lp61डोंगरभटक्यांसाठी प्रत्येक वेळची त्यांची डोंगर भटकंती आयुष्य समृद्ध करणारी असते. अशीच एक प्रकारची उनाड भटकंती. वेळापत्रक नव्हते, बंधन नव्हते. वाटले येथे थांबावे, तसे थांबलोदेखील, कारण आम्हीच आमचे मालक होतो. योजना तर दांडगी आखली होती. दिवाळीत राजगड ते तोरणा करायचे, अमावस्येला तोरण्याला जायचे. (कथित) ब्रह्मसमंधाला भेटायचे. जोडीला नेहमीचा भिडू चंद्रा दामले होताच.

धारावीतून शंभरेक पणत्या विकत घेतल्या, राजगड आणि तोरण्यावर लावण्यासाठी. असली अत्रंगी इच्छा बघून प्रसन्न जगतापने त्या पणत्यांसाठी पैसे दिलेच, वर त्याच्या गाडीतून त्या ठाण्यापर्यंत पोहोचवल्या. अर्थात भटक्या जमातीला कोणी अशी काही मदत करणार असेल तर कायम हवेच असते. ठाण्यापर्यंत घरपोच पणत्या हा दिवाळी बोनसच होता. जय्यत तयारी झाली. दिवाळीच्या आदल्या रात्री निघालो. उशिराचीच गाडी पकडली. सकाळी सहाला पुणे स्टेशनचे एसटी स्टँड गाठले. रिवाजाप्रमाणे स्टेशनबाहेरच्या बेकरीत मस्का- जामपाव चापला आणि वेल्ह्य़ाला जाणारी पहिली एसटी पकडून मार्गासनीला उतरलो.

आता येथून पुढचा राजगड पायथ्यापर्यंतचा आणि पुढे डोंगरातला सारा प्रवास आमच्या मनाप्रमाणे होणार होता. वेळेचे बंधन नव्हते. रात्रीपर्यंत जरी राजगडवर पोहोचलो असतो तरी काही फरक पडणार नव्हता. मनसोक्त भटकायचे होते. दुसऱ्या दिवशी तोरण्यावर पोहोचायचे एवढेच काय ते ठरले होते. त्यामुळे मार्गासनीपासून गडाच्या पायथ्याला गुंजवण्यापर्यंत सहा किलोमीटर जाण्यासाठी तीनेक तास लागले. वाटेत दिसणारी रानफुले आणि पक्षी पाहत रमतगमत डांबरी सडक पार करणे सुरू होते. गुंजवण्याच्या अलीकडे तीनेक किलोमीटरवर शेताडीत घुसलो. बांधावरून आडवेतिडवे जाताना कापणीला आलेल्या भाताचा साऱ्या शिवारभर पसरलेला घमघमाट जाणवू लागला. तो गंध छातीत मनसोक्त भरून घेत छायाचित्रणाची हौस भागवून घेत मजल-दरमजल करत गुंजवण्यात पोहोचलो.

गावातील बांदलांकडे चहा-नाष्टा झाला. गप्पा मारताना हलकेच एक मुद्दा मनाला लागून राहिला. बांदल सांगत होते, गडावर दारूपाटर्य़ा करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसे ते पूर्वीपासूनच होते. बांदलांनी पुढे जे सांगितले ते अधिक विदारक होते. दारू पिऊन दंगा करणारे मुख्यत: महाराजांच्या भागातील (सातारा, कोल्हापूर) असतात. बोलता बोलता ते बोलून गेले; पण मनात हे वाक्य ठसून राहिले. त्याआधी पाच-सहा वर्षांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजगडावर आले होते. नेमके गड उतरताना भेटले. तेव्हाच्या दारूधिंगाण्याबद्दल त्यांना सांगितले. परत खाली आल्यावर त्यांनी गडावर बंदूकधारी चौकीदार नेमण्याचे आश्वासन दिले होते. आज पुन्हा त्या प्रसंगाची आठवण झाली.

