02 March 2021

News Flash

मोदींनी जागे व्हावे

‘भाजपला व्यापमचा गळफास’ ही २४ जुलैच्या अंकातील कव्हर स्टोरी वस्तुनिष्ठ आहे. केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपला देशाची सत्ता मिळाली.

| August 14, 2015 01:01 am

lp05‘भाजपला व्यापमचा गळफास’ ही २४ जुलैच्या अंकातील कव्हर स्टोरी वस्तुनिष्ठ आहे. केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपला देशाची सत्ता मिळाली. महाराष्ट्रातही मोदींमुळेच भाजपचे सरकार आले. देशात किंवा राज्यात भाजपकडे मोदींशिवाय अन्य कोणताही नेता नाही. नरेंद्र मोदी आज पंतप्रधान आहेत. देश मोदींकडे लक्ष ठेवून आहे. एकूण भ्रष्टाचाराला संपूर्ण देश विटला होता. भ्रष्टाचार आणि लाखो कोटींचे घोटाळे यामुळे काँग्रेस बरबाद झाली. पंतप्रधानपदावर डॉ. मनमोहन सिंग यांनी एक पैसाही खाल्ला नाही. डॉ. सिंग अत्यंत प्रामाणिक आणि सचोटीचे असतानाही भ्रष्टाचार आणि घोटाळे थांबवू शकले नाहीत. तसेच मोदींचे होत आहे. मोदींनी दुसरे मनमोहन सिंग होऊ नये. मौनाचे नाटक सोडावे. व्यापम भाजपला फाशी देईल. सरकारही जाईल. लोक माफ करणार नाहीत. व्यापम माणसेही खात आहे. सुप्रीम कोर्टालाच काम करावे लागत आहे. सरकार बदलून काय उपयोग झाला? सगळे काही पूर्वीसारखेच सुरू आहे. पंतप्रधानपदावर मोदी ही जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. व्यापमवर बोलत नाहीत. महाराष्ट्रात एका दिवसात २०६ कोटींची चिक्की खाल्ली जाते. ६ ते ७ कोटींची चिक्की ११३ कोटीला घेतली जाते. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे भ्रष्टाचारी उपशिक्षणाधिकाऱ्याला नांदेडला पाठवितात. भ्रष्टाचारी शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षण संचालक पदावर बढती देतात. या अधिकाऱ्याचा अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी दि. ७ फेब्रुवारी २०१२ या दिवशी शासनाकडे पाठविला. भ्रष्टाचारांची ४६१ प्रकरणे या अहवालात आहेत. सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून मी न्यायालयात अर्ज केला. पीआयएल याचिका क्रमांक ९८/२०१२. दि. १९ जानेवारी २०१५ ला शासनाने दोषी अधिकाऱ्यांवर सहा महिन्यांत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आणि दि. १४ जुलै २०१५ ला संबंधितांनाच राज्याच्या शिक्षण संचालकपदावर बढती दिली. अन्य अधिकाऱ्यास पुन्हा नांदेडलाच बढती दिली. काँग्रेसी मंत्र्याप्रमाणे विनोद तावडे काम करीत आहेत. मुख्यमंत्री जागे नाहीत. पंतप्रधानही झोपलेत.
आर. के. मुधोळकर.

lp09सत्य समजेल का?
तीन जुलैच्या अंकातील ‘असला भ्रष्ट, तरी जय महाराष्ट्र’ हा दिनेश गुणे यांनी लिहिलेला लेख वाचला. अतिशय समर्पक असाच लेख आहे. लेखात ‘.. आणि मतदारराजा हताशपणे आपल्या बोटावरील शाईच्या खुणा न्याहाळू लागला’ असे वाक्य आहे. मतदारराजा असे मतदारास फक्त निवडणुकीच्या काळातच संबोधायचे आणि त्यानंतर पुढील निवडणुकीपर्यंत मतदाराकडे, त्याच्या अडीअडचणींकडे बघायचेही नाही अशा बेफिकीर वृत्तीच्या राजकारणींची वंशावळही त्यांच्या सवाई वृत्तीने वागत पुढे आहे, ही आपल्या देशाची वस्तुस्थिती आहे.
लेखात काही राजकारणी लोकांना त्यांनीच केलेल्या घोटाळ्यां(?)मुळे त्यांची पदे सोडावी लागली, त्यांच्या कामांवर कॅगसारख्या संस्थांनी ठपका ठेवला याचा उल्लेख आहे. पुढे काय झाले, हे सामान्य मतदारांना समजलेले नाही.
भुजबळ यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारे त्यांच्या मालमत्तांवरील झडतीमध्ये काहीही सापडले नाही असे त्यांची चौकशी करणाऱ्या लाचलुचपत विरोधी विभागाने स्पष्ट केले आहे. पण त्यांच्याकडील अधिकृतपणे उजेडात आलेली मालमत्ता सामान्यांचे डोळे फिरवून टाकणारी आहे. प्रश्न असा की, सामान्य सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी सेवाकाळात केलेल्या नियोजनानुसार काही मालमत्ता गोळा केली तर आणि कोणी त्यांच्या विरुद्ध आकसाने जरी तक्रार केली तर त्यांची मालमत्ता तो त्याच्या पगारात कशी गोळा करतो या मुद्दय़ावर हीच लाचलुचपत विरोधी यंत्रणा चौकशी करते. मालमत्ता जप्त करते. ते येथे झालेले दिसून येत नाही. या प्रकरणाची सुरुवात झाली तेव्हा याविषयी प्रसारमाध्यमांतून बरेच छापूनदेखील आले. आता मात्र त्या सर्व बातम्या अगदी बटन दाबून बंद केल्यासारख्या बंद झाल्या आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या ज्या महत्त्वाच्या घटना देशाच्या परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या घडल्या, त्यांच्याविषयी ‘सत्य’ मतदारराजास समजले आहे का? कारण आपले घोषवाक्य आहे ‘सत्यमेव जयते’
मनोहर तारे, पुणे

