‘स्वातंत्र्य दिन विशेष’ अंक फारच छान आहे. अंक वाचून मानसिक समाधान झाले; कारण प्रत्येक लेख वाचनीय आहे. वाचाल तरच विचार करू शकाल. अगदी वेळात वेळ काढून फक्त संपादकीय वाचले; तरी स्वातंत्र्याचा मथितार्थ कळेल. सावकाशीने नंतर एकेक सदर वाचा. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे असते, पण त्याची जबाबदारी घ्यायचीपण तयारी पाहिजे. स्वत:च्या मनाप्रमाणे वाटेल तसे स्वातंत्र्य घेतले की, ते केव्हाना केव्हा अंगाशी येते.
दूरदर्शनच्या मालिकांना स्वातंत्र्य दिले की त्या मारुतीच्या शेपटीसारख्या वाढवतात, ज्याला काही अर्थ नसतो. सिनेमांना ‘सेन्सॉर-बोर्ड’ असते; म्हणजे स्वातंत्र्यावर घाला असे वाटते. स्वातंत्र्याची लक्ष्मणरेखा कोण ठरवणार? कारण एकाला जे अश्लील वाटते, ते दुसऱ्याला नैसर्गिक आहे, असे वाटते; तेव्हा काहीही दाखवायला त्यांची ‘ना’ नसते. समाजात चांगली-वाईट दोन्ही माणसे असतात. विकृत मंडळी नको ते पटकन उचलतात. तसेच मध्यम वयाची मुले स्वत:ला पुढारलेली समजून पाहिजे ते करतात; कारण त्यांना स्वातंत्र्य पाहिजे असते. गुन्हेगारीच्या वाटेवर स्वातंत्र्यामुळे कधी जातात, हेच कळत नाही.
स्त्रिया कमवत्या झाल्यावर त्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले; म्हणजे त्यांच्या मनात येईल, तसे वागणार. त्यामुळे कोणाला त्रास होतो, याचे भान ठेवायचे नाही. पैसा हातात असल्यामुळे मनमानी खरेदी! जीवन एकदाच मिळते, ते उपभोगायचे नाही का? -हे तत्त्वज्ञान! आजकाल तरुण मुलींना शक्यतो उशिरा लग्न करायचे स्वातंत्र्य हवे असते. तसेच वाट्टेल तसे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य पाहिजे असते; म्हणून मग ‘ड्रेसकोड’ केला की वैतागतात. स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तिगणिक बदलते. पिढीगणिक बदलते. मी आहे तशीच ‘स्वतंत्र’ राहणार, बदलणार नाही. परिस्थितीनुसार व प्रेमाखातर काही वेळेस बदलावेच लागते. त्याचे वाईट कशाला वाटून घ्यायचे. बदलण्याचे स्वातंत्र्य सर्वाना आहे. वयानुसार माणूस बदलतोच. माणूस म्हणजे ठसा नाही, की जो कधीच बदलणार नाही.
‘शादी करे तो पछताए और न करे तो भी पछताए।’ याचा अर्थ एकटे राहून जीवन जगायचे असा होत नाही. एकटे राहण्यात स्वातंत्र्य आहे, असे वाटते, पण वय वाढायला लागल्यावर कोणीतरी असावे, असे जाणवायला लागते. एकटे राहण्यामुळे माणसाचा स्वभाव एकलकोंडा, तुसडा बनतो व व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधन येईल, असे वाटते; पण ते खरे असते असे नव्हे.
वैचारिक स्वातंत्र्य पाहिजे; म्हणजे आपली मते मांडता आली पाहिजेत. व्यक्ती तितक्या प्रकृती, तसेच व्यक्ती तितकी मते असणारच. दुसऱ्यांची मते ऐकून घेऊन, आपली मते बदलली पाहिजेत, असे नाही. लहान मुलांनी आपली मते मांडली, तर त्यांचा विचार करावा, व चुकीची मते असतील तर ती बदलण्याचे स्वातंत्र्य पालकांना व मोठय़ांना असावे.
२८ ऑगस्टचा ‘फूड टूरिझम’चा अंक वाचून पोट भरले. इतके नानाविध (माहिती असणारेपण) प्रकार वाचून मनसोक्त आनंद मिळाला न खाता. आता ज्येष्ठ नागरिक असल्याने खूपसे पदार्थ खाता येत नाहीत. तरीपण वाचून बरे वाटले; कारण वाचून पोट बिघडणार नाही, हे माहीत आहे.
मूळची मी मुंबईची; तरीसुद्धा इतके अनंत प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात, हे माहीत नव्हते. खूपसे पदार्थ त्या त्या जागी जाऊन खाल्ले आहेत; पण तरी खूप प्रकार खायचे राहिले आहेत; हे आपल्या अंकावरून कळले. बरे झाले, मी तरुण असताना कळले नाही. नाहीतर त्या त्या जागी पोहोचण्याचा आम्ही मैत्रिणींनी प्रयत्न केला असता. असो. भूतकाळाला मानगुटीवर बसून द्यायचे नाही; त्यामुळे आजचा दिवस आनंदात घालवते आहे.
‘पोटोबासाठी जिवाची मुंबई’ हा प्रियदर्शन काळे यांचा लेख अप्रतिम आहे. मुंबई दर्शनबरोबर खाद्य यात्रेचीपण छान माहिती दिली आहे. (त्याकरता मुंबईत महिनाभर ठाण मांडायला पाहिजे.). खाद्यप्रेमी प्रत्येक स्थळाला भेट देईलच, इतके सुंदर वर्णन केले आहे. ‘ढबोले’ घेऊन येऊन ‘खरेदी व खाणे’ होईल. पण ते पूर्वीच्या मुंबईत आता सर्वत्र ‘मॉल्स’ निघाल्याने वरच्या मजल्यावरच्या ‘फूड-कोर्ट’ मध्येच जातात. असो. ज्याची-त्याची आवड! पण माझ्या जुन्या मुंबईची माहिती वाचून मस्त वाटले.
रेखा केळकर, पुणे.

