01ujjwalaमोबाइलमुळे होऊ शकणाऱ्या दुष्परिणामांची यादी वाचून सामान्य माणसाला घाबरून जायला होतं. पण काही पथ्य पाळत मोबाइल वापरला तर तो आपला स्मार्ट मित्र ठरू शकतो.

‘‘हल्ली मी डॉक्टरांच्याकडे जातच नाही. माझ्या प्रकृतीबद्दलचा नेमका आणि खात्रीचा सल्ला मला माझ्या मोबाइलकडूनच मिळतो. तो माझ्या रक्तातली साखर वेळच्या वेळी तपासतो, इन्सुलिन किती घ्यावं ते सांगतो, माझ्या प्रत्येक शंकेचं निरसन तत्परतेने करतो. शिवाय धडधड, थकवा, वेदना वगैरे सगळ्या तक्रारींचं ताबडतोब निदान करून त्यांच्यावरचा अचूक तोडगाही सांगतो.’’

असा खिशातला धन्वंतरी प्रत्येकाला मिळाला तर..?

त्या भन्नाट कल्पनेवर रॉबिन कुकची ‘द सेल’ नावाची विज्ञानरंजक कादंबरी आधारलेली आहे. बुद्धिमान, शिकाऊ संगणकाचं अमानुष तर्कशास्त्र, त्याचा अनिर्बंध वापर आणि संवेदनाशील माणसाने त्याच्याशी दिलेली झुंज या संघर्षांतून कादंबरीचं थरारनाटय़ साकारतं..

आणि कानफाटय़ा मोबाइलच्या खलनायकी प्रतिमेवर शिक्कामोर्तब होतं!

मोबाइल-फोन प्रचलित व्हायला लागल्यापासूनच अनंत समस्यांचं खापर त्याच्या माथ्यावर फोडलं गेलं आहे. नव्या सुनेसारखंच प्रत्येक नव्या शोधाचंही स्वागत साशंक मनानेच होतं. लेखनाचा प्रसार झाला तर स्मरणशक्ती दुबळी होईल याची

सॉRे टिसला खात्रीच होती. छापखान्यांमुळे आलेला माहितीचा पूर भ्रमिष्टपणा वाढवेल अशी भीती सोळाव्या शतकातल्या जाणत्यांना वाटली तर रोजची ताजा खबर पेपरातून वाचल्यामुळे लोकांचं एकमेकांशी संभाषण बंद होईल अशी अठराव्या शतकातल्या फ्रेंच पुढाऱ्यांना आशंका होती.

मोबाइल फोन तर आल्याआल्या कानाकानाशी अहोरात्र लगटले. नवलाईच्या त्या सलगीमुळे नवलाख कुशंकांचा पूर आला. ‘मुलं मोबाइलवर बोलण्यात, गेम्स खेळण्यात वेळ घालवतात आणि अभ्यास, खेळ वगैरेंकडे दुर्लक्ष करतात’, ‘मोबाइलवर बारीक अक्षरांतला मजकूर सतत वाचून डोळे कोरडे होतात; त्यांच्यावर ताण येतो, मग डोकंही दुखतं’, ‘रात्री मोबाइल उशाशी ठेवून पुन्हापुन्हा पाहिला की झोप नीट लागत नाही’, ‘मोबाइल फोन आणि व्हॉट्सॅपवर संपर्क साधल्यामुळे माणसं हल्ली एकमेकांशी संवाद साधत नाहीत; एकलकोंडी होत चालली आहेत’, ‘खालमुंडी ठेवून तासन्तास मोबाइलवर टाइप केल्याने बोटांचे सांधे धरतात; मान अवघडते, पाठ दुखते’, ‘बाहेरून आल्यावर हातापायांबरोबर मोबाइल धुतला जात नाही. त्याने जंतू फैलावतात’… अशी एक ना दोन, अनेक खुसपटं काढली गेली. पण त्यांच्यातले बहुतेक दोष वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ आहेत हे सहज ध्यानात येतं. त्यामुळे मोबाइलचा वापर वाढतच गेला.

