patra-03लोकप्रभाचा १६ ऑक्टोबर २०१५ चा नवरात्र विशेषांक, उत्कृष्ट होता. अंबाबाई, कमळादेवी, माता तुळजाभवानी या देवतांचा आपल्याला प्राचीन, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यांच्या रुपाने महिलांचा सन्मान करून त्यांना मातेचा दर्जा दिला गेला आहे. नवरात्र, गरबाउत्सव हे मातेच्याच रूपांची ओळख आपल्याला करून देतात. आज आपण महिलांवर विविध जबाबदाऱ्या टाकल्या आहेत; परंतु त्याबरोबर त्यांना हक्क, स्वातंत्र्य, सुरक्षा, सहकार्यसुद्धा दिले पाहिजे. त्यांचा सन्मान कायम राहावा अशी वागणूक दिली गेली पाहिजे.
– राहुल पाडवी, नंदुरबार.

वास्तवाच्या जवळ जाता येईल?
‘सांगड’ कार्यकर्त्यांच्या संमेलनाचा वृत्तांत (लोकप्रभा २ ऑक्टो.) वाचला. ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर- पानसरे व्हाया तुकाराम’ हे हिंदूूंना – विशेषत: ब्राह्मणांना लक्ष्य करणारे रिंगण नाटय़ म्हणजेच भरकटत चाललेले सांगडचे तत्त्वज्ञान समोर आले. हिंदूूचा कुणाची हत्या करून विचार समाप्त करता येतात यावर मुळीच विश्वास नाही. शस्त्राच्या आधारे मानवजातीवर वर्चस्व गाजविणारे आज नष्ट होताना दिसत आहेत. या पाश्र्वभूमीवर ख्रिस्त्यांचा पाखंडवाद- इस्लामचा काफीरवाद यांवर अणुमात्र चर्चा झाल्याचे दिसले नाही. जणू िहदूंनीच इसाई-इस्लामींना शत्रू ठरवून टाकलेले आहे, असा ‘सांगड’मधील एकूण चर्चेचा सूर दिसला. प्रश्न असा पडतो की, अशाने वास्तव्याच्या जवळ कसे जाता येईल?

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती म्हणजे ‘रास्वसंघ-भाजपा परिवार’ हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाही. िहदुत्व तसेच हिंदूराष्ट्रवाद यांचा आणि परिवाराचा काही एक संबंधच नाही. जर असता तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या साहित्यासह वाळीत टाकले नसते. patra-02आजही स्थिती बदललेली नाही. पंतप्रधान मोदी गांधींचाच उदोउदो करतात यावरूनही सिद्ध होते.

धर्मनिरपेक्षता या सत्रात मुस्लीम कुटुंबात मुस्लीम धर्माविषयी धडे दिले जातात. देशद्रोहाचे धडे दिले जात नाहीत, असे वक्ते म्हणालेत. मग पाकिस्तान कसे निर्माण झाले? तिथल्या अल्लाला – प्रेषितांना तसेच पाकिस्तानला विरोध न करणाऱ्या पन्नास लाख हिंदूूंचा वंशविच्छेद केला असे सांगितले जाते. हे कशामुळे घडते? बांगला देश आज काय करतोय? पाकिस्तान किंवा इस्लाम हिंदूंना- इस्लामेतरांना काफीर समजतो म्हणूनच या साऱ्या समस्या निर्माण झाल्या आहेत, हे सत्य बोलायचेच नाही? हिंदूंनी इस्लामचे काय वाकडे केले? पवित्र कुराण तर भारतीय भाषात विसाव्या शतकात आले. इतरांना काफीर मानल्याविना इस्लामचा स्वीकारच करता येत नाही. हा तेरा शतकांचा इतिहास आहे! या सत्याला-वास्तवाला पाठमोरे होऊन तुम्हाला ‘मानवजात’ उभी करता येईल?
– सूर्यकांत शानबाग, बेळगाव.

patra-01दयनीय एमटीडीसी
दि. १६ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात ‘निमित्त’ या सदरात ‘एमटीडीसी कात टाकतेय’ हा सुहास जोशींचा लेख वाचला. त्यांनी फार आशादायी चित्र रंगवले. पण महाराष्ट्र पर्यटन विभागाची आणि त्यांनी जपलेल्या (?) स्थळांची परिस्थिती आजही तशीच आहे. विशेष बदल असा नाहीच.

