ईटीव्हीपाठोपाठ नेटवर्क एटीन या माध्यम क्षेत्रातील मोठय़ा कंपनीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मोठी भागीदारी मिळवल्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये आता नवं वादळ धडकलं आहे. सगळ्यात आधी, सगळ्यात वेगळं देण्याची सतत ईष्र्या बाळगणाऱ्या सर्वच चॅनल्सना आता प्रेक्षकांना खेचून घेण्यासाठी पुन्हा नव्याने सिद्ध व्हावं लागणार आहे.

आपणच काही तरी वेगळं करावं, सगळ्यात आधी आपण करावं असं सगळं ‘वेगळं’, ‘सगळ्यात आधी’ चॅनल्सना करायचं असतं. सगळ्यांनाच सगळं करायचं असतं म्हणून ही स्पर्धा नेहमीच चुरशीची होत असते. अनेकदा असंही होतं की, एकाच वेळी अनेक मोठे रिअ‍ॅलिटी शो, बिग बजेट मालिका, वेगळ्या धाटणीचा शो असं सगळंच येऊन टीव्हीवर धडकतं. ही स्पर्धा आता आणखी वेगाने वाढतेय. आशयामधली स्पर्धा मार्केटिंगच्या गणितांवरून ठरते. त्यानुसार चॅनल्सची चक्रे फिरत असतात. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेला मात्र एक छुपं निमित्त आहे असं म्हणता येईल. ते म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची नेटवर्क एटीनमधली नवी मोठी भागीदारी. सीएनबीसी, सीएनबीसी आवाज, आयबीएन सेव्हन, आयबीएन लोकमत, सीएनएन आयबीएन ही न्यूज चॅनल्ससह कलर्स, कलर्स एचडी, एम टीव्ही, कॉमेडी सेंट्रल, निक, सॉनिक, हिस्ट्री टीव्ही एटीन या चॅनल्सचा ताबा मिळवल्यामुळे या चॅनल्सचा बिझनेस चांगला कसा होईल याकडे साहजिकच लक्ष दिलं जाणार आणि याचमुळे त्यातल्या आशय, बडय़ा कलाकारांची हजेरी, मालिकांचे विषय अशा अनेक घटकांकडेही कटाक्ष असणार. या सगळ्यामुळे इतर चॅनल्स आणि नेटवर्क जागी झाली आहेत आणि म्हणूनच चॅनल्समध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाल्याचं चित्र दिसून येतंय. यापुढच्या काळात त्याची तीव्रता आणखी वाढेल.

महिलांसाठी चॅनल
‘‘सोनी पल हे चॅनल स्त्रियांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे टप्पे दाखवणाऱ्या मालिका घेऊन येत आहे. हा प्रत्येक टप्पा साजरा कसा करायचा हेच या चॅनलच्या मालिकांमधून दाखवलं जाणार आहे. यातल्या सगळ्या मालिकांचा केंद्रबिंदू गृहिणी हा आहे. त्यांना आवडतील, जवळच्या वाटतील अशा मालिकांचा यात समावेश असेल. तसंच यामध्ये सामाजिक आशय असेल. त्यामुळे एका अर्थी समाजप्रबोधनही होईल. आम्ही गृहिणी प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा करत आहोत, कारण आम्ही फक्त आणि फक्त महिलाप्रधान मालिका आणि कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केलंय.’’
