06-lp-lpcvr‘लोकप्रभा’च्या (५ फेब्रुवारी) अंकातील ‘दुभंगलेल्या समाजाचे विद्यापीठीय धडे’ ही कव्हर स्टोरी वाचली. रोहित वेमुला या विद्यार्थ्यांचा सर्व घटनांचा क्रम आपण कव्हरस्टोरीत मांडला आहे. काही दिवसांपूर्वीच चेन्नई विद्यापीठातील आंबेडकर- पेरियार संघटनेच्या विद्यार्थ्यांचे प्रकरण गाजले. आता हैद्राबाद विद्यापीठातील रोहित या विद्यार्थ्यांचे प्रकरण संपूर्ण देशात गाजत आहे.

संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आपले जीवन संपविणे, ही घटना कुणाच्याही काळजाला घर पाडणारी आहे. त्याहीपेक्षा देशाला मान खाली घालायला लावणारी आहे. रोहितच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध अजून लागायचा आहे. स्वप्ने उराशी बाळगून त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या एका उमद्या आणि हुशार विद्यार्थ्यांचा व्यवस्थेने बळी घेतला. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. जोपर्यंत मानसिकता बदल नाही, तोपर्यंत व्यवस्था बदलणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित विद्यार्थ्यांबदल म्हटले होते की, विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षा पास होऊन चालणार नाही, तर त्या शिक्षणाचा उपयोग आपण समाजातील अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केला पाहिजे. याच विचाराने रोहित अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत होता असे वाटले. याकुब मेमन या अतिरेक्याला फाशीची शिक्षा झाली. त्या वेळी देशातील अनेक मानवतावादी विचारवंतांनी याकुबच्या फाशीला विरोध दर्शविला होता, पण तोच सूर लावला म्हणून रोहित मात्र देशद्रोही ठरवला गेला. हा सर्व प्रकार म्हणजे विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांवर कोणतेही सबळ कारण आणि ठोस पुरावे नसताना केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी विद्यापीठावर दबाव टाकून कारवाई केली गेली, जी नि:संशय अन्यायकारक होती. दुसरीकडे रोहित हा दलित नाही, असे मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी जाहीर केले. तर राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले.

एखाद्या गोष्टीवर सरकारला अडचणीत आणणे चुकीचे नाही, परंतु एखादा विषय कुणी किती ताणायचा हा प्रश्न उरतोच. रोहित हा दलित होता, परंतु आत्महत्या ही दलिताची असो की कोणत्याही जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांची ती घटना निश्चितच वाईट आहे. पण या प्रकरणाचा विचार करताना विद्यापीठाचे काही नियम, अटी असतात. त्याचाही विचार करावा.
– सुनील कुवरे, शिवडी, मुंबई.

बीटी वांग्याचा हव्यास कशाला?
07-lp-lpcvr
‘बीटीचे वाण : वास्तव अन् अवास्तव’ (लोकप्रभा, २९ जानेवारी) ही विनायक परब यांची कव्हर स्टोरी वाचनात आली. शेतकीतज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी बीटी वाणाबाबत सुचविलेले उपाय सरकार आणि समाज यांच्या हिताचे असले तरी त्याचे भविष्यातील फायदे-तोटे आपण पडताळून पाहिले पाहिजेत. कापसाच्या वाणाला रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर करण्यात आला होता. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली, तसेच काही शेतकऱ्यांनी बीटी कापसाच्या उत्पादनासाठी कर्जेही घेतली होती. त्याची परतफेड वेळेवर करता आली नाही आणि ते कर्जबाजारी झाले. बीटी वांग्याबाबत त्याला कोणत्याही प्रकारचे कीडनाशक लागत नसल्याचा दावा केला होता, पण त्याची कायमस्वरूपी शाश्वती मात्र देता येत नाही. शेतकऱ्यांनी बीटी वांग्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली तर भारतातील मूळ वांग्याच्या जाती धोक्यात येतील. स्वजातीय वांग्याच्या काही जातींमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. मानवी आरोग्यासाठी अशी वांगी चांगली असतात. बीटी वांग्याचे बियाणे विदेशी कंपन्यांकडून घ्यावी लागतील अशी मतंही काही जाणकारांनी काढली होती. जगात वांगी उत्पादनात प्रथम क्रमांकाचा चीनचा तर दुसरा भारताचा लागतो. स्वजातीय वांग्याचे विक्रमी उत्पादन भारतात होते. काही वेळेला बाजारपेठेअभावी वांगी फेकून द्यायची वेळ येते, त्यामुळे बीटी वांग्याचा हव्यास कशाला? सद्यपरिस्थितीतही बीटी अन्नधान्य वाणाच्या उत्पादनाला सुरुवात झाली, म्हणजे अनेक देशी अन्नधान्य व भाजीपाल्यांचे वाण संकटात येतील आणि त्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या काही उपयोगी किटकांच्या जातीही नष्ट होतील. संकरित बियाणांच्या अतिवापरामुळे कोकणातील तांदळाच्या देशी जाती आज कायमच्या नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यकाळात भरघोस उत्पादन घेण्याच्या नादात आपण निसर्गातील महत्त्वाच्या अन्नसाखळीला धोका पोहचवत नाही ना, हे डोळसपणे तपासले पाहिजे.
– सुहास बसणकर, दादर, मुंबई.

