‘थेट जेएनयूमधून’ ही कव्हर स्टोरी (लोकप्रभा १८ मार्च ) वाचली. कन्हैया हिरो झाला असेल तर आपले सर्व राजकीय पक्ष- वर्तमानपत्रे- समग्र मीडिया किती पोरकट आहेत ते सिद्ध झाले. कन्हैयाची भाषणे तर वास्तवाला भिडणारी नाहीत, याची जाणीव त्याला आहे म्हणूनच तो म्हणाला ‘बदनाम हुये तो क्या हुआ नाम तो हो गया.’ या अर्थाने त्याला प्रामाणिक म्हणावयास हरकत नसावी. याउलट अभाविप म्हणजे बिनबुडाच्या तत्त्वज्ञानाच्या संघ, भाजप परिवाराचे खेळणे. त्यामुळे काही घडले तरी अभाविप ना काही भूमिका घेऊ शकते ना ठरवू शकते.

घुसखोरांची समस्या सोडविणे हे ज्येष्ठांचे संघ-भाजपचे काम. (आता तर त्यांचे शासनच आहे!) पण हे काम- आंदोलनाचे अभाविपवर त्यांनी सोपविले. हे एक उदाहरण. अशी अनेक हास्यास्पद उदाहरणे देता येतात. जेएनयूत ‘अभाविप’ जर बळीचा बकरा झाला असेल तर आश्चर्य नव्हे. याउलट कन्हैयाची भाषणं बिनबुडाची असली तरी तसेच बिनबुडाचे काँग्रेस-समाजवादी-साम्यवाद्यांचे नेते लगबगीने जेएनयूत दाखल झाले. आज यांची अशी स्थिती झालेली आहे की, मोदी शासनाला काही करून इसाई-इस्लामी-दलितविरोधी-जातीयवादी-प्रतिगामी-साम्राज्यवादी ठरविण्याची घाई. याकरिता कोणत्याही पातळीवर जायची यांची तयारी आहे. देशाच्या जनतेला याच्याशी काहीही देणे- घेणे नाही. कारण रोटी- कपडा-मकानमध्येच त्यांच्या दिवस-रात्री संपून जातात. भरीला अज्ञान आहेच. अशी स्थिती राहाणे हेच सत्ताधाऱ्यांच्या सोयीचं ठरतं.

कन्हैयाला गोळी घाला-जीभ कापा-धक्काबुक्की करा किंवा धमक्या द्या, हा प्रकार वैफल्यातूनच जन्माला आला. वादविवादानेच कन्हैयाला सहज पराभूत करता येत असता (भले ते मग हंटिंग करू देत ना!) ते शासनानेही टाळले आणि अभाविपनेही. नाही म्हणायला प्रा. मकरंद परांजपेनी कन्हैयाला सहजच पराभूत केले.

कन्हैयाला म्हणे देशापासून नव्हे तर जातीयवाद- शोषण-महागाई- वर्गभेद- गरिबीपासून आझादी हवी आहे. याविरुद्ध तर सारा देशच आहे. याला केवळ संघ-भाजप परिवार-हिंदू समाज जबाबदार आहे? साठ वर्षे सत्ता असलेल्या केरळ-बंगालमध्ये शासन असलेले साम्यवादी काँग्रेसबरोबरच होते. देशाला हवा तो बदल झाला नाही याला कारण या पक्षांचे वास्तवाला पाठमोरे धोरण कारणीभूत नाही? यांनी केवळ सत्तेच्या साठमारीबरोबरच वैचारिक आणि आर्थिक भ्रष्टाचार केला नाही? याचा संबंध जेएनयूत होत असलेल्या देशविघातक कार्यक्रम-घोषणांशी काय आहे? टीम कन्हैया किती पोरकट आहे ते सिद्ध होते.
– सूर्यकांत शानबाग, बेळगाव.