मोबाइलच्या लहरी आणि भट्टीतल्या मायक्रोवेव्हज यांची जातकुळी एकच असल्याचं समजल्यावर नव्याने घबराट फैलावली. मोबाइलच्या लहरींनी जवळपासचं तापमान वाढू शकतं. बाह्य़कानापासून मेंदूपर्यंत हाडाचा अडसर नसतो. सतत कानाशी धरलेल्या मोबाइलमुळे मेंदूकडे मायक्रोवेव्हज जात राहतात. पण दहा वर्षांच्या अभ्यासात तशा वापरानेही मेंदूवर काही लक्षणीय परिणाम झाल्याचं आढळलं नाही.

तरीही आरोपांचं गांभीर्य वाढत गेलं. ‘मोबाइलमुळे ऑटिझम होतो’, ‘मल्टिपल स्क्लेरॉसिस होतो’, ‘हृदयाच्या पेसमेकर्सच्या कामात मोबाइलच्या लहरींनी अडथळा येतो’, ‘अतिदक्षता विभागातल्या जीव वाचवणाऱ्या यंत्रणेचं कामकाज त्यांच्यामुळे ठप्प होतं’ असेही आळ आले. त्यांनाही वैज्ञानिक आणि वैद्यकीय पुराव्यांचं पाठबळ मिळालं नाही.

मग सहज फेटाळता न येणारे आरोप सुरू झाले. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचं मूळ मोबाइलच्या लहरींत असल्याचा बोभाटा झाला. त्याला अपुऱ्या अभ्यासाचा आणि फुटकळ अहवालांचा आधार दिला गेला. अणुऊर्जेच्या गॅमा लहरी आणि क्ष-किरण यांनी कॅन्सर होऊ शकतो, तर तो मोबाइलच्या लहरींनीही होईलच असा दावा तर्कशुद्ध वाटतो, दुष्टशंकी मनाला पटतो. पण विज्ञानाचे नियम मानवी तर्काशी सुसंगत असतातच असं नाही. सूर्यप्रकाशाच्या लहरींची शक्ती मोबाइल-लहरींच्या लाखोपटीने अधिक असते. अल्ट्राव्हायोलेट, गॅमा आणि क्ष किरण त्याहूनही अधिक शक्तिशाली आणि म्हणून घातक असतात. शरिरातल्या रसायनांचं विघटन करणं, डीएनएमध्ये दोष निर्माण करणं हे दुबळ्या मोबाइल-लहरींच्या आवाक्यातलं काम नाही. त्या कॅन्सरला कारणीभूत होतील हा दावा विज्ञानाला पटत नाही. अमेरिकेतल्या रॉबर्ट पार्कसारख्या आणि आपल्याकडच्या एस.टी.लक्ष्मीकुमारांसारख्या ऋषितुल्य शास्त्रज्ञांनी तसा जाहीर निर्वाळा दिला आहे. न्यू इंग्लंडमधल्या आठ वर्षें चाललेल्या प्रयोगातून किंवा युरोपमधल्या पाच देशांत मिळून अडीच लाख आणि डेन्मार्कमध्ये चार लाख मोबाइलधारकांवर केलेल्या प्रयोगांतही मोबाइलचे तसे दुष्परिणाम असल्याचं सिद्ध झालं नाही.

पण कुठल्याही गोष्टीचा दुष्परिणाम ‘कधीही होणार नाही’ हे सिद्ध करणं महाकठीण असतं. जोवर ते सिद्ध होत नाही तोवर तो किडा लोकांच्या डोक्यांतून निघत नाही. तरीसुद्धा मोबाइलने मिळालेल्या सुविधाही हव्याच असतात. त्यासाठी हट्टाने मोबाइल वापरला की मनातल्या संघर्षांमुळेच भलभलते त्रास सुरू होतात. तो संघर्ष टाळायला, केवळ मन:शांतीसाठी काही किरकोळ पथ्यं पाळायला काहीच हरकत नाही. लहरींची देवाणघेवाण मोबाइलच्या मागच्या भागातून होते. म्हणून फोन खिशात ठेवताना आपल्या अंगाला पाठमोरा न ठेवता सामोरा ठेवावा. मोबाइलवरून मुद्दय़ाचं तेवढंच बोलावं. वायफळाचे मळे फुलवू नयेत. व्यवसायासाठी मोबाइलवर बोलणं आवश्यक असलं तर स्पीकरचा किंवा इयरफोन्सचा वापर करावा आणि जेव्हा सोयीचं असेल तेव्हा टेक्स्ट करावं. जेव्हा संदेश पकडायला फोन धडपडत असतो, तेव्हा तो चाचपडायला अधिक लहरी बाहेर पसरवतो. म्हणून कनेक्शन लागेपर्यंतचा रिंगटोन ऐकत बसणं टाळावं. मोबाइलवरून बोलताना रेंज दाखवणाऱ्या रेषांवर लक्ष ठेवावं. एक-दोनच रेघा असतात तेव्हा चाचपडणं अधिकच वाढलेलं असतं. बंद गाडीत किंवा लिफ्टमध्येही तीच अडचण होते. तशा वेळी स्पीकरवर, मोजका निरोप देऊन संभाषण थांबवावं. रात्रीच्या वेळी गरज नसली तर मोबाइल बंदच करून ठेवावा म्हणजे उगाच झोपमोड होणार नाही.

