साधारण ३०-३५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. माझा मुलगा मंदार त्या वेळी माँटेसरी वर्गात होता. दुपारचे साधारण ११-११॥ वाजले होते. त्याची शाळेतून घरी आणण्याची वेळ झाली होती. म्हणून मी घरचं सगळं आटपून लगबगीने निघाले होते. रस्ता क्रॉस करणार इतक्यात आजूबाजूचे आवाज आले, ‘बस, बस, बस..’ आणि मला कुणीतरी मागे घेतलं. भानावर येते तो बसचं एकमजली धूड माझ्या बाजूने गेलं. मी मरता मरता वाचले. मी सावरून परत रस्ता क्रॉस करायला निघाले तर लक्षात आलं की, एक लहान मूल मला बिलगलंय. बघते तो, तो एक

४-५ वर्षांची मुलगी हातात पिशवी घेऊन मला घट्ट मिठी मारून उभी होती आणि लोक बडबडत- बाई तुमचं लक्ष कुठे होतं? मुलीला घेऊन रस्ता नीट क्रॉस करता येत नाही काय? आत्ता मुलीसकट तुम्ही बसखाली आला असतात. बसवाला एवढय़ा जोराने हॉर्न वाजवतोय, पण तुमचं लक्ष नाही वगैरे वगैरे.. मी लोकांना ओरडून सांगत होते, ‘‘अहो ही मुलगी माझी नाही..’’ पण कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मुलगी तर घाबरून मला एवढी घट्ट मिठी मारून उभी होती की, तिची मिठी मला सोडवत नव्हती. मला शाळेत जायला उशीर होत होता. काकुळतीला येऊन मी लोकांना सांगत होते, पण कुणीही त्या मुलीला घेण्यासाठी पुढे येत नव्हतं. ती मुलगी तर रडत होती. म्हणून मी तिला हातात धरून वाडीत शिरले. तिच्या अवतारावरून ती मुलगी मराठी आहे, गुजराथी आहे अगर उत्तर भारतीय आहे याचा काही पत्ता लागत नव्हता. चड्डी, वर एक मळकासा फ्रॉक, केसांचा बुचडा व हातात पिशवी असं तिचं ध्यान होतं. मी शेवटी तिला घरी घेऊन आले व सासरेबुवांच्या ताब्यात देऊन टॅक्सी पकडली व तडक शाळेचा दरवाजा गाठला. मुलगा माझी वाट बघत उभा होता. नेहमीच्या बायका उशीर का झाला? म्हणून विचारीत होत्या, पण माझं लक्ष नव्हतं. मी मुलाचं दप्तर खांद्यावर घेतलं, त्याची बकोटी धरली आणि बस पकडून रामाच्या देवळासमोर उतरले, वाडीत शिरले व घरचा रस्ता धरला. तडक चाळीत शिरले. आत शिरले, त्या मुलीकडे बघितलं, ती मुलगी आरामशीर बिस्कीट घेतलेल्या अवस्थेत कोचावर झोपली होती. रडून रडून दमल्यामुळे थकली होती व कुठल्यातरी निर्भयतेने आरामशीर वाटल्यामुळे गाढ झोपी गेली होती. मी हुऽऽश केलं. पदर सावरला आणि मग मुलाला घेऊन स्वयंपाकघरात गेले. सासरेबुवा ओरडत माझ्या मागे आले. स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, ‘काय सूनबाई! काय लचांड घेऊन घरात आलीस. कोणाची कोण मुलगी? तिला घरी काय घेऊन आलीस?’ मला काहीच सुचत नव्हतं. ते सारखं तिला रस्त्यात सोडून दे म्हणून सांगत होते, पण माझं मन तसं करायला तयार नव्हतं. मी यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्या काळी मोबाइल नव्हते. ऑफिसच्या लँडलाइनवर प्रयत्न करीत होते, पण फोन लागत नव्हता. शेवटी हे ऑफिसमधून आल्यावर बघू काय ते? असं म्हणून तोपर्यंत मी जबाबदारी घेते, तुम्ही काळजी करू नका असं सांगून सासरेबुवांना शांत केलं. दरवाजा लावून घेतला. या सगळ्या गडबडीने मुलगा घाबरला होता. त्याला खायला घातलं. त्याचे कपडे बदलले आणि त्या मुलीच्या समोर कोचाजवळ येऊन बसले. मनात मीही घाबरले होते. ही मुलगी कोणाची असेल? लोक म्हणतात त्याप्रमाणे तिच्या अंगावर काही दागिने असतील काय? दागिने चोरून कोणी हिला रस्त्यात सोडून दिलंय अगर आई-वडिलांनी मुलगी नको म्हणून रस्त्यात सोडून दिली नाही ना? असे एक ना अनेक विचार मनात येत होते. एवढय़ात ती मुलगीच आहे ना, म्हणून खात्री करून घेतली. मुलाचं झाल्यावर ती भुकेली असेल म्हणून तिला वरणभात भरवायला घेतला, काय आश्चर्य! काहीही कुरकुर न करता ती मुलगी वरणभात जेवली व परत शांत झोपली. मीही थोडी शांत झाले व तिथेच खाली मुलाला घेऊन आडवी झाले, माझा डोळा कधी लागला ते कळलंच नाही.
सासऱ्यांच्या ओरडण्याने आणि त्यांच्या बोलण्याने मी जागी झाले.
यांना पाहताच मन शांत झालं. तुझ्या बायकोने काय केलंय ते बघ! नुसतं लचांड गळ्यात बांधून घेतलंय. कोणाची मुलगी कोण जाणे? रस्त्यात सापडली आणि घरी घेऊन आलीय. हे शांतपणे बूट काढीच खुर्चीत बसले होते. दारातही चाळीतली चार-दोन मंडळी बडबडत होती. सल्ले देत होती. हे सगळ्यांना शांत करीत म्हणत होते, ‘‘मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. मी हिला घेऊन पोलीस चौकीवर जातो.’’ ‘‘तुम्ही कशाला पोलीस चौकीवर जाता? कशाला नसतं लफड गळ्यात बांधताय. तुम्हीच मुलगी पळविली असेल व तिच्या अंगावरचे दागिने चोरले असाल? असं म्हणून पोलीस तुम्हाला डांबून ठेवतील. नाहीतर तुम्हाला मुलगी नाहीच आहे’’, असाही सल्ला कोणीतरी दिला. मी काकुळतीला येऊन यांच्याकडे बघत होते. हे म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका. जो काही प्रसंग येईल त्याला मी तोंड देईन. मी एक सरकारी नोकर आहे. काळजी करू नका.
मग माझ्याकडे वळून म्हणाले, चल सुवर्णा, या मुलीला घेऊन आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ.
एवढय़ात हे सगळं ऐकून मुलाने भोकाड पसरलं. त्याला आमच्याबरोबर यावयाचं होतं. त्याला शांत केला. सासूबाईंचा ताब्यात दिला. आणि दुसरं काही ऐकून याचं मन वळायच्या आत पोलीस ठाण्यात पोहोचायला हवं, म्हणून लगबगीने चाळीबाहेर पडले.
