15 August 2020

News Flash

कहानी छोटे पडदे से उतारे हुए फॅशन की…

फॅशन नेमकी येते कुठून, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं आजच्या काळातलं उत्तर आहे, टीव्ही मालिका. या मालिकांमधल्या आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेला फॉलो करण्यासाठी तिची

| June 20, 2014 01:08 am

फॅशन नेमकी येते कुठून, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं आजच्या काळातलं उत्तर आहे, टीव्ही मालिका. या मालिकांमधल्या आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेला फॉलो करण्यासाठी तिची फॅशन मुलं-मुली उचलताना दिसतात. पण या सगळ्याची सुरुवात झाली कुठून आणि कशी?

‘या मालिकेतील सर्व पात्रे काल्पनिक असून वास्तवाशी याचा काही संबंध नाही.’ टीव्हीवरची कोणतीही मालिका सुरू व्हायच्या आधी हे ठरावीक विधान नक्कीच झळकतं. त्यानंतर मालिका सुरू होते. अगदी पौराणिक किंवा सत्य घटनांवर आधारित मालिकांमध्ये पण आम्ही गरजेनुसार बदल केले आहेत, अशी पाटी नक्कीच झळकते. पण कितीही नाही म्हटलं तरी या मालिकांचा आपल्या आयुष्यावर परिणाम पडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच तर ‘क्यँूकी साँस भी कभी.’ मधला मिहीर मेला की कित्येकांच्या घरातले देव पाण्यात जातात आणि सत्यजितने मंजिरीला घराबाहेर काढलं की प्रियाच्या नावाने असंख्य खडे फोडले जातात. हसू नका, हे फक्त आपल्या घरातील ताई-माई-आक्काच करतात असे नाही. तरुण मंडळी पण यात मागे नाहीत. ‘मधुबालामधला आरके कसला बाप दिसतो.’ आणि ‘आपल्याला तर बॉस, बायको हवी तर ती जान्हवीसारखी. उसमें नो कॉम्प्रोमाइझ.’ या चर्चा कॉलेज कट्टय़ावरसुद्धा रंगतात. त्यातूनच यावेळी कॉलेज फेस्टला कोणाला बोलवायचं, कोणाकडे कोणत्या नटाचा नंबर आहे अशा सगळ्या सेटिंग्ज लावल्या जातात. (कित्येक मराठी नटनटय़ा आमच्या कॉलेजमध्ये शिकत होत्या या यादीमुळे मुंबईमधल्या रुईया, रूपारेल, साठय़े कॉलेजच्या मुलांची कॉलर ताठ असते, हे तर तुम्ही मान्य करालच ना)
पण केवळ एक क्रेझ म्हणूनच नाही तर एक जीवनशैली म्हणून या टीव्ही मालिकांचा आपल्या लाइफ स्टाइलवर खूप परिणाम होत असतो. त्यातच फॅशनसुद्धा येते. उगाचच नाही साडय़ांच्या दुकानांमध्ये मालिकांच्या नावाने खपणाऱ्या साडय़ा दिसतात किंवा मालिकेतील अनारकलीच्या फॅशनमागे सगळ्या मुली वेडय़ा होतात. हे फॅशनचे खूळ केवळ आताचेच आहे असेही नाही आणि फक्त भारतात आहे असे पण नाही. जगभरात टीव्ही मालिकांचा फॅशनवर होणारा परिणाम लक्षणीय आहे. याची सुरुवात झाली अमेरिकेपासून. ८०च्या दशकात छोटय़ा पडद्याने संपूर्ण तरुणाईला व्यापून टाकलं होतं. याची सुरुवात ‘चार्लीज एंजल्स’ आणि ‘डायनास्टी’सारख्या सीरिअल्सपासून झाली. ८०च्या दशकातील या मालिकांनी स्त्रियांच्या मनात ‘पॉवर ड्रेसिंग’बद्दलची संकल्पना रुजवायला सुरुवात केली. पफ सिल्व्हज, जॅकेट्स, बोल्ड कलर्स, पॉवर सूट्स, डीप नेकलाइन्स, ट्राउझर्स या सर्वाची सुरुवात या मालिकांमुळे झाली. अर्थात या काळात अमेरिकन तरुणींनी बाहेर पडून नोकरी करण्यास आणि स्वत:च्या करियरकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली होती त्यामुळे या कणखर, स्वत:ची प्रामाणिक भूमिका असलेल्या मालिकेतील व्यक्तिरेखा त्यांना आकर्षित करू लागल्या होत्या. त्यामुळे साहजिकपणे त्या या पॉवर ड्रेसिंगच्या ट्रेंडकडे खेचल्या गेल्या. दोन हजारच्या दशकात फ्रेंडस, गॉसिप गर्ल्स या मालिकांनी अमेरिकेतील छोटा पडदा व्यापून टाकला होता. या मालिकांमधील मुलांमध्ये सहजतेने मिसळणाऱ्या, हॅपी गो लकी स्वभावाच्या तरुणी मुलांना भावू लागल्या होत्या. या काळात कॉलेज बॅण्डचे पेवही अमेरिकेत फुटले होते. त्यामुळे बारीक शरीरयष्टीच्या, लो वेस्ट जीन्स आणि शॉर्ट टी-शर्ट घातलेल्या, रंगीबेरंगी केसांच्या मालिकेतल्या नायिकेच्या नकला कॉलेजच्या आवारात दिसू लागल्या होत्या. या व्यक्तिरेखांनी मुलींना स्वतंत्रपणे विचार करण्यास, करिअरकडे गांभीर्याने पाहण्यास, नातेसंबंधांचा अर्थ लावण्यास प्रवृत्त केले. आपण दैनंदिन आयुष्यात जो विचार करतो, आपल्याला पडणारे प्रश्न, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी करावी लागणारी धडपड, मित्रमैत्रिणी यांमध्ये येणारे ताणतणाव हे सगळं फक्त आपणच सहन करत आहोत असे नाही तर घरातल्या छोटय़ा पडद्यावर रोज आपल्याला भेटणारी नायिका पण हेच सहन करतेय हे लक्षात आल्याने मुलींच्या मनात आत्मविश्वास येऊ लागला. आणि पर्यायाने त्या या व्यक्तिरेखांसारखं वागायचा, बोलायचा प्रयत्न करू लागल्या होत्या. यासाठीचा सर्वात उत्तम मार्ग त्यांची फॅशन फॉलो करण्याचा. म्हणूनच त्या काळाला टेलेव्हिजन फॅशनचा काळ असंही म्हटलं जातं.
