स्टार प्लसवर सुरू असलेल्या ‘एअरलाइन्स’ या मालिकेतल्या बहुतांश घडमोडी विमानात घडतात. त्यामुळे या मालिकेसाठी दिल्लीत चक्क एका विमानाचा सेटच उभारला गेला आहे. विशेष म्हणजे या सेटचं कला दिग्दर्शन केलंय ते नरेंद्र राहुरीकर या मराठी माणसाने.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठय़ा हवेल्या, बंगला, झुंबरांनी सजलेलं घर यापलीकडे जाऊन आता काही मालिका बंदिस्त स्टुडिओच्या बाहेर पडत आहेत. मालिकांच्या कथाबाबतही तसाच प्रकार. वेगवेगळी क्षेत्रं उलगडून दाखवताना मालिका वेगळी उंची गाठतायत. ‘एअरलाइन्स’ ही मालिका यापैकीच एक. विमानोड्डाण क्षेत्रातल्या घडामोडी दाखवताना त्याचं खरं रूप दिसावं यासाठी दिल्ली विमानतळावर या मालिकेचं चित्रीकरण होतंय. तसंच विमानातल्या काही सीन्ससाठी मालिकेच्या टीमने खास मालिकेसाठी एक विमानच तयार केलंय. ‘एअरलाइन्स’ या मालिकेसाठी दिल्लीत साकारलेल्या या विमानामागे एक मराठी हात आहे. नरेंद्र राहुरीकर या कला दिग्दर्शकाने साकारलेलं हे विमान मालिकेचा यूएसपी ठरलाय.
मालिकेचा विषय व्यापक असल्याने त्याचा सेटही तितकाच मोठा आणि आकर्षक असणं ही मालिकेची गरज होती. विषय वास्तवाकडे झुकणारा असल्याने सेटही तितकाच खरा वाटला पाहिजे. म्हणूनच नरेंद्र यांनी दिल्लीत नोएडा येथे असलेल्या फिल्मसिटीमध्ये १०० फूट लांब आणि २० फूट रुंद या आकाराचं विमान तयार केलं. ‘मालिकेचा विषय बघता त्याचे अनेक सीन्स हे विमानातले असणार आहेत. तसंच ते सगळे सीन्स खरे वाटावे यासाठी बारकाव्यानिशी विमानाचा सेट तयार केला. त्यामुळे मालिकेत दाखवले जाणारे विमानातले सीन्स हे खऱ्या विमानातलेच वाटतील’, असं नरेंद्र सांगतात. मालिकेचा बराचसा भाग दिल्लीच्या परिसरात चित्रित केला गेलाय. तसंच दिल्ली विमानतळावरही काही सीन्स चित्रित केलेत. त्यामुळे विमानतळ आणि विमानातलं चित्रण सोयीस्कररीत्या करता यावं यासाठी विमानाचा सेट दिल्लीतच बांधणं आवश्यक असल्याचंही ते सांगतात. एकूण शंभर जणांच्या टीमला हे विमान तयार करण्यासाठी एकूण पन्नास दिवस लागले. मुंबईत हे विमान तीस दिवसांत वेगवेगळ्या भागांमध्ये तयार करण्यात आलं. त्यानंतर पुढच्या वीस दिवसांत ते दिल्लीत नेऊन त्याची जोडणी केली गेली. याबाबत राहुरीकर सांगतात, ‘मालिकेतले प्रसंग वेगवेगळ्या अँगलने चित्रित करता यावेत म्हणून ते विमान वेगवेगळ्या भागांमध्ये तयार केलं. विमान फोल्डिंगचं असल्याने चित्रण करताना अडचणी आल्या नाहीत.’
