lp05दि. ८ जानेवारीच्या ‘लोकप्रभा’च्या अंकातला तेजश्री प्रधान यांचा ‘पॅन केक’ हा लेख आवडला. लेख हलकाफुलका असूनही मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या सद्य:स्थितीचं यथायोग्य मूल्यमापन करणारा व विचारांना चालना देणारा आहे. त्यात म्हटलं आहे की एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेणं पूर्ण होण्याच्या आतच दुसरी हजर असते. याचा अर्थ निर्मितीच्या अल्पजीवित्वाचं मूळ गरजेपेक्षा जास्त निर्मितीत आहे. याचं कारण म्हणजे या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेपेक्षा आकडय़ांना आलेलं महत्त्व. एखाद्या कलाकृतीने किती काळ लोकांच्या मनाची पकड घेतली याहीपेक्षा ती किती काळ चालवली, किती कलाकृती निर्माण केल्या व गल्ला किती गोळा झाला या आकडय़ांना महत्त्व आलं आहे. ही एक प्रकारे मनोरंजन क्षेत्रातली ‘एकदा वापरा आणि फेकून द्या’ संस्कृतीच!

– शरद कोर्डे, ठाणे.

परखड ‘पंच’नामा

पराग फाटक यांचा लेख माझ्याच मनातले सांगून गेला. पुलं गेल्यापासून अशा हिणकस विनोदांना प्रतिष्ठा लाभलीये. मराठीतही जे कॉमेडी शो चालतात, तेही असेच उबग येणारे असतात. एकंदरीतच समाजाची पातळी इतकी घसरली आहे की विसाव्या शतकात जन्मलेल्या सर्वानाच,

‘हे काय चाललंय?’ असं वाटू लागलं आहे.

– केशव काळ.

असेच मार्गदर्शन करावे

मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. ८ जानेवारीच्या अंकातील कॉर्पोरेट कथा या सदरातील प्रशांत दांडेकर यांचा ‘क्राइंग बेबी सिंड्रोम’ हा लेख वाचला. कॉर्पोरेट क्षेत्रात घडणाऱ्या रंजक घडामोडींची या लेखामुळे माहिती मिळाली. ‘क्राइंग बेबी गेट्स मिल्क’ या इंग्रजी म्हणीचा अर्थही यामुळे समजला. मी जिथे नोकरी करतोय तिथली कार्यपद्धती समजून घेण्यास मला या लेखाची मदत झाली. लेखात मांडलेल्या घडामोडी सांगून असेच मार्गदर्शन करावे.

– अमित काळदाते, बार्शी

उपयुक्त सदर

नवीन वर्षांतील ‘लोकप्रभा’ची सर्वच सदरं अतिशय उत्तम आहेत. सर्वसमावेशक असं अंकाला म्हणता येईल. तरुणाई, कला, मनोरंजन, आरोग्य अशा विविध विषयांशी संबंधित लेख वाचून महिती मिळत असते. यात एका सदराचा विशेष उल्लेख करावा लागेल ते म्हणजे डोके लढवा हे. वेगळ्या प्रकाराचे शब्दकोडे यात आहे. नेहमीपेक्षा काही तरी वेगळा विचार करून हे शब्दकोडे सोडवावे लागते. ते सोडवताना उत्सुकता, मजा आणि समाधान असं सगळंच अनुभवायला मिळतं. याशिवाय याच सदरात अंककोडेही उल्लेखनीय आहे. शब्दसंग्रह वाढत असतानाच दुसरीकडे गणिताचीही बाजू पक्की होते. हे अकंकोडे माध्यमिक शाळांतील मुलांसाठीही उपयुक्त ठरू शकतं. या सदरासाठी ‘लोकप्रभा’चे आभार!

– संगीता सुर्वे, नागपूर.

lp06फ्री बेसिक्सला भुलू नका!

गेल्या कित्येक दिवसांत ‘फ्री बेसिक्स’च्या प्रचारार्थ फेसबुकने वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातींचा मारा करून करोडो रुपयांची उधळपट्टी केलेली दिसते (नो ‘फ्री फेसबुक’ लंच!, मथितार्थ, ८ जानेवारी). जर सामान्य माणसांच्या प्रगतीचा उद्देश झुकरबर्ग महाशयांच्या मनामध्ये असता तर ह्य अमाप पैशांचा वापर कित्येक मागासलेल्या गावांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात खर्च करणे योग्य ठरले असते. परंतु, त्यांचा खरा आटापिटा हा जगभरातील समस्त लोकांनी आपल्या वेबसाइटचा वापर केल्यास ऑर्कुटचे नशीब आपल्या कपाळी येणार नाही हे साध्य करणे आहे. सामान्य लोकांना फेसबुकचे लागलेले वेड हे कित्येकदा आश्चर्यजनक वाटते. प्रत्येक कृतीचे अपडेट्स लोकांना देत राहणे हास्यास्पद ठरते.  आपल्या खासगी आयुष्यातल्या क्षणांचा वापर करू देण्याच्या बदल्यात फेसबुकला होणाऱ्या करोडो रुपयांच्या नफ्यातला हिस्सा मागण्याची वेळ आली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरू नये. दुसरीकडे, एखाद्या व्यक्तीवर आपत्ती कोसळल्यास त्याला मदत करण्याचे सोडून त्याचे मोबाइलवर चित्रण करून इंटरनेटवर व्हिडीओ अपलोड करण्याची घाई दिसून येते. म्हणूनच, सोशल मीडियाचा वापर करताना ताळतंत्र सोडून वाहवत जाण्याअगोदर थोडा विचार करण्याची वेळ आली आहे.

– केतन मेहेर, विरार (पूर्व)

भविष्य अंक  कशाला?

आज सर्वत्रच बाजारशरण पत्रकारिता बोकाळली असताना इंडियन एक्स्प्रेस ग्रुप हा त्यापासून कायमच दूर राहिलेला दिसून आला आहे. ‘लोकप्रभा’मधून आपण अनेक विषयांवर सखोल अभ्यासू असे लेख प्रकाशित केले आहेत. किंबहुना अनेक वेळा समाजातील लोकप्रिय पण विघातक, अंधश्रद्धापूरक अशा रूढी परंपरांवरदेखील थेट टीका केली आहे. असे असतानादेखील आपण भविष्य विशेषांकाच्या माध्यमातून नेमकं काय सुचवू पाहत आहात? समाजात स्वकर्तृत्वाची इतकी उदाहरणे असताना असं ज्योतिष्याच्या नादी का लागावे?

– अनंत काळे, सोलापूर.