lp58

त्या आठवणीतच गड चढायला सुरुवात केली. पाठीवरच्या सॅकमध्ये टेंट, पणत्या आणि तीन दिवस पुरेल इतका शिधा, स्टोव्ह असा जामानिमा घेऊन आम्ही दोघे गडाच्या वाटेला लागलो. वाटेत फोटोग्राफी सुरूच होती, एकदम रमतगमत, कारणे दोन. एक तर ढीगभर सामान पाठीवर होते आणि दुसरे आम्हीच आमचे मालक होतो. गडाच्या वाटेवर शेवटच्या वळणावर एक चुणचुणीत मुलगा भेटला. हातात अगदी टिपिकल गुराखी काठी आणि चेहऱ्यावर तरतरी. एरव्ही गावात भेटणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील अजिजीचा लवलेश नव्हता. दोन घटका टेकलो, गप्पा मारता मारता कळले, हा भिकुदाचा नातू. राजगड म्हटले की, गोनिदांनी वर्णिलेल्या गडाच्या वाटेवरील भिकुदाच्या झापाची आठवण येणे साहजिक होते. त्याच्या झापावरील आठवणीशिवाय राजगड पूर्ण होत नाही. दूरवर दिसणाऱ्या भिकुदाच्या झापाकडे एक नजर टाकून त्याच्या नातवाशी एका अव्यक्त मैत्रीचे नाते जोडून दुपारनंतर आमची स्वारी गडावर पोहोचली.

गडफेरी या वेळी आमच्या अजेंडय़ावर नव्हतीच. अशा वेळेस डोंगरावरून डोंगराआड मावळणारा सूर्यास्त न्याहाळणे इतकीच काय ती महत्त्वाकांक्षा उरते. आमचेही तसेच होते. पद्मावती माचीवरील विस्तीर्ण, पण उद्ध्वस्त वाडय़ांच्या अवशेषांना पार करत आम्ही भटकत राहिलो. मावळतीला राणीवशाच्या तलावाजवळील तटबंदीवर जाऊन बसलो. आकाशात असंख्य रंगांची उधळण सुरू होती, त्यापुढे छापखान्याच्या फोर कलर कॉम्बिनेशन वगैरे संकल्पना फिजूल होत्या. मोबाइलवरील आशाताईंच्या आवाजातील ‘सांज ये गोकुळी’ सुरू केलं. आमच्या समोरच्या वाटा शामरंगात बुडाल्या होत्या. पर्वतांच्या रांगेत आसमंतात रंगाचा सुरू असणारा खेळ केवळ अवर्णनीय होता. मंद वाऱ्यावर वाहणारी ती बासुरी आम्हाला ऐकू येत होती, सुधीर मोघेंच्या कवितेतील अमृताच्या ओंजळीत आम्ही प्रत्यक्ष न्हाऊन निघालो होतो.

lp59

त्याच भारावलेल्या अवस्थेत पद्मावतीच्या मंदिरात आलो. सॅकमधील पणत्यांचा खोका काढला. गडावर असणारी गावातली मुलं तेलवात करायला मदत करू लागली. सूर्य केव्हाचाच लोपला होता. आम्ही डोंगरावर असल्यामुळे संधिप्रकाशाचे साम्राज्य होते. पन्नासेक पणत्या तयार झाल्या. हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरू लागले आणि आमच्या पणत्या तेवू लागल्या. पद्मावतीचे मंदिर आणि बाहेरील एका छोटीशा दीपमाळेवर, तोफेवर एक पणती ठेवली. दोनच दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमात ‘दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले’ ही शंकर रामाणींची कविता पद्मजा फेणाणींच्या आवाजात ऐकली होती. नकळत मनात ते स्वर घुमू लागले. पद्मावतीचे मंदिर त्या मिणमिणत्या पणत्यांनी उजळून गेले. गडाखालच्या गावात दिवाळीचे लक्ष्मीपूजन सुरू होते आणि येथे आमचे गडदेवतेचे पूजन.

