06-lp-cvr‘गुरुत्वीय लहरींचा शोध’ या भूषण गद्रे यांच्या कव्हर स्टोरीची प्रस्तावना खूपच मार्मिक आहे. लेख वाचताना अनेक आठवणी जाग्या झाल्या. १९९० साली आमचा मुलगा डॉ. अतीश याच्या निमित्ताने विज्ञान पंढरी, प्रिन्सटनची वारी घडली. तेव्हा आइनस्टाइनचे निवासस्थान, फेरफटका मारण्याचे त्यांचे सुंदर तळे सारे आवर्जून पाहिले. मूलभूत सिद्धांताचे, त्यानुसार प्रगत अतिउच्च तंत्रज्ञान विकसित झाल्यावर होणारे दैनंदिन व्यावहारिक फायदे वाचताना आमच्या मुलाने वरिष्ठ विद्यार्थ्यांसमोर केलेले प्रास्ताविक आठवले. लायगोच्या कामात त्याचेच एक सहकारी कार्यशील आहेत हे कळले. नर्गिस नामक एमआयटी प्राध्यापिका यांचेही लायगोमध्ये निर्णायक योगदान असल्याचे आठवले. सर्नला असताना चार किलोमीटर बोगद्यातून ताऱ्यांची टक्कर घडवण्याचा कोलायडर प्रयोग समक्ष पाहण्यात आला. वैज्ञानिक प्रयोगांबद्दल आत्मीयता वाढली होती.

लेखात सामान्य मनाला पुरणारी पुरेशी समग्रता आहे. सोदाहरण केलेले स्पष्टीकरण सुगम वाटते. मनोवेधकही. आयुकामधील चमूच्या फोटोत दोन मुली पाहिल्यावर बरं वाटलं. लेखात डॉ. अर्चना पै यांची छोटी पुष्टिका समाविष्ट आहे. ही संपादकीय दृष्टीका अनुकरणीय आहे.

Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Why is cholesterol rising among the young
High Cholesterol : तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण का वाढत आहे? तज्ज्ञांनी सांगितले कारण
einstein brain history
आइन्स्टाईनच्या मेंदूची चोरी आणि २४० तुकडे; जाणून घ्या महान वैज्ञानिकाच्या मृत्यूनंतरचे गूढ

संशोधन अतिदीर्घकालीय प्रक्रिया, सैद्धांतिक व प्रायोगिक दोन्ही क्षेत्रांची. येथे त्या लहरी अतिसूक्ष्म व अतिक्षीण. अतिशय क्लिष्ट, किचकट प्रक्रिया आव्हानात्मक पण यश मिळाले. जल्लोष करावा अशीच घटना. जागतिक नेटवर्क, संयुक्तरीत्या काम, त्यातील एकोपा, पारिवारिकता महत्त्वपूर्ण.
– वृन्दाश्री दाभोलकर, ई-मेलवरून

अनंताचा शोध का आणि कुठपर्यंत?
गुरुत्वीय लहरींच्या शोधावरील कव्हरस्टोरी वाचली. अणू-रेणूंवर संशोधन केल्याने विविध औषधांचा शोध लागला आहे. तसे या गुरुत्वीय लहरींच्या शोधाचे प्रत्यक्ष फायदे मानवजातीला भविष्यात काय होऊ  शकतात याचे साधे कल्पनारंजनसुद्धा शास्त्रज्ञांना आज करता येत नाही. न्यूटनने शोधलेल्या गुरुत्वाकर्षणाप्रमाणे या शोधाचे प्रत्यंतरसुद्धा त्या मोजक्याच शास्त्रज्ञांव्यतिरिक्त कधीही कोणालाही येण्याची शक्यताही नाही. या शोधाच्या अनुषंगाने लेझर आणि अन्य उपयुक्त तंत्रज्ञान विकसित होते असे समर्थन केले. ते फारच लंगडे वाटते, कारण ते तसे या प्रयोगाशिवायही विकसित करायला काहीच हरकत नाही. विज्ञानाला अनेक प्रश्न कायम भुरळ घालतात. परंतु त्यांची उत्तरं वैज्ञानिक भासणाऱ्या कल्पनाविलासापलीकडे जाऊ  शकत नाही. हा विषय विज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म इथवर कुठेतरी जाऊन थांबतो. अणूच्या केंद्राभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन, पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र, सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी, आकाशगंगेत फिरणारे असे अनेक सूर्य आणि विश्वात फिरणाऱ्या अशा अनेक आकाशगंगा हा शोध कधी संपू शकेला का? अधिकाधिक दूरचे अंतराळ आणि त्यातील कृष्णविवरे न्याहाळून त्याचे उत्तर कधी मिळेल का? दोन आरसे समोरासमोर ठेवल्यास अगणित प्रतिमा निर्माण होतात. लहानपणी आपण आरसे लक्षात न घेता जास्तीतजास्त लांबच्या प्रतिमा मोजत राहतो तसे हे वाटते.