मी स्वत: जवळपास संपूर्ण भारत तर फिरलो आहेच पण देशाबाहेरील १५-१६ देशांतील पर्यटन स्थळे बघितली. आपल्या देशातच सुंदर व नैसर्गिक स्थळे खूप आहेत, पण त्यांची जपणूक करणे, त्यात सुधारणा करणे, जास्त आकर्षित करणे, इ.  बाबतीत पर्यटन खाते सुस्तच आहेत. त्यातही महाराष्ट्र पर्यटन खात्याचा व स्थळांचा नंबर शेवटचाच लागेल. मध्य प्रदेश कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात याबाबतीत फार पुढे आहेत.

खास मुंबई किंवा पुणे इथली पर्यटन कार्यालये सोडा, पण इतर कुठेही जा. तिथला कर्मचारीवर्ग उत्साही वाटत नाही. प्रत्यक्ष स्थळांवर गेले तर जेवण, राहणे, गाईड, गाडय़ा, स्थळांची देखभाल या सर्वाचा अनुभव हा निराशाजनकच आहे. वास्तविक या खात्यात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना इतर राज्यांत फिरवून आणायला हवे. माहिती केंद्रात धड माहिती मिळत नाही. पैसा खूप खर्च होतो, पण निष्पन्न काहीच होत नाही.

या लेखात वर्णिल्याप्रमाणे आता उशिरा का होईना एमटीडीसीचे संचालक व प्रधान सचिव जागे झाले आहेत व काही तरी ठोस करण्याची त्यांची दाट इच्छा आहे, ही चांगली गोष्ट आहे. बेटर लेट दॅन नेव्हर. पण ही चिकाटी टिकवून ठेवली पाहिजे. या दोघांनी पूर्वसूचना न देता वा ओळख न सांगता काही पर्यटन कार्यालये व पर्यटनस्थळांना सरप्राइज विझिट्स द्याव्यात.

जी जुनी व प्रसिद्ध स्थळे आहेत, त्यांना जास्त आकर्ष करायला हवे. उगाचच नवीन स्थळे जोडायची म्हणजे एक ना धड, भाराभर चिंध्या अशीच परिस्थिती होईल. तसेच आपल्या महाराष्ट्रातूनच असंख्य (लाखोंच्या संख्येत) लोक विदेशात पर्यटनस्थळे बघायला जातात. अमाप पैसा खर्च करतात. पण राज्यातील स्थळांना भेटी द्यायचे त्यांना जिवावर येते. हे असे का? याचाही अभ्यास करायला हवा.

परदेशातील स्थळे व देशातील स्थळे बघितली व तुलना केली तर ‘कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली’ या म्हणीची आठवण येते. सध्या सुधारणेच्या बाबतीत जो प्रयत्न होत आहे तो स्तुत्यच आहे, पण तो पूर्णत्वास न्यायला हवा. व्यावसायिकता यायला हवी. स्वच्छतेला महत्त्व द्यायला हवे. तरच आपण लेखात लिहिल्याप्रमाणे २०१७ पर्यंत पर्यटन स्थळांना चांगले दिवस येतील आणि लोकांना या स्थळांना भेटी द्यायला निश्चितच आवडेल अशी आशा करू या.

सध्या तरी या खात्याला आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना बेस्ट ऑफ लक म्हणायला हवे.
– भाऊराव हेडाऊ, नागपूर</strong>

‘सुखांत’ ची सेवा महाराष्ट्रभर पसरावी
दि.  ९ ऑक्टोबर २०१५ च्या सा. लोकप्रभा अंकातील उपक्रम अंतर्गत ‘शेवटचा दिस गोड व्हावा…’ वाचले. सुखांतच्या सेवकांच्या सेवेचे जितके कौतुक व अभिनंदन करावे तितके कमीच आहे.

बदलत्या काळात सुखांतसारख्या समाज सेवाव्रतींची या समाजाला नितांत गरज आहे. मृत्यूनंतर त्या मृत शरीराचे होणारे हाल व दशा पाहवत नाही. ज्यांचे नातलग लांब आहेत त्यांचे तर हाल खूप होतात. परंतु ज्यांचे नातलग, पै-पाहुणे जवळ आहेत अशा व्यक्तींचेही मृत्यूनंतर त्या मृत शरीराचे होणारे हाल अत्यंत दयनीय असतात. शेवटचा दिस गोड व्हावा.. असे प्रत्येकाला मृत्युपूर्वी वाटत असते मात्र बदलती सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती बघता ‘सुखांत सेवा’ ही काळाची गरज आहे.

मात्र ही सेवा मुंबई- ठाणे पुरती मर्यादित न राहता ती राज्यातील जिल्हा स्तरावर पोहचल्यास बरे होईल. नंतर ती तालुका व ग्राम पातळीवरही जावी अशी अपेक्षा आहे. याच अंकातील शेतकरी जगण्यासाठी ‘बिहार पॅटर्न’ हा काळाची गरज असलेला उपक्रमही मनी भावला.    – धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद.

