हे बघा, काय झालं समोर!! मेलोनिकाच्या आवाजाने मी एकदम दचकले आणि धावत गॅलरीत गेले. माझ्या घरासमोर एका मोटारसायकलचा अपघात झाला होता. सुदैवाने त्या माणसाला काही झालं नाही, पण त्याची गाडी मात्र संपूर्ण जळाली. तो बिचारा घाबरलेला माणूस बाजूला राहिला, कोणी त्याला पाणीही द्यायला गेलं नाही. उलट रस्त्यावरचे लोक गाडय़ा उभ्या करून त्या जळणाऱ्या गाडीचे फोटो काढत होते. त्यांना फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅपवर पाठवायचे असतील बहुधा. या फोटोला लाइक्स आणि कमेंट्स पण भरपूर मिळाले असतील. हे बघून माझी कामवाली म्हणाली- हे मलेशिअन लोक असेच आहेत. कधीच मदत करत नाहीत आणि मग मी विचार करायला लागले. नुसतं मलेशियाच का, सगळीकडे हेच तर आहे.. आपण कशाला त्या भानगडीत पडायचं, हाच विचार सगळे करतात. लोकांसमोर चोऱ्या होतात, अगदी भररस्त्यात कोणाच्या गळ्यातली चेन किवा कोणाची पर्स चोरली जाते, तरी आजूबाजूचे अरेरे म्हणतात आणि आपापल्या कामाला निघून जातात.

मागे प्राणिसंग्रहालयात एका वाघाने एका माणसाला मारल्याचा व्हिडीओ खूप प्रसिद्ध झाला. चूक माणसाचीच होती; पण मला कमाल वाटली त्या बाकीच्या माणसांची जे वरती त्या सगळ्या प्रकारचा व्हिडीओ घेत होते. तुमच्यासमोर एक माणूस मरतो आहे आणि तुम्ही त्याचा व्हिडीओ घेता..? माणुसकी म्हणजे हीच का?
माझा भाऊ वन्य जीव छायाचित्रकार आहे. तो मागे रणथंबोरच्या जंगलात गेला होता. तेव्हा त्याने बघितलं की वाघाने एका नीलगायीला मारलं. खाताना त्याच्या लक्षात आलं की ती प्रेग्नंट आहे, त्याने तिला पुढे खाल्लं नाही. उलट तिचा मेलेला अर्भक त्याने हळुवार बाहेर काढलं आणि झाडांच्या पानात अलगद ठेवून जंगलात घेऊन गेला. वाघाच्या या वागण्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. बऱ्याच लोकांनी तर वाघाने माणुसकी दाखवली असं म्हणाले.