अनुज कपूर, सीनिअर ईव्हीपी आणि बिझनेस हेड, सोनी पल आणि सब टीव्ही

टेलिव्हिजन क्षेत्र हे व्यवसाय करतच होतं. पण, नंतर त्याला उद्योगाचा दर्जा मिळाला. आधी सास-बहू डेली सोप्सनी भारतीय टेलिव्हिजनला वेगळं रूप दिलं होतं. तो ट्रेंड लोकांना आवडला. लोकांना आवडू लागला म्हणून तसं वारंवार देण्यातही आलं आणि याचमुळे टीव्ही क्षेत्रातला ‘व्यवसाय’ वेगाने डोकं वर काढू लागला. कालांतराने याची व्याप्ती वाढत गेली. याचबरोबर महत्त्वही झपाटय़ाने वाढू लागलं. घराघरांत टीव्ही पोहोचल्यामुळे त्याचा प्रभाव प्रेक्षकांवर पडत गेला. साहजिकच बॉलीवूडच्या बडय़ा कलाकारांना टीव्हीवर येण्याचा मोह आवरता आला नाही. हे सगळं एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला चारेक वर्षे सुरु होतं. त्यानंतर २००७ ते २००९ हा काळ टीव्हीसाठी सुवर्णकाळ मानला जातो. या काळात टीव्हीच्या अर्थकारणाला सोन्याचे दिवस आले होते. कारण याच काळात परदेशी बिझनेसमन, बडे ब्रँड वगैरे भारतीय टेलिव्हिजनमध्ये गुंतवणूक करत होते. या सुमारास झी टीव्ही नंबर वन चॅनल होतं. त्यामुळे या चॅनलवर जाहिरातींचा ओघ वाढला. यामुळे त्यांनी झी नेक्स्ट हे नवीन चॅनल सुरू केलं. एनडीटीव्ही न्यूज चॅनलने एनडीटीव्ही हे जीईसी (जनरल एंटरटेन्मेंट चॅनल) सुरू केलं. यासोबतच अल्वा ब्रदर्सने ‘रिअल’ हे चॅनल सुरू केलं. सब टीव्ही हे चॅनल २००० मध्ये सुरू झालं असलं तरी त्याचा विनोदी बाज २००८ पासून प्रकाशझोतात येऊ लागला. हे चॅनल सुरू झाल्यावर २००३ मध्ये विनोदी मालिकांचं चॅनल म्हणून त्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली; पण नंतर २००५ पासून तरुणांना आकर्षित करून घ्यायचं धोरण त्यांनी ठरवलं. २००८ पासून पुन्हा एकदा ते कॉमेडी जॉनरकडे वळले. ते आजतागायत त्याच बाजावर टिकून आहेत. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘एफआयआर’, ‘लापतागंज’सारख्या मालिकांमुळे सब टीव्ही नंबर वन चॅनल नसलं तरी टीआरपीच्या आकडेवारीत त्यांचं सातत्य मात्र आहे.

स्पर्धेतले एक्स फॅक्टर :
* अमिताभ बच्चन यांची ‘युद्ध’ ही मालिका. 
* ‘सोनी पल’ हे महिलाप्रधान चॅनल. 
* ‘जिंदगी’ हे पाकिस्तानी मालिकांचं चॅनल. 
* दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारीकर यांची ‘एव्हरेस्ट’ ही आगामी मालिका. 
* ‘एअरलाइन्स’ ही पायलटच्या आयुष्यावर बेतलेली मालिका. 
* प्रेक्षकांना अनेक लोकप्रिय परदेशी मालिकांचे देशी रूपांतर बघायला मिळणार आहे.

यासुमारास रिलायन्स ग्रुपचे ंसंचालक अनिल अंबानी यांनी अमेरिकेतल्या युनिव्हर्सल स्टुडिओसारखा स्टुडिओ मुंबईतही बनवायचा असा प्लान केला होता. त्याप्रमाणे कामही सुरू झालं होतं. एकाच ठिकाणी एडिटिंग, टेलिकास्ट, इतर तांत्रिक कामं होणार अशा मोठय़ा ऑफिसची रचना केली होती. काही चॅनल्सच्या परवानगीही मिळवल्या. याच काळात अमेरिकेत आर्थिक मंदी आली. त्यामुळे भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतली परदेशी गुंतवणूक आपोआपच कमी होऊ लागली. या सगळ्याचा मोठा परिणाम झाला तो जाहिरातींवर, पर्यायाने चॅनल्सच्या अर्थकारणावरही. यामुळे अंबानींचा हा मोठा प्रोजेक्ट बंद झाला. सुरू होऊ घातलेली नवी चॅनल्स बंद झाली. जाहिरातच नाही म्हटल्यावर प्रस्थापित चॅनल्सची कोंडी व्हायला सुरुवात झाली. ‘झी नेक्स्ट’, ‘एनडीटीव्ही इमॅजिन’ ही चॅनल्स बंद झाली. त्यामुळे २००७ ते २००९ हा काळ सुवर्णकाळ असला तरी त्यापुढची दोन र्वष टीव्ही इंडस्ट्रीसाठी कठीण होते. आता पुन्हा ही विस्कटलेली घडी मूळ पदावर येतेय. गेल्या दोन वर्षांपासून भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीची आर्थिक बाजू जोर धरू लागली आहे.
