01-vachak-lekhakमी खाली सही करणार श्रीनिवास सदाशिव डोंगरे, राहणार २१ पुरंदरेवाडी, गोखले रोड, दादर, मुंबई. जाहीर करत आहे की, मी माझ्या प्रौढपणाचा तातडीने राजीनामा देत आहे व ७ वर्षांच्या मुलीची सगळी दिनचर्या स्वीकारत आहे.

बालपणीचा काळ सुखाचा. असं मोठं झाल्यावर आपण कायम म्हणत असतो. मोठं झाल्यावर बालपण हवंहवंसं वाटू लागतं, पण काळ कधीच मागे जात नाही. तो अव्याहतपणे पुढे सरकत असतो.

म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण, असेही आपण म्हणतोच ना? म्हणून मी आत्ताच यापुढे पावसाळय़ात ट्रॅफिक जॅममधून वाट काढत ऑफिसला वेळेवर जाऊन काम करण्याची डोकेफोड न करता, पावसात रेनकोट घालून पाण्यात पाय आपटत, मित्रांच्या अंगावर पाणी उडवत शाळेत जाणे पसंत करीन.

यापुढे ऑफिसचे काम घरी आणून लॅपटॉपवर करणार नाही, त्याऐवजी माझ्या ७ वर्षांच्या मुलीबरोबर म्हणजे ‘राधा’बरोबर शाळेचे प्रोजेक्ट, पपेट, ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवण्यात भाग घेईन.

यापुढे सोने, चांदी, दागदागिने, शेअर याचा संग्रह मी करणार नाही. त्यापेक्षा स्टिकर, टॅटू, मणी, माळा, रंगीत कागद, फुले, खडू यांचा संग्रह करीन.

यापुढे संगणक, इंटरनेट, मोबाइल, गुगल, व्हॉटस्अप हे सर्व बंद करून, मुलीबरोबर पकडापकडी, लपाछपी खेळणं, चित्रकला, हस्तकला काढणं पसंत करीन.

यापुढे रोज रोज पोळीभाजी, आमटीभात, (भाजी आवडत नसली तरी) खाणार नाही. मनात आले की हट्ट करून न्यूडल्स, पिझ्झा, बर्गर, रोल मुलीबरोबर शेअर करणार, औषधांच्या गोळय़ा न खाता लॉलीपॉप, अलपेनलेबे चॉकलेट चघळणार.

यापुढे महिन्याच्या शेवटच्या

५-६ दिवसांत पगारात भागवण्याची चिंता न करता बिनधास्त कंपासपेटी, मॅचिंग फ्रॉक व सँडलची मागणी करणार.

यापुढे टीव्हीवर बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मालिका वगैरे बघण्यापेक्षा पोगो, कार्टून नेटवर्क, डिस्ने वगैरे बघणे पसंत करेन. मिस्टरमेकर एक मिनिटात हा डिस्कव्हरी किड चॅनेलवर क्राफ्टवस्तू बनवतो तशा मुलीबरोबर बनवण्यात वेळ घालवीन. मोठमोठय़ा कथा, कादंबऱ्या, चरित्र वाचण्यापेक्षा चांदोबा, कुमारसारखे बाल साहित्य वाचणे पसंत करेन.

कुटुंबातील, नात्यातील भांडणात; कलहात पडून मनस्ताप, चिंता, राग वगैरे न करून घेता लहान मुलांसारखे निरागस, निष्पाप मन ठेवून जगण्याचा प्रयत्न करणार.

सोसायटीतील सर्वसाधारण सभेत होणाऱ्या भांडणामुळे सभासदांशी, शेजारीपाजारी वैर धरण्यापेक्षा सोसायटीतील सर्व मुलांबरोबर एकत्र अंगणात आनंदात हसत खेळेन.

माझ्या मुलीबरोबरीने तिच्या अभ्यासात- होमवर्कमध्ये भाग घेऊन तिला धडा समजावून सांगेन. शाळेत तिला चांगले मार्क मिळाल्यावर तिचे सर्व कौतुक करताना बघणं व तिच्या डोळ्यांतील माझ्याबद्दलचा आदर पाहणं मी पसंत करेन आणि हा आनंद मला ऑफिसमध्ये बढती मिळण्यापेक्षा मोठा असेल.

लांडेलबाडी, भ्रष्टाचार, चोऱ्यामाऱ्या, फसवाफसवी, हाणामारी अशा आजूबाजूला चाललेल्या सगळय़ा गोष्टींचा विचार करून मन दु:खी किंवा चिंता करत बसणार नाही, त्याऐवजी निष्पाप निरागस मन ठेवून जगात सर्व प्रामाणिक आहेत. पोलीस चोरांना पकडतातच, गुन्हेगाराला शिक्षा होते, वाईट वागल्यास देव पाप देतो, देव गरिबांचे रक्षण करतो, यावर भोळाभाबडा विश्वास ठेवेन.

वेळेवर धावत जाऊन ट्रेनची खिडकी मी पकडणार नाही. त्यापेक्षा मी शाळेत स्कूलबसने खिडकीत बसून टाटा-बायबाय करत जाणे पसंत करेन. ऑफिसमधल्या बॉसची मर्जी सांभाळण्यापेक्षा शाळेतील मास्तरांपुढे हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करेन.

गोविंदा, गणपती मिरवणूक, नवरात्र गरबा यांतील नाच फुटपाथवरच्या कडेला उभे राहून बघण्यापेक्षा डीजेवर मी मनमुराद नाचेन.