टीव्हीवरच्या मराठी मालिकांची नुसती नावं बघितली तरी जगात लग्न या एका गोष्टीशिवाय दुसरं काहीही अस्तित्वातच नाही की काय असं वाटायला लागतं. मराठी मालिकांच्या दृष्टीने वयात आलेले मुलगा-मुलगी समोरासमोर आले, जरा ओळख झाली की लगेच लग्नच करायला धावतात की काय?

अनोळखी मुलगा आणि मुलगी भेटले किंवा बोलले तर लगेच त्यांचं लग्नच लावायला हवं असा मराठी मालिकांचा हट्टच असतो. प्रेम, अफेअर, दाखवण्याचा कार्यक्रम, कुंडल्या, पत्रिका, साखरपुडे, लग्न यापेक्षाही जगात अनेक गोष्टी असतात याची जाणीव मराठी मालिकांना लागलेले लग्नलोलुप ग्रहण पाहता  करुन द्यावीशी वाटते.

लग्न हा मानवी आयुष्यातला अविभाज्य टप्पा. हा टप्पा आयुष्यात कधी येतो हे सापेक्ष आहे. मात्र लग्न चॅप्टर सोडूनही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अन्य गोष्टी असतातच. रोजच्या जगण्यात, प्रवासात एवढं काही घडतं ते मराठी मालिकांमध्ये अभावानेच पाहायला मिळतं. अचानक मध्येच एखादी मराठी मालिका लावा, तिकडे पत्रिका, लग्न, दाखवण्याचा कार्यक्रम असलंच काहीतरी सुरू असतं. केजीपासून पीजीपर्यंत शिक्षणाचं उदाहरण घ्या. किती इव्हेंटफुल असतात ही पंधरा-सतरा र्वष. इझम्स, आयडियालॉजी, बेस पक्का करणारी ही र्वष असतात. आपण पुढे काय काम करणार याची बीजं याच वयात रुजतात. पण मराठी मालिकांचा एकच अजेंडा-लग्न. केवळ माणूस म्हणून नॉर्मल असं कोणी बोलू, वावरू शकतच नाही हा त्यांचा समजच होऊन बसलेला. साधं आपण सरकारी कचेरीत जातो. कोणत्याही स्मार्ट सिटीत असलात तरी किमान एकोणीस खेटे मारल्याशिवाय तुमचं काम होत नाही. असल्या गोष्टी का येत नाही पडद्यावर? सामान्य माणसाच्या आयुष्यात एवढे जुगाड असतात की ते सोडवता नाकी दम येतात. घर पाहावे बांधून, लग्न पाहावे करून असं म्हणतात. मराठी मालिकांमध्ये उक्तीचा दुसऱ्या भागाचंच पारायण होतं. घर घेताना लोनसाठी बँकेत मारलेल्या चकरा, बिल्डरचा अनुभव, रजिस्ट्रेशन ऑफिस, स्टँपडय़ुटी,-शंभर गोष्टी असतात. गाव असो शहर असो- प्रत्येक जण रोज प्रवास करतो. ट्रेनचा, बसचा, रिक्षाचा. काय काय घडतं प्रवासादरम्यान. महाअतरंगी गोष्टी असतात त्या विश्वात. म्हणूनच कदाचित ट्रॅव्हलिंग इज लर्निग म्हणत असावेत. पण मराठी मालिकांमध्ये फक्त लग्नासाठीचा प्रवास दिसतो. अर्थात सन्माननीय अपवाद आहेत काही पण त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच. गेल्या दहा वर्षांतील मराठी मालिकांचा अभ्यास केला तरी बहुतांशी लग्नाभोवतीच कथानकं फिरताना दिसतात. सुरुवातीच्या काळात तंत्रज्ञानाला मर्यादा होती, त्यामुळे मनातलं सगळं पडद्यावर मांडता येईल का, हा प्रश्न असू शकतो. पण आता मनातलं काहीही पडद्यावर मांडता येईल अशी टेक्नॉलॉजी सोबतीला आहे. टेक्नोसॅव्ही जगात माणसांचे प्रॉब्लेम्स आणखी वाढलेत. मालिकेत पत्रिका, साखरपुडे, लग्न दाखवू नयेत म्हणजे आमची लिव्ह इनला संमती आहे असं नाही. पण आयुष्यात लग्न हा एकच विषय नसतो कोणाच्याही. एवढं काही हॅपनिंग घडत असतं अन्य नात्यांमध्ये.