आता नवनवीन आशय टीव्हीवर बघायला मिळू लागला. नवी चॅनल्स सुरू झाली. केवळ जीईसी चॅनल्सच नाहीत तर म्युझिक, कार्टून, युथफुल, फूड अशी चॅनल्स सुरू झाली. वेगवेगळ्या विषयांच्या मालिका, शोज् बघता येऊ लागले. या दोन वर्षांच्या कठीण काळानंतर सगळ्याच चॅनल्सनी गावागावांमध्ये पोहोचायचं ठरवलं. काही मालिकांमध्ये तसा ग्रामीण टच होताच; पण आता तो आणखी वाढवला. याचा सगळ्यात मोठा बदल जाणवला तो म्हणजे काही मालिका, शोची नावं हिंदीमध्ये लिहिली जाऊ लागली. झी टीव्हीने काही प्रादेशिक चॅनल्स सुरू केली. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान अशा काही राज्यांचा यामध्ये समावेश होता. वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांचं त्यांच्याच भाषेत मनोरंजन व्हावं यासाठी ‘झी’चा हा प्रयत्न होता. ‘इनाडू टीव्ही’ म्हणजेच ‘ई टीव्ही’ नेटवर्कने हिंदी चॅनल्स काढली नाहीत; पण अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांची चॅनल्स सुरू झाली. ‘ई टीव्ही मराठी’, ‘ई टीव्ही गुजराती’, ‘ई टीव्ही तेलुगु’, ‘ई टीव्ही आंध्र प्रदेश’ अशी अनेक प्रादेशिक चॅनल्स सुरू झाली. २००१ ते २००६ पर्यंत इनाडू कंपनीने उत्तम चालवलं; पण नंतर त्यांना अवघड होऊ लागलं. या वेळी मुकेश अंबानींनी या नेटवर्कला आर्थिक मदत केली. त्यांनी ई टीव्ही नेटवर्कमध्ये मोठी भागीदारीही घेतली. त्यामुळे ई टीव्ही नेटवर्कमधली काही दक्षिणेकडची प्रादेशिक चॅनल्स वगळता इतर सगळी चॅनल्स मुकेश अंबानीच्या ताब्यात आली. यातच अनिल अंबानी यांनी ‘बिग मॅजिक’ हे चॅनल सुरू केलं.

स्पर्धा हवीच!
‘‘‘झील’च्या ‘जिंदगी’ या मालिकेचा आशय महत्त्वाचा आहे, कारण आशय चांगला असला, की इतर गोष्टी आपसूकच होत असतात. तसंच चॅनल्समध्ये स्पर्धा तर असणारच. मी याकडे सकारात्मकदृष्टय़ा बघते. प्रेक्षकांसाठी ही बाब चांगली असेल, कारण त्यांना वेगवेगळा आशय बघायला मिळेल. आमचं चांगल्या, साध्या मालिका प्रेक्षकांना देणं यावरच लक्ष असेल. मला परदेशी मालिकांचं अनुकरण करण्यात फार रस नाही. आतापर्यंत अनेकांनी अशा प्रकारचं अनुकरण केलं आहे. ते चांगलंही झालंय; पण माझा आपल्या संस्कृतीवर जास्त विश्वास आहे. त्यातही अनेक गोष्टी दाखवता येऊ शकतात, असं मला वाटतं. सध्या टीव्हीवर बॉलीवूड कलाकारांची खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे आमचा सध्या तरी कोणा बडय़ा स्टारला चॅनलमध्ये आणण्याचा विचार नाही, कारण नव्या कलाकारांमुळे मालिका लोकप्रिय होते हे आम्ही सिद्ध केलंय. सध्या रिअ‍ॅलिटी शोज सगळीकडे हवा आहे. टीआरपी मिळण्याचं ते हक्काचं शस्त्र आहे. तरी आम्ही एवढय़ात तरी रिअ‍ॅलिटी शोज आणण्याची घाई करणार नाही. कदाचित काही टॅलेंट शो आणण्याचा आमचा विचार असेल.’’ 