हे, मी आणि ती मुलगी असे आम्ही तिघेजण वाडीतून भरभर चालत रामाच्या देवळाच्या पुढय़ात असलेल्या ६१ नंबरच्या बसस्टॉपवर आलो. वाटेत सकाळचा प्रसंग ज्यांच्या लक्षात होता ती मंडळी ती मुलगी कोणाची ते समजेल काय? तिचं काय केलंत? वगैरे प्रश्न विचारत होती. पण कुणालाही उत्तरे देण्याच्या भानगडीत मी पडले नाही. सरळ बसस्टॉपवर येऊन बसची वाट बघत उभे राहिलो. एवढय़ात धोबीतलावाच्या बाजूने दोन-तीन पोलीस आले. हे त्यांना म्हणाले, ‘‘अहो ही मुलगी कुणाची आहे बघा. आम्हाला रस्त्यात सापडली आहे. पोलिसांनी बघितले-बघितल्यासारखं केलं व आमच्याकडे तिरका कटाक्ष टाकत, काय? आम्हाला मुर्ख बनवता काय, अशा भावाने आमच्या पुढय़ातून निघून गेले. आम्ही बसची वाट बघत उभे राहिलो. आमचं हे बोलणं आजूबाजूच्या प्रवाशांनी ऐकलं. अहो खरंच ही मुलगी तुमची नाही काय? मग उगाच कशाला पोलीस ठाण्यात जाताय? द्या सोडून हिला, असा सल्ला दिला. परत मी घाबरले व यांच्याकडे बघितलं. यांनी तू काळजी करू नकोस अशी मला खूण केली. ६१ नं.ची बस आली. बसमध्ये चढलो. प्रिन्सेस स्ट्रीटची तिकिटे काढली. जी.टी.हॉस्पिटलच्या समोर प्रिन्सेस स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाण्यासाठी उतरलो. पायऱ्या चढून पोलीस ठाण्यातील समोरच्या काउंटरपुढे उभे राहिलो. यांनी कोणी मुलं हरवल्याची तक्रार केली आहे काय? म्हणून काउंटरपलीकडे बसलेल्या पोलिसाजवळ चौकशी केली. आमचं सुदैव होतं. त्या भल्या पोलिसानं कोणताही आरडाओरडा न करता आमच्या समोर तक्रारवही दिली. आम्ही ती वही घेतली. बघतो तो बऱ्याच हरवलेल्या मुलांची नावं होती. सुदैवाने एका नोंदीशी आम्हाला सापडलेल्या मुलीची नोंद जुळली. तसं आम्ही त्या हवालदाराला सांगितले. त्या हवालदाराने मुलीची मागणी केली. यांनी मुलीला ताब्यात देणार नाही म्हणून सांगितले. त्या मुलीचा पत्ता आमच्या घराजवळ होता म्हणून आम्ही हवालदाराला आमच्याबरोबर येण्यास सांगितले व आम्हीच प्रत्यक्ष ज्याची मुलगी आहे त्याला देतो असं सांगितलं. त्यानं आम्हाला वरिष्ठापुढे उभं केलं. सुदैव चांगलं होतं. वरिष्ठाने एक कटाक्ष आमच्याकडे टाकला व तसं करण्यास आम्हाला परवानगी दिली व आमच्याबरोबर एक हवालदार देण्याची तयारी केली. आम्ही हवालदाराला बरोबर घेतलं आणि टॅक्सी केली आणि नवेवाडीतील दादीशेट अग्यारी या गल्लीच्या नाक्यावर उतरलो, तो हवालदार आणि आम्ही तिघं असे म्हणून त्या गल्लीच्या टोकाला, आमच्या झावबावाडीतील पूर्वीच्या नॅशनल हॉस्टेलच्या बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या चाळीत जावयास निघालो. वाटेत आम्ही काहीतरी लचांड केलं आहे अशा नजरेने लोक आमच्याकडे बघत होते. शेवटी आम्ही चाळीत तळमजल्यावर शिरलो. ती मुलगी हरवली असल्याचा कुठलाच गोंधळ आम्हाला तिथे जाणवला नाही. कोणाची मुलगी हरवली आहे काय? असं म्हणून मोठय़ाने हवालदार ओरडल्यावर एका खोलीतून एक उत्तरभारतीय जोडपे बाहेर आले व मुलीला बघताच त्यांनी हंबरडा फोडला व तिला मिठी मारली. हवालदार खात्री करून निघून गेला. ती माणसं आम्हाला सोडायला तयार नव्हती. आमच्या रूपानं देवच घरी आला असे मानून आमच्या पाया पडून आदरसत्कार करीत होती. आम्ही गोंधळून तिथेच उभे होतो. एवढय़ात मला माझ्या मुलाची आठवण झाली व लगबगीने सुटका करून घेऊन घराकडे परतलो.
रवींद्र मादुस्कर