फेस्टिव्हल्स ऑफ इंडिया
लडाखमधल्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने जम्मू-काश्मीर सरकार दरवर्षी लडाख फेस्टिव्हल साजरा करते.

भारताच्या जम्मू-काश्मीर राज्यातले जम्मू, काश्मीर आणि लडाख हे तीन प्रांत. त्यातला लडाख हा अतिदुर्गम पण तेवढाच निसर्गसुंदर असा भाग. उत्तर-पूर्वेला काराकोरम रांगा, दक्षिण-पूर्वेला हिमालयाच्या रांगा आणि गाभा ट्रान्स हिमालयन रांगांचा असा हा प्रदेश आहे.
इथली सिंधू नदी, सिंधू आणि झंस्कारचा संगम, स्तोक कांगरी शिखर, १४३० साली बांधून पूर्ण झालेली थिकसे मॉनेस्ट्री ही सर्वात देखणी अशी मॉनेस्ट्री, लेह शहराच्या जवळच असलेला शे पॅलेस, लेह शहरावर आपली प्रेमळ नजर ठेवून असलेला शांती स्तूप, पँगगाँग त्सो हे लडाखमधलं एक आश्चर्य, खारदुंग ला पासवरून जाणारा जगातला सर्वात उंच मोटरेबल रोड, नुब्रा व्हॅली, हुंडरचं वाळवंट ही ठिकाणं आणि जोझि ला, फोटू ला, नामकि ला, खारडुंगला, चांग ला, टांगलांग ला अशा उंचच उंच खिंडी असलेलं हिमालयाचं आगळंवेगळं रूप आणि त्यात वसलेली अफलातून माणसं, इथले याक, सहा-सात महिने जमिनीखालच्या बिळात ध्यानस्थ असलेले मरमट, उमदी जंगली गाढवं क्वचित प्रसंगी चांगला पासच्या रस्त्यावर दिरणारा स्ने लेपर्ड काय काय सांगावं..
मातकट रंगांचे उंचच उंच पसरलेले डोंगर, निळंभोर आकाश, नद्यांचा खळाळते प्रवाह, जीवनात रंग भरायचे असतील तर लडाखी माणसाला स्वत: प्रयत्न करावे लागतात आणि सदासर्वकाळ हसरा चेहरा घेऊन वावरणारी ही माणसं या बाबतीत कुठेही कमी पडत नाहीत. ठिकठिकाणचे रंगबिरंगी स्तूप, कलाकुसरीने आणि रंगसंगतीने नटलेल्या गुंफा लडाखच्या आसमंतात उठून दिसतात. लेह आणि आसपासचा भाग गजबजलेला दिसला तरी किलोमीटरला एखादी व्यक्ती एवढी कमी लोकसंख्या असलेल्या या प्रांतात लोकांना एकत्र आणतात ते इथले उत्सव. कमी लोकसंख्या असूनही इथली उत्सवप्रिय जनता या सोहळ्यामध्ये अगदी हिरिरीने भाग घेते. पन्नास-साठ मैलांची पायपीट करून उत्सवाच्या ठिकाणी लडाखी बंधूभगिनी जमा होतात आणि मग अगदी जल्लोषात उत्सव साजरा केला जातो.
लडाख फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी लेहमधल्या मुख्य रस्त्यावर लडाखमधल्या शामव्हाली, दहा व नू, चांगथांग, नुब्राव्हाली, झुंग, झंस्कार अशा विविध खोऱ्यातले आणि जन-जातीचे लोक आपल्या पारंपरिक वेशभूषेत तयार होऊन छुवी मार्केट परिसरात येतात आणि एका दिमाखदार मिरवणुकीला सुरुवात होते. लेहमधल्या शाळांमधली गोजिरी मुलं, स्थानिक नेते, ठिकठिकाणचे कलाकार, नर्तक आणि जनता या धारेत सामील होत जाते. कर्णमधुर अशा पारंपरिक तसंच आधुनिक संगीत रचनांच्या तालावर पदन्यास करीत जाणारा हा कारवॉँ अखेरीस लेहमधल्या पोलो मैदानात प्रवेश करतो. पोलो मैदानात एका रंगारंग समारंभाला सुरुवात होते. वरील सहाही भागांमधून आलेले कलाकार आपली कला पेश करतात आणि तमाम जनसमुदाय मंत्र मुग्ध होऊन जातो. वेगवेगळे वस्त्रालंकार परिधान केलेले कलाकार आणि जनसमुदायातील लोक ही पर्यटक आणि छायाचित्रकार यांना पर्वणीच असते. विविध नाच, मुखवटे घालून केलेली नृत्य, हस्तकला वस्तू, स्थानिक पदार्थ आणि पेये अशा गोष्टींचा आस्वाद या दरम्यान घेता येतो. संपूर्ण लडाख प्रांतातली जनता एकत्र आल्याने त्यांच्यासाठी ते वर्षभरातून एकदा होणारं स्नेहसंमेलनच असतं.