शैलजा केजरीवाल, ‘झील’च्या ‘जिंदगी’ या चॅनलच्या स्पेशल प्रोजेक्ट्सच्या चीफ क्रिएटिव्ह

राघव बहल हे माध्यमांमधलं, तर मुकेश अंबानी हे बिझनेस क्षेत्रातलं मोठं नावं. राघव बहल यांनी नेटवर्क एटीन ही कंपनी सुरू केली. यामध्ये अनेक न्यूज चॅनल्स आणि जीईसी चॅनल्सचा समावेश आहे. राघव बहल यांनी अमेरिकेतल्या वायकॉम या कंपनीत पार्टनरशिप करून नेटवर्क एटीनचं एटीन आणि वायकॉम अशी वायकॉम एटीन कंपनी सुरू केली यामध्ये कलर्स, रिश्ते, सोनिक, निकोलोडिन अशा काही चॅनल्सचा समावेश होतो. या हिंदी चॅनल्ससोबत वायकॉमला प्रादेशिक चॅनल्सही सुरू करायचे होते, पण आर्थिकृष्टय़ा ते तेव्हा परवडणारं नव्हतं. त्यामुळे आधीच प्रस्थापित आहेत ती प्रादेशिक चॅनल्स विकत घेणं शक्य होतं, पण त्यासाठीही पुरेसा पैसा नव्हता. मग यामध्ये मुकेश अंबानी यांनी नेटवर्क एटीनमध्ये मोठे शेअर्स घेतले. यामुळे आता वायकॉमच्या नावाखाली अनेक प्रादेशिक चॅनल्स आली जी वायकॉमला हवीच होती. ई टीव्हीची अनेक प्रादेशिक चॅनल्स आधीच मुकेश अंबानी यांच्या ताब्यात होती आणि आता नेटवर्क एटीन. त्यामुळे माध्यम जगतावर आता त्यांचे मोठे नियंत्रण असणार आहे. ही महत्त्वाची घटना टीव्ही क्षेत्रात घडल्यामुळे तिथली व्यावसायिक गणितं आता नव्याने बदलणार असून अनेक चॅनल्समध्ये पुन्हा एकदा निकराची स्पर्धा दिसणार आहे.
गेल्या पाचेक महिन्यात झालेल्या या उलाढालीचा प्रभाव आता इतर चॅनल्स आणि नेटवर्कवर दिसू लागलाय. झी नेटवर्कचं ‘जिंदगी’ हे चॅनल सुरू झालंय. तर मल्टिस्क्रीन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचं ‘सोनी पल’ हे चॅनल लवकरच सुरू होतंय. झी नेटवर्कचं आणखी एक चॅनल लवकरच सुरू होतंय. या सगळय़ा नव्या चॅनल्सवर गेल्या काही महिन्यांपासूनच काम सुरू असलं तरी त्याला वेग मात्र आता आलाय. एकीकडे चॅनल्सची भाऊगर्दी तर दुसरीकडे जुनीच चॅनल नवनवीन मालिका, शोज घेऊन येतायत. तर कोणी बॉलीवूडच्या बडय़ा स्टार्सना घेऊन मालिका, रिअ‍ॅलिटी शोज्चा चेहरा बनवतायत. याच काळातलं सगळय़ात मोठं आकर्षण ठरलं ते अमिताभ बच्चन यांची ‘युद्ध’ ही मालिका. सोनी टीव्हीच्या ‘युद्ध’मुळे अमिताभ बच्चन यांची छोटय़ा पडद्यावर मालिकेतून एंट्री झाली. खरं तर या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अमिताभ डेली सोपमध्ये पहिल्यांदा येणार म्हणून मालिकेचा बोलबालाही प्रचंड झाला, पण मालिकेला हवा तसा जम बसवता आला नाही. टीआरपीतही ही मालिका यशस्वी झाली. ही मालिका अमिताभ बच्चन यांची असली तरी प्रेक्षकांनी त्यांच्या नेहमीच्या मालिकांना टाटा-बाय करून ‘युद्ध’कडे वळलेत असं केलं नाही. ‘युद्ध’च्या वेळेतच इतर चॅनल्सवर ‘वीरा’, ‘उतरन’, ‘डोली अरमानों की’, ‘सावधान इंडिया’ यापैकी सगळय़ात कमी टीव्हीटी मिळणारी मालिका ही ‘युद्ध’च आहे. अपेक्षेप्रमाणे या मालिकेने प्रेक्षकांची पकड घेतलेली नाही. ठरावीक वर्ग सोडला तर ही मालिका म्हणावी तशी पसंतीस उतरलेली नाही. त्यामुळे या स्पर्धात्मक फेजमधल्या मोठय़ा घटकाला तितकंसं यश मिळालं नाही. तरी चॅनल्समध्ये हे मोठे आणि आकर्षक बदल केले जातायत हे मात्र नक्की. आणि याचमुळे यांच्यातली स्पर्धा दिवसेंदिवस तगडी होत जातेय.

