चिंतन, ए चिंतन. हे दप्तर का असं टाकलंय इथे. किती वेळा सांगितले की दप्तर जागेवर ठेवत जा. डबा काढून धुवायला देत जा. आई बडबडत होती, पण चिंतन कार्टून पाहण्यात गुंग झाला होता. आता मात्र कमाल झाली या मुलाची, आई वैतागली होती. तिने स्वत:च चिंतनच्या दप्तरातून डबा काढला आणि दप्तर त्याच्या खोलीत नेऊन ठेवलं. डबा उघडून पाहिल्यावर तर आणखीनच चिडली.

चिंतन आज डबा का नाही खाल्लास सगळा? आईच्या या प्रश्नावर चिंतनचं उत्तर होतं, ‘भेंडीची भाजी’. आई म्हणाली, भेंडीच्या भाजीचं काय? किती छान झाली होती. ताईने तर सगळी संपवली.
चिंतन म्हणाला, अगं आई, तुला माहितीये ना, मला नाही आवडत भेंडीची भाजी; मग का देतेस?
चिंतन बाळा, सर्व भाज्या खाव्यात, आई म्हणाली. आई, आता नेहमीची कॅसेट नको लावूस प्लीज. मला आहे लक्षात. अन्न हे पूर्णब्रह्म, अन्नाचा अपमान करू नये. पानात पडेल ते सर्व खावे. उदरभरण म्हणजे यज्ञकर्म समजावे. सर्व पाठ झालेय.
अरे, सर्व कळते ना तुला. मग का बरे अन्न टाकतोस? आई, त्यापेक्षा तू मला जॅम-चपाती देत जा. चालेल मला. चिंतन म्हणाला.
अरे, तुला न चालायला काय झालं.. तू तर रोजसुद्धा जॅम-चपाती नेशील डब्याला. सोड, तुला काही सांगण्यात अर्थ नाही. तू काय ऐकणारेस का माझं. बरं, टीव्ही बंद कर, हातपाय धुऊन, देवाजवळ रामरक्षा म्हण.
आई, त्यापेक्षा शुभंकरोती म्हणू का? रामरक्षा नको. सगळय़ाचा कसा रे तुला कंटाळा. ठीक आहे.. पण शुभंकरोती म्हणून झाल्यावर लगेचच अभ्यासाला बस. बाबा आल्यावर जेवायला बसू.
चिंतनसुद्धा शुभंकरोती म्हणून सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला बसला. अभ्यास करताना चिंतन इतका गोड दिसत होता. आईने कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं. गुणी माझं बाळ असं म्हणून स्वयंपाकघरात निघून गेली.
दारावरची बेल वाजली. चिंतनने धावत जाऊन दरवाजा उघडला. त्याला माहीत होतं त्याचे बाबा आले होते.
काय चिंतू शेठ? कसा काय चाललाय अभ्यास? बाबांनी चिंतूला प्रश्न केला.
छान चाललाय बाबा. आज तर टीचरने मला व्हेरी गुड असं लिहिलंय माझ्या प्रोग्रेस कार्डवर.
शाब्बास चिंतन.
तेवढय़ात आई बाहेर आली. म्हणाली, चला, पुरे झाल्या गप्पा. जेवण तयार आहे. मी पानं वाढायला घेते, तोवर तुम्ही आवरून या.
जेवताना, आईने चिंतनला विचारलं, काय रे चिंतन, उद्या मानवचा वाढदिवस आहे ना.
हो, तुला कसं कळतं? चिंतनने आश्चर्याने विचारलं. अरे, काही नाही, त्याच्या आईचा फोन आला होता की उद्या चिंतनला जेवायला पाठवाल का?
ए आई! जाऊ ना गं मी.
तुझ्या बाबांना विचार?
ओ बाबा, जाऊ का, सांगा ना प्लीज.
बाबा म्हणाले, जा. पण लक्षात ठेव, तिथे जाऊन मस्ती करायची नाही.
आई म्हणाली, आणखी एक गोष्ट, लागेल तितकंच अन्न वाढून घे. अन्न वाया घालवायचं नाही. हो गं आई, पण मानवला गिफ्ट काय देऊ. पेन्सिल बॉक्स देऊ का?