लडाखमधल्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने जम्मू-काश्मीर सरकारचा पर्यटन विभाग आणि लडाख हिल काऊंसिलतर्फे दरवर्षी लडाख फेस्टिव्हल २० ते २६ सप्टेंबर या दिवसांत साजरा केला जातो. लडाखमधला जेमतेम चार महिनेच चालणारा पर्यटनाचा कालावधी आणखी थोडा काळ पुढे चालावा आणि पर्यटनावरच चालणाऱ्या हाताना काम मिळावं असाही उद्देश हा उत्सव सप्टेंबरमध्ये भरवण्यामागे आहे. असं असलं तरी लडाखचं समृद्ध सांस्कृतिक वैभव, परंपरा आणि जुना वारसा देशी-विदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचवावा असाही हेतू हा उत्सव साजरा करण्यामागे आहे. लडाखी लोकांची जीवनशैली अनुभवण्याबरोबरच सांस्कृतिक नाच, संगीत, करमणुकीचे कार्यक्रम आणि पोलो तसंच तिरंदाजीचे चित्तथरारक खेळ या फेस्टिव्हल दरम्यान लडाखच्या विविध भागांत आयोजित केले जातात. गायन, नृत्य, तिरंदाजी स्पर्धा असे करमणुकीचे कार्यक्रम आणि खेळ तसंच थंका प्रदर्शनं शामव्हाली, दहा व नू, चांगथांग, नुब्राव्हाली, झुंग, झंस्कार अशा ठिकाणी दर वर्षी फेस्टिव्हलच्या सप्ताहात वेगवेगळ्या दिवशी आयोजित केले जातात जेणेकरून पर्यटकांना कार्यक्रम आणि निसर्गदर्शन एकाच वेळी करता येईल आणि त्या त्या भागाच्या अर्थकारणालाही चालना मिळेल. या उत्सवादरम्यान लडाखमधल्या गुंफांमध्ये थंका आणि प्राचीन वस्तूंचं प्रदर्शन मांडलं जातं. शिस्तबद्ध रीतीने आयोजित केलेल्या लडाख फेस्टिव्हलमुळे दरवर्षी इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. आपल्याच देशातून येणाऱ्या पर्यटकांना लडाखचे नैसर्गिक देखावे आणि उत्सव पाहून राष्ट्रीयत्वाच्या भावनेत वाढ होण्यास मदत होते आणि एक आगळावेगळा भूभाग जवळून अनुभवायची संधीही मिळते.
लडाखमधल्या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत लडाखी लोकांना घराबाहेर पडणे दुरापास्त होऊन बसतं. या वेळेचा सदुपयोग ही मंडळी न करती तरच नवल. इथले कामसू लोक हिवाळ्याच्या दिवसात हस्तकलेच्या उद्योगात स्वत:ला गुंतवून ठेवतात आणि सहा-सात महिने लागून तयार केलेल्या वस्तू या उत्सवादरम्यान विकायला काढतात. बारीक नक्षीकाम आणि रंगकाम केलेल्या लाकडी आणि धातूच्या वस्तू हे लडाख फेस्टिव्हलचं वैशिष्टय़ आहे.
या वर्षी साजऱ्या होणाऱ्या लडाख फेस्टिव्हलचं मुख्य आकर्षण असणार आहे ते म्हणजे लेह पॅलेसमध्ये आयोजित करण्यात येणारं छायाचित्र प्रदर्शन. सदर प्रदर्शन नॅशनल म्युझियम इन्स्टिटय़ूट ऑफ हिस्ट्री ऑफ आर्ट कंझर्वेशन अँड म्युझिओलॉजी (सांस्कृतिक कार्य मंत्रालय, भारत सरकार) आणि लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊ न्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या अखत्यारीत असलेली पुरातन छायाचित्रं या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे. लडाख मधल्या सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीजमध्ये ‘म्युझियम अॅन्ड चेंजिंग कल्चरल लॅण्डस्केप’ या विषयावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. लडाखमध्ये येऊन अध्यात्मिक अनुभूतीच्या शोधात असलेल्यांसाठी तिथल्या महाबोधी मेडिटेशन सेंटरने साधनेच्या वर्गाचं आयोजन केलं आहे. लडाखमधल्या सिंधुसंकृती टी-सुरू इथल्या ‘ओपन थिएटर’मध्ये या वर्षी संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विजेते स्पर्धक आणि कलाकार यांच्या अदाकारीचा रंगारंग सोहळा पुन्हा एकदा पोलो मैदानात होतो आणि या सात दिवसांच्या कार्यक्रमाची सांगता होते, तेव्हाच जनसामान्यांना आणि पर्यटकांना पुढच्या वर्षीच्या उत्सवाची उत्सुकता लागून राहते.
जागोजागी दिसणारे स्तूप, भलीमोठी पण कलाकुसर आणि रंगाने मढवलेली प्रेईंग व्हील्स, ध्यानस्थ डोंगर, अध्यात्माची मंदिरं असलेल्या गुंफा, इथली शांतताप्रिय माणसं या सर्वामुळे इथे येणारा प्रत्येकजण लडाखच्या प्रेमात पडतो, पण लडाख फेस्टिव्हलमुळे हा आनंद शतगुणित होतो यात शंका नाही.