कव्हरस्टोरी
दुसऱ्याला काहीतरी देणं, आपल्याजवळच्या एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यासाठी त्याग करणं ही संकल्पना अगदी पूर्वापारपासून आहे. सगळ्याच धर्मानी तिला सर्वोच्च महत्त्व दिलं आहे. पण आता मात्र दान या संकल्पनेचा आजच्या संदर्भात विचार करायची गरज आहे.

दानाचा पहिला उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो. ऋग्वेदामध्ये दानस्तुतीपर सुक्ते आली आहेत. दान करणाऱ्या यजमानाला स्तुतीपर आशिर्वचन आली आहेत. दानदाता आणि प्रतिग्रहिता, असे त्याचे स्वरुप आहे. दाता म्हणजे देणारा आणि प्रतिग्रहिता असे दोन असतात. कुठलेही धर्मकार्य केल्यानंतर दक्षिणा देणे हा आपल्याकडे सर्वसाधारण धार्मिक कार्याचा भाग मानला जातो, तर कोणतेही यज्ञकर्म दानाशिवाय अपूर्ण ठरते, असे धार्मिक ग्रंथांमध्ये म्हटले आहे. दक्षिणा हेही एका अर्थाने दानच असते. वर्णाश्रम विचारामध्ये ब्राह्मणांना सहा आवश्यक कर्मे सांगितली आहेत. त्यात अध्ययन, अध्यापन, यज, याजन, दान आणि प्रतिग्रह असा उल्लेख आहे. त्यांना दान स्वीकारण्याचा अधिकार असल्याचे प्राचीन ग्रंथात उल्लेख येतात, तर क्षत्रियांकडून धर्म म्हणून ज्या अपेक्षा व्यक्त झाल्या आहेत त्यात क्षमा, शुचिता यांबरोबर धर्मकर्माच्या यादीत दानाचाही समावेश करण्यात आला आहे. ‘शरयतेजं कृती: दाक्ष: दानं ईश्वर भावश्च क्षात्रं कर्म’ अशा आशयाचा उल्लेख आहे. देणे हा त्याचा धर्म असून दानामुळे ईश्वरभाव प्राप्त होतो, असा उल्लेख आहे. तुम्हाला मिळालेली संपत्ती दानरूपाने देता तेव्हा तो ईश्वरभाव प्राप्त होतो. गीतेमध्येही दानाचा उल्लेख आहेच.
साधारण धर्म नावाचा एक प्रकार असतो प्रत्येक धर्मामध्ये. त्यात अहिंसा, सत्य आदी प्रमुख बाबींचा समावेश असतो. जगातील सर्व प्रमुख धर्माचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, सर्वच धर्माच्या सामायिक आचरणतत्त्वांमध्ये दानाचा समावेश हा आहेच आहे. आपल्याकडे म्हणजे हिंदूू धर्मातही दानाचा समावेश आहे. सुचिता दक्षपानंह्ण असा उल्लेख येतो. गीतेत दैवी संपन्न म्हणजे चांगल्या गुणांचा समावेश आहे. त्याग आणि अहिंसा, सत्य इत्यादी गुणांबरोबरच त्याग आणि दानाचा समावेश केला आहे. त्याग आणि दान हे परस्परपूरकच आहेत. यजनपूजना(पूर्त) बरोबरच लोकापयोगी कार्यानाही सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्यात त्यागाचा समावेश आहे. त्याग म्हणजे दुसऱ्या अर्थाने दानच होय. या दानामध्ये सर्वच धर्मात लोकोपयोगी गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. आपल्याकडे तर सात्त्विक, राजस आणि तामस असे दानाचे तीन प्रकार सांगितले आहेत. गीतेच्या १७व्या अध्यायामध्ये दानाचा उल्लेख करताना देश, काल आणि पात्र यांचा विचार करावा, असे म्हटले आहे. म्हणजेच त्याचे उपकार आपल्यावर नाहीत किंवा त्या दानामागे कोणताही अंतर्हेतू नाही, परतफेड म्हणून केलेले नाही किंवा त्यातून कोणालाही क्लेश उत्पन्न होणार नाही, अशा दानाला सात्वीक दान असे म्हटले आहे. केवळ मला द्यायचे आहे म्हणून दिलेले दान असे त्याचे स्वरूप असते.