इतकी पथ्यं पाळली की मोबाइल नि:शंकपणे वापरता येईल. मोबाइलच्या तंत्रात सतत नवी भर पडत असते. नेहमीचा वापर असला की त्या नवलाईच्या स्पर्धेत आघाडीवर राहणं आपसूकच जमतं. ती नवलाई केवळ छंदफंद, गप्पाटप्पा यांच्यापुरती मर्यादित नाही. संशोधनांनी सुसंस्कृत झालेला मोबाइल सात पावलंच नव्हे तर सात खंडं सोबत करणारा मित्र बनू शकतो. न्यूझीलंडमध्ये मीटिंग चालू असताना, कसलाही गाजावाजा न करता, व्हॉट्सॅपवरून न्यूयॉर्कमधल्या वरिष्ठांचा सल्ला मिळवून देतो आणि पुण्यातल्या आजारी बाळाची खुशालीही सांगतो. भारतात राहून अमेरिकेची कामं करणारे, विश्वचे युवा नागरिक पोटापाण्यासाठी रात्ररात्र जागतात. रात्रीबेरात्रीही मोबाइल गरजेला वाजेलच ही खात्री त्यांना अत्यावश्यक वाटते आणि तो वाजला नाही तर सगळं आलबेल असल्याची निश्चिंती लाभते. बहुतेक वेळा, खणखणीत साद घालू शकणारा मोबाइल उशाला घेऊनच त्यांना निर्धास्त झोप लागते. ती त्यांची प्राथमिक गरज आहे; व्यसन किंवा नोमोफोबिया नव्हे.

आताची तरुणाई हौसेचा प्रवासही बराच करते. जगभरातला प्रवास, गिर्यारोहण, रानावनातलं ट्रेकिंग यांत प्रकृतीच्या कुरबुरी होत नाहीतच असं नाही. पण प्रत्येक दुखण्यात, खिशातल्या मोबाइलमुळे घरचे डॉक्टर हाकेच्या अंतरावर सापडतात. अंगावर पुरळ आले, डोळे लाल झाले, पाय मुरगळला तर त्या भागाचे फोटो काढून ते डॉक्टरांना पाठवणं जमतं. योग्य सल्ला तात्काळ मिळतो. एव्हरेस्टसारख्या जान्यामान्या शिखरांची अठरा हजार फुटांपर्यंतची उंची आणि आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेल्या बहुतेक साहसवाटा ‘थ्री-जी’च्या कक्षेत येतात. सौर-ऊर्जेवर चालणारा फोन असला तर चाìजगचीही कटकट नाही. धाडसाच्या टापूतले विशिष्ट आजार जाणणारं अ‍ॅप फोनमध्ये आधीच भरून ठेवलं तर कित्येक दुखणी मुळातच निस्तरता येतात. आणीबाणी उद्भवलीच तर फोनवरून संपर्क तर साधता येतोच, पण व्हॉट्सॅप, फेसबुकावरूनही मदतीसाठी रान उठवता येतं.

दारू-सिगारेटचं व्यसन सोडताना नेमक्या मोहाच्या क्षणी कान धरणारे, नैराश्याच्या गर्तेत ब्लेडने मनगट कापण्यापूर्वी हात थोपवणारे आणि भयचिंतेने बुद्धीचा कडेलोट होण्यापूर्वी भक्कम आधार देणारे, औषध सुचवणारे समुपदेशकही स्मार्टफोनमुळे हाकेसरशी उत्तर देतात. परिस्थिती वेळच्या वेळी आटोक्यात येऊ शकते.

