News Flash

करिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : लसनिर्मितीच्या क्षेत्रातील संधी

लसनिर्मितीचा उद्योग हा जागतिक पातळीवरच्या सर्वात मोठय़ा उद्योगांपैकी एक मानला जातो.

लसनिर्मितीच्या क्षेत्रात येण्यासाठी विज्ञानाची आवड असणे गरजेचे आहे. लस उद्योगामध्ये जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र आणि जीवतंत्रज्ञान या विज्ञानाच्या शाखांतील ज्ञानाची गरज असते.

डॉ. गिरीश वालावलकर – response.lokprabha@expressindia.com

करोनाची महासाथ सुरू झाल्यापासून जवळपास गेलं दीड वर्ष संपूर्ण जगाचं लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित झालं आहे. ती म्हणजे – ‘करोना प्रतिबंधक लस’! शास्त्रीय व्याख्येप्रमाणे लस म्हणजे, ‘संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी सक्षम आणि सुयोग्य प्रतिकारशक्ती प्राप्त करून देणारे जैविक औषध!’  लसनिर्मितीचा उद्योग हा जागतिक पातळीवरच्या सर्वात मोठय़ा उद्योगांपैकी एक मानला जातो. बुद्धिमान आणि कष्ट करण्याची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या उद्योगात उत्तम करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये नवीन संधींची भर सातत्याने पडत आहे.

लस शरीरात टोचण्याच्या क्रियेला लसीकरण म्हटले जाते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीला त्या अपायकारक विषाणू वा घटकांची माहिती मिळते आणि त्यावर मात करण्याचा सराव आणि अनुभव मिळतो. त्यामुळे लसीकरण केलेल्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या शरीरात होत नाही. म्हणूनच लसीकरण हा कोणत्याही संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग मानला जातो.

लसनिर्मितीच्या क्षेत्रात येण्यासाठी विज्ञानाची आवड असणे गरजेचे आहे. लस उद्योगामध्ये जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र आणि जीवतंत्रज्ञान या विज्ञानाच्या शाखांतील ज्ञानाची गरज असते. या शाखेतील बी.एस्सी. किंवा बी.टेक.सारखी मूलभूत पदवी घेतल्यानंतर एम.एस्सी. अथवा एम.टेक.सारख्या पदव्या मिळवल्या तर या क्षेत्रात प्रवेश मिळण्याच्या शक्यता वाढतात. या क्षेत्रात उच्च स्थानावर पोहोचायचे असेल तर या विषयाशी संबंधित पीएच.डी. म्हणजेच डॉक्टरेट आवश्यक असते. या पदव्या, विशेषत: पदव्युत्तर आणि पीएच.डी.चा अभ्यासक्रम शिकवणारी काही मान्यवर महाविद्यालये आणि विद्यापीठे भारतात आहेत. बंगलोरची ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’, पुण्याची ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ (एनसीएल), मुंबईतील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यासारख्या भारतीय शिक्षण संस्थांना आणि तिथे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना जगभर प्रतिष्ठा आहे. या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. या स्पर्धा परीक्षा ‘द कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च, नवी दिल्ली (सीएसआयआर)’सारख्या केंद्रीय संस्था आयोजित करतात. काही शिक्षण संस्थांच्या स्वत:च्या प्रवेश परीक्षासुद्धा असतात. या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसुद्धा मिळते आणि विद्यार्थी पालकांच्या आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता स्वत:चे शिक्षण पूर्ण करू शकतो. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यांनतर भारतीय औषध उद्योगात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात किंवा इच्छा असल्यास त्याला परदेशी जाऊन करिअर करण्याची संधीसुद्धा उपलब्ध असते.

लसनिर्मितीच्या उद्योगात करिअर करण्यासाठी प्रामुख्याने नव्या लशींचे संशोधन आणि विकास, लशींची निर्मिती आणि वितरण तसेच व्यवस्थापन हे तीन प्रमुख विभाग उपलब्ध आहेत. यातील कोणत्याही विभागात यशस्वी व्हायचे असेल तर लसनिर्मिती मागच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे पूर्ण आणि अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक असते. नवी लस विकसित करताना अनेक प्रयोग करावे लागतात. त्यातील काही अयशस्वी होतात. त्यामुळे निराश न होता पुन्हा जोमाने काम करण्यासाठी आशावादी वृत्ती संयम हे गुण संशोधन विभागात काम करण्यासाठी आवश्यक आहेत. लसनिर्मितीच्या कारखान्यात काम करण्यासाठी वेळेचे अचूक बंधन पाळणे आणि आधी ठरलेल्या वेळापत्रकाला अनुसरून काम करणे गरजेचे असते. लशीच्या वितरण आणि व्यवस्थापनासाठी आपल्या ग्राहकवर्गाची आणि स्पर्धकांची इत्थंभूत माहिती असणे, आणि त्याचबरोबर आपल्या तसेच स्पर्धक कंपन्यांच्या लसनिर्मितीमागची प्रक्रिया नेमकी माहीत असणे अनिवार्य ठरते.

