चांगल्या गोष्टीही आहेत की…

विनोदाला खाद्य पुरविणाऱ्या या मालिका कधी कधी जीवनातील वास्तव समोर आणून खाडकन डोळे उघडायलाही लावतात.

जान्हवी वापरत असलेल्या मंगळसूत्राची  क्रेझ येते, ‘कला तू गप्प बस’, ‘काहीही हं श्री’ आणि ‘जान्हवीची डिलिव्हरी’ ही ‘होणार सून..’मधली वाक्यं चेष्टेचा विषय बनतात. विनोदाला खाद्य पुरवितात. विनाकारण लांबण लावलेल्या, रटाळ होत जाणाऱ्या दैनंदिन मालिकांचं असं हसं होणारच. (लोकप्रभा, १५ जानेवारी- वाचकांचा प्रतिसाद) परंतु विनोदाला खाद्य पुरविणाऱ्या या मालिका कधी कधी जीवनातील वास्तव समोर आणून खाडकन डोळे उघडायलाही लावतात. ‘दिल दोस्ती..’मधला आशू, कैवल्यला गुंडाच्या तावडीतून सोडविल्यावर स्वत:चा भूतकाळ कथन करताना म्हणतो, ‘अरे यार माझ्याकडे जगण्यासाठी काय होते? न पैसा, न पुस्तक, न प्रेम करणारी माणसं.. न गिटार! होती फक्त मस्ती, रग आणि ती जिरविण्यासाठी बेफिकीर वृत्ती. म्हणून मी कधी काळी ‘त्यांच्यात’ होतो, पण मला चांगले जीवन जगायचे आहे.’ काकुळतीला येऊन पुढे म्हणतो, ‘मला तुमच्यातच राहू द्या ना, प्लीज!’ याच मालिकेवर भाष्य करताना ‘चला हवा येऊ  द्या’च्या मंचावर सागर कारंडे एकत्र राहणाऱ्या तरुण मुला/मुलींच्यातर्फे निकोप प्रेमाचा हवाला देऊन त्यांच्या पालकांना निश्िंचत करतो. ‘जुळून येती रेशीमगाठी’मध्ये नायिकेच्या भूतकाळाला विसरायला, तिच्या प्रियकराचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हातभार कोण लावतं तर तिचा नवरा, सासू सासरे! ‘होणार सून..’मध्ये श्री आणि आई आजी म्हणजे तर समाज सेवेचे व्रत घेतलेले धुरीणच जणू! शिवाय सासू, नणंद, भावजय, बहीण आणि सून अशी विविध नाती असलेल्या सहा स्त्रिया चक्क गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. जान्हवीला ड्रायव्हिंग शिकवीत असताना श्री सहज म्हणून जातो ‘जो माणूस हॉर्नचा कमीत कमी वापर  करतो तो उत्तम ड्रायव्हर!’ वा  क्या बात है! आणि ‘का रे  दुरावा..’ ज्येष्ठांना विरंगुळा म्हणून, आधुनिक जगाशी संपर्कात राहण्यासाठी ‘ल्याप टोप’ची ओळख करून देणारा, वारंवार अपमान होऊनही बायकोच्या बापाचा अवमान होणार नाही अशी दक्षता घेणारा जय! अगदी सहजी लक्षात आलेले हे प्रशंसापात्र मुद्दे! अगदीच ‘काऽऽहीऽऽ  हीऽऽ.’ नाही बरं का!
– अनिल ओढेकर, नासिक.

होऊन जाऊ द्या आणखी पंचनामा
टीव्ही सीरियल्सबद्दल हल्ली खूप लेख ‘लोकप्रभा’त छापून येत असतात. पराग फाटकांचा पंचनामा नावाचा एक कॉलमपण सुरू झालेला आहे. यात पहिल्याच लेखात त्यांनी ‘होणार मी..’चा मस्त पंचनामा केला होता. आता एकदा ‘का रे दुरावा’पण होऊन जाऊ  द्या. साधेपणाच्या नावाखाली बिनडोकपणा करणारे जय-अदिती आता डोक्यात जायला लागलेत. जुई आपल्यावर मरत्येय हे जयला कळात नाही यावर शेंबडं पोरपण विश्वास ठेवणार नाही. केतकर काकांचा रोखठोकपणा चांगला वाटतो, पण काकू जरा जास्तच अदितीच्या प्रेमात आहेत. शोभाला सहन करण्याचा मूर्खपणा त्या करतात हे काकांना कसं चालतं? अरविंद कदम इतका माठ आहे तर ऑफिसच्या हिशेबांचं कल्याण आणि नंदिनीचा बिनडोक भोचकपणा आणि अगोचरपणा आता उबगवाणा होतोय. अर्धवट बोलून गैरसमजांचे गोंधळ उडणं आता विनोदी वाटेनासं झालंय. रजनीच्या तोंडाला बांधलेलं कुत्रं कोणत्या जातीचं आहे ते एकदा सांगून टाका म्हणजे साईप्रसाद त्याप्रमाणे आपली चाल खेळेल. दाभोळकरांसारखा करोडपती कॉलर उसवलेले शर्ट घालतो आणि आपला उद्योग सोडून देव टूर्सच्या ऑफिसमध्ये टाइमपास करत बसतो आणि याची कंपनी म्हणजे मल्टी नॅशनल. सगळा बाजारबुणग्यांचा धिंगाणा. पण मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे दुसरं काही करता येत नाही म्हणून ही हलतीबोलती चित्रं बघावी लागतात नाइलाजाने. आम्हाला हवं ते दाखवण्याचा शहाणपणा कधी सुचणार टीव्ही वाल्यांना?

