lp03‘लोकप्रभा’ ११ सप्टेंबरचा अंक नेहमीप्रमाणेच संपूर्ण वाचनीय होता.
मेडिक्लेमचं वास्तव ही कव्हर स्टोरी वाचली. आरोग्यसेवा क्षेत्रात पारदर्शकता रोगाच्या निदानापासूनच महत्त्वाची ठरते. पेशंटनं डॉक्टरापासून काहीही लपवायचं नसतं, त्याचप्रमाणे मेडिक्लेम पॉलिसी देणाऱ्यांपासूनही काही लपवून ठेवू नये. शेवटी त्याचा प्रीमियम हा गाडीच्या प्रीमियमसारखा वर्षभरात काही झालं तर मिळवायच्या नुकसानभरपाईसाठीच्या परताव्याचा असतो हे कव्हर स्टोरीमध्ये सांगितल्याप्रमाणे आरोग्य विमाधारकानं कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मग भले एखादी व्याधी एक-दोन वर्षांनी विमासंरक्षणात समाविष्ट केली जावो. ही पारदर्शकता विमासंरक्षणाविषयी, इस्पितळात दाखल व्हायच्या आधी संबंधित डॉक्टरांकडे बोलताना सांभाळणं आवश्यक आहे. डॉक्टरांनीही अ‍ॅडमिट करून घेताना तिथल्या सोयी-सुविधांच्या फीविषयी सांगताना पारदर्शकता ठेवावी. म्हणजे आरोग्यनिदान करण्याचा गुंता सोडवण्यामध्ये जो महत्त्वाचा वेळ घालवायचा तो मेडिक्लेमच्या अटी आणि कागदपत्रे पूर्ण करून देण्यातच घालवावा लागेल. विशेषत: पॉलिसीच्या अटींच्या संदर्भात डॉक्टारांनीच तडजोडीचं धोरण स्वीकारून मेडिक्लेमवाल्या कंपन्यांना हितावह कागदपत्रं देण्यासाठी आपल्या सेवाभावी डॉक्टरी पेशावर अन्याय केल्यासारखंच होईल.
डॉक्टरांनीही आपल्या सेवासुविधांमध्ये पारदर्शकता ठेवावी. गरीब-श्रीमंत हा भेदभाव जसा रोगांच्या बाबतीत नसतो तसंच मेडिक्लेमवाले आणि विनामेडिक्लेमवाले असा भेदभाव करू नये. म्हणजे पेशंट भरती करून घेताना स्पेशल खोल्यांच्या उपलब्धतेच्या बाबतीत ज्या मर्यादा येतात त्या अवघड होणार नाहीत आणि मेडिक्लेम नाकारला जाण्याचं नंतरचं संकट पेशंटवर आणि त्याचा दोष डॉक्टरांवर हे दुष्टचक्र निर्माण होण्याची शक्यता ओसरेल. याबाबतीतले काही लोकांचे बोलके अनुभव आणि त्यावरचे उपाय यांचीही लेखात सांगोपांग केलेली चर्चा अत्यंत उपयुक्त वाटली.
‘चिलेशन थेरपी’ या प्रकाराविषयी डॉ. रत्नपारखींच्या लेखानं सावध केलं.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे.