तरुण मातांना त्यांच्या स्वत:च्या प्रकृतीबद्दल, तान्हुल्याच्या संगोपनाबद्दल पदोपदी सल्ला हवा असतो. मधुमेही रुग्णांनाही रक्तातल्या साखरेच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांच्या मताची गरज वरचेवर भासते. तसं मार्गदर्शन करणारी मोबाइल-अ‍ॅप्स मातब्बर वैद्यकीय संस्थांच्या मदतीने बनवली गेली आहेत.

कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीतले डॉ.ऑझ्कॅन काडय़ापेटी एवढे जुने मोबाइल्स उलगडून त्यांना नवा संगणकी मेंदू देतात आणि त्यांच्यापासून वैद्यकीय प्रयोगशाळांतल्या अवजड यंत्रणांच्या चिमुकल्या, सक्षम आणि स्वस्त प्रतिकृती बनवतात. त्यांच्यातल्या इवल्याशा कुप्यांत पाणी, रक्त वगैरेंचे नमुने घातले की ते तपासून तिथल्या तिथे रिपोर्ट मिळतो. रक्तातली साखर, क्षार वगैरेंचं प्रमाण तर समजतंच, पण कुठल्याही दुर्गम भागातलं पाणी पिण्यालायक आहे की नाही, हवा किती दूषित आहे, वनस्पती विषारी आहेत का याचीही माहिती मिळते. जगभरातून तसे रिपोर्ट्स ज्या त्या पत्त्यासकट डॉ. ऑझ्कॅनकडे पोचतात. जगाच्या नकाशात मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून नोंदी होतात.

२०१२मध्ये स्मार्टफोनच्या पाठुंगळीवर बसणाऱ्या एका छोटय़ा यंत्राला एफडीएची मान्यता मिळाली. त्याला बोटांमधल्या स्पंदनांवरून हृदयाची अनियमित धडधड नोंदता येते. तशाच दुसऱ्या एका यंत्राला नाडी, श्वसनाचा वेग, रक्तदाब आणि रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण दहा सेकंदात मापता येतं. तसाच ईसीजी नोंदणारा मोबाइल-मित्रही लवकरच अवतरणार आहे. स्मार्टफोनसोबत स्वस्त एलईडी प्रकाश वापरून सूक्ष्म पेशींच्या गाभ्यात डोकावायचीही किमया मॅसॅच्युसेट्सच्या केम्ब्रिज विद्यपीठातल्या शास्त्रज्ञांना साधली आहे. आता प्रत्येक पेशीची ‘डीएनए-आरएनए’वाली सही त्या सुशिक्षित मोबाइलच्या संगणकी मेंदूला ओळखता येते. ती ताडून जंतूंची, एड्ससारख्या विषाणूंची लागण तो पटकन शोधू शकेल. जगभरातल्या भ्रमंतीत तसे मोबाइल-पाठीराखे तरुणाईच्या खिशात सहज मावतील आणि खिसा रिकामाही करणार नाहीत.

रॉबिन कुकच्या कादंबरीने मोबाइलच्या राक्षसाचं भेडसावणारं स्वरूप चितारलं हे खरं. पण त्यामुळे संशोधक सावध झाले. मोबाइल-अ‍ॅप्स कादंबरीतल्यासारखी हाताबाहेर जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर एफडीएने कडक र्निबध घातले. रुग्णांना आपल्या आपण, स्वतंत्रपणे उपचार करून घ्यायला शिकवणाऱ्या अ‍ॅप्सवर र्निबधक संस्थांनी करडी नजर रोखली आहे. सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या चाचण्या करायला पूर्ण मनाई आहे.

रुग्ण, डॉक्टर्स, संगणकतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि सुजाण नागरिक या साऱ्यांनी त्या अ‍ॅप्सच्या नेहमीच्या वापराबद्दलचं धोरण आखायला मदत करावी असं एफडीएचं आवाहन आहे. आपण, सुजाण माणसांनीच डोळ्यात तेल घालून ते धोरण नीट आखलं आणि वेळोवेळी कटाक्षाने सुधारलं तर मोबाइलचा भयावह भस्मासुर बनणार नाही. तो माणसाचा मायाळू मित्रच राहील.