एखादे दान हे अदेशकाले व अपात्रे म्हणजे ते कोठे व कोणाला द्यायचे याचा विचार केलेला नाही असेही असू शकते, मात्र ते देताना त्यामागे घेण्याऱ्याविषयी सन्मान आणि आदरभाव नसला त्यामुळे ते तामस ठरते. जेव्हा ते करताना किंवा देताना त्यामागे आदरभाव मात्र पुरेपूर असतो. म्हणजे तुझ्यासारख्या भिकारडय़ाला काय त्याचे, पण चल जाऊ दे देऊन टाकतो तुला, असे म्हणत दिलेले दान हे अपमानास्पद प्रकारात मोडते. जेव्हा परतफेड म्हणून किंवा कोठल्यातरी आतल्या हेतू तसेच दुसऱ्याला क्लेष पोहचेल अशारितीने दिलेले दान मध्यम प्रतीचे म्हणजे तामस ठरते.
कोणकोणत्या बाबींसंदर्भात दान दिले जाते याचा शोध घेतला तर असे लक्षात येते की, व्याधी संपण्यासाठीही दान देण्याची पद्धत होती. ‘दानेन हरते व्याधिम् असा श्लोकच आहे. गोदान करा, असे त्या वेळेस अनेकदा सांगितले जायचे. महत्त्वाचे म्हणजे ज्ञान मिळविण्याच्या मार्गावर किंवा निर्वाणाच्या मार्गावर जाण्यासाठी सर्वसंगपरित्याग करण्यास सांगितले आहे, यातही दान आहेच. स्वत:चे म्हणून काहीही ठेवायचे नाही, असे सांगितले आहे. म्हणूनच नचिकेताच्या कथेत त्याचे वडिल सर्व काही देऊन टाकत आहेत हे पाहून तो वडिलांना विचारतो की, तुम्ही सर्व दान करणार, मग बाबा, तुम्ही मला कुणाला देणार? त्यावर त्याचे वडील म्हणतात की, यमाला देणार..

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

सुरुवातीच्या काळात समाजामध्ये असलेल्या दानाचेच पुढचे रूपांतर सर्वच धर्मामध्ये सुरू झालेल्या तीर्थयात्रांमध्ये दिसते. या तीर्थयात्रांचा दानाशी अन्योन्यसंबंध आहे.

दान देताना लोक पूर्वी हजार वेळा विचार करायचे. मला आठवते की, माझ्या वडिलांना एका व्याधीमध्ये खूप त्रास होत होता. त्या वेळेस त्यांना वैद्य मित्राने सांगितले की, अरे, पुराणात सांगून ठेवले आहे की, दानेन हरते व्याधिम्. मग तू दान का करत नाहीस? दानामध्ये सर्वोत्तम मानले जाते ते गोदान. तर गोदान कर म्हणजे विकार कमी होईल. त्यावर वडील म्हणाले की, गोदान करून प्रश्न सुटणार नाही. ज्याला गोदान करणार त्याला गाईला चारा तर देता आला पाहिजे. म्हणजेच गाईबरोबर पाच एकर जमीनही दान करावी लागेल.. आता खरे तर काळ बदलला आहे. त्यामुळे आपण काळानुसार या संकल्पनांमध्ये बदल करायला हवा, असे मला वाटते.
वेगवेगळ्या धर्मामध्ये याचा विचार वेगळ्या पद्धतीने झाला आहे. जैन धर्म असे मानतो की, पूर्वजन्मातील पापांमुळेच व्याधी उत्पन्न होतात. ते केवळ भोगूनच कमी होते. सुकृताच्या मार्गाला लागण्यापूर्वी आपले वाईट कर्म आधी संपावे लागते आणि ते भोगूनच संपते. त्यामुळे आहे त्या परिस्थितीला सामोरे जा, असे जैन धर्म सांगतो. जवळपास सर्वच धर्मामध्ये आणखी एक साम्य आहे, ते म्हणजे सर्वसंगपरित्यागानंतरही सर्वानीच काही बाबी मात्र सोडू नयेत, असे म्हटले आहेत, त्यात दानकर्म असा स्पष्ट उल्लेख आहे. हिंदूूंमध्येही सर्वसंगपरित्यागानंतरही यज्ञ, दान आणि तप:कर्म सोडू नये असे म्हटले आहे. गीता असे सांगते की, या तिन्हींमधून मिळणाऱ्या फळाचा त्याग करा, पण या बाबी करणे सोडू नका. ‘यज्ञो ज्ञानम् तप:कर्म पावनानी मनिषिणाम’. दानामुळे मन शुचिर्भूत होते, असे गीता सांगते.