06-lp-patreहीन राजकारण
१८ मार्चच्या ‘लोकप्रभा’त ‘जेएनयूमध्ये नेमके काय घडले’ याविषयी आँखो देखा हाल प्रकाशित करून फार उत्तम केले. तिथे भारताविरोधात घोषणाबाजी झाली, पत्रके वाटली गेली हे निश्चितच होते; पण कन्हैया तिथे नव्हता, यात त्याचा काही हात नाही वगैरे भासवून मोदीविरोधात रान उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधी पक्षांनी, तसेच काही तथाकथित बुद्धिवंतांनी व काही घरभेद्यांनी केला. कदाचित हे प्रकरण हाताळताना भाजप चुकला असेलही, पण या काही डाव्या संघटना राष्ट्रप्रेमी निश्चितच नाहीत व आता ते उघडपणे भारताविरोधात बोलत आहेत आणि तरीही भाषणस्वातंत्र्य हवे असा शंख चालला आहे. आम्ही हिंदू आहोत असेसुद्धा निधर्मी राष्ट्रात म्हणायचे नाही, असे सांगणारे निधर्मी भारताच्या विरोधात बोलणाऱ्यांचा जयजयकार करीत आहेत. राजकारणासाठी आम्ही आमची देशनिष्ठा व नीतिमूल्ये कशी तुडवली आहे, याचेच हे प्रत्यंतर आहे.
-डॉ. अनिल सोहोनी, दोंडाईचा

‘जेएनयू प्रकरण- धोक्याची नांदी’
‘लोकप्रभा’च्या (१८ मार्च) अंकात कव्हर स्टोरीमध्ये सुयश देसाईंचा थेट ‘जेएनयूमधून’ लेख म्हणजे एक ‘आँखो देखा हाल’ आहे. लेखक स्वत:च त्या  संस्थेमध्ये त्यांनी शिक्षण घेत आहेत. तिथल्या खऱ्या परिस्थितीची इतकी सविस्तर माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली. टी.व्ही.चॅनलवाले, राजकीय नेते, विविध विद्यार्थी संघटना, केंद्र सरकार सर्वच आपआपली बाजू मांडतात. तिच्यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच पडतो.

जे काय तिथे घडले हे अयोग्यच आहे. असंतोषाची ठिणगी ही विद्यार्थ्यांच्या वाजवी (किंवा अवाजवी) मागण्यांशी संबंधित असते; पण या वेळी प्रकरण आणि कारण निराळेच होते. अफजल गुरू, देशाचे तुकडे करण्याची भाषा, पंतप्रधानमोदींवर ताशेरे मारणे, काश्मीर पाकचा भाग आहे. कम्युनिस्ट/ काँग्रेस/भाजप पक्षांची ढवळाढवळ इत्यादींनी हा प्रकार ग्रासला होता. देशाच्या, स्थैर्याच्या व ऐक्याच्या दृष्टीने तर या प्रकाराची निंदाच करायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या सैन्यदलाविषयीचे भाष्य आक्षेपार्ह व निंदनीय आहे. याबाबतीत न्यायालयानेसुद्धा या विद्यार्थ्यांना चांगलेच चोपले आणि हे आवश्यकच होते.

अंगात नेतेगिरीचे गुण असले म्हणजे अशा व्यक्तींनी काही तरीच मूर्खासारखे, तर्कशून्य बोलण्याचा परवाना मिळाला असे समजू नये. भान ठेवूनच बोलायला हवे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कोणी तरी नेता मिळाला की ते एकत्र जमतात व सारासारविचार न करता त्याच्या मागे जातात. या प्रकरणात राजकीय नेत्यांची लुडबुड व्हायला नको होती. २-३ वर्षांपूर्वी दिल्लीत अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली केजरीवाल व श्रीमती किरण बेदी यांनी जे आंदोलन केले होते त्याला विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनापासून पाठिंबा दिला होता. इतकेच नव्हे तर भारतभर लोकांनी या आंदोलनाचे कौतुक केले होते. केंद्र सरकारला चांगलाच हादरापण बसला, कारण उद्देश चांगला होता.