विश्वाची आणि सजीवाची निर्मिती झाली आहेच तर ते विश्व त्या सजीवांना जगण्याकरता कसे जास्त लायक बनवता येईल यावर ही सगळी विद्वत्ता आणि हा खर्च व्हावा असे वाटते.
– प्रसाद दीक्षित, ठाणे, ई-मेलवरून

सुधारणा हवी
दिनांक २६ फेब्रुवारीच्या अंकातील ‘दशा नाटय़गृहांची’ वाचून फारच अचंबित झाल्यासारखे झाले. महाराष्ट्राच्या विविध शहरांतील नाटय़गृहांची स्थिती वाचून नाटय़ कलावंत कुठल्या परिस्थितीत नाटय़ प्रयोग सादर करून ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीशी इमान राखतात हे कळले. खरे तर नाटकाचे तिकीट ३०० ते ४०० रुपये असतानासुद्धा नाटय़रसिक महागडे तिकीट काढून नाटकांवरील प्रेम व मायबाप प्रेक्षक म्हणून आपला वाटा उचलत असतात. निर्मात्यांचा खर्च, नाटय़गृहांचे भाडे, वाहतूक, प्रवास भाडे, तालिमींचा खर्च, इतर खर्च वगळता शेवटी कलाकारांचे (पाकीट) मानधन एवढे सगळे सांभाळताना हातातोंडाशीच गाठ असल्याचे जाणवते. राज्यस्तरीय व नाटय़संमेलन आयोजित करणाऱ्या साहित्य संमेलन भरविणाऱ्यांना ते पुरस्कृत करणाऱ्याच्या खर्चावर लगाम घालून प्रत्येक शहरामधील नाटय़गृह सुस्थितीत आणून सोयी-सुविधा पुरविण्याचा कामाकडे जातीने लक्ष घालून, त्यामध्ये स्थानिक प्रशासनाचा हातभार लावण्याचे आवाहन करता येऊ शकेल. शेवटी कलावंत कलेवरील प्रेमापोटी व नाटय़रसिक आवडीसाठी नाटक पाहायला जातात व जात राहणार. तेव्हा सर्वच संबंधित याकडे जातीने लक्ष घालून आपली जबाबदारी पार पाडतील ही आशा.
– अनिल प्रल्हाद पाठक, विरार (प.), ई-मेलवरून

07-lp-cvrआयएफआरचा नेमका अर्थ कळला…
‘चिनी दादागिरीवर भारतीय मात’ ही कव्हर स्टोरी आयएफआरचे अनेक पैलू उलगडणारी होती. किंबहुना आपल्या संरक्षण सामग्रीचं असं इतकं प्रदर्शन कशाला हवं असा विचार सुरुवातीला या कार्यक्रमाबद्दल होता. पण ‘लोकप्रभा’ची कव्हर स्टोरी वाचल्यानंतर नेमकं मर्म कळलं. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम केवळ एक औपचारिक महोत्सव नसून त्यामागे एक संदेश देण्याची जी काही स्ट्रॅटेजी असते ती वाचल्यावर याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. बहुतांश वेळा आपल्याकडे अशा महोत्सवांचे वृत्तांकन एका ठरावीक साच्यातून होत असते. पण आपण कार्यक्रमाची आखणी, नियोजन आणि त्यामागील धोरणाचा आढावा ज्या पद्धतीने घेतला आहे त्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन या लेखातून मिळाला. त्याचबरोबर मथितार्थमधून याच विषयावर केलेले भाष्य उद्बोधक होते.
– अनंत कांबळे, सोलापूर, ई-मेलवरून