‘युद्ध’ ही मालिका अनेकांनी उत्सुकतेने बघायला सुरुवात केली, पण काही भागांनंतर काही जणांनी ही मालिका बघण्याला पूर्णविराम दिला. मालिका समजायला जड आहे, वेळ उशिराची आहे, मालिकेत तणाव खूप आहे, अशी अनेक कारणं यामागे आहेत. काही प्रेक्षकांनी व्यक्त केलेली ही मते:

तोच ताण पुन्हा नको
सध्या सगळ्यांच्याच आयुष्यात ताणतणाव असतो. त्यामुळे दिवसभर काम करून झाल्यावर ब्रेक म्हणून प्रेक्षक टीव्हीसमोर बसतात; पण जर तिथेही तणावग्रस्त परिस्थितीच दिसणार असेल तर मात्र ते नकोसं होत असतं. तसंच झालं अमिताभ बच्चन यांच्या ‘युद्ध’ या मालिकेचं. ही मालिका अमिताभ बच्चनची म्हणून मी बघायला सुरुवात केली; पण दोनच भागांनंतर मला ती फार ताणतणाव देणारी वाटली. आपले कौटुंबिक, सामाजिक आयुष्य हे तणावाने ग्रासलेले आहेच. त्यामुळे ही मालिका बघून त्यात आणखी भर कशाला घाला? आधीच असलेल्या टेन्शनमधून बाहेर पडण्याचा आपण विचार करत असतो. ही मालिका बघून आपण करत असलेले प्रयत्न वाया जातायत असं वाटू लागलं. तोच ताणतणाव पुन्हा टीव्हीवर बघण्याची ताकद सर्वसामान्य माणसांमध्ये नसते. आपलंच विद्रूप प्रतिबिंब दाखवणारे आरसे आपण घरात कधीच ठेवत नाहीत. तसंच या मालिकेचं आहे. मालिकेची कथा, विषय खूप गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट आहे. दिवसभराच्या थकल्याने रात्री शांत झोप लागली पाहिजे. अशी मालिका बघून हे होणं तसं कठीणच. त्यामुळे मी ही मालिका दोन भागांनंतर बघणं सोडून दिलं
– दत्ता पाटील, नाटय़लेखक (नाशिक)

कंटाळवाणी वाटू लागली
मी ‘युद्ध’ ही मालिका बघण्याची दोन महत्त्वाची कारणं होती. एक म्हणजे अनुराग कश्यप आणि दुसरं म्हणजे अमिताभ बच्चन. अनुराग कश्यपच्या सिनेमांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्याच्या सिनेमांमध्ये वास्तवता असते. त्यामुळे तो मालिकेत काय कमाल करतो याची मला उत्सुकता होती; पण मालिकेबाबत माझा अपेक्षाभंग झाला. ‘युद्ध’चा विषय हा सिनेमात दाखवला असता तर तो कदाचित चालला असता, कारण त्यात आटोपशीर पद्धतीने तो मांडता आला असता. मालिकेत मात्र तसं करता आलं नाही. मालिकेत प्रत्येक भागामध्ये ताणतणाव आहे. दिवसेंदिवस तो वाढत गेला आहे. त्यामुळे मालिका कंटाळवाणी वाटू लागली. अशा पद्धतीचे सिनेमे बघायला आवडतात; पण मालिकेत असा विषय बघायला थोडं जडच गेलं. मालिका बघणं बंद करण्याचं आणखी एक कारण म्हणजे याची वेळ. रात्री साडेदहा ते साडेअकरा या वेळेपर्यंत थांबणं शक्य होत नाही. दिवसभर थकल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं असतं, त्यामुळे इतका वेळ जागून ही मालिका बघणं शक्य नसतं. त्यामुळे मी ही मालिका आता बघत नाही. 