कोणत्याही रोगापासून बचाव करण्यासाठी वापरली जाणारी लस ही तोच रोग निर्माण करणाऱ्या जिवाणू, विषाणू किंवा सूक्ष्मजीवजंतू यांच्या अशक्त वा मृत पेशींपासून तयार केली जाते. करोना विषाणूंवर प्रभावी ठरत असलेली ‘कोव्हॅक्सिन’ ही भारतीय लस कोविडला कारणीभूत असलेल्या सार्स कोव्ही-२ या विषाणूंना अत्यंत अशक्त करून त्यांच्यापासून निर्माण करण्यात आली आहे. काही लशींमध्ये केवळ तो रोग पसरवणारे विष किंवा घटक वापरले जातात, परंतु त्यांचा प्रभाव कमी केलेला असतो, त्यामुळे शरीरात गेल्यावरसुद्धा ते हानी करू शकत नाहीत. करोना विषाणूवरील दुसरी अ‍ॅस्ट्राझेनिका आणि सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस करोना विषाणूमधील ‘स्पाईक प्रोटीन’ हे संसर्ग फैलावणारे प्रथिन वेगळे करून त्यापासून तयार केली आहे.

लसनिर्मितीचा उद्योग आज जगभर प्रचंड विस्तारला आहे. लशींची जागतिक बाजारपेठ, म्हणजे त्यांची जगभरातील मागणी, आज वार्षिक तीन लाख १७ हजार कोटी रुपयांची आहे. २०२४ पर्यंत ती चार लाख ४६ हजार कोटींपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. भारतात गेल्या वर्षी, म्हणजे २०२० साली, विविध रोगांवरच्या लशींची, सुमारे आठ हजार कोटी रुपयांची विक्री झाली. लस उत्पादनाच्या उद्योगात ब्रिटनच्या ‘ग्लॅक्सो स्मिथकलाईन’, अमेरिकेच्या ‘मर्क’ तसेच ‘फायझर’, फ्रान्सच्या ‘सनॉफी’ या कंपन्यांचे वर्चस्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने लस संशोधन आणि उत्पादनांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. भारताशी तीव्र स्पर्धा करत चीन वेगवेगळ्या देशांच्या बाजारपेठांमध्ये शिरकाव करायचा कसून प्रयत्न करत आहे.

भारतात काही कंपन्यांनी लस उद्योगामध्ये देदीप्यमान यश मिळवले आहे. वरदाप्रसाद रेड्डी यांनी १९९१ साली हैद्राबादमध्ये ‘शांता बायोटेक’ या कंपनीची स्थापना करून ‘हिपॅटायटिस बी’ या काविळीला कारणीभूत असणाऱ्या विषाणूवर परिणामकारक लस शोधून काढली. तिला जगभर उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढे २००४ साली ‘सनॉफी’ या लस उत्पादनातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या कंपनीने ‘शांता बायोटेक’ला उत्तम मूल्य देऊन ती विकत घेतली. अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊन परतलेल्या कृष्णा एल्ला आणि सुचित्रा एल्ला यांनी १९९६ साली ‘भारत बायोटेक’ नावाची लस विकसित करणारी कंपनी सुरू केली. करोनावर ‘कोव्हॅक्सिन’ ही लस निर्माण केल्यानंतर ‘भारत बायोटेक’ आज जगातील औषध उद्योगाच्या केंद्रस्थानी पोहोचली आहे. पुण्यातील उद्योजक सायरस पुनावाला यांनी १९६६ साली ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ या विविध रोगांवर लस तयार करणाऱ्या कंपनीची स्थपना केली. आज ‘सीरम इन्स्टिटय़ूट’मध्ये तयार होत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या करोना विषाणूवरच्या लशीला जगभरातून प्रचंड मागणी आहे. लसनिर्मितीच्या उद्योगातील या सर्वच कंपन्यांना लसनिर्मितीच्या उद्योगाचे ज्ञान असलेल्या तरुणांची आवश्यकता असते.

