lp05rr ‘म्यांव म्यांवचे टार्गेट तरुणाई’ ही ‘लोकप्रभा’ची कव्हरस्टोरी वाचली. तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता ही खरोखरच चिंतेची गोष्ट आहे. आमच्या वेळी एखाद्याला सिगारेट – दारूचे व्यसन आहे, असे समजले तरी काहीतरी भयंकर आहे असे वाटायचे. पण आताच्या पिढीबद्दल ऐकावे ते सगळे बरेच पुढे गेलेले आहे. एकीकडे या पिढीच्या स्मार्टनेसचे, त्याच्या तंत्रज्ञानाबद्दलच्या जाणिवेचे, त्यांच्या वाढलेल्या आवाक्याचे कौतुक वाटते तर दुसरीकडे त्यांच्या या असल्या व्यसनाधीनतेमुळे मन व्याकूळ होऊन जाते. मानवी समाज आज प्रगतीच्या एका सर्वोत्तम अशा टप्प्यावर आहे. तिचा वापर करत जीवन समृद्ध करणे सोडून ही तरुण मुलं ते असं विचित्र व्यसनांमध्ये का झाकोळून टाकत आहेत तेच समजत नाही.

सीताराम पालवे, अहमदनगर.

खर्चाचा अतिरेक टाळा

‘लोकप्रभा’चा लग्न विशेषांक वाचला. खरं तर मी ‘लोकप्रभा’चे सगळेच अंक नियमित वाचतो. त्यामुळे आत्तापर्यंतचे लग्न विशेषांक मी वाचले आहेत. लग्न ही माणसाच्या आयुष्यात सहसा एकदाच घडणारी घटना. ती आनंदाची तर आहेच. पण हे लग्न विशेषांक वाचताना मला दरवेळी असा प्रश्न पडतो की एरवी प्रागतिक भूमिका घेणाऱ्या लोकप्रभात लग्न करताना अशी लाखो रुपयांची उधळपट्टी करू नका, त्याऐवजी ते पैसे तुमच्या भावी आयुष्यासाठी उदाहरणार्थ घर घेणं, इतर काही गुंतवणूक यासाठी राखून ठेवा, असं का प्रसिद्ध केलं जात नाही? असं अगदीच शक्य नसेल तर चार लेख लग्नाचं उदात्तीकरण करणारे असतील तर एखादा लेख तरी लग्नातला खर्च टाळा असं सांगणारा असायला काय हरकत आहे? उधळपट्टीचा विचार जसा समाजाच्या वरच्या थरातून खालच्या थरात झिरपत जातो, तसाच उधळपट्टी टाळा असा विचारही एक ना एक दिवस झिरपत जाईलच ना!

 स्वप्निल मारणे, औरंगाबाद.

lp06rrसमृद्ध परंपरांचा परिचय

‘लोकप्रभा’चा लग्न विशेषांक वाचला. तो सगळ्याच अर्थानी अतिशय सुंदर, वाचनीय होता. प्रांतोप्रांतीची लग्नं या विभागात तर भारतातल्या विविध प्रांतांमधल्या लग्नपद्धतींची माहिती समजली. आपल्याकडे असलेल्या विविध परंपरांची समृद्धी त्यातून जाणवली. तरी या अंकात कानडी, काश्मिरी, पूवरेत्तर राज्ये, उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणची लग्नं अशी माहिती नव्हती. ती असती तर अंक परिपूर्ण झाला असता.

 रेखा ओवळे, नाशिक.

कॅशलेस व्यवहार भारतात शक्य आहेत का?

lp04r‘कॅशलेस अद्यापही परिघाबाहेरच!’ (‘लोकप्रभा’, २ डिसेंबर) ही कव्हरस्टोरी वाचली. भारतात अद्यापही १५ ते २० टक्के नागरिक निरक्षर आहेत. उर्वरित जे लोक आहेत त्यातील पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त लोकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा पैसे देण्याच्या खरेदी-विक्री करण्याच्या सुविधा देणारी आधुनिक पद्धती ज्ञात नाही मग कॅशलेस व्यवहार शक्य आहे का?

आज मोबाइल, लॅपटॉप, नेट अशा विविध सुविधा आहेत, मात्र त्या समजून घेण्याची क्षमता निम्म्या भारतीयांकडे नाही. अशा समयी कॅशलेस व्यवहार शक्य होईल असे वाटत नाही. एटीएमची सुविधा ही सर्व नागरिकांना शक्य नाही. यासाठी अजून काही कालावधी लागेल.