भारत सुट्टय़ांचा देश
08-lp-lpcvr
‘लोकप्रभा’ (५ फेब्रुवारी २०१६) ‘बंद करा सुट्टय़ांची चंगळ’ हा लेख नोंदअंतर्गत वाचला. यातील आकडेवारी बघता सरकारी कर्मचारी वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी २०१ दिवस हक्काने घरी बसू शकतो. हे पाहिल्यावर व वाचल्यावर भारत खरोखर सुट्टय़ांचा जगातील एकमेव देश आहे असे वाटते. आता तर बँकांनाही द्वितीय व चौथा शनिवार लागू केला. लागोपाठ सुट्टय़ा आल्या की कार्यालय व बँकासुद्धा आठवडाभर बंद राहतात व यामुळे सर्व व्यवहार ठप्प असतात.

देशाची व कुटुंबाची उन्नती व विकास व्यक्तीच्या क्रयशक्तीवर अवलंबून असतो आणि वर्षांतील ३६५ पैकी २०१ दिवस घरी राहिल्यावरही क्रयशक्ती ठप्प होते. व्यक्ती निष्क्रिय बनते व आळशी बनून रोगांना निमंत्रण देते. काम हीच पूजा (work is worship)) असताना सुट्टय़ांना प्राधान्य देणे हे सर्वस्वी चूक आहे. ‘‘पगार वाढवा म्हणणाऱ्यांनी कधी सुट्टय़ा कमी करण्यासाठी आंदोलन केलेले नाही’’ (लेखातील वाक्य) खूप बोलके आहे.

देशाची उन्नती व विकास घडवून आणावयाचा असेल तर चीन व जपानसारखी व्यक्तीची क्रयशक्ती वाढविण्यासाठी सुट्टय़ा कमी करा. कर्मचाऱ्यांना निरोगी, निकोप ठेवून सशक्त ठेवायचे असल्यास सुट्टय़ा कमी करायलाच हव्यात.
– धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद.

अनुवादकाचे कौतुक
‘लोकप्रभा’च्या (५ फेब्रुवारी) अंकातील ‘भारतीय समाजाचा डीएनए’ हा लेख वाचला. या लेखात चिटणीस यांनी देवदत्त पटनायक यांच्या ‘जय’ या पुस्तकाचे कौतुक केले आहे. पण ज्यांच्या सुरस मराठी अनुवादामुळे हा ग्रंथ आपणांस मराठीत वाचवयास मिळाला त्या अभय सदावर्ते यांचा नुसता उल्लेख केला आहे. वास्तविक त्यांचेही सढळ हाताने कौतुक करायला हवे होते. म्हणून या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या अभय सदावर्ते यांचे अभिनंदन व आभार.
– सुरेंद्रनाथ मोरे, कोळेगाव-डोंबिवली (पूर्व).

दुनियादारीचा प्रयोग आवडला
दि. ५ फेब्रुवारीच्या अंकातील पराग फाटक यांचा दुनियादारीचा ‘प्रयोग’ हा लेख आवडला. खरंच या मालिकेने अवाजवी, भंपक गोष्टी दाखवण्यापेक्षा सर्वसामान्य गोष्टी पुढे आणल्या आणि दाखवल्या. एरवी मालिका म्हटलं की, चकचकीतपणा, झगमगाट असतोच. पण, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका अपवाद ठरली. सुरुवातीच्या काही एपिसोड्समध्ये मालिकेची भट्टी चांगली जमली होती. मधल्या काळात जरा गडबड झाली होती. पण, इतर मालिकांपेक्षा ही मालिका नेहमीच चांगली ठरली. साधेपणा हे त्याचं एकमेव कारण.
– सुशांत गुप्ते, नाशिक.