‘का रे दुरावा’ मालिकेचंच उदाहरण घ्या. जय आणि अदिती यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालंय. त्यांचं स्वत:चं घर नाही. दोघांना जॉब मिळालाय जिथे लग्न झालेल्यांना प्रवेश नाही. म्हणून ते सिंगल असल्याचं दाखवतात कागदोपत्री. खरं तर आजारी वडिलांची काळजी घेणं, स्वत:च्या घराचा विचार करणं, स्वत:च्या पायावर उभं राहणं, खरं जगता येईल असं काहीतरी करणं हे विषय प्राधान्याने येतील असं वाटतं. पण बघायला काय मिळतं? इतकी र्वष देव टूर्सचे अविनाशराव एकटय़ानेच जगत होते. बिझनेसचा पसाराही एकटय़ानेच हँडल करत होते. मात्र सर्वगुणसंपन्न आदितीताईंना पाहिल्यावर आऊसाहेबांना अविनाशरावांचं अदितीशी लग्न लावावं असं वाटू लागलं. अविनाशरावांनाही अदितीताईंविषयी सॉफ्टकॉर्नर आहेच. पूर्वी आऊंना नुसतंच असं वाटायचं. आता तर आडूनआडून अदितीताईंच्या मनातलं काय हे जाणून घेण्यासाठी त्यांनी मोहीमच आखलीय. सूत्र एकच-लग्न व्हायला हवं. बरं हे कमी की काय म्हणून चार संलग्न लग्न ट्रॅक आहेतच. सुरुवातीला भित्र्या सश्याप्रमाणे वावरणाऱ्या जुईताईंना सुरुवातीपासून जयवर क्रश आहे. आता या क्रशची इंटेन्सिटी तीव्र झालीय. कवितांमधून व्यक्त होणाऱ्या जुईताई जयरावांची कायमची साथ मिळावी यासाठी चक्क नोकरी सोडायला तयार आहेत. दुसरीकडे बोलभांड रजनीताई जयरावांवर डोळा ठेवून आहेतच. त्यांना जयरावांसोबत डेटवर जायचं असतं. त्यांचा सहवास मिळावा यासाठी त्या सदैव आतुर असतात. बरं हे पुरेसं नाही म्हणून कदम काका आणि नंदिनी मॅडम यांचं मेतकूट जुळवलेलं आहे. लग्न वाईट नाही, आमचा त्याला विरोध नाही. पण मराठी मालिकांत त्याची सक्तीच असते. १८ ते २८ वयोगटातले मुलं-मुली एकमेकांशी बोललं की डायरेक्ट लग्न. नॉर्मल सहकारी म्हणून, माणूस म्हणून कोणी बोलू शकत नाही का?

मध्यंतरी एक ‘कन्यादान’ पार पडलं. कडक शिस्तीच्या सरकारी अधिकाऱ्याची मुलगी. एसवायला वगैरे असेल. शिकू दे की तिला राव. तिला अजिबातच न साजेशा माणसाशी लग्नाचा घाट असाच मुळी मालिकेचा ट्रॅक. बरं हा मुलगा बिझनेस वगैरे सांभाळतो म्हणे. पण ते सोडून सदासर्वकाळ कॉलेजमध्ये डान्सच्या प्रॅक्सिटला कसा येऊ शकतो असा प्रश्न आम्हाला पडला. बरं कॉलेजचं फेस्टिव्हल ते. सहा सात महिने एकाच गाण्यावर प्रॅक्टिस-चिटिया कलैया रे. एवढय़ा वेळात अख्ख्या पिक्चरचं शूटिंग होईल. हल्ली नुसतं ग्रॅज्युएशन नुसतं चालत नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. हल्ली तर पीएच.डी.ही कमी पडू लागलेय. असं असताना कॉलेजात शिकणाऱ्या मुलीचं लग्नच डायरेक्ट. मुलगा कसा आहे, वाममार्गी नाही ना यासाठी ते कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी त्या मुलाला घरीच राहायला आणतात- परीक्षेसाठी. बरं बाबांचा धाक एवढा की संध्याकाळी पिक्चरला जाऊ का असंही विचारावं लागतं, पण त्याच वेळी कपडे मात्र वेस्टर्न चालतात.

लग्न हा एवढा यशस्वी फॉम्र्यूला की त्यावरून क्रमश: गोष्टीही निघतात. एका लग्नाची पहिली गोष्ट मग दुसरी गोष्ट अशी चळतच मांडली जाते. पात्रं बदलतात, त्यांची ऑक्युपेशन्स बदलतात, सेट बदलतो, पण फोकस एकच- लग्न. माणसं थोडीवर्ष विनालग्नाची राहिली तर समाजाचं अध:पतन होईल अशी भीती निर्माते, चॅनेलकर्मी यांच्या मनात असावी. लग्न म्हटलं की मोठ्ठा ड्रामा दाखवता येतो. अगदी लार्जर दॅन लाइफ असा. एवढंच कशाला, लग्नाच्या पत्रिकेवर अख्खा एपिसोड निघू शकतो.