कॅशलेस व्यवहाराची घाई करू नये असे वाटते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी शेतमजूर, कामकरी – कष्टकरी, कामगार यांच्यासाठीही हे कॅशलेस व्यवहार उत्तम आहेत, मात्र या वर्गाला विश्वास बसण्यासाठी व त्यांना या व्यवहाराचे परिपूर्ण  ज्ञान येण्यासाठी थोडा अवधी द्यावाच लागेल. शासन व रिझव्‍‌र्ह बँक याबाबत निश्चितपणे विचार करेल अशी अपेक्षा.

धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद

एक नाटक अनेक अनुभव

इतर टिपिकल कलाकारांप्रमाणे झगमगाटात न रमणाऱ्या आणि अर्थातच त्यामुळे फारशा चर्चेत नसलेल्या गीतांजली कुलकर्णी यांचे सेलिब्रेटी लेखक हे सदर झक्कास आहे. ‘पिया बहरुपिया’ या नाटकानिमित्ताने झालेली त्यांची भटकंती आणि त्यातून येत असलेले देशोदेशीचे अनुभव हे सारेच विलक्षण आहे. भाषा, प्रांत, वेष या सर्वापलीकडे जाऊन कलाकृतीकडे कसे पाहिले जाते याची एक सुंदर अनुभूती तुम्ही वाचकांना देत आहात. अशा प्रकारचे लेखन हल्ली फारसे दिसून येत नाही. त्यांचे लेखन वाचकांपर्यंत पोहचवल्याबद्दल ‘लोकप्रभा’चे खास आभार.

– अजित कुंभार, कोल्हापूर.

‘पिया बहुरुपिया’ या नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने गीतांजली कुलकर्णी लिहीत असलेले अनुभव फार सुंदर आहेत. त्यांनी आणखी भरभरून लिहावे.

– विशाल तांगडे, चिंचवड.

‘पिया बहरुपिया’ या नाटकाच्या दौऱ्यावरचे गीतांजली कुलकर्णी यांचे लेख फार आवडले.

निनाद जोशी, पुणे.

खेळाला शाप

lp03rक्रीडा प्रकार हा केवळ मेहनतीचाच नाही तर मानसिक तंदुरुस्तीचादेखील भाग आहे. केवळ  अंगमेहनत आहे म्हणून सारं काही जिंकता येत नाही. त्यासाठी विशिष्ट धोरण राबवावं लागते आणि ते अमलात आणावे लागते. पण हे धोरण राबवताना त्यात खेळाप्रती निखळ निष्ठा असेल तर त्याला चांगली दिशा मिळते. पण येनकेनप्रकारेण जर पदकच मिळायला पाहिजे असे धोरण राबवले तर मात्र रशियासारखी आपली परिस्थिती होऊ शकते. २३ डिसेंबरच्या अंकातील मिलिंद ढमढेरे यांचा ‘शापित खेळाडूंचा देश’ हा लेख वाचल्यानंतर याची प्रचिती आली. सोची हिवाळी ऑलिम्पिकमधील उत्तेजकांच्या वापराबाबतची शंका, तेथील उत्तेजक प्रयोगशाळेच्या माजी संचालकांची मुलाखत आणि त्यातून उघडकीस येत असलेल्या गोष्टी हे सारंच भयंकर आहे. खेळ हा शरीराला तंदुरुस्त ठेवतो तसा मनाचीदेखील मशागत करतो. पण येथे मात्र या साऱ्या प्रकरणाने सर्व वातावरण कलुषित झाले आहे.