आई म्हणाली, चालेल. जा घेऊन.
संध्याकाळी बर्थडे पार्टीला जायचं म्हणून चिंतनची स्वारी भलतीच खूश होती. छान कपडे करून, चिंतन वाढदिवसाला गेला. दमूनच आला. कारण मानवकडे भरपूर मजा आणि दंगा-मस्ती केली होती. त्यामुळे आल्यावर लगेचच झोपून गेला.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आला. दप्तर जागेवर नेऊन ठेवलं. त्यातला डबा काढून आईच्या हातात ठेवला आणि म्हणाला, बघ उघडून. सगळा डबा खाल्लाय. काहीही शिल्लक नाही.
आईला, खूप आनंद झाला. चिंतनला म्हणाली. गुड बॉय. आता हे रोजचं होऊ लागलं. चिंतन रोजच्या रोज डबा खाऊ लागला.
अचानक चिंतनमध्ये झालेल्या या सुधारणेचं आई-बाबांना फार कौतुक वाटायला लागलं. पण हे घडलं कसं? ते कळत नव्हतं.
बाबांनी ठरवलं, याबद्दल चिंतनलाच विचारायचं रात्री झोपायच्या आधी. बाबांनी चिंतनला जवळ बोलावलं. चिंतू शेठ, तुम्हाला की नाही मी बक्षीस देणार आहे. का हो बाबा? चिंतनने विचारलं.
अरे हल्ली तू नियमितपणे दिलेला डबा खातोस, न खाता परत आणत नाहीस. शिवाय घरीही जेवताना पानात अन्न टाकत नाहीस. एवढं शहाणपण कुठून आलं रे? चिंतन गालातल्या गालात हसला. खरं सांगू का आई आणि बाबा. तुम्हाला आठवतंय का, मी मानवकडे त्याच्या वाढदिवशी गेलो होतो.
हो आठवतंय की, त्याचं काय? आईने विचारलं. अगं त्या दिवशी आम्ही खूप धमाल केली. गेम खेळलो. नंतर जेवायला बसलो. त्याच्या आईने इतका सुंदर स्वयंपाक केला होता. मी पोटभर जेवलो, पण मी ना अन्न थोडं जास्त घेतलं होतं वाढून आणि ते मला संपेना. म्हणून पानात अन्न टाकून उठलो. ते पाहून मानवची आजी म्हणाली, अरे चिंतन, एवढं अन्न का वाया घालवतोस, संपव की.
मी म्हणालो, नको आजी, माझं झालंय. तेव्हा आजी म्हणाली, अरे, आमच्या घरात अन्नाला आम्ही पूर्णब्रह्म मानतो. अन्नाचा असा अपमान होऊ देत नाही असं म्हणत, माझ्या पानातील माझं उष्टं अन्न स्वत: खाऊन संपवलं.
त्या दिवशी पानात अन्न टाकल्याची पहिल्यांदाच एवढी लाज वाटली. आई तू माझं उष्टं तर नेहमी खातेस, पण त्या दिवशी माझ्यामुळे, मानवच्या आजीला उष्टं अन्न खावं लागलं आणि तेसुद्धा घरात एवढी पंचपक्वान्नं असताना. त्या दिवसापासून ठरवून टाकलं की, कधीही अन्नाचा असा अपमान करायचा नाही. आई, तू म्हणतेस ते मला पटलंय अन्न हे पूर्णब्रह्म आहे.
चिंतनच्या आई-बााबांना, चिंतनचं फार कौतुक वाटलं. त्याच्या पाठीवरून आईनं मायेचा हात फिरवला व जवळ घेतलं. तेव्हा बाबा म्हणाले, ‘चिंतन बाळा, मला तुझा फार अभिमान वाटतो. तुझ्या प्रोग्रेस कार्डवर तुला व्हेरी गुड असा शेरा मिळालाय ना, मग तुझ्यात झालेल्या या प्रोग्रेसबद्दल ‘एक्सलेंट’ असा शेरा मी तुला देतो.
विश्वास नंदकुमार गुरव