पाकिस्तानबद्दलचे ज्ञान वाढेल
लेव्ही व स्कॉट-क्लार्क यांचे ‘न्यूक्लियर डिसेप्शन’ या पुस्तकाचे ‘पाकिस्तानी अणुबॉम्ब: एक घोर फसवणूक’ असे रूपांतर मी केले आहे. रूपांतर म्हणायचे कारण म्हणजे ते थेट भाषांतर नसून मी जवळ-जवळ ३५ टक्क्यांनी ते छोटे केले आहे व मग भाषांतर केलेले आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सर्व टिपासुद्धा माझ्या स्वत:च्या आहेत.

‘तो एक पाकिस्तानी’ हे पुस्तक मी चाळले आहे व मूळ इंग्रजी पुस्तक बऱ्यापैकी वाचले आहे. या पुस्तकात मुख्यत्वे डॉ. खान यांचीच माहिती दिलेली आहे जी मी रूपांतर केलेल्या पुस्तकातही आहेच, पण ‘न्यूक्लियर डिसेप्शन’मध्ये एकूणच विशाल अवलोकन केलेले आहे. हे पुस्तक वाचल्यावर वाचकांचे पाकिस्तानबद्दलचे ज्ञान व त्याबद्दलची ओढ खूपच वाढते असे मला वाटते. या सर्व बाबींची माहिती ‘लोकप्रभा’च्या वाचकांना देण्यासाठी आणखी एक पूरक लेख लिहावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
– सुधीर काळे, ई-मेलवरून

08-lp-cvrतांत्रिक त्रुटी नसाव्यात
२६ फेब्रुवारीच्या अंकातील ‘दशा नाटय़गृहांची’ हा लेख वाचला. मी नाटय़गृह सल्लागार म्हणून नवीन नाटय़गृहांचे नियोजन व जुन्यांचे नूतनीकरण हे विशेष प्रकारचं काम करतो. मी आतापर्यंत केलेली नाटय़गृह यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. तांत्रिक दृष्टीने त्रुटी राहिल्यामुळेच नाटय़गृहे सक्षमरीत्या चालत नाहीत, त्यामुळे रंगकर्मी व रसिकप्रेक्षक यांचा हिरमोड होतो.
– प्रशांत वराडकर, मुंबई, ई-मेलवरून

परिपूर्ण ताट
मी ‘लोकप्रभा’ची नियमित वाचक आहे. ‘लोकप्रभा’मधली नवी कोडी सोडवायला मजा वाटते. ‘पिठलं भात’ लेख खूप आवडला तसेच परदेशांची माहिती, देवस्थान, किल्ले आणि सुंदर सुंदर फुले बघून मनाला खूप आनंद होतो. माझ्यासारख्या जेष्ठांना घर बसल्या मेजवानीच. ‘लोकप्रभा’ म्हणजे परिपूर्ण जेवणाचे ताटच वाटते. जसे भात, वरण पोळी, चटणी, लोणचे, कोशिंबीर आणि एखादा गोड पदार्थ असे परिपूर्ण ताट पाहिल्यावर भूक लागणारच. तसे लोकप्रभा बौद्धिक भूक भागविते. डोळ्याचे पारणे फिटते. असे सुंदर अंक निघावेत हीच इच्छा.
– उषा रेणके, अंधेरी, मुंबई