थोडय़ाच दिवसात ‘नांदा सौख्यभरे’चं पण तेच होणार अशी चिन्हं दिसायला लागल्येत. नवीन लग्न झालेल्या मुलीच्या सासरी लगेच धाकटय़ा बहिणीला अभ्यासाला पाठवण्याचा देशस्थी घोळ देशपांडे मंडळींनी घातलाय. स्वानंदीशिवाय तिचा अभ्यास कुणी घेऊ शकत नाही म्हणे. अंगठा छाप आहेत का बाकीचे सगळे? प्रोफेसर माणूस इतका बावळट का दाखवतात नेहमी? चांगला शिकलेला, शंभरेक तरुण मुलांसमोर विश्वासाने बोलणारा माणूस इतका मूर्ख कसा असेल? कालपर्यंत आई आई करणारी मुलं एका रात्रीत लगेच बायकोच्या कच्छपि कशी लागतात? आईला किंवा इतर कुणाला न सांगता परस्पर कुणाला तरी घरी आणायचा निर्णय घरातला तरुण मुलगा कसा घेतो? अशा वेळी ती आई पिसाळली तर तिचा दोष कसा? भर स्वयंपाकघरात मिठय़ा मारण्याइतकं धीट वातावरण कुठल्या मराठी घरात असतं? वेळेवर सावरा आणि आवरतं घ्या म्हणावं.
– कल्याणी नामजोशी.

मग अपमानस्पद वागणूक का?दि. ११ डिसेंबरच्या अंकातील ‘वेदनेचा हॅपी’ आविष्कार हा वैशाली चिटणीस यांचा लेख वाचला. शनीशिंगणापूरमध्ये महिलेने केलेल्या या बंडामुळे देव दर्शन आणि महिला हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आपल्या देशातील काही राज्यांतील मंदिरात महिलांना प्रवेश नाही. तसेच मुस्लीम आणि जैन धर्मीयांच्या अनेक मंदिरे, मशिदीमध्ये महिलांना प्रवेश नाही. केरळ राज्यातील शबरीमाला मंदिरात १० ते ७० वर्षांपर्यंतच्या महिलांना प्रवेश देण्यावरून वाद निर्माण झाला. आसाम, आंध्रमधील काही मंदिरांत महिलांना प्रवेश नाही. कारण काय मासिक पाळी. वास्तविक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत निसर्गाने स्त्रीला मासिक पाळी प्रक्रिया बहाल केली आहे.

महाष्ट्रातसुद्धा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नव्हता. जनतेने आंदोलन केल्यावर गेल्या ७-८ वर्षांपासून तेथे महिलांना प्रवेश सुरू झाला. देव हा सर्वाचा असतो. तेथे स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो. तसेच स्त्रीची अनेक रूपे असली तरी मुळात ती जगतजननी आहे. सर्व धर्मामध्ये स्त्री पूजनीय आहे. मग तिला इतकी अपमानास्पद वागणूक का? प्रबोधनकार ठाकरेंनी असे म्हटले आहे की, या देशातील तरुण स्वत:च्या विचाराने वागेल, तेव्हा त्याच्या विचारांचा पहिला हातोडा देवावर आणि देवळावर पडेल. पण आता तो देवाच्या दलालांवर पडला पाहिजे.
– सुनील कुवरे, शिवडी, मुंबई.

चीनशी तुलना करण्याआधी आपले काय चुकते ते पहा…

उमेश
मुळात हे सगळे देशात बनवायचे तर आधी सेमी-कंडक्टर इंडस्ट्री उभारा. देशात एक चिप आपण बनवू शकत नाही आणि सेटटॉप बॉक्स बनवायच्या बाता करतो आहोत! इंटेल, एमडी इत्यादीची चिप फॅब्रिकेशन इंडस्ट्री चीनमध्ये आहे. कोणतेही बऱ्यापैकी आधुनिक तंत्राचे उत्पादन बनवायचे असेल तर आपल्याकडे तिचे हृद्य, म्हणजे चिप्स बनवायचे तंत्र नाही. तेव्हा कोणाच्या घशात काय गेले हे बघण्यापेक्षा आपली इंडस्ट्री सुधारा. सेमी-कंडक्टरसारखा उद्योग करायचा असेल तर मोठय़ा कंपन्यांनी संयुक्तपणे डिझाइन करून चिप्स बनवल्या पाहिजेत. इतरत्र असे झाले आहे. कोरियाने तेच केले. ब्लू-रे तंत्रज्ञान जगातील १२-१४ कंपन्यांनी मिळून बनवले. एवीतेवी टेलीकॉम टॉवर शेअर करता, मग इकडे यांचे घोडे मार का खाते? मुळात भारतीय उद्योजकांत भारतात काम करताना निकोप स्पर्धेचे वावडे आहे व भ्रष्ट राजकारणी, नोकरशाहीसकट तेदेखील या समस्येचे मूळ आहे.