जे जनतेच्या व देशाच्या हिताचे आहे तेच समस्त नेते मंडळींनी करायला हवे. देशविघातक कृत्य कोणीही सहन करणार नाही. अंगात नेतेगिरी असल्याचा गैरवापर झाल्यामुळे मुंबईच्या सूतगिरण्या बंद पडल्या व असंख्य मिल मजूर बेकार झाले. त्यांची उपासमार झाली. नागपुरातसुद्धा एमआयडीसीमध्ये ५० ते ६० टक्के कारखाने बंद आहेत. सर्वच राजकीय पक्ष याला जबाबदार आहेत.

हे कन्हैया प्रकरण काही दिवसांत थांबेल, पण अशी आंदोलने देशाच्या ऐक्य व प्रगतीला बाधक ठरू नये याची सर्वानीच काळजी घ्यायला हवी. चांगले नेते तयार होणे जरुरीचे आहे. त्यांची विचारसरणी नेहमीकरिता टिकून राहते; अन्यथा मोरारजीभाईंनी केव्हा तरी म्हटले होते ‘क्विक राइज हॅज क्विक फॉलिंग’ याची प्रचीती येईलच.
-भाऊराव हेडाऊ, नागपूर.

07-lp-patreभ्रष्टाचारी राजकारण्यांना धडा
‘इतकं सगळं आलं कुठून?’ या ‘लोकप्रभा’ दि. १ एप्रिलच्या अंकातील लेखामुळे, तसेच भुजबळासंबंधीच्या इतर लेखांमुळे महाराष्ट्रातील जनतेला आपले नेते काय लायकीचे आहेत याचे ज्ञान झाले.   स्वा. सावरकर म्हणतात, ‘मज राज्य नको, आईची झोपडी प्यारी!’ सर्वस्वाचा त्याग करून देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिवीरांना हे सर्व पाहून काय वाटत असेल. एक राजकारणी एवढा भ्रष्टाचार करतो. इतकी वर्षे ही संपत्ती मिळवतो आणि त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यांना कोणी रोखू शकेल अशी यंत्रणा असू नये हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. भुजबळांसारखे असे किती असतील? देशभर अशा भ्रष्टाचारी राजकारण्यांनी देशाची संपत्ती आपल्या हाती एकवटल्यावर देशाची आर्थिक प्रगती कशी होणार.

आपल्या भुजबळांवरील लेखाबाबत अजून असे म्हणता येईल, ईडीकडे दाखल झालेले भ्रष्टाचार पुरावे, खासदार सोमय्या, अंजली दमानिया यांनी सादर केलेली कागदपत्रे मिळवून जाहीरपणे छापली असती तर या लेखांना विशेष वजन प्राप्त झाले असते.

‘लोकप्रभा’चा हा अंक खूपच वाचनीय झाला आहे. ‘सुहाना सफर’मधील प्रिसिलिया मदन हिने पनवेल ते कन्याकुमारी सायकलने केलेला प्रवास युवकांना प्रेरणादायी ठरेल. यानिमित्ताने तरुणवर्ग ‘भारत जोडो’ उपक्रमात आपोआप सहभागी होऊ शकतात. चिन्मय मांडलेकर यांच्या मुलाखतीतून एक ध्येयवादी, महत्त्वाकांक्षी कलाकाराचे दर्शन घडले. मराठी सिनेमांना आणि कलाकारांना सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. संपादकाच्या आवडीचा विषय ‘चित्रकला’ याही अंकात रंगरेषामधून चित्रकारांच्या कुंचल्यातून उतरलेल्या चित्रांसहित लिहिलेला लेख ‘सोयरे वनचरे’ आवडला. इतर सदरेही वाचनीय आहेत. एकूण हा अंक खूपच चांगला आहे, असे म्हणावेसे वाटते.
-चंद्रकांत वैद्य, कल्याण, ई-मेलवरुन

