प्लास्टिकमय भीमाशंकर

आमची देवस्थाने तसेच जंगले यांची आपणच वाट लावतो आहे

03-lp-cvr‘लोकप्रभा’ (२३ एप्रिल) च्या अंकात सुहास जोशींच्या कव्हरस्टोरीअंतर्गत ‘भीमाशंकरच्या मस्तकी कचऱ्याची गंगा’ हा सविस्तर आणि पोटतिडिकीने लिहिलेला लेख म्हणजे आमची देवस्थाने तसेच जंगले यांची आपणच वाट लावतो आहे याचे प्रत्यक्ष वर्णन. पवित्र भीमाशंकरचा भाग व देवालय मी बऱ्याच वर्षांपूर्वी बघितले. तो मनाला आनंद देणारा त्या वेळचा परिसर आणि आताचा परिसर काही तुलनाच करवत नाही. ‘फ्रॉम हेवन टू हेल’ असेच म्हणावे लागेल. या लेखातील चित्रे बघून तर असे वाटते की, आपण सर्वत्र घाणीचे साम्राज्य किती लवकर निर्माण करता येईल आणि या चढाओढीत सरकार, वन विभाग, जनता आणि देवस्थानची काळजीवाहू मंडळी यापैकी कोण पुढे असेल याचीच चिंता लागलेली दिसते.

भीमाशंकरच काय, कुठेही जा, परिस्थिती जवळपास तशीच. आळंदीची पवित्र नदी इंद्रायणी बघितली किंवा उत्तरेकडील कुलु-मनाली जवळच्या रोहतांग पास किंवा बियास नदीचा परिसर. सर्वत्र प्लास्टिकचाच खच. ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ वापराच्या वस्तू आल्यापासून तर यात जास्त भर पडतेय. सर्वच जबाबदार आहेत. या लेखातील छापलेली चित्रे बघितली, तर मला नाही वाटत कुणी भीमाशंकरला जायची िहमत करेल; पण मग जाणार तरी कुठे? इतका सविस्तर लेख खूप मेहनत घेऊन सुहास जोशी यांनी लिहिला. खरं म्हणजे सरकार, नगरपालिका व देवस्थान यांनी गंभीरपणे लक्ष द्यायला हवे. पावित्र्य आणि घाण एकत्र नांदू शकतात यावर विश्वास ठेवायला हवा असेच वाटते.

ही भयंकर घाण हटवायची असेल आणि खरोखरच ‘स्वच्छ भारत’ हवा असेल तर प्लास्टिकच्या सर्वच वस्तूंच्या नुसत्या वापरावर बंदी नाही, तर या वस्तू बनवणाऱ्या कारखान्यांना कुलूप ठोकायला पाहिजे. ना रहेगा बाँस, ना बजेगी बाँसुरी. कायदे, दंड या सगळ्या वल्गना आहेत. निदान भारतात तरी आपल्याला याचा अनुभव पदोपदी येतोच. नैसíगक पर्यावरण तर बिघडलेले दिसतेच, पण राजकारणातसुद्धा तेच चालले आहे.

‘इफ यू सेव्ह नेचर, नेचर विल सेव्ह यू’ हे लक्षात ठेवायला हवे. सिंगापूर विमानतळावरच्या प्रसाधनगृहात ते वापरणाऱ्यांना तिच्या स्वच्छतेचे मानांकन (ग्रेडेशन) करायला सांगतात, तर मलेशियात ‘क्लिनेस्ट टॉयलेट इन द वर्ल्ड’पण आहे. काय ते आपणच ठरवायला हवे.
– भा. ल. हेडाऊ, नागपूर.