विमा घेताना काय काळजी घ्याल?
मेडिक्लेमचं वास्तव ही सुहास जोशी यांची कव्हरस्टोरी माहितीपूर्ण आणि चांगली आहे, पण ज्यांनी आरोग्य विमा संरक्षण घेतलेलं नाही त्यांना हा लेख वाचल्यावर आरोग्य विमा घेऊ नये असे ध्वनित होत आहे. आजारी व्यक्तीच्या उपचाराबाबत त्याच्या कुटुंबीयांना आश्वस्ततेसाठी सद्य:स्थितीत आरोग्य विमा संरक्षण अत्यंत गरजेचे आहे यात काहीच शंका नाही. त्यामुळे आरोग्य विमा घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी यावर भर देणारा लेख प्रकाशित करावा. माझ्या मते पुढील घटक गरजेचे वाटतात. प्रीमियम योग्य वेळेत भरणे. पॉलिसीचे नूतनीकरण वेळेवर करणे. पॉलिसी घेताना आपल्यासंबधित सर्व बाबींचे स्पष्टीकरण द्यावे. आधीपासूनच असलेल्या आजारांना पहिल्या काही वर्षांमध्ये विमा संरक्षण मिळत नाही. पूर्वनियोजित उपचाराबाबत टीपीएला सूचना देऊन ठेवावी. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विमा कंपनीच्या नियमानुसार ठरावीक काळात टीपीएला सूचना द्यावी लागेल. सर्व आरोग्य चाचण्यांची आणि रोजच्या उपचाराची मूळ कागदपत्रे आपल्याकडे असली पाहिजेत. डिस्चार्ज कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. ठरावीक उपचारांसाठी असलेल्या ठरावीक खर्चमर्यादेविषयी सर्व माहिती असावी. तसेच आपण हेदेखील नमूद करावे की सर्व गरिबांनादेखील आरोग्य विमा संरक्षण लाभले पाहिजे. राष्ट्रीयीकृत बँकांमधील खातेदारांनादेखील समूह आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ घेता येतो. याबद्दलदेखील आपण लिहावे. – प्रमोद भिडे, मुंबई, ई-मेलवरून.

चिलेशन थेरपी भ्रम नव्हे!
११ सप्टेंबर २०१५ च्या ‘लोकप्रभा’मध्ये डॉ. गजानन रत्नपारखी यांचा ‘चिलेशन थेरपी- एक भ्रम’ हा लेख वाचनात आला. अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीची शिफारस आवश्यकता नसतानाही करून अमाप पैसा खेचण्याचे प्रयत्न आजही अगदी अमेरिकेतही होत आहेत. चिलेशन थेरपीबाबत माझी अनेक व्याख्याने व प्रेझेंटेशन्स यूटय़ूबवर प्रसिद्ध झालेली आहेत. त्यामधील माहितीवरून चिलेशन थेरपी ही बायपास सर्जरी अथवा अँजिओप्लास्टी या नेहमी शिफारस केल्या जाणाऱ्या उपचारपद्धतींपेक्षा कितीतरी स्वस्त, सुरक्षित व परिणामकारक आहे हे प्रतीत होते.
– भालचंद्र गोखले, मुंबई.

lp04प्रकाशझोत टाकणारा लेख
आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार (लोकप्रभा, २१ ऑगस्ट) हा अभिजीत देशपांडे यांचा समलिंगी संबंधांवरचा लेख चिंतन करायला लावणारा होता. समलिंगी व्यक्तींना समाज त्यांच्या मनाप्रमाणे आयुष्य जगू देत नाही. भिन्न लिंगी सज्ञान व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी लैंगिक व्यवहार करताना आढळल्या तर पोलीस त्यांना दमदाटी करून सोडून देतात. पण समलिंगी व्यक्ती आडोशाला साधी मिठी मारताना आढळल्या तरी पोलीस त्यांना ताब्यात घेतात. आता तर सुप्रीम कोर्टानेही समलिंगी व्यक्तींच्या विरोधातच निकाल दिला. पण हा निकाल देताना त्यांनी समलिंगी व्यक्ती आणि त्यांचे समलिंगी आकर्षण याबाबतीत काहीच विचार केलेला दिसून येत नाही. कारण अशा निकालामुळे समलिंगी व्यक्तींच्या समलिंगी आकर्षणाबाबत काहीच बदल होणार नाही. भारतीय समाज आणि न्यायव्यवस्था समलिंगी संबंध आणि विवाहाला मान्यता देण्यास नकार देत असेल तर ती सामाजिक नीतिमूल्यांची हारच मानावी लागेल. कारण आपल्या तथाकथित संस्कृतीला जपण्याच्या नादात एखाद्या व्यक्तीच्या नैसर्गिक इच्छा-आकांक्षांना मुरड घालणे अयोग्य आणि अन्यायकारक आहे.
– सुहास बसणकर, दादर.