विचार न पटणारे
‘राजकीय आशीर्वादाने चालणारी बाजारपेठ बंद होईल का?’ ‘सारा रोख हिंदूंवरच का?’ अनिल काळे, नागपूर यांच्या पत्रामधील कोणताही विचार हा पटणारा नव्हता. पत्रलेखकांचा पूर्ण गोंधळ उडलेला दिसत होता. कारण त्यांनी ‘संस्कृतीच्या नावाखाली उन्मादाची बाजारपेठ’ या लेखाबद्दल मुद्दे पटले म्हणून अभिनंदन तर केलेय, मात्र हिंदूंवरच टीका का? याला कारण वैभवशाली हिंदू संस्कृती आणि सण यांना राजकीय आशीर्वादाने पूर्णपणे काबीज केलेय. समजूतदार नागरिक शांत राहून सहन करण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही. सुप्रिम कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून गल्लाभरू उत्सव गल्लोगल्ली साजरे होताना दिसतायत. श्रद्धेचा झालेला व्यापार थांबवण्यासाठी ‘लोकप्रभा’सारख्या साप्ताहिकाची, त्यातील विचारांची नितांत गरज आहे.
– सुहास सावंत, भांडुप (पश्चिम)

जागतिक अंक
0123456789 हे जागतिक अंक बहुतेक सर्व भारतीयांना परिचित आहेत. फोन, कॅलक्युलेटर, टॅक्सीमीटर, घडय़ाळे, मापन टेप, कोनमापक, वजनमापक, रक्तदाबमापक वगैरे सर्व विज्ञानसाधने, तसेच शासकीय नाणी, नोटा, टपालाची व रेलगाडीची तिकिटे, वाहन नंबर प्लेटी, तसेच खेळपत्ते यांवर ते असतात.. भारतीय संविधानाची त्यांना मान्यता आहे.. मराठी माध्यमाच्या शाळातही हायस्कूलमध्ये तेच अंक गणित व विज्ञान यांच्या शिक्षणासाठी वापरतात. ते अंक सर्व हिंदी नियतकालिकातही वापरले जातात. मराठी नियतकालिकांतही ते स्वीकारावेत.     – म. ना. गोगटे, पुणे.

patra-04माहितीचा खजिना
गणेशासंबंधी धार्मिक, राजकीय, (‘कोण म्हणतो टिळकांना’-रवि आमले) पौराणिक माहिती असा सर्वागीण माहितीचा खजिना ‘लोकप्रभा’ने गणेश विशेषाच्या दोन्ही भागांमध्ये दिला. गणेश भाग २ मध्ये (१८ सप्टेंबर ) पॉल मार्टिन दुबोस या फ्रेंच अभ्यासकाने केलेला गणेशाचा अभ्यास आणि त्यातून पुढे आलेली माहिती विशेष होती. कारण गेल्या वर्षीच्या गणेश विशेष मध्ये ‘गणेशाचे पुरातत्त्वीय संदर्भ हे ख्रिस्तोतर दुसऱ्या शतकानंतरचे?’ असा मुद्दा काही पुरातत्त्वज्ञ व विशेषत: अरविंद जामखेडकर यांनी मांडला होता. तेव्हा आणि आताही तो मुद्दा अनुत्तरितच राहिला होता.

आजवर मी गणेश विशेषांक वाचत आलोय. त्यात साधारणपणे गणेशासंबंधी आलेले वर्णन असे. १. गणेश ही आदिदेवता आहे, २. गणेश सृष्टीचा निर्माता आहे, ३. ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य या पंच देवांसह सगळ्यांनीच (मानव, सुर, असुर, ऋषीमुनी वगैरे) आपापल्या कार्यसिद्धीकरिता त्याची आराधना केलेली आहे. ४. परंतु त्याने कोणत्याही देव/देवतेची स्थापना किंवा आराधना केलेली नाही. म्हणून ही देवता सार्वभौम मानली जाते. तात्पर्य गणेश देवता ही सार्वभौम, आदिदेवता आहे! मग व्यास ऋषींसाठी (मर्त्य मानवासाठी) लेखनिक म्हणून (महाभारत लेखन) दुय्यम, तिय्यम दर्जाचे काम त्याने का स्वीकारले? काही अटींवर हे कार्य स्वीकारले तरीही त्यावर तोडगा काढण्यात व्यास मुनींनी दर शंभरावा श्लोक कूट श्लोक अशी रचना करून; गणेशावर कुरघोडी केली असे होत नाही का?
– अनिल ओढेकर, नाशिक.