lp06साधू-महंतांचे देशाला योगदान काय?
‘अडीच हजार कोटींचा कुंभ..’ ही १० जुलैच्या अंकातील कव्हर स्टोरी वाचली. ‘हमारा कोई प्रश्न है, तो हम आप को रात को भी बुला सकते है’ आमच्या शासक-प्रशासकांना उद्देशून साधू-महतांनी केलेले उद्दाम वक्तव्य वाचून मनस्वी चीड आली. या साधू-महंतांना जाहीररीत्या विचारावेसे वाटते की, यांनी आजपर्यंत देशासाठी काय योगदान दिले? यांच्यातील काही जण तर शाही स्नानाला नंग्यानेच येतात हे टीव्हीवर पाहिले आहे. कोणी थोडेसे अश्लील लिखाण, चित्र काढले तर पोलीस त्यांच्या लगेच मुसक्या बांधतात. या नंग्या साधूंचे नंग्या परिस्थितीत तरुणींच्या खांद्यावर हात टाकून काढलेले फोटो सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर जिकडेतिकडे फिरत आहेत, हे सरकार त्यांच्यापोटी असलेल्या अंधश्रद्धेने की आंबटशौकीनपणे पाहात आहे काय? यांचे काही आखाडे त्र्यंबकेश्वरी आहेत, बाकीचे बरेचसे उत्तरेकडील गंगा, यमुना तीरावर असतील. इतकी वर्षे गंगामैयाच्या स्वच्छता अभियानाला यांची काय मदत झालीय का? ‘हम यहाँ कुछ भी कचरा, कुडा डाल सकते है’ ही दादागिरी चालते. श्रीमंतांच्या घरी बऱ्याच वेळा हे शाही पाहुणचार घेतात, शाही गाडय़ांतून कसे फिरतात, हे हल्लीच वृत्तपत्रांतून आले आहे. अशांना आम्ही सुज्ञ जनतेने वंदन करावे काय?
सुधीर देशपांड.

lp08थक्क करणारी लेखमाला
‘कौटिल्य आणि शिवराय’ ही लेखमाला अतिशय आवडली. आसावरी बापट यांनी कौटिलीय अर्थशास्त्राचा आणि शिवचरित्राचा केलेला सखोल आणि तौलनिक अभ्यास यावरून दिसून येतो. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेचे, स्वराज्यावर आणि स्वत:वर आलेल्या प्रत्येक संकटातून सुटका करून घेण्याचे आणि कौटिल्याने अर्थशास्त्रात सांगितलेल्या राज्यरक्षण व विस्तारण्याच्या विविध उपायांचे विलक्षण साम्य पाहून मन थक्क होते. ही लेखमाला लिहिल्याबद्दल लेखिकेला मन:पूर्वक धन्यवाद.
शिवाजी महाराजांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता का? त्यांच्या शिक्षकांनी त्यांना अर्थशास्त्र शिकविले होतो का? त्या काळच्या परिस्थितीकडे पाहता आणि महाराजांच्या बालपणाबद्दल, शिक्षणाबद्दल सर्वसामान्यांना जी माहिती आहे त्यावरून ही गोष्ट शक्य वाटत नाही. प्रत्येक संकटातून त्यांनी स्वत:च्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने आणि अंगभूत चातुर्यानेच योग्य मार्ग शोधून काढला. आग्य्राहून सुटका हा त्यांच्या जीवनातला कळसाध्याय. औरंगजेबाच्या मगरमिठीतून, मनुष्यबळ बरोबर नसताना, सल्लामसलत करण्यासाठी कोणी नसताना, मन शांत ठेवून, अत्यंत विचारपूर्वक आणि कुशल नियोजन करून जिवाला जीव देणाऱ्या स्वराज्याच्या पाईकांवर पूर्ण विश्वास टाकून त्यांनी आपली व संभाजीराजांची आग््रयाहून सुटका करून घेतली. ही त्यांच्या हिमतीची, बुद्धिचातुर्याची, मनावर पूर्ण नियंत्रण असण्याची, आपल्याबरोबर नेले त्या प्रत्येक माणसाची, सर्वात कठोर परीक्षा ते अत्यंत यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. यातच सर्व झाले. महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा हा भाग्योदय ठरला. लेखिकेने काढलेला निष्कर्ष ‘ग्रेट पीपल थिंक अलाइक’ हा खरा ठरविणारा आहे.
-सुहास खेडकर, चेंबूर, मुंबई.