‘दोन स्पेशल’ नाटकातील खटकणारे मुद्दे…
‘दोन स्पेशल’ या नितांतसुंदर नाटकाचा ४१वा प्रयोग बघितला. पत्रकारित आलेल्या आणि नंतर दुरावलेल्या दोन प्रेमींचे वैचारिक व तात्त्विक द्वंद्व अतिशय सशक्तपणे संवाद मांडणी, अभिनय, नेपथ्य, इ.द्वारे अधोरेखित करण्यात कलाकार व दिग्दर्शक प्रावीण्याने उत्तीर्ण झाले आहेत. त्यासाठी या सर्वाचे अभिनंदन. पण काही अतार्किक व मनाला न पटणाऱ्या गोष्टींवर वेळीच उपचार झाल्यास अशा दर्जेदार कलाकृतीत उणीव जाणवणार नाही. यातील काही बाबी एक मुख्य कलाकार जितेंद्र जोशी यांच्याशी प्रयोगानंतर चर्चिल्या. त्या त्यांनी मान्यही केल्या. दिग्दर्शकाशी या विषयावर बोलेन, म्हणून सांगितले. काही उणिवांची त्यांनी नोंद घेतल्याचे समाधान मिळाले. तरीही त्यांच्या सततच्या कार्यबाहुल्यामुळे ते या गोष्टीस वेळ देऊ शकतील, याविषयी शंका असल्याने व या नाटकाच्या परिपूर्णतेची आस असल्याने या उणिवांकडे काणाडोळा होऊ नये म्हणून पुढे देत आहे.
१) धनू व स्वप्नासोबत (दोन्ही बहिणी) मुंबईत घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाची घटना सांगताना गिरिजा ओक यांनी ती तीव्रतेने अभिनित केली आहे. पुण्यातील सर्व वृत्तपत्रांत फोटोसहित ही घटना प्रसृत झाल्याने संपूर्ण पुणे शहर हादरल्याचे स्वप्न सांगते. कुटुंबाची मन:स्थिती, अपमान इत्यादींमुळे धनु विषण्ण मन:स्थितीत आत्महत्या करते. स्वप्नाचीही तशीच अवस्था होते. पण ती त्यास धजावत नाही. येथे प्रश्न असा उपस्थित होतो की मिलिंद भागवत (जुना प्रियकर) हासुद्धा पत्रकार वा उपसंपादक असल्याने त्यास या भीषण घटनेची माहिती का होत नाही?
पत्रकारितेत अशा घटनांची भीषणता सर्व पत्रकारांना माहीत असतेच किंवा असावी. स्वप्नाने दाखवलेली या घटनेची तीव्रता, पण पत्रकारितेत असूनही या घटनेबद्दलची मिलिंदची अनभिज्ञता यांची सांगड घालता येत नाही. त्यामुळे हा नाटकाचा एक तांत्रिक दोष वाटतो.
२) नोकरी मागण्यासाठी आलेल्या सातारच्या भोसलेला प्रथम दिवशीच संकलेचा बिल्डरसंबंधीची काही गुप्त कागदपत्रे आणण्यासाठी देशपांडेंकडे पाठवणे, भोसलेने ही कागदपत्रे उघडून त्याच्या प्रती काढणे यामुळे त्यातील गुप्तता किंवा महत्त्व कमी होते. गुप्ततेबाबतचा विचार न करता अनोळखी व्यक्तीवर एवढा विश्वास दाखवणे, हे मनाला पटत नाही. संकलेचा बिल्डरसंबंधी बातमीमधील मिलिंद व स्वप्ना यांच्या मनोवस्थेच्या तात्त्विक द्वंद्वाची तीव्रता त्यामुळे कमी होतेय असे वाटते.
३) उपसंपादक त्याच्या कार्यालयीन वेळेत हॉटेलमध्ये जाऊन गप्पा मारत बिअर पिण्याएवढा वेळ काढू शकतो, हे पटण्यासाठी मनाला त्रास होतो.
नाटकातील काहीतरी दोष दाखवणे, हा उद्देश नसून नाटकाने परिपूर्ण व्हावे, या इच्छेमुळेच हा पत्रप्रपंच.
– रघुनाथ सोनार, डोंबिवली.

