05 June 2020

News Flash

चिमणीचं घरटं आणि कावळा…

कधीही घरटं न बांधणारा कावळा पाऊस आल्यावर चिऊताईच्या घरटय़ात आश्रय मागतो, ही आपण सगळय़ांनीच लहानपणी ऐकलेली गोष्ट.

| December 19, 2014 01:10 am

कधीही घरटं न बांधणारा कावळा पाऊस आल्यावर चिऊताईच्या घरटय़ात आश्रय मागतो, ही आपण सगळय़ांनीच लहानपणी ऐकलेली गोष्ट. तीन वेगवेगळय़ा दृष्टिकोनाची माणसं ही गोष्ट कशी वेगवेगळय़ा पद्धतीने सांगतात पीहा-

कथा- १
साने गुरुजींच्या समाजवादी विचारानं भारलेला एक साथी, एका प्राथमिक शाळेत मुलांसमोर बोलत होता. जमिनीवर बसून, एक पाय उभा ठेवून, समोर पाहत तो सांगू लागला..
मुलांनो, मी आपल्याला एक छान गोष्ट सांगणार आहे. तुम्ही ती गोष्ट ऐकलेली असेल, ती आहे चिमणी कावळय़ाची गोष्ट. पण मी सांगतोय त्या गोष्टीचा भावार्थ खूप आगळावेगळा आहे असं तुम्हाला दिसेल. एका भरगच्च वडाच्या झाडाच्या फांदीवर चिमणीनं खूप छान घरटं बांधलेलं होतं. झाडांच्या फांदीच्या काडय़ा, धागेदोरे, सुतळी, गवत अशा अनेक बारीकसारीक गोष्टी गुंफून तिनं ते भक्कम घरटं तयार केलं होतं. फांदीच्या टोकाला ते लोंबकळत होतं. कितीही वारा, पाऊस आला तरी ते टिकून होतं.
एकदा खूप जोराचा पाऊस आला. सगळीकडं पाणी पाणी झालं. हवेत गारठा आला, पण चिमणीच्या भक्कम घरटय़ात ऊब होती. अन् त्या उबेचा लाभ घेत तिची तीन-चार पिल्लं मजेत बसली होती.
अचानक तिथं एक कावळा आला. काळाकुट्ट वर्ण, अन भिजून चिंब झालेला. घरटय़ाबाहेर बसून त्यानं काव-काव सुरू केली. तो म्हणाला, चिऊताई-चिऊताई दार उघड. तो असं चार-पाच वेळा म्हणाला. त्याच्या काव-काव करण्यात खूप याचना होती. . तो हतबल झाल्याचं दिसत होतं. तो विनवणीनं म्हणाला, या पावसात मला कुठंच आसरा मिळत नाही. जरा वेळ मला बसू देतेस का तुझ्या घरटय़ात? चिऊताईला त्याची दया आली. तिनं आपल्या पिलांना मायेची ऊब दिलेली होती. तिचं मातेचं हृदय द्रवलं, मातेचं महन्मंगल मुलायम मन, दयेनं ओथंबून गेलं, तिनं विचार केला, इतक्या थंडीत तो कावळा कुठं जाईल बिचारा? त्याला तर घरटं करून राहायची सवयच नाही, मग तिनं त्याला आत बोलावलं. घरटय़ात एका बाजूला तो कावळा बसून राहिला. दोन तासांनी पाऊस थांबला. कावळा बाहेर आला. त्यानं पंख फडफडवले, पाय ताणले. त्यानं त्या माऊलीरूपी चिमणीला धन्यवाद दिले अन् भर्ु्कन उडून गेला. त्या चिमणीला खूप बरं वाटलं, आपला कुणाला तरी, संकटाच्या वेळी उपयोग झाला या जाणिवेने.

कथा- २
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात सुरू होती. आचार्य अत्र्यांची मुलुखमैदान तोफ मराठी प्रदेशात दणाणत होती. त्यावेळी अत्र्यांचा एक कार्यकर्ता समितीच्या वतीनं एका सभेत उभा राहून भाषण करत होता.
बंधु-भगिनींनो!
आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती आहे साधीसुधी चिमणी-कावळय़ाची गोष्ट. तुम्हाला वाटेल हाय काय त्यात? पण नंतर कळेल त्या साध्या गोष्टीतसुद्धा मोठं तत्त्व आहे, अन् मराठी मुलखातलं सत्त्व आहे.
एका चिमणीनं छान घरटं बांधलेलं होतं. चिमणीचं भरभक्कम घरटं पाहून कावळय़ाला हाव सुटली. ते भक्कम घरटं आपण पळवावं असं त्याला वाटू लागलं; कारण तो हावरट अन् एक नंबरचा लबाड होता- मोरारजी देसायांसारखा. त्यानं काय केलं. तो चिमणीकडं गेला, अन् तिला गोड बोलून म्हणाला, चिऊताई, आता फार पाऊस पडतोय. थंडी वाजतेय, तर मी राहू का जरा वेळ तुझ्या घरटय़ात!
चिऊताई बावरली, ती म्हणाली का बरं! मी तर खूप कष्ट करून घरटं उभं केलंय, त्यासाठी खूप खस्ता खाल्यात. जशा मराठी माणसांनी मुंबईच्या कापडगिरण्या, कारखाने, व्यापार उभारणीसाठी खाल्यात. मी कष्टानं घर बांधलं ते माझ्यासाठी अन् माझ्या पिलांसाठी तू असंच घरटं बांध की कुठं तरी, कोण नको म्हणतंय?
कावळा जोरात बोलायला लागला. म्हणाला, माझा दिल्लीतल्या पक्षीराजाकडं वशिला आहे. हवं तर घरटं मी उचलून नेऊ शकेन.
त्यावर चिमणी गोंधळली, पण लगेच सावरली, तिनं मोठा चिवचिवाट केला, तो ऐकून दहावीस चिमण्या जमा झाल्या. साळुंक्या आल्या, होले आले, पोपट आले. त्यांना चिमणीनं पटवलं. ती म्हणाली हा डोमकावळा आयतोबा माझं घर पळवायचा विचार करतोय, ते नाही का द्विभाषिक प्रांतवाले मुंबई पळवायचा विचार करतायत अगदी तस्संच.
त्यावर सगळे पक्षी एक झाले. त्यांनी जोरात हल्ला केला. त्या कावळय़ाला चावे घेतले, तुडवला, कुचलला, कुबलला अन् कावळा गेला काव काव करीत दिल्लीकडं.