– नीलेश सूर्यवंशी, ग्राफिक डिझायनर (नाशिक)

कनेक्ट झाली नाही
मी आणि माझ्या घरातले सगळेच अमिताभ बच्चन यांचे चाहते आहेत. त्यामुळे त्यांचा कोणताही सिनेमा, शो असला, की आम्ही तो जरूर बघतो. म्हणून ‘युद्ध’बाबतही प्रचंड उत्सुकता होती. अमिताभ आहे म्हणजे मालिका नक्कीच वेगळी आणि चांगली असणार असं वाटलं होतं; पण अपेक्षाभंग झाला. पहिल्या दोन भागांनंतर मी मालिका बघूच शकलो नाही. खरं तर अमिताभ बच्चन यांना सिनेमांमधून नेहमी सामान्य माणसांशी कनेक्ट झालेलं पाहिलंय; पण या मालिकेत त्याचा अभाव वाटला. ही मालिका सर्वसामान्य माणसांच्या जवळ गेली नाही. मालिकेचा विषय उच्चभ्रू समाजातला आहे. तसंच मालिकेचा वेगही कमी वाटला. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे कितीही पर्व आले तरी कंटाळा येत नाही; पण या मालिकेचा लवकरच कंटाळा आला. 
मिलिंद भोगांवकर, वकील (परभणी)

‘जिंदगी’ हे चॅनल दोन महिन्यांपूर्वी सुरू झालं आणि चर्चेचा विषय बनलं. पाकिस्तानी मालिका दाखवणारं चॅनल अशी ओळख होऊनही या चॅनलला तुफान लोकप्रियता मिळाली. ‘जिंदगी गुलजार है’, ‘काश मैं तेरी बेटी ना होती’, ‘औन झारा’, ‘मात’, ‘कही अनकही’ या मालिकांना जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. मालिकांचे विषय, आशय, साधेपणा, सामान्य प्रेक्षकांच्या जवळ जाणारं सादरीकरण, मर्यादित भाग या सगळय़ामुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतायत. विशेष म्हणजे यात नवे चेहरे असल्यामुळे प्रेक्षकांसाठीही नावीन्य आहे. यातल्या मालिकांची शीर्षकगीतंही उत्तम आहेत. या चॅनलच्या यशामुळे आता स्पर्धा आणखी तगडी होणार असं दिसतंय. स्टार प्लसवर ‘एअरलाइन्स’ ही नवी मालिका सुरू होतेय. एव्हिएशन इंडस्ट्रीवर आधारित ही मालिका असणार आहे. या मालिकेसाठी बिग बजेट मोठं एक एअरक्राफ्ट बनवलंय. त्यामुळे या मालिकेचा हा एक यूएसपी असू शकतो. तसंच मालिकेची नायिका तुलीप जोशी ही टीव्ही क्षेत्रात पदार्पण करतेय. त्यामुळे याही मालिकेत अनेक नव्या गोष्टी असतील अशी अपेक्षा आहे. 