कैकयी की सुमित्रा?
‘हनुमान वानर नव्हे, राजनीतिज्ञ’ हा अरविंद जागीरदार यांचा लेख वाचला. या लेखात दशरथ आणि कैकयीयांना भरत आणि शत्रुघ्न अशी दोन मुलं होती, असं लेखकाने म्हटलं आहे. पण, रामायणावर आधारित असलेल्या कुमार जैमिनी शास्त्री आणि यू. जे. शास्त्री यांच्या एका पुस्तकात मात्र वेगळा संदर्भ आहे. या पुस्तकात म्हटलंय की, सुमित्राला लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी दोन मुलं होती. आता माझा प्रश्न असा आहे, यापैकी नेमकं बरोबर काय आहे? जागीरदार यांचा लेख की शास्त्री यांचं पुस्तक? आताची पिढी वास्तवदर्शी गोष्टींवर अधिक विश्वास ठेवते. त्यामुळे हा खुलासा होणं आवश्यक आहे.
– जयंत तिळवे, गोवा.

lp05अनोखे हनुमान मंदिर
‘हनुमान वानर नव्हे, राजनीतिज्ञ’ या लेखातील विचारांशी काहींचे मतभेद असू शकतात. मागील वर्षी डिसेंबरात अ‍ॅनास्थेशिया कॉन्फरन्सच्या निमित्ताने मदुराईला जाण्याचा योग आला. तिथून रामेश्वरला गेलो. तेथे पूंछहीन (शेपूटविरहीत) हनुमानाचे चांगल्या स्थितीतील एक मंदिर दिसले. दुर्दैवाने दुपारची वेळ असल्याने ते बंद होते, पण मी बाहेरून फोटो काढले. हनुमान रामेश्वरहून लंकेला गेला तो शेपुटविरहीत मानवच असेल का? नसता तर नेमके ते मंदिर रामेश्वरलाच कसे? इतरत्र कुठे तसे आहे का? ‘लोकप्रभा’तील त्या लेखाला पुष्टी देणारा एक पुरावा म्हणून रामेश्वरचे हे शेपूटविरहीत हनुमानाचे मंदिर गणले जाईल का हे तज्ज्ञांनी ठरवावे. मी फक्त कुतुहलापोटी हा ई-मेलप्रपंच केला एव्हढेच.
– डॉ. मनोहर भरणे, ठाणे.

मुद्दे पटले
४ सप्टेंबरच्या अंकातील ‘बिहारी जुगाड’ हा मथितार्थ वाचला. बिहारमधील राजकारणाच्या बिकट परिस्थितीवर आपण बोट ठेवलेत. आता येनकेनप्रकारेण बिहार आपल्या हातून जाऊ द्यायचा नाही असा चंग बिहारमधील साऱ्या पक्षांनी बांधलेला दिसतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्येच नव्हे तर भारतावर रथीमहारथी असे काही घायाळ झाले होते, की एकमेकांच्या आधाराशिवाय ते उभेच राहू शकत नाहीत. म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार. पण एकाच काडीवर सर्व लटकू लागले तर सारेच बुडतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण अगदी बरोबर विवेचन केले आहे. काँग्रेस, राजद यांना बिहारमध्ये कुणी विचारत नाही. अशा लोकांची सोबत नितीशकुमार यांना घ्यावी लागते. कारण एवढी वर्षे त्यांना भाजप सोबती म्हणून चालला आणि अचानक नितीशकुमारांना निधर्मी वाद सोईस्कररीत्या आठवला. मोदी म्हणतात त्याप्रमाणे बिहारमध्ये जंगलराज आहे. जंगलात भाजपचा हत्ती फिरतोय आणि बाकीचे कुत्रे भुंकतात. हत्तीचे त्यांच्या भुंकण्याकडे लक्षदेखील नाही. सरतेशेवटी बिहारची जनता योग्य तो न्याय करतीलच. वेट अ‍ॅण्ड वॉच..!
– प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वर्सोवा.