अर्थात या मालिकांनी यादरम्यान मुलांच्या फॅशनवरही मोठा प्रभाव टाकला होता. अर्थात आता आपण समाजात मुलींपेक्षा मोठे आहोत ही भावना पुसून समानतेची भावना रुजवण्यात मालिकांचा मोठा हातभार होता. त्यामुळे सुटाबुटातील मुले आता कॅज्युअल वेअरमध्ये दिसू लागली होती. अर्थात मध्यंतरी सत्तरच्या दशकात मुलांच्या फॅशनमध्ये बेफिकीर वृत्ती होतीच, पण आता ही बेफिकीर वृत्ती जाऊन जबाबदारीची जाणीव करून देण्यास या मालिकांनी हातभार लावला.
भारतामध्ये टीव्ही आला त्या सुरुवातीच्या काळात फॅशन आणि टीव्ही यांचा काहीच संबंध नव्हता. कारण त्या काळात भारतात फॅशन ही संकल्पनाच रुजू झाली नव्हती. त्यामुळे टीव्ही आणि फॅशनचा संबंध लावणे अशक्यच होते. हा संबंध लागायला आपल्याकडे दैनंदिन मालिका म्हणजेच डेली सोप्सचा काळ यावा लागला. या दैनंदिन मालिकांमध्ये रोज नटलेल्या, छान साडय़ा नेसलेल्या, मोठमोठय़ा बंगल्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया दिसू लागल्या होत्या. भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, रोज मन मारत जगणारी, कामाच्या गराडय़ात अडकलेली स्त्री या मालिकेतील प्रतिमेकडे खेचली गेली. तिला आपली न पूर्ण होणारी स्वप्न नायिकेच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसू लागली. पर्यायाने ती आता तिच्यासारखं दिसण्याचा, वागण्या-बोलण्याचा विचार करू लागली होती. बाजारातही या काळात मालिकांच्या स्टाइलच्या साडय़ा, पंजाबी ड्रेस मिळायला सुरुवात झाली होती. त्यामुळे ‘मी कहानी घर घर की मधल्या पार्वती सारखी साडी नेसली आहे’ किंवा ‘पवित्र रिश्ता’ मधल्या अंकिता सारखी अनारकली आहे हे सांगण्यात आणि मिरवण्यात फक्त तरुणीच नाही तर चाळिशी पार केलेल्या स्त्रिया पण स्पर्धा करू लागल्या होत्या.
मालिकेतील मेकअपचे ट्रेंड गाजू लागले होते. डोळ्याबाहेर हलकेच खेचलेले लायनर, मोठय़ा टिकल्या, भडक लिपस्टिक, रंगीत नेलपॉलिश असे अनेक ट्रेंड्सची या काळात चलती होती. वेगवेगळ्या हेअर स्टाइल्स करून देणाऱ्या सलून्सच्या बाहेर तरुणी रंग लावून उभ्या राहू लागल्या होत्या. हे प्रमाण इतके होते की कित्येकदा केवळ मालिकेतील तरुणीची नक्कल म्हणून कॉलेजला लांब सलवार कमीज घालून हातात पुस्तकं घेऊन जात असत. आपल्यामधील बहुतेक सर्वच मालिका परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या असल्यामुळे पारंपरिक कपडय़ांचे अनेक प्रकार मालिकांमुळे लोकांना पाहायला मिळाले.
त्यामुळेच पंजाबी मुलगी पण आज गुजराती स्टाइलचा मांगटिका शोधण्यासाठी बाजार पालथा घालते, तर दक्षिण भारतीय मुलगी मराठी स्टाइलची ठुशी घेण्यासाठी दादरला आवर्जून चक्कर मारते. थोडक्यात टीव्हीच्या माध्यमातून तरुणीला व्यक्त होण्याचे एक साधन मिळाले होते. पडद्यावर रोज आपल्याला दिसणारी व्यक्तिरेखा आपल्याच कुटुंबाचा एक भाग असल्याची भावना या मालिकांमुळे तयार झाली. आणि त्यामुळेच त्यांच्या नकला करण्याची रीतही सुरू झाली. हा बदल मुलांपासून पण दूर नाही राहिला. सिक्स पॅक अ‍ॅब्जच्या हीरोला पाहून जिमकडे वळणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही. किंवा मुलींना पटवायचं असेल तर गिटार वाजवता आलंच पाहिजे नाहीतर डान्स तरी करता आला पाहिजे हे खूळ टीव्हीनेच भरवलं. थोडक्यात टीव्हीच्या विश्वात रंगताना फॅशनचा रंग पण हलकाच त्यात मिसळला गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2014 1:08 am

Web Title: tv serial fashion
टॅग Tv
Next Stories
1 वारी निघाली कॉलेजला..
2 लुक में ट्विस्ट..
3 बस.. टचअप जरुरी है!!!
Just Now!
X