तमाच्या तळाशी दिवे लावण्याइतके काही आमचे काम थोर नव्हते; पण ताकदीनुसार आम्ही गडावर दिवाळी साजरी करत होतो. दुसऱ्या दिवशी तोरण्यावर तोरणजाईच्या मंदिरात दिवाळी साजरी करायची होती. सकाळी काहीसे उशिराच निघालो.

राजगडावरून भुतोंडय़ाच्या दिशेने असणाऱ्या अळू दरवाजाने तोरण्याच्या दिशेने जातानाच घसारा पार करेपर्यंत बराच वेळ गेला. सपाटीवर आल्यावर मागे वळून राजगडाकडे पाहिले. आजवर अनेक वेळा गड पाहिला होता; पण गडांच्या राजाचा हा नजारा यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. एकीकडे स्वराज्यातील पहिला किल्ला आणि दुसरीकडे पहिली राजधानी. इतिहासाच्या धुंदीत मध्येच येणारा रस्ता पार केला. आता ढेब्यांची वस्ती हे आमचे विश्रांतिस्थान होते. या वाटेवर ढेबे अनेक वर्षे राहतात. जी काही थोडीफार शेती आणि रानमेवा जमा करणे आणि आल्यागेल्यांना पिठलेभात करून देणे, मार्गाला लावणे हेच त्यांचे काम. त्यांचे घर एकदम जंगलातले. कालच्या कवितेतील ओळ पुन्हा आठवली. ‘तमाच्या तळाशी दिवे लागले रे..’ यांच्या घरात तर कायमचाच अंधार. आम्ही कुठवर पुरे पडणार.

भिडूची तब्येत थोडी डाऊन झाली. तोरण्यापर्यंत जाईल असे वाटले नाही. मग या ढेब्यांच्या घरापासून तासाभराच्या अंतरावर आणखीन एक घर होते. सांज होता होता पोहोचलो. समोर तोरण्याची बुधला माची दिसत होती. म्हटले तेथेच पडू रात्रीचे. एक माय विहिरीवरून पाणी आणत होती. आम्हीदेखील पाणी ढोसून दमगिर झालो. सांजवले तसे रानावर अंधाराचे साम्राज्य पसरले. तेथे ना विजेचा दिवा होता ना सौरऊर्जेचा. साराच अंधार. तमाच्या तळाशी असणारे ते घर मनात घर करू लागले. तोरण्यावर लावायाच्या चाळीसेक पणत्या बाकी होत्या. साऱ्या बाहेर काढल्या. वात तयार केली, तेल भरले आणि घराभोवती पणत्या लावल्या. शहरात दिवाळी सुरू होती, येथे अंधार होता. अठराविश्वे अंधारात असणाऱ्या त्या खोपटाला पणत्यांनी दिवाळीची थोडीशी शोभा आणली. मायेने रांधलेला पिठलेभात खाल्ला. उरलेले तेल आणि पणत्या त्यांनाच देऊन टाकल्या.

lp60

काल पद्मावतीवर पणत्या लावताना इतिहासाचे भान होते, तर येथे तोरण्याच्या सन्मुख माळावर वर्तमानाचा भीषण अंधकार दाटून आला होता. पाठपिशवीत असणारे गोडधोड त्यांना देऊ केले. नव्या दिवसाच्या उषेला सामोरे जाताना आम्हाला एक समाधान होते. ट्रेक किती पूर्ण झाला याला महत्त्व नव्हते. काळोखाला हटविण्यासाठी प्रकाशाचे ते मिणमिणते प्रतीक, हाच त्या दिवाळीत खरा आनंद होता. त्याच आनंदात तोरण्याला लांबूनच सलाम करत दुसऱ्या दिवशी परतीला निघालो.