प्राच्यविद्येमध्ये प्रवीण असलेल्या भांडारकर यांनी सेश्वर उपनिषदांवर लिहिले आहे. ही ईश्वर मानणारी उपनिषदे होत. सेश्वर उपनिषदामध्ये रुद्र तोच ब्रह्मस्वरूप आहे, असे सांगितले आहे. ब्रह्म, रुद्र याकडे जाण्याचा मार्ग संसाराच्या त्यागातून जातो. वैदिक धर्मात मातृऋण, पितृऋण, आचार्यऋण आणि समाजऋण अशी ऋण संकल्पना सांगितली आहे. आपण जन्माला आल्यानंतर नियत कर्म करत जातो, तसतशी यातील अनेक ऋणे आपल्या खांद्यावरून उतरतात, असे मानले जाते. संतती झाल्यानंतर माणूस सर्व ऋणांतून मोकळा होतो. त्यानंतर तो संन्यास घेऊ शकतो. या सर्व ऋणांनतर त्याचा स्वार्थही संपतो, तेव्हाच तो मोक्षाच्या मार्गावर जाऊ शकतो. त्या वेळेस त्याचा परतत्त्वाशी संबंध येऊ शकतो. हा परतत्त्वाचा संबंध ब्रह्म त्या व्यक्तीची निवड करते, त्या वेळेस होतो. हा संबंध आणि निवड याबद्दल म्हटले आहे की, ‘न ज्ञानेन, न मेधया, न तपसा यं एव येषभुनिते..’ म्हणजेच ध्यान, ज्ञान, बुद्धी किंवा तपाचरण यांच्यामुळेही ते मिळत नाही. म्हणूनच ब्रह्माने केलेली निवड ही प्रसादरूप असते. प्रसाद या शब्दाला अनेक अर्थ आहेत. अस्वच्छ पाण्यातील गाळ खाली तळाला बसतो त्या वेळेस ते पाणी प्रसन्न झाले, असे म्हणण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच ज्या मनात आता काही शिल्लक नाही असे निर्मळ मन प्रसन्न मानले जाते. प्र-सादयती अशी त्यामागची संकल्पना आहे आणि प्र-सादयतीपर्यंत पोहोचायचे तर सन्मार्गाने किंवा सत्पात्री केलेले दान हाच मार्ग सांगण्यात आला आहे. म्हणजे सत्पात्री किंवा सात्त्विक दानामुळे मन स्वच्छ किंवा निर्मळ होते, असे मानले जाते.
बौद्ध धर्मातही असे म्हटले आहे की, ‘मला वाटतं म्हणून दान केले’ असे दान हे सर्वोत्तम दान मानले जाते; किंबहुना म्हणूनच त्यासाठी दानधर्म असा शब्दप्रयोग अस्तित्वात आला असावा. कोणत्याही अपेक्षेशिवाय किंवा स्वत:ची प्रवृत्ती म्हणून केलेले असे ते दान असते. हे दान हा माझा प्रसाद आहे, असे बुद्ध म्हणतात. बौद्ध उपासकही ‘दानं प्रसाद:’ हे बुद्धवचन मानतात. बौद्ध धर्मामध्ये महायान संप्रदायाच्या कालखंडात दानाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. प्रत्येक जण बौधिसत्त्व होऊ शकतो. प्रत्येकाला बुद्ध होता येईल, हेच या संप्रदायाचे प्रमुख तत्त्वज्ञान आहे. त्यात सामान्यजन जे केवळ उपासक असतात, त्यांनाही बोधिसत्त्व होण्याचा मार्ग सांगितला आहे. त्यानुसार त्यांनी बुद्धाने सांगितलेल्या अरिय अष्टांगिक मार्गाचा म्हणजे सत्प्रवृत्तीच्या मार्गाचा वापर करून कमावलेले धन किंवा संपत्ती बौद्धसंघाला दान केली तर त्यातून त्यांना पुण्य मिळते, जे त्यांना नंतर बोधिसत्त्व होण्याच्या मार्गावर घेऊन जाते, असे म्हटले आहे. याच दानामुळे तर देशभरामध्ये सर्वत्र लेणी उभ्या राहिल्या. बौद्ध कालखंडात खोदण्यात आलेल्या या लेणी आज जगातील अप्रतिम सौंदर्याचा नमुना मानल्या जातात. यातील अनेक लेणींना जागतिक वारशाचा मानही मिळाला आहे. या लेणींमधील शिलालेख वाचण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये विशद केलेले दानाचे महत्त्व लक्षात येते.