04-lp-cvrपराक्रम तेथे हनुमान

सा. ‘लोकप्रभा’च्या २९ एप्रिलच्या अंकात रामभक्त हनुमानाची विविध प्रकारची माहिती आल्याने अंक अत्यंत लोभसवाणा झाला आहे. मात्र त्याच्या मुखपृष्ठावरील चित्र तितकेसे आवडले नाही; कारण कदाचित त्याचे चित्र ज्या नेहमीच्या रूपात दिसते तसे नाही. हनुमानासंबंधी वेगवेगळी माहिती व परस्परविरोधी कथा वाचल्यानंतर एक लक्षात आली की त्यातील एक खरी व बाकीच्या कल्पित असल्या पाहिजेत. काहीही असले तरी जनमानसाला भावलेले हनुमानाचे रूप म्हणजे रामभक्त, अत्यंत बुद्धिमान, तितकाच नम्र व चतुर, दास्यभक्तीचा आदर्श. रामायण कथा हनुमान व त्याचे कार्य याशिवाय अपूर्ण आहे.
– श्यामसुंदर गंधे, पुणे.

वाचनीय हनुमान विशेषांक
‘लोकप्रभा’चा हनुमान विशेषांक आवडला. दत्त विशेषांकाप्रमाणेच हाही अंक उत्तम होता. या अंकातील समर्थस्थापित अकरा मारुती आणि हनुमान आला कुठून हे दोन्ही लेख विशेष आवडले. हनुमंताचा बालपणीचा पराक्रम अद्भुत आहे. हनुमान सूर्यदेवासारखा कर्मयोगी आहे. हनुमान दिव्य ‘विभूती’ आहे. उत्कट दिव्य व्यक्तिमत्त्व आहे. जगातील कोणत्याही संस्कृतीला तेजोमय, ज्वलंत दिव्य विभूतीमत्त्व लाभलेले नाही. ते हनुमानाला लाभले आहे. परिपूर्ण करणारे जे जे आहे, त्या सर्वाचे मूर्तिमंत प्रतीक हनुमान आहे. यम, इंद्र, कुबेरच नव्हे तर साक्षात विष्णू देवालाही लाजवणारे सामथ्र्य, शक्ती आणि सर्वच्या सर्व सद्गुण एका व्यक्तीमध्ये सामावल्याचे आजपर्यंत आठवत नाही. पण, हे सर्व हनुमानात आहे. हनुमान स्वत:ला श्रीरामप्रभूचा दास समजायचा आणि आजही अदृश्य स्वरूपातही रामाचा दास आहे.
– सुनील कुवरे, शिवडी.

हनुमान विशेष अप्रतिम
हनुमान विशेष हा अंक खूप आवडला. मारुतीराया अथवा हनुमंत हे ‘प्राणतत्त्व’ आहे. अखिल मानवजातीसाठी प्राणतत्त्वाची गरज असते. भारतातील प्रत्येक गावात मारुती असतो. काही ठिकाणी मंदिरही नसते. परंतु मारुतीची मूर्ती असते. सर्व समाजांत मारुतीला आदराचे आणि मानाचे स्थान आहे. मारुतीरायांनी रामरायाची जशी सेवा केली तशी सेवा आज देशाचे सरकारही करीत नाही आणि विरोधी पक्षही. त्यामुळे आपल्या देशात रामराज्य कधीही येणार नाही.
– आर. के. मुधोळकर, नांदेड

06-lp-cvr‘हनुमान विशेष’ वाचून आनंद झाला. वैशाली चिटणीस यांचा लेख आवडला. सुदर्शन कुलथे यांचे ‘डोकं लढवा’ वाचल्याशिवाय ‘लोकप्रभा’ वाचल्याचे समाधान मिळत नाही.
– अपर्णा कुलकर्णी, ई-मेलवरून.

 

 

05-lp-cvrजिथे तिथे भोंदूगिरीच
८ एप्रिलचा रिअल इस्टेटचा विशेषांक वाचला. त्यासंबंधी सुचलेले काही विचार मांडत आहे. मुंबईतील पहिला टॉवर म्हणायचा झाला तर ‘उषाकिरण’. या बिल्डिंगच्या फ्लॅटच्या जाहिरातीसुद्धा त्या वेळी वृत्तपत्रात छोटय़ा जाहिरातींच्या रकान्यात सात-आठ ओळीत असायच्या. हे पाहता सध्या बिल्डर वृत्तपत्रांतून त्यांच्या बांधकामाच्या पान पान भरून जाहिराती करीत असतात. जर फ्लॅट विकलेच जात नसतील  (तसे म्हणतात तरी) आणि ग्राहकांना वाजवी किमतीत घर देण्याचा दावा करतात तर जाहिरातींसाठी एवढा अवाढव्य पैसा येतो कुठून? सध्या भारतात हुश्शार अर्थतज्ज्ञांची वानवाच असल्याने याचा छडा लागणे अवघड आहे.

