बहारिनमधील वाळवंटात ४०० र्वष जुना वृक्ष आहे. कोणत्याही ज्ञात जलस्रोताशिवाय तो निर्जन वाळवंटात उभा आहे. ‘ट्री ऑफ लाइफ’ असे याला सार्थ नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वृक्षाच्या आसपास एकही वनस्पती आढळत नाही. एका वर्तमानपत्रात ही बातमी वाचली आणि मला प्रत्यक्ष माझ्या घरात घडलेली अशीच एक घटना आठवली. 

गौरी-गणपतीच्या आरासाची पूर्वतयारी म्हणून चाफ्याच्या झाडाच्या मोठाल्या फांद्या तोडून घरात आणून ठेवल्या होत्या. नेहमी आरास केली जाते त्या ठिकाणी या फांद्या जमिनीपासून तीन-चार फूट उंचीवर, भिंतीला खिळे मारून फिक्स केल्या.
त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात काही तातडीचे काम उद्भवल्याने पाच-सहा महिन्यांसाठी घरातील सगळ्यांनाच गावी जावे लागले. साधारण पाच-सहा महिन्यांनी म्हणजे जुलैमध्ये घरी परतलो. बरेच दिवस घर बंद असल्यामुळे तसेच नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे दार उघडताच कुबट वास अपेक्षित होता. घरात प्रवेश करताच प्रत्यक्षात मात्र सुगंधाची दरवळ अनुभवायला मिळाली. त्याहीपेक्षा सुखद घटना म्हणजे चाफ्याच्या फांद्या फुलांनी अक्षरश: डवरलेल्या होत्या.
डिसेंबरनंतर जानेवारी ते जून संपूर्ण कडक उन्हाळा. घरदार खिडक्यांसह संपूर्ण बंद. पाणीच नाही तर ओलसरपणाचाही मागमूस नाही. अशा पूर्ण विपरीत परिस्थितीत चाफ्याच्या फांद्यांनी हा सुखद धक्का दिला होता. अकल्पित म्हणावी अशीच ही घटना. एरव्ही पुरेसे ऊन मिळावे, वेळचे वेळी पाणी घालावे, मधून मधून पोषक खतांचा नैवेद्य दाखवावा, कीटकनाशकांची फवारणी करावी तरीही एखादे लाडके आणि लाडावलेले रोपटे बाळसे धरेलच अशी खात्री नसते. मग चाफ्याच्या या फांद्यांचे पोषण केले कुणी?
‘फानुस बनके हवा
जिसकी हिफाजत करे
वो शमा क्यँू बुझे
खुदा जिसे रोशन करे’
कोणत्या अदृश्य शक्तीचं हे वरदान होतं? निसर्गाने काय तजवीज केली असावी ?
विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध वगैरे विचार करू शकणाऱ्या मनाला पडलेले प्रश्न अशा वेळी मती गुंग करून टाकतात हे खरं!