औरंगाबादजवळच्या अिजठा लेणींनाही जागतिक वारसा यादीत स्थान असून या लेणी कलेच्या बाबतीत सर्वोत्तम मानल्या जातात. यामध्ये असलेल्या शिलालेखात भूतपाल म्हणतो, ही लेणी जंबुद्वीपातील सर्वोत्तम आहेत. याचे दान मी माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी दिले असून त्यामुळे ती तर होईलच, पण त्या पुण्यकर्माबरोबर आई-वडिलांनाही मोक्षप्राप्ती होईल. एवढेच नव्हे, हे दान एवढे व्यापक आहे की, त्या दानामुळे जगातील सर्व प्राण्यांनाही मोक्ष मिळेल, ते बोधिसत्त्व होतील. सर्व जगाच्या हितामध्येच माझे (आध्यात्मिक प्रगतीचे) हित दडलेले आहे. बौद्ध धर्म हा एके काळी जगात सर्वाधिक पसरलेल्या धर्मापैकी एक होता, त्यामुळे त्यातील दान परंपरेची दखल इतरही अनेक धर्माना त्यांच्या परीने घ्यावीच लागली.
दानाची हीच संकल्पना ख्रिश्चन धर्मामध्येही आहे. तिथेही ख्रिस्ताशी सांकेतिक एकरूपत्वासाठी वेफर आणि वाइन यांचा उल्लेख प्रसादरूपाने येतो. यातील वेफर म्हणजे ख्रिस्ताची हाडे तर वाइन म्हणजे रक्त असा संकेत आहे. ते प्रसादरूपाने समोर येते तेव्हा त्याच्याशी भक्त तादात्म्य पावतो. त्या प्रसादामुळे तो मनाने निर्मळ होतो, असे ख्रिश्चन धर्म मानतो आणि तो प्रसाद हा नि:स्वार्थी त्याग अर्थात दानातून येतो.
जैन धर्मामध्येही म्हटले आहे की, दान केल्यानंतर तुमच्या पापांचा नाश होतो. मोक्षाकडे जाण्याच्या दोन शिडय़ा आहेत. त्यातील उपशमाची म्हणजेच इंद्रिय संयमाची आहे, तर दुसरी पापक्षयाची आहे. इंद्रियांच्यावर ताबा मिळवल्याने नवीन पापाचा संचय होणे टळते. तर सदाचरण आणि तपामुळेच पापचा क्षय होतो.
बौद्ध धर्मामध्येही असे म्हटले आहे की, भिख्खूसंघातील भिख्खू किंवा श्रमण हे सामान्यांना धर्मदान करतात, तर सामान्य माणसे त्यांना भिक्षा देतात आणि त्यानिमित्ताने उपजीविकेचं दान करतात. दान ही संकल्पना या इथे सर्वोच्च तत्त्वाच्या पातळीवर जाते आणि दानाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच पार बदलून जातो. सुरुवातीच्या काळात समाजामध्ये असलेल्या या दानाचेच पुढचे रूपांतर सर्वच धर्मामध्ये सुरू झालेल्या तीर्थयात्रांमध्ये दिसते. या तीर्थयात्रांचा दानाशी अन्योन्यसंबंध आहे.
एकूणात काय तर आध्यात्मिकतेचा संबंध हा समाजाशी राहावा आणि त्या निमित्ताने लोकोपयोगी कामे व्हावीत, हाच यामागचा प्रमुख हेतू दिसतो. कारण सर्वच धर्म कमी-अधिक फरकाने लोकांसाठी किंवा समाजासाठी काय करावे, याची शिकवण देतात. त्या शिकवणीमध्ये दान हे सर्वप्रथम येते. दानाच्या या संकल्पनेमागे सोशल कमिटमेंट प्रत्येक धर्माने सांगितली आहे, पण आता त्या पूर्वापार दानांमध्ये बदल व्हायला हवा. गाईला चारा देऊन मोक्ष मिळणार नाही, तर गरजू रुग्णांची सेवा करून आपला वेळ चांगल्या मार्गाने दान करण्याचा पर्याय स्वीकारायला हवा. सध्याच्या जमान्यामध्ये ज्ञानदान हे मोठे दान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधांची उभारणी व्हायला हवी. अनाथांसाठी अनाथालये व्हायला हवीत. दानाचे रूपही काळानुसार बदलायला हवे. एका महामानवाला हे कळले आणि त्याने ते रूप बदलले, त्यांचे नाव विनोबा भावे. भूदान आणि श्रमदान या संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात समाजामध्ये मोठय़ा प्रमाणावर राबविल्या. एका वेगळ्या अर्थाने बोलायचे तर ती नवीन दानक्रांतीच होती.