भोंदूगिरी करण्यासाठीच जणू काही भारतीय (मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो) पृथ्वीवर अवतार घेतो; त्याच्या नसानसात भोंदूगिरी ओतप्रोत भरलेली असते. मग त्यातून बिल्डर तरी कसे दूर राहणार? आमच्या इथे एसव्ही रोडपासून पश्चिमेकडे साधारण ३०० फूट लांबीची आणि साधारण १२ फूट, काही ठिकाणी ८ फूट रुंदीची गल्ली आहे. गल्लीच्या दक्षिण अंगाला सहा उंच बिल्िंडग (त्यात दोन टॉवर) आहेत तर उत्तर अंगाला दुसऱ्या सोसायटीच्या भिंती आहेत. या उत्तर अंगाला असलेल्या दोन सोसायटीच्या दोन कुंपणामधून एक छोटासा रस्ता उत्तरेकडे जातो तेवढीच काय ती मोकळी जागा. येथे जर आगीसारखी दुर्घटना घडली तर फायर ब्रिगेडची एखादी गाडीच जेमतेम उभी राहून काम करू शकेल अशी परिस्थिती. तर अशा प्रकारे धोकादायक बांधकाम करणारे बिल्डर आणि त्यांना तशी परवानगी देणारे सरकारी नोकर यांना भोंदू म्हणायचे नाही तर काय? बरे, याच गल्लीत संजय निरुपम यांच्या नावांचे बाकडे आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाचा गणपती बसतो. गोपाळ शेट्टीच्या गाडय़ा फिरतात. तरी कोणाच्याही लक्षात या गोष्टी येत नाहीत म्हणजे ही मंडळी अडाणी निश्चितच नसल्याने भोंदूच असण्याची शक्यता जास्त.

भोंदूगिरीची आणखी उदाहरणे पाहू. अणुविद्युत प्रकल्पांतून किरणोत्सर झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी आपले शास्त्रज्ञ सज्ज आहेत, असे वारंवार आपले सरकार सांगत असते मग असे सज्ज असलेले शास्त्रज्ञ सध्या उद्भवलेल्या पाणी समस्येवर गप्प का? जपानमधली फुकुशिमाची समस्या पाण्याच्या अभावानेच घडली होती ना? तुळशीचे झाड रात्रंदिवस भरपूर प्राणवायू उत्सर्जित करीत असते. असे सरकारी प्रसारमाध्यमांतून वारंवार सांगितले जाते. तुळशीचे झाड रात्रीसुद्धा प्राणवायू सोडते हे कोणत्या भल्या शास्त्रज्ञाने कोणता प्रयोग करून सिद्ध केले? हे मात्र कधीच सांगत नाहीत. भारताचे मंगळयान कमी खर्चात आणि प्रथम प्रयत्नांत यशस्वीरीत्या मंगळाकडे नेण्यास भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी झाले आणि त्यांनी या बाबतीत अमेरिका व रशियालाही मागे टाकले, असे सरकारी माध्यमातूनही सांगितले जाते; पण भारतीय शास्त्रज्ञांना प्रवासासाठी लागणारी ट्रॅजेक्टरी (Trajectory) (यानाचे मार्गदर्शनपर रेखांकन) नासाकडून विनासायास मिळाले होते, कित्येक उड्डाणे, वेळ व पैसा खर्च करूनच नासाने ही ट्रॅजेक्टरी बनविली होती. हे मार्गरेखांकन (Trajectory) भारतीय शास्त्रज्ञांनी का बनविली नाही?
– अशोककुमार कानेटकर, बोरिवली