जुनी गाणी आवडीची
‘लोकप्रभा’चा १७ जुलै मध्ये स्वप्नाली ताम्हाणे यांचा ‘संदेशवाहक’ हा लेख वाचला. या लेखात साधारण ब्रिटिश राजवटीपासून म्हणजेच तार व टपाल सेवा भारतात सुरू झाल्यापासून व तत्पूर्वी महान कवी कालिदासांनी रचलेल्या मेघदूत या काव्यात एका शापित यक्षाची कथा आणि व्यथा यात आषाढ महिन्यातल्या मेघाची दूत अशी कल्पना केलेली आहे. त्यानंतरच्या काळातही अनेक कवींनी चंद्रमाला साक्षी ठेवून व वेळप्रसंगी त्यास प्रियकर व प्रेयसीच्या मधल्या दुव्याची जबाबदारी सोपवलेली दिसते. लेखिकेने उल्लेख केलेल्या ‘बंजारन’ या सिनेमातील ‘चंदा रे मोरी पतीया ले जा, सजनी को पहुँचा दे रे’ हे या गाण्यात चंद्रास संदेशवाहक समजून दिलेली उपमा आणि लता-मुकेश यांच्या गोड आवाजामुळे या गाण्याची गोडी काही औरच वाटते. आज माझे वय पासष्ठ वर्षे आहे. तरी माझ्या बाल्यावस्थेपासून प्रथम मी रेडिओवर आणि आता साइटवर ऐकतो. सेवानिवृत्तीमुळे मला भरपूर वेळ मिळतो. त्यामुळे जुनी चंदामामावरची सर्वच गाणी विशेषत: १९५० ते १९६५ या दीड दशकातील गाणी मी आवर्जून ऐकतो. त्यात १९६० मधील ‘बंजारन’च्या या गाण्याला तोड नाही, हे मात्र निश्चित.
श्रीकांत देशमुख, नांदेड

lp07लेख आवडला
दि. १० जुलै २०१५ च्या ‘लोकप्रभा’ अंकात प्रकाशित झालेले ‘शोध’ या सदरात आशुतोष बापट यांनी लिहिलेला ‘समर्थाची आणखी एक घळ’ हा लेख खूप आवडला. त्याबद्दल सुंदरमठ रामदास पठार, गणेशनाथ महाराज संस्थान, पोस्ट वरंध, ता. महाड, जि. रायगड यांच्या वतीने ‘लोकप्रभा’चे व बापट यांचे हार्दिक अभिनंदन. – शिवराम दिघे, घाटकोपर, मुंबई.

‘मयसृष्टी’साठी तपशील
प्रभाकर तांबट यांचा ‘ही तो सारी मयसृष्टी’ हा लेख खूपच छान होता. पौराणिक छायाचित्रांमुळे लेख देखणा झाला. पण एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते. राजा रविवर्मानी जी पौराणिक स्त्रियांची चित्रे रेखाटली (उदा.: लक्ष्मी, सरस्वती, द्रौपदी इ.) त्या स्त्रियांची चेहरेपट्टी रविवर्माना कशी सुचली. त्या काळी अंजनीबाई मालपेकर या प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिकेच्या जलशाला रविवर्मा गेले होते. अंजनीबाईंचा सुंदर चेहरा त्यांनी आपल्या चित्रांसाठी वापरला.
– सी. बा. अलूरकर, पुणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:01 am

Web Title: vachak pratisad 3
Next Stories
1 युद्ध मुशाफिरीचे!
2 क्राइम टाइम, प्राइम टाइम…!
3 ‘शोले’ची चाळिशी अन् राजाभाऊंचा थ्रीडी चष्मा
Just Now!
X