प्रेक्षकवर्ग वेगळा असल्याचा फायदाच होईल
‘मल्टिस्क्रीन मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीच्या सोनी टीव्ही, सब टीव्ही आणि सोनी पल हे आगामी चॅनल हे वेगवेगळ्या ऑडियन्ससाठी आहेत. त्यामुळे सोनी पल या नव्या चॅनलची आमच्याच प्रस्थापित चॅनल्सशी स्पर्धा होणार नाही. कारण, प्रत्येक चॅनलचं टार्गेट वेगळं आहे. सोनी टीव्हीचा टार्गेट स्त्री आणि पुरुष असे दोघे आहेत. तर सब टीव्हीचा संपूर्ण कुटुंब. तर ‘सोनी पल’ हे चॅनल संपूर्णपणे महिलांवर केंद्रित केलं असेल. त्यामुळे आमच्याच जीईसी चॅनलशी सोनी पलची स्पर्धा होणार नाही. उलट टार्गेट ऑडियन्स वेगवेगळे असल्यामुळे चॅनल्सचा एकमेकांना फायदाच होईल.’ 
एन.पी.सिंग, मुख्य अधिकारी, मल्टिस्क्रीन मीडिया प्रायव्हेट लिमिटेड

कलर्सच्या ‘ट्वेंटीफोर’ मालिकेने टीव्ही मालिकांच्या आशयाला वेगळं वळण दिलं. या परदेशी मालिकेचा देशी अवतारही तितकाच आकर्षक आणि देखणा वाटला. याही मालिकेने टीआरपीच्या रूपाने फारशी जादू केली नसली तरी या मालिकेने वेगळा दर्जा तयार केला हे नाकारता येणार नाही. त्यामुळे त्या दर्जापर्यंत पोहोचण्याचा अनेक चॅनल्स प्रयत्न करताना दिसतायत. ‘द अनुपम खेर शो.. कुछ भी हो सकता है’ हा शो मनोरंजन क्षेत्रातल्या अनेकांच्या खासगी आयुष्यात डोकावून पाहतोय. तसंच अनेक परदेशी मालिका आणि शोजचं अनुकरण करणाऱ्या मालिका-शोज आपल्याकडे आगामी काळात येत आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारीकर ‘एव्हरेस्ट’ ही मालिका लवकरच घेऊन येत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने आशुतोष टीव्ही क्षेत्रात निर्माता म्हणून पदार्पण करताहेत. अनेकांचं टीव्ही क्षेत्रात पदार्पण हे सद्य परिस्थितीचं वैशिष्टय़ म्हणता येईल.
‘सोनी पल’ या चॅनलचा चेहरा म्हणून जूही चावला प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘चॅनलचा चेहरा’ ही नवी संकल्पना सध्या टीव्हीवर दिसून येतेय. याआधी लाइफ ओके हे चॅनल सुरू झालं होतं तेव्हा त्या चॅनलचा चेहरा म्हणून माधुरी दीक्षित दिसली होती. त्यामुळे चॅनलचं ब्रॅण्डिंग करण्याकडेही आता चॅनल्सची टीम सज्ज झाली आहे. सोनी पल हे नवं चॅनल सप्टेंबरमध्ये सुरू होतंय. या चॅनलचा स्त्रीप्रधान कार्यक्रमांवर भर असून स्त्रियांमधली सकारात्मक ऊर्जा त्यांचं आयुष्य कसं बदलून टाकते, असा आशय असणाऱ्या मालिका या चॅनलवरून दाखवल्या जाणार आहेत. जगणं हा एक आनंदोत्सव आहे आणि प्रत्येक क्षणी तो कसा साजरा करायचा हे या मालिका सांगणार आहेत. इतर चॅनलवरून स्त्रियांच्या आयुष्यातली रडारड दाखवली जात असताना स्त्रीमधली सकारात्मक ऊर्जा आणि तिचा आविष्कार प्रेक्षकांपुढे आणणं ही या चॅनलची सगळ्यात मोठी जमेची बाजू असणार आहे. खरं तर ज्या मालिकांमध्ये खलनायिका, खलनायक, कट-कारस्थानं हे सगळं असतं त्याच मालिकेचा टीआरपी ‘वाढता वाढे’ असा असतो. पण, ‘सोनी पल’ वेगळा प्रयोग करू पाहतंय हेही नसे थोडके! या चॅनलचा प्राइम टाइम सध्या साडेसात ते साडेदहा असा असणार आहे. एका महिन्यानंतर हा सात वाजल्यापासून सुरू होईल. प्रत्येक मालिका ही अर्धा तास असेल. यातल्या मालिकांचे शूटिंग पटियाला, दिल्ली, लखनऊ अशा अनेक ठिकाणी आऊटडोअरही केलंय. त्यामुळे मालिकांमधून वेगवेगळ्या ठिकाणांचं दर्शन प्रेक्षकांना होईल. बंदिस्त सेट, स्टुडिओच्या चौकटीबाहेर जाण्याचा या चॅनलचा प्रयत्न आहे.