या अनुकरणाचे काय करायचे?
‘क्राइम टाइम, प्राइम टाइम’ (१४ ऑगस्ट) हा क्राइम शोजवरील सविस्तर व प्रतिक्रियांसहित लेख वाचला. याबरोबरच ‘हे करायला हवं’ यातील पाच मुद्देही वाचले. हा अंक छापला जात असतानाच्याच काळात माझ्या वाचक-लेखक मित्रांबरोबर याच विषयावर चर्चा झाली. त्या चर्चेचा गोषवारा आणि माझी मते मांडू इच्छितो.
शो कुठलाही असो वा त्याचा विषयही कुठलाही असो, त्याची लोकप्रियता वाढायला लागली की इतर वाहिन्या त्याचे अनुकरण करतातच. हे व्यावहारिक तत्त्व आहे. आपण बाजारात एखाद्या वस्तूचे दुकान उघडले आणि ते छान चालू लागले की चार-सहा महिन्यांत त्या दुकानाच्या अल्याड-पल्याड त्याच वस्तूंचे दुकान थाटले जाते. पाल्र्यात दीनानाथच्या समोर अग्रवाल मार्केटमध्ये एक ड्रायफ्रूट व खाद्यवस्तूंचे दुकान उघडले. त्याबरोबर वर्षभरात त्याच्या शेजारीच तसलीच आणखी दोन दुकाने उघडली. ही स्पर्धा अनिवार्य आहे. परंतु क्राइम शोजमधील चित्रणाचे वास्तवामध्ये अनुकरण केले जात असेल तर ते सामाजिक-मानसिक आरोग्य व सुरक्षा या दोन्ही दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, नव्हे तर घातक आहे. शाळकरी मुलाने त्याच्या वर्गमित्रावर चाकूसुरीने हल्ला केला हे वृत्तपत्रात दोन दिवसांपूर्वीच आलेय. या अर्धवट वयाच्या शाळकरी मुलांना ही बुद्धी कशी होते? बँकांवरील दरोडे, ज्वेलर्सच्या दुकानांची लूट हेसुद्धा शोजमधील चित्रणांप्रमाणे होऊ लागलेत. या शोजमुळे आपण गुन्हे कसे करावेत याचे प्रशिक्षण मिळतेच, शिवाय गुन्ह्यंचे पुरावे कसे नष्ट करावेत किंवा आपण गुन्ह्यात सापडू नये म्हणून कसे वागावे हेसुद्धा प्रेक्षक त्यातून शिकतात. आता प्रेक्षक कोण आहेत यावर त्याचे अनुकरण करायचे किंवा नाही हे अवलंबून राहते. सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीत घरातील कर्ते स्त्री-पुरुष नोकरी-धंद्यानिमित्त दिवसभर बाहेर असतात. सकाळची शाळा करून आलेली मुले दुपारी एकटीच घरी असतात. त्या वेळी १६ वर्षांखालील मुले हे शोज बघणार नाहीत का? कुठल्याही मुलास आपण हे बघू नको म्हटले की ते बघण्याचे त्याचे कुतूहल अधिक जागृत होते. जागांचे प्रश्न तर मोठेच आहेत. त्यामुळे एकाने आवडत असलेला शो घरातील दुसऱ्याने बघू नये म्हणून बंद करावा ही जबरदस्ती भांडणास काळ होते. एखाद्याला शो बघायला त्रास होतो; परंतु जागेअभावी त्याला दुसऱ्याच्या आवडीसाठी तिष्ठत राहणे क्रमप्राप्त होते. गुन्हेगारी जगतात हे शोज तर प्रसिद्ध आहेतच, त्यामुळे आज शहरातील गुन्हेगारीमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. त्यातून भ्रष्टाचार आणि राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांची मिलीभगत यामुळे या गुन्ह्यांना कसा आळा घालायचा, हा खरा सध्याचा समाजापुढील प्रश्न आहे.
सुधीर ब. देशपांडे, विलेपार्ले, मुंबई.