अजित भोसले, कोल्हापूर, ई-मेलवरुन

महाभारतापासून तेच सुरू

‘पसंत आहे मुलगी’सारखी मालिका लवकर का गुंडाळली? ‘नांदा सौख्यभरे’ फक्त कट-कारस्थाने, मात-शह आणि मात दाखवते. कधी ‘काही सांगायचंय मला, असे म्हणत म्हणत फक्त गप्प बसणाऱ्या कलेक्टरीण बाई, तर दुसरीकडे सीईओ असलेल्या बाई हतबल होऊन ‘अस्सं सासर सुरेख बाई’च्या जपात गढलेल्या! इथे एक लक्षात घ्या, कौतुक करीत, दूषणे देत या सगळ्या मालिका बारकाईने बघितल्या जातात म्हणूनच त्यांच्या सविस्तर कुंडल्या मांडल्या जातात. कारण प्रेक्षक त्या भूमिकांशी आपले आयुष्य कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न करीत असतात. चर्चाचा हा रतीब असाच चालू राहावा म्हणून की काय नवी मालिका आली आहे. ‘खुलता कळी खुले ना’मध्ये आहे, दोनही कुटुंबांतील सगळ्या सदस्यांना आपल्या बोटावर/ तालावर नाचविणारी मोनिका. ती जहांबाज आजेसासूला किंवा फटकळ नानू मामांना, समंजस बहिणीला, नवऱ्याला, प्रेमळ भोळसट सासूला गुंडाळून ठेवत मन मानेल तसे वागते . तेव्हाही तिचं वागणं प्रेक्षकांना अतिशयोक्तिपूर्ण, फिल्मी वाटत नाही. कारण हा अनुभव थोडय़ाफार फरकाने (कुटुंबस्वास्थ्यासाठी) सहन करणारी कुटुंब परिकथेतील नाहीत, हे वास्तव आहे. एवढेच कशाला महाभारतातदेखील द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी किंवा कौरव पांडव युद्धापूर्वी धृतराष्ट्रासह पितामह भीष्माला गप्प बसणं का भाग पडतं.? तर परिस्थिती. स्वतच्या मुलांना/नातवंडांना पांडवांशी युद्ध करण्यापासून किंवा अनाचारी कृत्यापासून रोखण्याची हिम्मत दाखविण्याइतकी भीष्माची घरात सत्ता नव्हती का? पण ..

– अनिल ओढेकर, नासिक.

‘नातिचरामि’चा अर्थ तरुणांपर्यंत पोहोचवा

‘नातिचरामि’ या लेखातून डॉ. मीनल कातरणीकर यांनी लग्नासारख्या अवघड विषयावर अत्यंत सहजपणे, जराही क्लिष्टता न आणता विचार करायला लावणारा मुद्दा हाताळला आहे. साधी सुबोध भाषा हे या लेखाचं वैशिष्टय़ आहे. पती-पत्नीच्या नात्याबद्दल लिहिताना कामजीवन व सहजीवनाचा परिपोष या लग्नाच्या अलौकिक  स्वरूपाबद्दल मुलामुलींना सजग करण्याचे त्यांचे आवाहन सर्वदूर पोहोचले पाहिजे. विशेषत: कॉलेजेसमधून  लेखाच्या आरंभी ‘नातिचरामि’ या शब्दाचा अर्थभेद यायला हवा होता. लेख खूप आवडला.

– अरविंद किणीकर

प्रशांत दांडेकर यांच्या ‘कार्पोरेट कथा’ या सदरातून कार्पोरेट जगतातल्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळते. त्यातून एकूण असं दिसतं की जगात ज्ञानापेक्षाही शहाणपण जास्त महत्त्वाचं आहे. किंमतही त्यालाच जास्त आहे.

– राजेश कागवाड, बेळगाव.

आपल्या अंकांतून देवादिकांचे अति कौतुक होते असे जाणवते. देवी विशेषांक, गणपती विशेषांक असे देवतांचे कौतुक करणारे अनेक विशेषांक आपण प्रकाशित करीत असता. अर्थात इतर आधुनिक विषय तुम्ही हाताळताच, पण हे देवादिकांचे कौतुक थोडे कमी झाले तरी हरकत नाही.

– प्रसन्न लाड, ई-मेलवरून

दिवाळी कथा स्पर्धा हा मस्त उपक्रम आपण सुरू केला आहे. अनेक दर्जेदार कथा त्यामुळे वाचायला मिळत आहेत. पठडीबाहेरील विषय मांडले जात आहेत. असाच उपक्रम कवितांसाठीदेखील सुरू करावा.

– माधवी भोसले, पुणे.

‘अंधारातील कवडसे’ या विजय पांढरीपांडे यांच्या लेखातील विचार प्रत्येकाने कृतीत आणण्याची गरज आहे.

– राधिका गोडकर, पुणे

‘लोकप्रभा’च्या ९ डिसेंबर २०१६च्या अंकातील ‘येता जावळी, जाता गोवळी’ हा साईप्रसाद बेलसरे यांचा लेख आवडला.

 – डॉ. रमा लोहोकरे

डॉ. मीनल कातरणीकर यांचे प्रेमाचे प्रयोग हे सदर चांगले आहे. ते मी नेहमी प्रेमाने वाचते.

– सुरेखा मढवी, ठाणे.

मला ‘लोकप्रभा’तून प्रसिद्ध होणाऱ्या कथा वाचायला आवडतात. त्यांची संख्या वाढवता येईल का?

– गौरी दिघे, पुणे.