मुंबईकर
हल्ली बहुतेक मोठे ब्रॅण्ड चीनमधूनच इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवून घेतात. कारण ते स्वस्त पडते. आपले केबल ऑपरेटर आणि त्यांना पोसणारे राजकीय नेते जर इमानदारीत राहतील तर हे सगळे खर्चीक द्राविडी प्राणायाम करावेच लागणार नाही. त्यामुळे २२ हजार कोटी हे सेट टॉप बॉक्सचे नसून आपल्या देशातील काही नेत्यांच्या बेईमानीसाठी खर्च करावे लागत आहे असे म्हणणे योग्य ठरेल.

संजय तेलंग
सेट टॉपबॉक्ससाठी चीन, बुलेट ट्रेनसाठी जपान, स्वच्छ गंगेसाठी जर्मनी, अणुभट्टीसाठी फ्रान्स, संरक्षण सामुग्रीसाठी रशिया आणि इतर अनेक गोष्टींसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन व तत्सम सारे देश. ही बातमी वाचून गेल्या साठ वर्षांत काही झाले नाही ह्यचीच लाज वाटते. पाया मजबूत असेल तर इमले बांधता येतात. नाही तर ‘गणपत वाणी विडी पिताना ..’ गत होते. फिर भी मेरा भारत महान, वा वा..

श्रीकांत
सध्या ज्या योजना सरकार रेटते आहे त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू चीनमधून येत आहेत. टीव्हीसाठी सेट टॉप बॉक्स, एलईडी दिवे, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत लावल्या जाणाऱ्या टाइल्स (आता शौचकूपसुद्धा येतायत.) देशांतर्गत पुरवठा नसताना योजना रेटायच्या कोणासाठी? आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ??

विजय शहा
आज चायनीज वस्तू नसत्या तर तुम्हाला जगणेच कठीण झाले असते. त्यांच्यामुळेच तर गरीबातल्या गरीब माणसाला आज मोबाइलसारख्या वस्तू परवडत आहेत. त्यांचे आभार मानण्याऐवजी त्यांना काही तरी शिव्या द्यायच्या या मानसिकतेतून आता बाहेर या. तुमच्यात दम आहे का एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याचा? चायनीज वस्तूंमुळे अगदी नेटसुद्धा प्रत्येक घराघरांत आणि प्रत्येक मुला-मुलींच्या मोबाइलमध्ये आले आहे. त्यामुळे आता स्वदेशी स्वदेशी सोडा आणि जागतिक स्पर्धेचा मुकाबला करायला तयार व्हा.

स्वप्नील
मोबाइल हातात आले म्हणजे प्रगती झाली असे नाही. याच सरकारच्या कृपेने फेसबुक फ्री बेसिक्ससारखे लुटमार आर्थिक कार्यक्रम राबवू धजतंय याचीही जाणीव असावी. हा कार्यक्रम अमलात आला तर हे मोबाइल वगैरे कुचकामी ठरतील. कारण आपल्याला इंटरनेट परवडणारच नाही. तेव्हा सरकारच्या कोणत्याही गोष्टीचे कसेही समर्थन करायचे हे सोडले पाहिजे.

श्रीकांत
सरकारी योजनांचा फायदा भारतीय उद्योजक नक्की घेऊ  शकले असते जर त्यांना मुदत मिळाली असती तर. त्याऐवजी त्याचा फायदा चीनला मिळतोय याची खंत वाटते.

अनामिका
भारताला काय पाहिजे ते चीनच्या लोकांना माहीत असते म्हणून चीन भारताच्या कितीतरी पुढे आहे. इथले राजकारणी भ्रष्टाचार करण्यात कुठे हाथ मारायला मिळेल हे बरोबर शोधून काढतील, त्यामध्ये जगात एक नंबर भारतच असेल.

रोहिणी केदार
टीव्हीवर इतके दिवस सेट टॉपबॉक्स घ्या असे ओरडून सांगत होते तरी काही फरक पडला नाही. याचा अर्थ टीव्हीचा चांगला उपयोग काही नाही, त्यातून प्रबोधन होत नाही आणि मनोरंजनावर कुणी किती पैसा खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण लेखात ती जीवन आवश्यक वस्तू असल्यासारखा उल्लेख केला आहे आणि सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वाचक प्रतिसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers response

ताज्या बातम्या