कथा- ३
भारत-पाकिस्तान युद्ध नुकतंच संपलं होतं. त्यात भारताचा विजय होऊन बांगलादेश निर्माण झालेला होता. त्यानंतर काही दिवसांनी महाविद्यालयीन युवकांची एक विशाल सभा होती. त्यावेळचे राष्ट्रवादी वृत्तीचे खासदार जगन्नाथराव जोशी हे प्रमुख वक्ते होते. ते म्हणाले-
आज खूप आनंदाचा अन् अभिमानाचा दिवस आहे. आज मी तुम्हाला साधी सोपी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे चिमणी-कावळय़ाची, प्राणी-पक्षातही युद्धे होतात. त्वेष असतोच.
एका चिमणीनं छान घरटं बांधलं. खूप कष्ट घेतले तिनं ते बांधताना. कुठून कुठून कळकाच्या काडय़ा आणल्या, त्या गुंफल्या. त्यात गवत अंथरलं, अन् छान घरटं उभं केलं. एका विहिरीवर वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या एका फांदीत तिनं ते घरटं बसवलं होतं. वाऱ्याच्या झोताबरोबर घरटं हेलकावे खात असे, अन् ते मोठे नयनरम्य दिसत असे.
एकदा एक डोमकावळा फिरत फिरत तिथं आला. विहिरीतलं पाणी पंपाच्या साह्याने बाहेर पडत होतं. कावळा पाणी प्याला, विसावला. अन् त्याच्या मनात पाप आलं. ते चिमणीचं घरटंच आपण नेलं तर? त्यापेक्षा त्या चिमणीला तिथून हुसकावून लावलं तर? असा लोभी विचार करून तो त्या फांदीवर गेला, जोरजोरात काव-काव करू लागला. ते ऐकून चिमणीची पिलं घाबरली, ती गोंधळली, घरटय़ाच्या तोंडाशी पिलं यायची अन् पुन्हा आत जायची. काय करायचं त्यांना काय कळणार, तेवढय़ात चिमणी बाहेरून परत घरटय़ात आली.
तिनं कावळय़ाला दटावलं, पण तो कुठला ऐकायला, तो घरटय़ाच्या जवळजवळ येऊ लागला. चिमणीने धीर धरला. आजूबाजूला पाहिलं, तिथं एक साळुंकी होती. तिच्याजवळ जाऊन चिमणीनं सांगितलं, आता मी संकटात आहे. तो कावळा माझं घरटं बळकावतोय. काही मदत करशील का?
साळुंकीने विचार केला अन् म्हणाली, तू घरटय़ाजवळ थांब. मी आणखी पक्षी गोळा करते.
साळुंकीनं जोरजोरात आवाज काढत त्या मोठय़ा वटवृक्षाच्या फांद्यावरचे रहिवासी पक्षी जागे केले. फांदीवरचे वटवाघूळ, होले, पोपट, पिंगळे जमा झाले. पलीकडच्या झाडाच्या ढोलीतून एक घुबड डोळे वटारून बघत होतं. त्याला दिवसाच्या प्रखर प्रकाशात यायला नको होतं, ते तिथेच बसून पाहत राहिलं.
आलेल्या पक्ष्यांना चिमणीनं संकटाची जाणीव करून दिली. सगळय़ांना माहिती होतं की चिमणीनं खूप कष्टानं घरटं उभं केलंय. सर्व पक्षी एक झाले, अन् कावळय़ाला म्हणाले, तू इथून चालता हो, कावळा चिवटपणे म्हणाला- मला घरटंच नाही. आता मी हेच घेऊन जाणार.
आणि मग चिमणीसह सर्व पक्ष्यांनी कावळय़ावर हल्ला केला. चिमणीमधली रणरागिणी; दुर्गा जागी झाली. पक्ष्यांचा मोठा कलकलाट सुरू झाला. ते बघून पलीकडच्या ढोलीमधलं घुबडही आपले लांब पंख उडवीत धावून आलं. त्यानं आल्याबरोबर कावळय़ाला धडक दिली. काही काळ त्या छोटय़ा पक्ष्यांची निकराची लढाई झाली. सगळेच आपल्याविरुद्ध आहेत हे पाहिल्यावर कावळय़ानं तिथून पळ काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2014 1:10 am

Web Title: vachak lekhak 21
टॅग Story,Vachak Lekhak
Next Stories
1 रणगाडा
2 गंप्या, नाद आणि स्वरा
3 सहकार जागर : सभासदाची सजगता गरजेची
Just Now!
X