07-lp-cvrदुष्काळाची तमा नाही…
साडेसहाशे सालांची मोगलाई, दीडशे सालांचे इंग्रजांचे राज्य  आणि आता सदुसष्ट सालांचे स्वराज, तरीसुद्धा माझ्या महाराष्ट्र देशाच्या लोकांची तृषा ‘जैसे थे’ पाहून मला खूप वाईट वाटत  आहे. काँग्रेसने जवळजवळ चाळीस वर्षे महाराष्ट्रात राज्य केले. नंतर गेल्या वीस वर्षांत भेसळ राज्य चालू आहे, पण कुणालाच इतिहासाची, पदोपदी पसरलेल्या दुष्काळाची जरासुद्धा तमा नसावी हे पाहून आश्चर्य वाटले आहे.

महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम खासगी बोअर खोदण्याचे बंद केले पाहिजे. दुसरे, ऊसशेती बंद करायला हवी. तिसरा उपाय, शीतपेयांसाठी जमिनीतून पाणी खेचण्याचा धंदा करायला कठोर बंदी घालण्यात यावी. ठिकठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या शेतात कोपऱ्यात दहा बाय वीस बाय दोनची तळी मनरेगाच्या पैशांनी खणून द्यावी. शिवाय प्रत्येक खेडय़ापाडय़ात पाझर तलाव खोदून भूगर्भीय पाण्याची पातळी वाढवून दुष्काळाची तीव्रता कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे.

मी स्वत: जिल्हा विकास अधिकारी असताना मध्य प्रदेश राज्यातील अनेक गावांमध्ये लोकांना यासाठी प्रेरित केले आहे व त्याचे चांगले परिणाम पाहिले आहेत. यासाठी वेगवेगळ्या संस्थांतील लोकांनी पुढाकार घ्यावा व आसपासच्या लोकांना जीवन समृद्ध होण्यास मदत केली पाहिजे.
– चंद्रकांत लेले, भोपाळ म.प्र.

08-lp-cvrइतकं सगळं आलं कुठून?
‘इतकं सगळं आलं कुठून?’ ही कव्हरस्टोरी सार्वजनिक जीवनात येण्यापूर्वीची भुजबळांची इस्टेट व सार्वजनिक जीवनात (राजकारणाचा धंदा केल्यानंतर) झालेल्या वाढीचे तुलनात्मक वर्णन झाले असते तर जास्त वजन आले असते.

पूर्वी सेवेच्या असलेल्या अनेक क्षेत्रांचा ‘धंदा’ झाला आहे. जसे पूर्वी आरोग्य सेवा होती, त्याचाही धंदा झाला आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी राजकारणाचा धंदा केला आहे. धंदा करणारे इन्कम टॅक्स तरी भरतात. सर्व कर न भरता केला जाणारा धंदा म्हणजे राजकारण असे सूत्र आज होऊ पाहत आहे. भुजबळांप्रमाणे अनेकांची कुंडली मांडणे ही एक लोकसेवा ठरावी.
– डॉ. सुभाषचंद्र मालाणी, जत, सांगली.

‘लोकप्रभा’ २२ एप्रिलच्या अंकामधील साईप्रसाद बेलसरे यांचा ‘हरिश्चंद्र परिक्रमा’ लेख वाचला. अप्रतिम आहे. बेलसरे यांचा अनुभव मस्तच होता..
– रेखा गुरव, मुंबई.

‘लोकप्रभा’ वर्धापन दिन विशेषांकातील ‘महाभारताची कालनिश्चिती हा संशोधनात्मक लेख आवडला.
– प्रशांत गौतम, औरंगाबाद

09-lp-cvr
लोकप्रभा’ करिअर विशेषांकातील ‘पुणे ते काबूल व्हाया युनेस्को’ या लेखातील आनंद कानिटकर यांचे छायाचित्र संदीप दौडकर यांनी टिपले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वाचक प्रतिसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers response

Next Story
खबरदारीचे उपाय घ्यायला काय हरकत आहे?
ताज्या बातम्या