खऱ्या विमानाप्रमाणेच या सेटमध्येही फायबरच्या काचा वापरल्या गेल्या आहेत. तसंच प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची बैठक व्यवस्था, पायलटचं केबिन, आतले लाइट्स, सामान ठेवण्याची व्यवस्था, सीट बेल्ट, फ्लोअिरग अशा अनेक गोष्टींमधल्या बारकाव्यांचा अभ्यास करून राहुरीकर यांनी विमान पूर्ण केलं आहे. या बारकाव्यांमुळे विमानाला खरं रूप आलंय. ‘सेट खरा वाटावा यासाठी काही गोष्टींचा अभ्यास करावा लागला. एरवी आपण विमानातून अनेकदा प्रवास करतो. त्यावेळी अशा गोष्टींकडे आपलं बारीक लक्ष जात नाही. पण, ज्यावेळी प्रत्यक्ष विमानाचाच सेट तयार करण्याचा प्रोजेक्ट माझ्याकडे आला त्यावेळी मात्र मी आणि माझ्या टीमने याबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली. मग विमानातल्या महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टीं कशा डिझाइन केल्या आहेत, कशा पद्धतीने तयार केल्या आहेत, त्याचं मटेरिअल काय अशांचा अभ्यास करत प्रत्यक्षात या विमानाचा सेट उभा केला’, असं नरेंद्र यांनी सांगितलं. ही मालिका आता सुरू झाली असली तरी हा विमानाचा सेट मार्चमध्येच तयार झाला होता. सेट पूर्ण झाल्यानंतरच मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. या विमानासाठी एकूण ८५ लाख इतका खर्च आला आहे. मालिकेच्या केवळ एका सेटसाठी एवढय़ा मोठय़ा बजेटचा सेट तयार करणारी ही हिंदी इंडस्ट्रीतली पहिली मालिका असावी असं म्हटलं जातंय.
नरेंद्र राहुरीकर यांचा कला दिग्दर्शनातला अनुभव मोठा आहे. बिग बजेट रिअॅलिटी शोज, इव्हेंट्स, काही विशेष कार्यक्रम अशांसाठी राहुरीकर नेहमीच कला दिग्दर्शनाचं काम करतात. सिनेमांमध्ये त्यांनी अनेक सिनेमांसाठी काम केलंय. रोहित शेट्टीसोबत त्याचे बरेचसे सिनेमे त्यांनी केलेत. ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘सिंघम’, ‘सिंघम रिटन्सर्’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या सिनेमांसाठी कलादिग्दर्शन त्यांनी केलंय. ‘ब्ल्यू’ या सिनेमाचे सेट्स गाजले होते. सिनेमाचा बराचसा भाग हा पाण्याखाली होता त्यामुळे त्याचं कला दिग्दर्शन करणं हे आव्हानात्मक होतं. हे आव्हान पेललं ते नरेंद्र यांनीच. या सिनेमासाठी त्यांनी केलेल्या पाण्याखालच्या कला दिग्दर्शनाचं त्यावेळी कौतुक झालं होतं. तसंच ‘लक’ या सिनेमासाठीही त्यांनी काम केलंय. संजय दत्त आणि सलमान खान या दोघांनी अँकरिंग केलेल्या ‘बिग बॉस’च्या एका सीझनचा सेटही त्यांनीच डिझाइन केला होता. यंदाच्या सीझनच्या प्रोमोमधल्या विमानाचा सेटही नरेंद्र यांनीच केला आहे. ‘नाच’, ‘बोल बच्चन’, ‘हिरोपंती’, ‘ऑल द बेस्ट’, ‘जॅकपॉट’ अशा अनेक सिनेमांसाठी त्यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. अनेक जाहिरातींचे सेट्सही त्यांनी उभारले आहेत. आगामी ‘वेलकम टू’ आणि ‘मस्तीजादे’ या दोन सिनेमांच्या कलादिग्दर्शन ते करत आहेत. ‘एअरलाइन्स’ मालिका केवळ २६ भागांची आहे. त्यामुळे मालिकेचं संपूर्ण चित्रीकरण झाल्यानंतर हा सेट पर्यटकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मालिकेच्या काही सीन्ससाठी विमानतळ दिसणं आवश्यक होतं. विमानाच्या सेटप्रमाणे तेही खरं वाटण्यासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर खास परवानगी घेऊन शुट करण्यात आलं. या सेटमुळे हिंदी मालिकांच्या सेट्सबाबत पुन्हा चर्चा व्हायला लागली आहे. याआधी ‘बिग बॉस’, ‘कौन बनेगा करोडपती’, ‘झलक दिखला जा’ अशा रिअॅलिटी शोजचे सेट्स चर्चेत असायचे. मालिकांचे मोठे बंगले, ऑफिस, झगमगणाऱ्या हवेल्या किंवा मोठं गावं असेच सेट्स असायचे. पण, ‘एअरलाइन्स’च्या निमित्ताने मालिकांमधल्या सेट्सची चर्चा होऊ लागली आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv serial airlines
First published on: 19-09-2014 at 01:11 IST