंबईला गणेशोत्सव जेवढा धूमधडाक्यात साजरा करतात ना अगदी तसाच साजरा करतात. मारबत असे त्या उत्सवाचे नाव. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण असलेला हा उत्सव नागपूरकर मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. इतरत्र असा मारबत उत्सव दिसत नाही. समाजातील व्यंग, उणिवा, ज्वलंत प्रश्न यांना मूर्तीरूपात आणून त्यांची मिरवणूक काढणे म्हणजे मारबत. मूळ आदिवासींची असलेली ही परंपरा आता शहरी भागात पण जोपासली जाते. मारबत या शब्दाला काही पौराणिक संदर्भ पण दिसतात. मारबतचे संदर्भ पुतनामावशीपर्यंत जोडले जातात. जे जे वाईट म्हणून समाजात आहे त्यांचे प्रतीक म्हणजे हा मारबत. त्यांची मिरवणूक काढून नंतर त्यांचे दहन करणे, म्हणजे समाजातील वाईट चाली-रूढी-परंपरा-प्रथा-रोगराई तसेच समाजातील व्यंग, उणिवा, ज्वलंत प्रश्न इत्यादींचे रूपक म्हणजे हे मारबत असतात. श्रावणी अमावस्या म्हणजे बैल पोळा या दिवसापासून मारबत उत्सवाला सुरुवात होते. शहरातील मुले गल्लो गल्ली ‘घेऊन जारे मारबत-घेऊन जारे मारबत’ असे ओरडत फिरत असतात. गावात, काठय़ा, तरट, बांबू यांच्यापासून पुतळे तयार करतात आणि त्यावर चिंध्या, फाटके कपडे, बारदान गुंडाळून त्याला विविध रंगांनी रंगवतात आणि त्यांची मिरवणूक काढतात. मारबत पुतळ्यासोबत एक काळा पुतळा असतो त्याला बडग्या असे म्हणतात. मिरवणुकीच्या वेळी मोडलेले झाडू, फुटलेले डबे, टायरचे तुकडे, फाटके कपडे यांच्या माळा बडग्याच्या गळ्यात घालतात. तसेच या बडग्याच्या हातात मुसळ आणि कमरेवर उखळ दाखवतात. उखळ आणि मुसळ हे नवनिर्माण, धान्य कुटणे याचे प्रतीक समजतात. ही मिरवणूक लेंडी तलावाजवळ येते आणि सर्वाच्या साक्षीने हे मारबत जाळून टाकतात. सर्व वाईट प्रथा, रोगराई, समाजातील असंतोष यांचे प्रतीक असलेला मारबत हा सर्वाच्या देखत जाळला जातो. जागनाथ बुधवार चौकातील पिवळा मारबत हा नागपूरमधील मानाचा मारबत आहे. इ.स. १८८५ साली याची स्थापना झाली. हा गडद पिवळ्या रंगाचा असतो. याच्या मागूनच इतर मारबतांची मिरवणूक निघते. १९८५ साली पिवळ्या मारबतच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा मोठय़ा दणक्यात हा शतक महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यानंतर १८९५ साली नेहरू पुतळ्याच्या जवळ, रविवार बारदान चौकात काळा मारबत बसवण्यात आला. पण पिवळ्या मारबतला मानाचे वडीलकीचे स्थान आहे. त्यामुळे काळ्या मारबतची मिरवणूक निघाली की ती आधी पिवळ्या मारबतला भेटते. तिथे दूध प्यायले जाते आणि मगच पुढे मार्गस्थ होते. पूर्वी मारबतच्या पुतळ्यांची उंची कमी असायची पण आता ती जवळजवळ १०-१२ फूट इतकी उंच असते. मारबताच्या पुतळ्यांचे जनकत्व स्वर्गीय गणपतराव दसराजी रोडे यांच्याकडे जाते. सुमारे शंभर वर्षांपूर्वी गणपतरावांनी हे भव्य पुतळे बनवायला सुरुवात केली होती. अलीकडे घराघरातूनसुद्धा मारबत बसवतात. घरातील मंडळी एका मोठय़ा मडक्यात घरातील केरकचरा, घाण, टाकाऊ पदार्थ गोळा करून भरतात तो मटका घरातील कानाकोपऱ्यातून फिरवतात आणि एके ठिकाणी बांबूच्या काठीने तो बडवतात, वाजवतात. त्यानंतर तो मोहल्ल्याबाहेर अथवा गावभर नेऊन मटका फोडतात. तो फोडताना ‘आला बला, रोगराई घेऊन जारे मारबत! घन, तापसरी, खोकला, रोगराई घेऊन जा रे मारबत’ असे म्हणतात. इडापीडा, आपत्ती, जादूटोणा, रोगराई या संकटांना बरोबर घेऊन जा आणि आम्हाला यापासून मुक्ती दे असे हे मागणे असते. मारबतचा सोहळा पाहण्यासाठी नागपूरला लोक खूप मोठी गर्दी करतात. शहरातील विविध तालमी, आखाडे, शाळा यात भाग घेतात. तलवारबाजी, दांडपट्टय़ांची प्रात्याक्षिके दाखवली जातात. अत्यंत आगळीवेगळी आणि एकाच भागात जोपासली जाणारी ही प्रथा खरंच आपल्या महाराष्ट्राचं भूषणच म्हटलं पाहिजे. 

केव्हा जावे? कसे जावे?
श्रावणी अमावस्या म्हणजे बैल पोळा या दिवशी मारबत साजरा केला जातो. समाजातील वाईट चाली-रूढी-परंपरा-प्रथा-रोगराई तसेच समाजातील व्यंग, उणिवा यांच प्रतिक असल्यामुळे मारबत मूर्ती मांडवात अथवा घरी ठेवली जात नाही तर लगेचच मिरवणूक काढली जाते. नागपूरला रस्ता, रेल्वे, विमानाने पोहचता येते.