09-lp-patreरात्रीचा खेळ आणि विरोधाचं भूत
रात्रीस खेळ अन् दिवसाचे नाटय़ (लोकप्रभा, १८ मार्च) हा ‘टीव्हीचा ‘पंच’नामा’ सदरातील पराग फाटक यांचा लेख ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेवर आणि सद्य परिस्थितीवर चांगल्या प्रकारे प्रकाशझोत टाकणारा होता. मुळातच या मालिकेविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. कोकणची पाश्र्वभूमी, कोकणातील भाष्य, तेथील जातिव्यवस्था, देव आणि भुताखेतांवरील श्रद्धा-अंधश्रद्धा, एखाद्या वास्तू किंवा ठिकाणाबाबत असणाऱ्या दंतकथा याबाबत अनेक साहित्यिकांनी भरभरून लिहिले आहे, पण चोखंदळ पर्यटक कोकणच्या निसर्गसौंदर्यावर प्रेम करतात. त्यामुळे अशा गूढ विज्ञानाबाबत ते निसर्गाचा एक चमत्कार अशाच नजरेतून बघतात.

कोकणातील पर्यटनाला धोका निर्माण होईल किंवा पर्यटक कोकणाकडे पाठ फिरवतील, असे म्हणणे चुकीचे आहे. शिवाय भुताखेतांवर किंवा रहस्यावर आधारलेली ही काही पहिली मराठी मालिका नाही. यापूर्वीही ज्या वेळी टीव्हीने कात टाकली नव्हती त्या वेळी दूरदर्शनवरील ‘श्वेतांबरा’ ही मालिका काहीशी गूढ पद्धतीने प्रसारित केली जायची आणि अलीकडच्या काळात ‘एक तास भुताचा’ ही मालिका पूर्णपणे भुतांच्या गोष्टींवरच सुरू होती. त्याशिवाय रत्नाकर मतकरी यांची ‘गहिरे पाणी’ आणि नारायण धारप यांच्या कादंबरीवर आधारित महेश कोठारे यांनी ‘अनोळखी दिशा’ ही मालिका आणली होती. अशा मालिकांमधून भूत, रहस्य, गूढकथा असा पुरेपूर मसाला असूनही तेव्हा त्यांना विरोध झाल्याचे ऐकिवात नाही.

काही दिवसांनी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका शेवटचा भाग प्रसारित करून बंदही होईल; पण विरोध नेमका कशासाठी आणि कुणासाठी करायचा हे भूत मात्र तथाकथित विरोध करणाऱ्यांच्या मानगुटीवरून उतरणार नाही.
– सुहास बसणकर, दादर.

08-lp-patreआमच्याकडे सदोष नाटय़गृह
२६ फेब्रुवारीचा अंक नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण होता. त्यातील दशा नाटय़गृहांची हा लेख विशेष आवडला. मी अमरावती येथे राहते. मला वाटत होते की मोठय़ा शहरांतील नाटय़गृहे चांगली असतील, पण भ्रमनिरास झाला. अमरावतीतील संत ज्ञानेश्वर सभागृह आहे तेथे आम्ही ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक बघायला गेलो, पण त्या नाटकाचा आस्वाद पूर्णपणे घेऊ शकलो नाही, कारण सदोष ध्वनी व्यवस्था. अक्षरश: नाटक मध्येच थांबवून दिग्दर्शकांनी याबद्दल असंतोष व्यक्त केला. आम्हा प्रेक्षकांना अक्षरश: उकाडय़ात बसून नाटक बघावे लागले. त्यामुळे एक चांगली कला आम्ही बघू शकलो नाही.
-अंजली पेशवे, अमरावती.

पर्यटन विशेषांक आवडला. हनीमून स्पेशल पर्यटन ही संकल्पना एकदम भन्नाट आहे. पर्यटनात अनेक ट्रेंड असतात, पण आपल्या ते लक्षातच येत नाही. आपण हा ट्रेंड वेगळ्या पद्धतीने मांडल्यामुळे अनेकांना नक्कीच फायदा होईल. अशाच नवनव्या संकल्पना आपण पुढील अंकातून मांडाव्यात.
 – अजित पाटील, इचलकरंजी