News Flash

मेसेज – द मेसेंजर ऑफ गॉड

वर्षांच्या अखेरचा आठवडा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’ चित्रपटाने गाजवला. सर्वसामान्य जनतेसमारे दुसरी बाजू आणण्याचा प्रयत्न करून थोडय़ाफार प्रमाणात सजग करण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला.

| January 2, 2015 01:03 am

वर्षांच्या अखेरचा आठवडा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’ चित्रपटाने गाजवला. सर्वसामान्य जनतेसमारे दुसरी बाजू आणण्याचा प्रयत्न करून थोडय़ाफार प्रमाणात सजग करण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला. विनोदाच्या माध्यमाचा अचूक उपयोग करून नेमके प्रश्न उपस्थित करून त्यांच्या उत्तरांच्या फंदात न पडताही ‘बीलिव्हर्स’ना विचार करायला लावणारा हा सिनेमा गाजला.
नवीन वर्षांत गुरमित रामरहिम सिंगजी इन्सान यांचा ‘मेसेज : दी मेसेंजर ऑफ गॉड’ या नावाचा सिनेमा १६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. गुरमित रामरहिम सिंगजी इन्सान हे डेरा सच्चा सौदा या संप्रदायाचे प्रमुख आहेत. एक गायक, संगीतकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.
‘मेसेज : दी मेसेंजर ऑफ गॉड’ या आपल्या पहिल्याच सिनेमाद्वारे संत गुरमित रामरहिम सिंगजी इन्सान अभिनेता-दिग्दर्शक-गायक-लेखक अशा सर्व महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांचे रॉक आल्बम गाजले असून अलीकडेच ‘लव्ह चार्जर’ हे त्यांनी गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. संत किंवा एका आध्यात्मिक पंथाचे प्रमुख असूनही गुरमित रामरहिम सिंगजी इन्सान यांनी आजच्या आधुनिक काळाला अनुसरून रहस्यमय आणि अॅक्शनपट अशा पद्धतीचा सिनेमा तयार केला असून, १६ जानेवारी रोजी हा सिनेमा हिंदीसह इंग्रजी, तामीळ आणि तेलुगू या भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
संत आणि डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख असण्याबरोबरच रॉकस्टार, प्रवचनकार आणि आता ‘सुपरहीरो’ बनून गुरमित रामरहिम सिंगजी इन्सान रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. हे सारेच अप्रूप नेमके काय आहे ते चित्रपट पाहिल्यानंतरच कदाचित लोकांना समजू शकेल.
रंगीबेरंगी सुपरहीरो वेश परिधान करून गुरमित रामरहिम सिंग एखाद्या बॉलीवूडच्या अभिनेत्यासारखे स्टण्ट्स करताना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमातील सर्व स्टण्ट्स त्यांनी स्वत:च केले आहेत, असे सांगण्यात येते. त्याशिवाय हर्ले डेव्हिडसनसारखी अवाढव्य मोटारसायकल चालवितानाही ते रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत.
‘मेसेज : दी मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या कथानकात ते गुरुजी ही प्रमुख भूमिका साकारत असून, गुरुजी हे व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरमित रामरहिम सिंगजी इन्सान यांच्या वास्तवातील रूपाचेच एक पडद्यावरील रूप आहे असे म्हणता येईल. कारण सिनेमातही गुरुजी ही व्यक्तिरेखा एका आध्यात्मिक गुरुची असून या गुरुजींचे असंख्य भक्त आहेत. समाजातील दुष्ट प्रवृत्ती, अमलीपदार्थाचे सेवन, त्याची विक्री हे सारे रोखण्याचे आव्हान गुरुजी पेलतात. लिंगाधारित व्यवस्थेलाही गुरुजी आव्हान देतात. त्यामुळे समाजव्यवस्था सुस्थितीत राहावी असे ज्यांना अजिबात वाटत नाही, ते खलनायकी स्वरूपाचे लोक गुरुजींवर प्रचंड संतापतात. कारण त्यांचे काहीच चालत नाही. अशा स्वरूपाचे कथानक या सिनेमाचे आहे.
गुरुजी या व्यक्तिरेखेचा पडद्यावरील वावर, हेलिकॉप्टर्स, हर्ले डेव्हिडसन बाइक, बर्फाचा डोंगर चिरून त्यातून बाहेर येणे या सगळ्या आपण अनेक बॉलीवूडपटांमध्ये पाहिलेल्या गोष्टी या सिनेमातही दिसणार आहेत.
असत्ला नष्ट करून सत्चा प्रचार-प्रसार करणे हाच थोडक्यात या सिनेमाचा उद्देश असावा. दिग्दर्शनासाठी गुरमित रामरहिम सिंग यांनी टीव्ही मालिकांचे दिग्दर्शक जितू अरोरा यांची मोठी मदत घेतली आहे. हकिकत एण्टरटेन्मेंट या कंपनीच्या अधिपत्याखाली चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून, जगभर आपल्या पंथाचे भक्त वास्तव्य करीत असल्यामुळे भारतासह हा सिनेमा अनेक देशांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल हा सिनेमा करील असा दावाही करण्यात आला असून, हा पैसा जगभरातील थॅलेसेमिया रुग्णांच्या औषधोपचारांसाठी खर्च केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:03 am

Web Title: upcoming movie message messenger of god
Next Stories
1 दक्षिणी रिमेकचा ‘तेवर’
2 तितली
3 करमणूक करणारा ‘मध्यमवर्ग’
Just Now!
X