वाचनीय अंक
‘गौरी बोरकर’ यांचे बोट धरून ‘गोबीचे रण’ पार केले. प्रसाद हावळेसोबत विज्ञान परिषदचे अधिवेशन न्याहाळत होते, तर ‘चौकटीबाहेरचं चित्र शिबीर’ बघता-बघता ‘अस्तुला तथास्तु’चे दर्शन घडले. ‘तेजाली कुंटे’ यांची डोळे उघडणारी सुलोचना भेटली. तर भाकरीने टचकन डोळ्यांत पाणी उभे केले. ‘मृत्यू एका समुद्राचा’ माणसाच्या लोभी वृत्तीचा परिणाम पृथ्वी तलावर कसा धुडगूस घालतोय याचा परिचय झाला. हा धक्का पेलवत असतानाच प्रचंड भूक लागली होती, तर ‘वैशाली चिटणीस’ यांच्या कुकर, पातेलं कढईतील आवडती- नावडती, पातळ- फडफडती आळसावलेली कंटाळा आल्यावरच्या समयीची मैत्रीण अगदी जिवाभावाची वाटणारी, अशी- तशी, कानडी बिशी बाळी हुळी अन्ना, आजाऱ्यांचं सुपाच्य जेवण, ‘हेमकुंडसाहेब’ला ४६३२ कि. मी. उंचीवर गुरुद्वाराचा प्रसाद म्हणून उंचावलेली खिचडी चाखली. ‘पुन्हा एकदा भात पुराण’ खूप मज्जा आली. असे तपशील ज्ञानवर्धक, २९ जानेवारी २०१६ चा ‘लोकप्रभा’चा दिवस खूप छान गेला.
– संध्या बायवार, बानापुरा, जि. होशंगाबाद (म.प्र.).

नवे स्वरूप आवडले
अनेक वर्षांच्या छंदापायी ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाचा अंक, त्यातील विविध सदरांमुळे वाचल्याशिवाय आठवडय़ाची समाप्ती होत नाही. ८ जानेवारीचा अंक वाचनीय आणि विचार प्रवर्तक निश्चितच आहे. विनायक परब यांचा ‘समकालीन’ मधील ‘कोण होती हेमा उपाध्याय’ लेख मनाला चटका लावून राहिलाय. संवेदनशील कलावंताला अशा प्रकारे जगाचा करुण निरोप घ्यावा लागावा, हे खूपचं विलक्षण. ‘मथितार्थ’ महात्मा गांधींच्या विधानानं सुरू करून स्वातंत्राची महती पटविताना त्याचा उपयोग योग्य त्या प्रमाणात करण्याचा सल्लाही शेवटी पटवून दिला आहे. कव्हर स्टोरीने तर नवीन वर्षांच्या निमित्ताने संकल्प करून ते पूर्ण न करण्यात किती व कशी मजा असते याचे मजेशीर वर्णन करताना संकल्पाचे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांचे उदाहरण देऊन थेट चीनमधील बाटलीबंद ऑक्सिजनशी त्याचा संबंध जोडून आपल्याकडील राजकीय झुंजीचीही तुलना ओघानेच केलेली चांगलीच जाणवते. भारतीय वर्षांरंभाची परंपरा ‘सूर्यभ्रमण किंवा चंद्रभ्रमणानुसार मानली तरी ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर दैनंदिन आयुष्यात केला जातो याचा मेळ छानच जमला आहे. ज्योतिषशास्त्रानुसारच्या पद्धती व मान आणि पंचांगांतील वर्षांरंभाचा तौलनिक अभ्यासपूर्ण लेख अंकाची पूर्तता सिद्ध करतो. ‘पडद्यामागचे’ या सदरातील लेखात सर्वसाधारण चित्रपटरसिकांना ज्ञात नसलेले कॅमेऱ्यामागचे वास्तव, परिवर्तनासह चित्रपट बनवितानाचा इतिहास आणि या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील वेगवान विकास याबाबत उज्ज्वल निरगुडकर यांच्यावरील सोप्या शब्दातील विश्लेषणात्मक लेखाने ज्ञानात भर टाकली आहे. मराठी कलादिग्दर्शकाची घेतलेली ‘दखल’ अभिमानास्पद असून मराठी कलाकारांना प्रेरणादायी आहे. याशिवाय नेहमीच्या सदराव्यतिरिक्त ‘कॉर्पोरेट जगताची कथा’ यामुळे साप्ताहिक वाचनीय व संग्राह्य़ झाले आहे.
– नरेश नाकती,  ई-मेलवरुन