लसनिर्मितीबरोबरच लसीकरणासाठी, म्हणजे ग्राहकांना लस टोचण्यासाठी, प्रशिक्षित परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी वर्गाची मागणीसुद्धा सातत्याने वाढत आहे. वैद्यकीय प्रशिक्षण देणारे ‘डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी’ (डी. एम. एल. टी.) सारखे अल्पकालीन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि सेवाभावी वृत्ती असलेल्या तरुणांना या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. जगातल्या प्रत्येक माणसाला लशींची गरज आहे. त्यामुळे जगाची लोकसंख्या वाढते त्याच प्रमाणात लशींची मागणीसुद्धा नैसर्गिकरीत्या वाढत जाते. त्याखेरीज, नवनवे सूक्ष्म जीव कार्यरत होत असतात आणि त्यातून कधी स्थानिक, कधी देशांतर्गत तर कधी जागतिक पातळीवर साथी येत राहतात. उपलब्ध लशींबरोबरच, या नव्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी नव्या लशींची गरज पडत असते. त्यामुळे लशींचा उद्योग कायमच अत्यंत गतिशील आणि सातत्याने वाढत जाणारा ठरला आहे.

लस विकसित करण्याच्या संशोधनाला आणि उद्योगाला साहाय्य करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधन संस्था आणि त्या त्या देशांची सरकारे नेहमीच तयार असतात. आज जगभरात उद्रेक झालेल्या ‘करोना’ विषाणूवर लस शोधण्यासाठी फ्रान्समधील ‘पाश्चर इन्स्टिटय़ूट’ किंवा अमेरिकेतील ‘केसर परमनेंट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिटय़ूट’सारख्या मान्यवर संशोधन संस्थांनी पुढाकार घेतला आहे. भारतामध्ये अनेक कंपन्या संशोधनासाठी मुंबईतील ‘हाफकिन इन्स्टिटय़ूट’ किंवा ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’शी (सी. एस. आय. आर.) संबंधित प्रायोगशाळांचे सहकार्य घेतात. लसनिर्मिती कंपनीकडे एखादी उपयुक्त लस किंवा तत्सम औषधावर संशोधन आणि त्यांनतर त्याचे उत्पादन करण्याचा योग्य आणि आश्वासक प्रस्ताव असेल, तर कर्जही दिले जाते. दिल्ली येथील ‘डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी’, किंवा ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ यांसारख्या संस्था त्यासाठी नाममात्र व्याजदराने, दीर्घ मुदतीचे कर्ज देतात. या सुविधांमुळे तरुणांना आता लसनिर्मिती उद्योगात उत्तम नोकऱ्यांबरोबरच स्वत:चा उद्योग सुरू करण्याच्या संधीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत.

१९०० ते १९८० या काळात देवीच्या रोगाने जवळपास तीन कोटी लोकांचा मृत्यू झाला आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त लोकांच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण कायमचे राहिले. त्यानंतर लसीकरणामुळे देवीच्या रोगाचे जगातून उच्चाटन झाले. १९८८ सालापर्यंत प्रत्येक वर्षी जगभरात सरासरी साडेतीन ते चार लाख बालकांना पोलिओने अपंगत्व येत असे. १९८८ साली जागतिक पातळीवर पोलिओच्या लसीकरणाची सुरुवात झाली. त्यानंतर पोलिओग्रस्तांची संख्या वेगाने कमी होत गेली. गेल्या वर्षी जगात फक्त २२ लोकांना पोलिओची बाधा झाली. लसीकरणामुळेच भारत आता पोलिओमुक्त झाला आहे.

या लशींनीच आपल्याला देवीसारख्या आयुष्य विरूप करणाऱ्या, जीवघेण्या रोगांपासून संरक्षण दिले. पोलिओला दूर करून आपले आयुष्य सुदृढ केले. आपले बालपण गोवर, गालगुंड, टायफॉइड आणि कांजिण्यांच्या वेदनांपासून मुक्त केले. ही वस्तुस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे. आज लसनिर्मितीच्या उद्योगामध्ये भरपूर पगार देणाऱ्या नोकरीची, इच्छा असल्यास उद्योजक होण्याची संधी आहे. शिवाय इतरांच्या उपयोगी पडण्याचे समाधान आहे, ते वेगळेच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 3:05 pm

Web Title: vaccine production jobs and vacancies career special issue career post covid dd 70
Next Stories
1 करिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : ‘कचऱ्या’तून करिअर
2 करिअर विशेष (कोविडोत्तर संधी) : औषधनिर्माणाचे प्रगतिशील क्षेत्र
3 राशिभविष्य : दि. ११ जून ते १७ जून २०२१
Just Now!
X