‘आभासी वास्तव’ हा २२ जानेवारीच्या अंकातील मथितार्थ अतिशय मार्मिक आणि समर्पक असा आहे. सेल्फी आणि सेल्फिश मनाची सुसंगत मांडणी आपण केली आहे. या लेखाबद्दल मनापासून धन्यवाद.
– राधा मोहिते, ई-मेलवरून

प्रशांत दांडेकर यांचा ‘रुट कॉज अ‍ॅनालिसिस’ हा २६ फेब्रुवारीच्या अंकातील09-lp-cvr लेख म्हणजे यशाच्या मुळापर्यंत जाणारी कॉर्पोरेट लघुकथा म्हणावी लागेल. त्यांच्या लिखाणाला शुभेच्छा.
– दत्तात्रेय दांडेकर, ई-मेलवरून

एक पक्षीय विचार
गेली पंधरा वर्षे ‘लोकप्रभा’चा वाचक आहे. अनेक वेळा वाचक प्रतिसाद सदरात पत्रदेखील प्रकाशित झाले आहे. त्यामुळे माझ्या मताला काही किंमत आहे असे मला वाटते. त्यामुळे मी हे सहजपणे सांगू इच्छितो की ‘लोकशाही, देशद्रोह अन् सहिष्णुता’ हा मथितार्थ वाचून मनाला आनंद नाही झाला. विनायक परब हे नेहमी विचार प्रवर्तक लेखन करतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये समतोलपणाला ढळू देत नाहीत. असे असताना या वेळेस इतके पराकोटीचे एक पक्षीय पातळीवर जाऊन लेख कसा झाला हे समजत नाहीये.

मी भाजपवाला नाही. संघवाला पण नाही. मोदींच्या चुकांची अनेक ठिकाणी तपासणी करण्यात मी कमी केलेले नाही. बुलेट ट्रेन फक्त मुंबई ते अहमदाबादच का? दिल्ली ते कोलकाता किंवा कोलकाता ते चेन्नई का नाही? स्मार्ट सिटी म्हणजे स्थानीय नोकरदार व्यक्तींना आणि पुढारी वर्ग यांचे उखळ पांढरे करण्याची पर्वणी आहे, हे लिखाण नाराज करणारे आहे. तरीसुद्धा हैदराबाद काय आणि दिल्ली येथील घटनांना मुळात पत्रकारांनी फक्त मोदींविरोधी वातावरण निर्माण करणे हा एक मोठा भाग आहे असे मला वाटते. जेएनयू हा डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला आहे. त्याबद्दल हरकत नाही. पण देश विरोधी आंदोलन चालवणारे हेडक्वार्टर बनू पाहता तथाकथित धर्मनिरपेक्ष बुद्धिजीवी वर्ग आणि मीडियाने त्याला साथ द्यायला नको असे मला मनापासून वाटतं. ‘लोकप्रभा’वर माझे प्रेम आहे व ते पुढेही यथावत राहील अशी माझी खात्री आहे.
– चंद्रकांत लेले, भोपाळ  म.प्र, ई-मेलवरून

लग्न सोहळ्यापलीकडे कधी जाणार…
लग्नसराई विशेषांक वाचला. लग्नासंदर्भातील अनेक विषयांना आपण स्पर्श केला आहे. पण तोदेखील केवळ साजरीकरणाच्या आणि सोहळ्याच्या अनुषंगाना. लग्न म्हणजे खर्च, आणि तो करणे शक्य नसणाऱ्यांनी चारहात लांब राहावे हेच यातून सूचित होते. ते जरी मान्य असले तरी या सोहळ्यापलीकडे लग्नाला काही अर्थ आहे की नाही या प्रश्नाला आपण या अंकात कसलाच वाव दिला नाही. अशा विषयांवर विचारमंथन करणारे लेखदेखील ‘लोकप्रभा’ने प्रकाशित करावेत अशी अपेक्षा आहे.
– अनिल जाधव, औरंगाबाद, ई-मेलवरून.