आमच्या ‘श्री’जी आणि जान्हवीताई यांनी तर सपाटाच लावलाय लोकांची लग्न करून देण्याचा. त्यांनी पिंटय़ादादा आणि सुनीतादीदीला बोहल्यावर चढवलं. मनीषराव आणि गीताताईंना लग्न करायला भाग पाडलं. अत्यानंद महाराजांच्या परमभक्त सरस्वती मावशीला चाळिशीत लग्न करायला लावलं त्यांनी. बेबी आत्याला बेबीपणातून बाहेर काढत लग्नासाठी तयार केलं. कांता आणि छोटीआई यांचं लग्न मोडल्यागत होतं. तेही मार्गी लावलं.

रेशीमगाठी जुळून आल्या होत्या. तिथेही तेच-आदित्यदादा आणि मेघनाताई. त्यांचं लग्न कसं होईल, त्यांचं आधीचं आदित्यप्रकरण बाहेर तर येणार नाही यातच सरली सगळी र्वष. धोरणसुसंगत वागायला हवंच की-मग त्यांनी चित्राताईंचं लग्न लावून दिलं.

अन्य ठिकाणी डोकावू या. नांदा सौख्यभरे- नावातच पाहा. शीर्षकगीताचा व्हिडीओ पाहा. दाखवण्याच्या कार्यक्रमासाठी मंडळी चालली आहेत. दुसरं काहीच नाही आयुष्यात पडद्यावर दाखवण्यासारखं. लग्न हा ठाशीव मार्केट यूएसपी अगदी मान्य. पण आपण रोज अन्य गोष्टीही जगतोच की. देशपांडेंच्या दोन मुलींचं लग्न, सासरकडची मंडळी, सासर यापलीकडे काहीही नाही. स्वानंदीताई क्लासमध्ये शिकवतात म्हणे. ते एकदम गौण. संपदाताई खाजगी कंपनीत काम करतात. काय बुवा काम करतात त्या, कुठे करतात हे अजिबात महत्त्वाचं नाही.

अस्सं सासर सुरेख बाई- पहिल्या फ्रेमपासून मध्यमवर्गीय यश महाजन यांच्या लग्नासाठीच सीरियल सुरू झाल्याचं कळतं. काडीशास्त्रज्योतिषकार त्यांचे काका यांच्या अंदाजानुसार म्हणे यशजींच्या भविष्यात राजयोग आहे असं सांगतात. विभावरी इनामदारांशी यशरावांचं जमावं अशी काकाकाकूंची इच्छा आहे तर यशजी जुई नारायणी यांच्यात गुंतलेत. त्यांनाही यशजी आवडू लागलेत. म्हणजे काय एकूण लग्नकल्लोळ कायम आहे. बरं हा त्रिकोण पुरेसा नाही म्हणून यशजींचे मित्र अविनाश आणि भगिनी रेखाताई यांच्या लग्नाचा ट्रॅक आहेच. सामाजिक दायित्व म्हणून यशजींनी कार्यालयातल्या एका सहकारीचे लग्न लावून दिले. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न करणाऱ्या त्या जोडप्याचं देवळात लग्न लावून देतात.

माझे मन तुझे झाले-नावातच मामला सेट आहे. शेखरराव गणिताचे प्राध्यापक वगैरे. शुभ्रा त्यांच्या विद्यार्थिनी. वयात अंतरही बरंच. यांना शिकू द्या, त्यांना शिकवू द्या की. पण नाही लग्नगाठी जुळल्याच. बरं शुभ्राताईंची आणि शेखररावांची फार अशी केमिस्ट्री वगैरे जुळली असंही नाही. बस लग्न व्हायला हवं.

प्रीत परी तुझ्यावरी-अल्लड वाटू शकणारे मुलगा-मुलगी. लग्न विषय सोडून त्यांचं आयुष्य असेलच की. पण नाही, मालिकेचं नावच प्रीत परी तुझ्यावरी म्हटल्यावर स्कोपच नाही राव. तुमचं आमचं सेम असतं यातही प्रेमकहाणी, रुसवेफुगवे आणि ओघाने येणारं लग्न. मराठी कवितेला साचेबद्धतेतून बाहेर काढणाऱ्या कवींमध्ये मंगेश पाडगांवकरांचं नाव घेतलं जातं. मात्र त्यांच्या ओळींच्या नावाने सुरू झालेल्या मालिकेत मात्र लग्नाचा साचा सेम आहे. काही दिवसांपूर्वी ‘मानसीचा चित्रकार तो’ मालिका आलेली. मानसी, चित्र, प्रेम, लग्न-मालगाडी तिथेही कायम होती.

मराठी मालिका दाखवणारी चॅनेल्स आहेत मोजकी. त्यातही सगळीकडे लग्नकल्लोळ पाहून विषयांची तीव्र टंचाई जाणवते. ही टंचाई जेव्हा सरेल तेव्हा नक्कीच काहीतरी सकस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पराग फाटक –