चॅनल्समध्ये स्पर्धा असणं हे काही नवं नाही. टीआरपीच्या शर्यतीत कोण पुढे, कोण मागे यासाठी सतत धडधड सुरू असते. अमुक एका चॅनलने असा शो आणला, चला तसं करूया.. तमुक एका चॅनलवर तो मोठा स्टार आला, आपणही कोणाला तरी आणूया, अशी चढाओढ सतत सुरू असते. काही वेळा तर मालिकांच्या ट्रॅक्सचीही कॉपी केली जाते. फरक असतो तो फक्त मागे-पुढे असण्याचा. बाजारपेठ आणि आशय हे एकमेकांना पूरक आहेत. आशय चांगला असला तरी व्यवसायाच्या पातळीवर मालिका चालत नसेल म्हणजेच तिला जाहिराती मिळत नसतील तर त्यावर लगेच काट मारली जाते. आणि टीआरपी तुफान असेल आणि आशय चांगला नसेल तरी ती मालिका वर्षांनुवर्षे सुरूच ठेवली जाते. हा चॅनलचा नेहमीचा पवित्रा असतो. पण, या टीआरपीविषयी ‘जिंदगी’ चॅनलच्या स्पेशल प्रोजेक्ट्सच्या चीफ क्रिएटिव्ह शैलजा केजरीवाल म्हणतात की, ‘टीव्हीटी हा मीडिया बिझनेसचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तो येत-जात राहणारच. पण, आम्हाला आत्तापर्यंत तरी त्यामुळे कुठेही आडकाठी आलेली नाही. तसंच टीआरपी कमी म्हणून मालिका बंद असा प्रकारही आमच्याबाबतीत होणार नाही, कारण आमच्या मालिका मर्यादित भागांच्याच आहेत.’
‘सोनी पल’ या चॅनलमुळे ‘सोनी’ आणि ‘सब टीव्ही’ या त्यांच्याच नेटवर्कच्या म्हणजे मल्टिस्क्रीन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या जीईसी चॅनल्सना येत्या काळात थेट स्पर्धा होणार आहे. याबाबत त्याचे मुख्य अधिकारी एन.पी.सिंग म्हणतात की, ‘आमच्या कंपनीच्या सोनी टीव्ही, सब टीव्ही आणि सोनी पल हे आगामी चॅनल हे वेगवेगळ्या ऑडियन्ससाठी आहेत. त्यामुळे थेट स्पर्धा होणार नाही. प्रत्येक चॅनलचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. त्यामुळे हा प्रेक्षक वेगवेगळा असल्यामुळे चॅनल्सना फायदाच होईल.’
या स्पर्धेमुळे येत्या काळातही प्रेक्षकांना टीव्हीवर मालिका, शोजमधलं वैविध्य, प्रयोग बघायला मिळतील. पण, या स्पर्धेत पुढे जाण्याच्या नादात मालिकांच्या आशयावर परिणाम झाला तर मात्र प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाहीत, हे तितकंच खरं. क्यूंकी ये है पब्लिक है बॉस.. और पब्लिक सब जानती है..!!