जनता जनार्दना जागा हो!
भाजपच्या नेत्यांवरील आरोपांबाबत पंतप्रधान मौन बाळगून का आहेत, असा तिखट प्रश्न वारंवार काँग्रेस व इतर पक्ष करीत आहेत. पंतप्रधान गप्प नाही बसणार तर काय करतील? एकेकाचं कर्तृत्व त्यांना अवाच्य करून सोडतं आहे. आरोपांनी डागळलेल्या भाजपा नेत्यांच्या आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा न देण्याच्या हट्टाला दुसरं काय करणार? इतकं वादंग माजलेलं असताना सुषमा स्वराज यांनी तेव्हाच राजीनामा देणे अगत्याचे होते. सोनिया गांधी पंतप्रधान होणार या नुसत्या कल्पनेनं भडकून जाऊन टी. व्ही.वरून थयथयाट करून केशवपनाची धमकी देणाऱ्या सुषमांची नैतिकता एवढय़ातच ढासळली याचे वैषम्य वाटते. गुरुवर्य अडवाणी पण मूग गिळून आहेत. ते खचलेले आहेत. लाल बहादूर शास्त्रीसारखे या देशाचे सुपुत्र ज्यांनी मद्रासजवळ झालेल्या भीषण अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा दिला होता ते कुठे. कै. चिंतामणराव देशमुख यांनी भारताच्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा नुसत्या पं. नेहरूंच्या सत्याचा विपर्यास करणाऱ्या विधानानंतर दिला होता ते कुठे. आणि वादातीत ठरलेले भाजपाचे नेते कुठे. गेले ते दिवस!
भाजपा आणि काँग्रेसने संसदेला कुस्तीचा आखाडा केलाय,एकमेकांवर लागोपाठ आरोप करत. जय हिंद! मेरा भारत महान!!
अरविंद किणीकर.

अंक चांगला, पण..
‘लोकप्रभा’चा स्वातंत्र्याच्या निरनिराळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारा स्वातंत्र्य दिन विशेषांक उत्तम आहे. मुखपृष्ठ ‘दृष्टी स्वातंत्र्याची’ या थीमला साजेसे आहे. ‘माझी भारतमाता’ ही कविता सोडली तर सबंध अंकात देश, त्याचे स्वातंत्र्य, त्यासाठी ह्य देशाचे नागरिक म्हणून आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांबद्दल एकही शब्द नाही. ‘दृष्टी स्वातंत्र्याची’ वैचारिक, पेहरावाचे, सोशल मीडियाचे, लग्न करणे न करणे, सेन्सॉर, नाही म्हणण्याचे, कलावंतांचे, फार काय समलिंगी संबंधांचे अशा निरनिराळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यांवर केंद्रित आहे. आपापल्या जागी हे विषय महत्त्वाचे आहेतच, पण १५ ऑगस्ट दिवशी देशाबद्दल काहीही लिहिले गेले नाही याचा खेद होतो. फार काय ‘मथितार्थ’सुद्धा त्यापासून दूरच आहे.
सुरेश देवळालकर, हैदराबाद.

फूड टुरिझमचा अंक आवडला
‘लोकप्रभा’चा फूड टुरिझम अंक वाचला. उत्तम आणि माहीतीपूर्ण आहे. देशात अथवा देशाबाहेरची भटकंती एक मजा असते. त्यासोबत लज्जतदार खाणे असेल तर काही औरच मजा. महाराष्ट्राचा पर्यटन विभाग मात्र याबाबत बराच मागे आहे. सर्वच दृष्टीने. सुधारणा व्हायला हवी, पण लक्षात कोण घेतो?
-भाऊसाहेब हेडाऊ, नागपूर, ई-मेलवरून.

सुंदर लेख
फूड टुरिझममधील ‘रांगडय़ा चवीचे कोल्हापूर’ हा लेख सुंदर होता, पण त्यातून रंजक असा ‘रस्सा मंडळ’ हा विषय सुटला. असो, या अंकाबद्दल धन्यवाद
-राजू साठे, कोल्हापूर, ई-मेलवरून.