सासू-सुना ड्रामा, बिचारी सून, सगळ्या संकटांना एकहाती सामोरी जाणारी सुपर(मॅन)सून, चवीपुरतं घेतलेला नायक, प्रेमकथेत लुडबुड करणारी घरातलीच कोणी एक व्यक्ती या आणि अशा बऱ्याच गोष्टींनी सध्याचा टीव्ही भरगच्च भरलाय. या सगळ्याला प्रेक्षकवर्ग निश्चितच आहे. पण त्यात तरुण मंडळींचं प्रमाण बरंच कमी आहे. यापेक्षा आम्हाला आमचं आयुष्य मालिकांमध्ये बघायला आवडेल, असा ओरडणारा तरुण प्रेक्षकवर्ग आता कुठे सुखावलाय. याला कारण आहे झी मराठीची नवी मालिका. ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ म्हणत ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने धडाकेबाज एंट्री घेतली आणि सासूच्या कारस्थानांना, सुनेच्या रडगाण्याला प्रेक्षकांनी विशेषत: तरुण प्रेक्षकांनी ब्रेक दिला. बऱ्याच वर्षांनी तरुण मंडळींचा विचार करत मालिका भेटीस आली आहे. या मालिकेचे प्रोमोज बघूनच त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. दिग्दर्शक-निर्माता संजय जाधव यांची निर्मिती आणि विनोद लव्हेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या या मालिकेने एका आठवडय़ातच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. साधी मांडणी, सोपे संवाद, तरुणाईची भाषा, कलाकार, दिग्दर्शन अशा सगळ्या गोष्टींमुळे मालिका वेगळी ठरते.

मालिकेच्या शीर्षकापासून तरुणाईला ती जवळची वाटतेय. शीर्षक गीताच्या सुरुवातीलाच सेल्फी स्टिक घेऊन फोटो क्लिक करणारी मीनल आणि मागून तिला त्रास देण्यासाठी आलेली तिची दोस्त मंडळी हे चित्र आपण कट्टय़ाकट्टय़ांवर बघतो. शीर्षकगीतही उत्तम जमलंय. मालिकेचा लुक जसा फ्रेश आहे तसाच शीर्षकगीतासाठीही आर्या आंबेकर, जुईली जोगळेकर आणि सागर फडके या फ्रेश आवाजांची निवड केली आहे. एका आठवडय़ातच हे गाणं लोकप्रिय झालंय. तरुणाईचं आयुष्य रंगबेरंगी असतं. मिसमॅच करणं हा आजच्या तरुणाईचा हिट फंडा. हे मिसमॅच करताना जास्तीतजास्त रंग वापरण्याची या यंगिस्तानची धारणा असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचं आयुष्य रंगबेरंगी दिसतं. हा कलरफुल जोश मालिकेत दिसतो. सगळ्या कलाकारांचा अभिनयही उत्तम. सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, सुव्रत जोशी, पुष्कर चिरपुटकर, अमेय वाघ, पूजा ठोंबरे हे कलाकार कौतुकास्पद काम करत आहेत. नव्या चेहऱ्यांची ही फळी मालिकेत धमाल आणते. त्यांच्या अभिनयात सहजता आहे. ही सहजताच मालिकेला फ्रेश ठेवते. केवळ तरुणवर्ग नाही तर मध्यमवयीन, वयस्कर मंडळीही या मालिकेचं कौतुक करताहेत. मालिकेचा विषय केवळ मैत्री असा नाही. तर त्याला अनेक घटनांची जोड आहे. त्या घटनांमधून झालेली मैत्री हा विषय असल्यामुळे त्यात नावीन्य दिसून येतंय.
बऱ्याच वर्षांनी युवा पिढीचं प्रतिनिधित्व करणारी मालिका कमी वेळात लोकप्रिय झाली आहे. ‘दुनियादारी’, ‘४०५ आनंदवन’, ‘बेधुंद मनाची लहर’ अशा काही लोकप्रिय मालिकांनंतर बराच काळ अशा मालिकांची पोकळी भासत होती. ही पोकळी भरून काढली ती ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने. तरुणाईशी संबंधित मालिका आहे असं म्हटल्यावर कॉलेज, कट्टा, चहाची टपरी अशाच गोष्टी डोळ्यांसमोर येतात. पण या मालिकेने या समजुतींना खोटं ठरवलं. कदाचित मालिकेत पुढे कॉलेज, ऑफिस अशा गोष्टी येतीलही, पण तूर्तास एका खोलीत राहणारे सहा मित्र-मैत्रिणी यांच्यातली मैत्री ही कथा पुढे सरकतेय. वेगवेगळ्या ठिकाणांहून मुंबईत आल्यानंतर एका खोलीत राहणं ही संकल्पना मालिकेत मांडणं हेच वेगळेपण आहे. ‘अकाउंटचा निल नितीन मुकेश करावा लागणार’, ‘तुझ्या बेसिकमध्येच लोचा आहे’, किंवा ‘तिच्या लाइफचा भुस्काट झालाय’ ही नाक्यांवर, कॉलेज कट्टय़ांवर ऐकायला मिळणारी तरुणाईची भाषा मालिकेत आणली आहे ती संवादलेखिका मनस्विनी लता रवींद्र हिने.
नायक-नायिकांची भांडणं, सासूचा छळ, रडगाणं असं सगळं तणावग्रस्त वातावरण मालिकेतून बघण्यापेक्षा ‘दिल दोस्ती दुनियादारी’ उत्तम पर्याय आहे, असा मेसेज सध्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फिरतोय. तसंच ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे सब्जेक्ट्सही पटापट बदलताहेत. या मालिकेचे एपिसोड्स चुकण्याचीही शक्यता कमी आहे. कारण तिची वेळ रात्री साडेदहाची आहे. थोडक्यात काय, तर या मालिकेमुळे टीव्ही आणि विशेषत: मालिकेकडे तरुणाई खेचली जातेय. इंग्लिश मालिकांच्या मागे धावणारे मराठी तरुण चांगला आशय दिला की मराठी मालिकेकडेही वळतात, हे या नव्या मालिकेवरून सिद्ध होऊ शकेल. बऱ्याच वर्षांनी तरुणांची मालिका आल्यामुळे पुन्हा एकदा अशा मालिकांचा ट्रेंड सुरू होईल अशी आशा करायला हरकत नाही. या मालिकेचं फर्स्ट इम्प्रेशन प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलंय. आता हेच आणि असंच इम्प्रेशन शेवटपर्यंत राहावं हीच इच्छा.
चैताली जोशी